Sunday 5 June 2022

पर्यावरण दिनानिमित्त राणी उंचेगाव येथे 7.50 लक्ष बांबू लागवडीचा शुभारंभ कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या बांबूची शेतकऱ्यांनी लागवड करावी -- जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

 




जालना दि. 5 (जिमाका) : कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या बांबूला  बाजारात मोठ्या प्रमाणात  मागणी आहे. बांबू लागवडीसाठी पोकरा योजनेतून अनुदानही देण्यात येते. शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी अधिकाधिक बांबूची लागवड करण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

     जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाअंतर्गत घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव  येथे जिल्हाधिकारी डॉ.  राठोड यांच्या  हस्ते 7 लक्ष 50  बांबू लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी   भिमराव  रणदिवे, डॉ. सुयोग कुळकर्णी, भरत मंत्री, इक्बाल कुरेशी, शैलेश बजाज ,  तालुका कृषी अधिकारी  राम रोडगे, कैलास शेळके यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

    जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यातील 363 गावांमध्ये जवळपास 3 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही लागवड शेतकऱ्यांच्या वैयक्तिक तसेच गावातील सार्वजनिक जमिनीवर करण्यात येणार आहे. यासाठी शासन निकषाप्रमाणे अनुदानही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

      बांबू लागवडीमुळे  वनाच्छादन वाढून जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. 4 ते 5 वर्षांपासून बांबूचे उत्पादन होऊन बाजारात मागणी असलेल्या अनेक वस्तू या बांबूपासून तयार होतात. बांबू आधारित उद्योगामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडत असल्याने शेतकऱ्यांनी बांबूची अधिकाधिक लागवड करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केले.

***

 

No comments:

Post a Comment