Friday 24 June 2022

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा - पालकमंत्री राजेश टोपे

 




 

जालना दि. 24 (जिमाका):-  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जालना जिल्ह्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षासाठी 358 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी मंजूर आहे.  या मंजूर निधीच्या खर्चाचे काटोकोर नियोजन करुन प्रत्येक विभागाने त्यांना दिलेला निधी वर्षभरात विविध विकास कामांवर वेळेत खर्च होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या  त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, माजी आमदार चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी आदींसह समिती सदस्य व विभाग  प्रमुख  यांची उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजनेंर्तगत वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये जालना जिल्ह्याच्या विकास कामांसाठी  336 कोटी 21 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या निधीपैकी जवळपास 98.17 टक्के निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यात आल्याने त्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत चालू वर्षातही मंजूर असलेला निधी पूर्णपणे खर्च करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

ग्रामीण भागांमध्ये रोहित्र नादुरुस्त असणे तसेच रोहित्रांसाठी ऑईल नसल्यामुळे अनेक गावांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येत आहे.  ही अतिशय गंभीर बाब असुन ज्या गावाधील रोहित्रे नादुरुस्त आहेत ती तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. तसेच जी रोहित्रे केवळ ऑईल नसल्यामुळे बंद आहेत अशा रोहित्रांसाठी अधिकचे ऑईल प्राप्त करुन घेऊन रोहित्रे सुरु करण्यात यावीत.   जिल्ह्यातील एकाही गावात रोहित्रांच्या नादुरुस्तीमुळे वीज खंडीत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना सुरु आहेत.  परंतू केवळ कंत्राटदार वेळेत काम करत नसल्याने या योजनांचे काम वेळेत पुर्ण होत नसल्याच्याही तक्रारी येत आहेत.  ज्या ज्या भागात कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा योजनांची कामे रखडलेली असतील अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांच्यासह समिती सदस्यांनी उपयुक्त अशा सुचना केल्या.   या सुचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुर्यवंशी यांनी सन 2021-22 मध्ये झालेल्या खर्चाची तसेच सन 2022-23 मधील निधी वाटपाची माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन सभागृहाला दिली.

बैठकीस सर्व विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

*******

No comments:

Post a Comment