Wednesday 22 June 2022

पूर परिस्थितीत काय करावे, काय करु नये..!

 


 


 

       अतिवृष्टीमुळे अचानक  पूर परिस्थिती  निर्माण होवून भीतीचे वातावरण तयार होते.  पुरामुळे मोठया  प्रमाणात जिवीत व वित्त हानीही  होते. मात्र, पुर परिस्थितीत घाबरुन  न जाता  वेळीच उपाययोजना केल्यास पुरापासून उदभवणाऱ्या धोक्यातून नक्कीच  बचाव करता येऊ शकतो.  पूर आल्यास  नक्की काय करावे किंवा काय करु नये, याबाबतची माहिती  या लेखातून मांडण्यात आली आहे.   

पूर परिस्थितीत काय करावे --

आपल्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती असल्यास तात्काळ तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा व परिस्थिती बाबत कळवावे. तसेच गावचे तलाठी, पोलिस पाटील यांनाही कळवावे. जिल्हा नियंत्रण कक्षासही दुरध्वनीव्द्वारे तात्काळ कळवावे. जवळच्या तहसील कार्यालयातून आपल्या गावासाठी निश्चित करण्यात आलेल्या जवळच्या सुरक्षित स्थलांतर करण्यासाठीच्या ठिकाणांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून पूर परिस्थिती उदभवल्यास त्याचा उपयोग होईल. पुरादरम्यान उकळलेले अथवा क्लोरीनद्वारे शुध्द केलेले पाणी प्यावे.  खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत. जास्त आहार घेवू नये किंवा हलका आहार घ्यावा. पूर परिस्थितीमध्ये बैलगाडी, कृषी उपयोगी मशिन, पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे. आपातकालीन बॉक्स नेहमी आपल्या जवळ बाळगावा. ज्यामध्ये एक छोटा रेडिओ, बॅटरी, पाणी, कोरड्या स्वरूपातील अन्नपदार्थ, मेणबत्ती, माचिस इ. आवश्यक वस्तुंचा समावेश असावा. आपातकालीन परिस्थितीमध्ये जर स्थलांतर करण्याच्या सूचना मिळाल्यास सर्वात पहिले थंडीपासून बचाव करणारे कपड़े, औषधी, मौल्यवान वस्तु, वैयक्तीक महत्वाची कागदपत्रे वॉटरप्रूफ पिशवीमध्ये भरून सुरक्षित ठेवावेत. आपातकालीन परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करणाऱ्या पथकाला संपूर्ण सहकार्य करावे. पूर परिस्थितीमध्ये ताज्या घटनांसाठी अथवा काही सूचना मिळण्यासाठी रेडिओ / टीव्ही यांचा उपयोग करावा.

 पूर परिस्थितीत काय करू नये --

            अतिवृष्टीच्या वेळी नदीस पूर आला असल्यास नदी दुथडी भरून वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.  लहान मुलांना पुराच्या पाण्याजवळ जावू देवू नये. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा इतर कोणत्याही पद्धतीने पूल पार करण्याचा प्रयत्न करू नये.  घरात पाणी घुसण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वप्रथम विजेचे सर्व कनेक्शन बंद करावे. पुरामुळे प्रभावित झालेल्या विद्युत उपकरणांचा वापर करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचा उपयोग करू नये. अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये जे पुराच्या पाण्याने प्रभावीत झालेले आहे. अफवांवर लक्ष देवू नये अथवा अफवा पसरवु नयेत.

-- जिल्हा माहिती कार्यालय,

   जालना

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment