Tuesday 28 February 2023

जालना शहरातील भोकरदन नाका येथील भारती लॉनमध्ये 1 मार्चला मेळावा पीएम स्वनिधी योजनेच्या संबंधित लाभार्थ्यांना कर्ज वितरण मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.28 (जिमाका) :- पी.एम. स्वनिधी योजनेचा कर्जवितरण मेळावा बुधवार दि.1 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता जालना शहरात भोकरदन नाका येथील भारती लॉनमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील पीएम स्वनिधी योजनेच्या सर्व संबंधित लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,  असे आवाहन जिल्हा प्रशासन अधिकारी विक्रम मांडुरके यांनी केले आहे.

पीएम स्वनिधी योजनेच्या कर्ज वितरण मेळाव्यास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे सहकार आणि इतर बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे आणि जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, जालना नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर आणि जालना नगर विकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी विक्रम मांडुरके आदी विनीत आहेत. असे   जिल्हा प्रशासन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

‘महिला आयोग आपल्या दारी उपक्रम’ 2 मार्चला जालना जिल्ह्यात अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या - अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आवाहन

 


जालना, दि.28 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी’ या  उपक्रमातंर्गत जालना जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार, दि. 2 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी  कार्यालय, जालना येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. तरी जालना जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणी अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

बैठकीनंतर अध्यक्षा रुपाली चाकणकर या जालना  जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलिस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी  कार्यालय, जालना  येथे होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई  कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोगाद्वारे करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाल्या आहेत तर  दि. 2 मार्चपासून  इयत्ता  दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. तसेच दि. 6 व  7 मार्च रोजी होळी व धुलिवंदन, 10 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती आणि दि.11 मार्च रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने  विविध मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी निर्गमित केले आहेत.

इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाल्या आहेत तर  दि. 2 मार्चपासून  इयत्ता  दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. तसेच दि. 6 व  7 मार्च रोजी होळी व धुलीवंदन उत्सव साजरा होणार असल्याने मिरवणुका व विविध कार्यक्रम होणार आहेत. आणि दि.10 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. तरी या  सण,  उत्सवाच्या अनुषंगाने मिरवणुका व विविध कार्यक्रम होणार आहे. संकष्ट चतुर्थी दि.11 मार्च रोजी असल्याने राजूर, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने भाविकांची सदर ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी व शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.  

शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगणार नाही.  तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही आणि गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणापत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि. 1 मार्च 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 15 मार्च रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आलेले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये जमावास प्रतिबंध

 


जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच होळी व धुलीवंदन आणि तिथीप्रमाणे शिवजयंती, संकष्ट चतुर्थी असल्याने मिरवणूका व विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये दि.1 ते 15 मार्च 2023 रोजीपर्यंत जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.

दहावी व बारावी परीक्षा तसेच दि.6 व 7 मार्च रोजी अनुक्रमे होळी व धुलिवंदन उत्सव, दि.10 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती मिरवणुक आणि दि.11 मार्च रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजूर, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने भाविकांची सदर ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी व शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्वारे पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आले आहे. हा आदेश अधिकारी-कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक व जालना, अंबड, परतुर, भोकरदन उपविभागातील पोलीस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू असणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि.1 मार्च 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 15 मार्च रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Friday 24 February 2023

‘महिला आयोग आपल्या दारी उपक्रम’ 2 मार्चला जालना जिल्ह्यात अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या - अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आवाहन

 

 

जालना, दि.24 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी’ या  उपक्रमातंर्गत जालना जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार, दि. 2 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी  कार्यालय, जालना येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. तरी जालना जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणी अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

बैठकीनंतर अध्यक्षा रुपाली चाकणकर या जालना  जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलिस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी  कार्यालय, जालना  येथे होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई  कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोगाद्वारे करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रस्तावासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ

 


जालना, दि.24 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आपल्या महाविद्यालयातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्याचे प्रस्ताव दि. 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत महाविद्यालयीन स्तरावर स्विकारुन सदरचे प्राप्त प्रस्ताव दि. 17 फेब्रुवारीपर्यंत या कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि काही महाविद्यालयांनी अद्यापही जालना येथील समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे विद्यार्थ्याचे प्रस्ताव सादर केलेले नाहीत, त्याअनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील नवीन/नुतनीकरणाचे संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयीन स्तरावर दि. 10 मार्च 2023 पर्यंत स्विकारावेत तसेच महाविद्यालयांनी प्राप्त प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जालना येथे दि. 15 मार्चपर्यंत सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*- 

दहावी व बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या खेळाडुंनी गुणवाढीसाठी प्रस्ताव सादर करावेत

 


 

जालना, दि.24 (जिमाका) :- राज्य मंडळ सचिवांचे दि. 12 डिसेंबर 2022 रोजीचे तसेच औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिवाचे दि.2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या पत्रातील निर्देशानूसार गुणवाढीसाठी खेळाडूंनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. तरी  जालना जिल्ह्यातील संबंधित सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी व बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंचे गुणवाढीसाठीचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात बुधवार    दि. 5 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या आणि जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि.20 डिसेंबर 2018 व 25 जानेवारी, 2019 अन्वये अनुक्रमे 5 ते 25 गुण देण्यात येत असतात. राज्य मंडळाच्या दि. 12 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार प्रति विद्यार्थी 25 रुपये छाननी शुल्क, बँक चलनाद्वारे किंवा रोखीने भरणा करुन प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील. या प्रकरणी शासनाच्या निर्देशानुसार कमी अधिक बदल झाल्यास संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह शारीरिक शिक्षकांमार्फत दि. 5 एप्रिल, पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्याकडे सादर करावेज. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत किंवा मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

साहित्यरत्न अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन थेट कर्ज योजनेच्या लाभार्थींनी 3 मार्च रोजी चिठ्याद्वारे निवडीसाठी उपस्थित रहावे

 


जालना, दि.24 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ( मर्या.) जिल्हा कार्यालय जालनामार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत  दि.28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले होते. पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तरी जालना जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी थेट कर्ज योजनेच्या लाभार्थींच्या चिठ्याद्वारे निवडीसाठी शुक्रवार दि.3 मार्च 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथील सांस्कृतीक सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी केले आहे.

थेट कर्ज योजनेअंतर्गत एकुण 773 कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 570 कर्ज मागणी अर्ज पात्र व 203 कर्ज मागणी अर्ज अपात्र झाले आहेत. पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष 364 व महिला 204 आहेत. सदर योजनेचे 50 कर्ज प्रकरणाचे उद्दीष्ट असुन त्यापैकी पुरुष 25 व महिला 25 कर्ज मागणी अजांची मा. अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी जालना यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिठ्याव्दारे (लॉटरी पध्दतीने) निवड करावयाची आहे. त्याकरिता दि. 3 मार्च 2023 रोजी सकाळी 11  वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहात अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड चिठ्याद्वारे करण्यात येणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

"जागृत पालक सुदृढ बालक" मोहीम आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करुन घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 



 

जालना, दि.24 (जिमाका) :- "जागृत पालक सुदृढ बालक" ही मोहीम जिल्ह्यात शासकीय व निमशासकीय शाळा, खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शासकीय अंगणवाडी, बालगृहे/ अनाथालये, अंध, दिव्यांग शाळा, शाळाबाह्य बालके, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खाजगी शाळा, 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्याकरीता दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजीपासुन सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपल्या नजीकच्या शाळा, अंगणवाडी, प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र, शहरी नागरी दवाखाने यांच्या मार्फत शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करुन घेण्यात यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

            शाळा तपासलेल्या संस्थांची संख्या 589, अंगणवाडी  तपासलेल्या संस्थाची संख्या 328 असून शाळेतील तपासलेल्या लाभार्थींची 98.54 तर अंगणवाडी तपासलेल्या लाभार्थींची संख्या 92.03 अशी आहे. असे जिल्हा आरोय अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 450 प्रशिक्षणार्थ्यांकडून बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती



 


जालना, दि.24 (जिमाका) :- जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात 450 नवप्रविष्ठ पोलिस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून पोलिस प्रशिक्षण केंद्रामार्फत नेहमीच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत जनसामान्यात प्रभावीपणे जनजागृती व्हावी या उद्देशाने जालना शहरातून रॅली शुक्रवारी काढण्यात आली.  या जनजागृतीपर रॅलीने  शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.

जालना पोलिस प्रशिक्षण केंद्राच्यावतीने बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनतेमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने जनजागृती रॅली शुक्रवार दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता पोलिस प्रशिक्षण केंद्र येथून 450 पोलिस प्रशिक्षणार्थ्यांची रॅली काढण्यात आली.  रॅलीस पोलिस प्रशिक्षण केंद्रापासून सुरुवात होवून मिशन हॉस्पिटल, राम मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी चौकात येवून रॅलीचा समारोप करण्यात आला.  बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबतची रॅली प्राचार्य अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक श्री.मेहत्रे, श्री.भारती, इद्रीस शेख, जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परदेशी, सी.आर.बरकुंट, जे.एस.फारुकी, श्री.जावेद, श्री.केंद्रे, ट्राफिक पोलिस अंमलदार श्री.निकम आदींची उपस्थिती होती.

चित्ररथाद्वारे बालविवाहास प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य केले जात असून या चित्ररथात बालविवाहमुक्त जालना जिल्हा अभियान फ्लेक्ससह श्राव्य संदेशाचाही समावेश करण्यात आलेला असल्याने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची जनमाणसांत प्रभावीपणे जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भावी पोलिसांना या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृतीपर रॅलीस अभूतपुर्व प्रतिसाद लाभला.   

-*-*-*-*-

 

Thursday 23 February 2023

सामुहिक विवाह सोहळयात विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव, विमाप्र दाम्पत्यासाठी ‘कन्यादान’ योजना सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

 


 

जालना, दि.23 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील दाम्पत्यासाठी ‘कन्यादान योजना’ राबविण्यात येते.  तरी सन 2022-23 या वर्षात सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी  संस्थांनी जालना येथील समाज कल्याण कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            कन्यादान योजनेअंतर्गत अर्थ सहाय्यासाठीचा अर्ज नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जालना कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेनूसार सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणाऱ्या वधूचे वडील, आई किंवा पालक यांचे नावे रु.20,000 रुपये अनुदान क्रॉस धनादेशाने देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येकी पात्र जोडप्यास 4,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्यातील वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*- 

‘राष्ट्रीय युवा स्वयंसेवक’ पदासाठी युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.23 (जिमाका)- केंद्र शासनाच्या योजनेमध्ये सहभागी होऊन युवा संगठन तथा युवा नेतृत्वाव्दारे राष्ट्र विकास व राष्ट्र बांधणीमध्ये सहभागी होण्यासाठी भारत सरकारतर्फे आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, साक्षरता, पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात जनजागृती, शासकीय अभियान आदी स्वरुपाच्या कार्यात सहभाग तथा आयोजन करण्याकरीता जालना जिल्ह्यातील युवक- युवतींनी ‘राष्ट्रीय युवा स्वयंसेवक’ पदासाठी गुरुवार दि. 9 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, 1 एप्रिल 2023 रोजी वय 18 ते 29 वर्षादरम्यान असावे,  सद्यस्थितीत शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.

नियुक्ती केवळ एका आर्थिक वर्षाकरीत अजून जास्तीत जास्त एक वर्ष मुदतवाढ उत्कृष्ट कार्याच्या आधारे मिळू शकेल.  परंतु कोणत्याही स्थितीत एकुण दोन वर्षापेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यकाळ राहणार नाही, तसेच ही सेवा कोणत्याही स्वरुपाचा रोजगार नसून स्वयंसेवकाला सरकारकडे नोकरीचा दावा करता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पाच हजार रुपये मानधन सर्व भत्यासह देण्यात येईल. योजनेबाबतची सविस्तर माहिती तथा अर्जाच्या नमुन्यासाठी नेहरू युवा केंद्र संगठनाच्या www.nyks.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याची प्रत आवश्यक कागदपत्रासह अर्ज नेहरू युवा केंद्र, जालना येथे दि.9 मार्च 2023 पुर्वी सादर करावा. साधारण प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी 2 पदे व संगणकीय कार्याकरीता जिल्हा मुख्यालयात 2 पदे भरावयाची असून संबंधित तालुक्यातील उमेदवारांनी रहिवासी पुरावा तसेच आवश्यक प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावेत. ज्यांनी पूर्वी या पदावर कार्य केले आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नये. तसेच शासकीय आदेशानुसार मागील वर्षी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनी पुन्हा रीतसर अर्ज करावेत. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

 



 

    जालना, दि.23 (जिमाका) :- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार प्रशांत पडघन यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, गजानन खरात , प्रभाकर घुगे, संतोष अनारसे, यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा महाराज यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

Wednesday 22 February 2023

ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील सण, उत्सव व उपक्रमामध्ये सूट दिल्याचे आदेश जारी

 


जालना, दि.22 (जिमाका): जिल्ह्यात सन 2023 मध्ये विविध धार्मिक सण, उत्सव व उपक्रम संपन्न होणार असून या सण,उत्सावाच्या काळात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर शासन निर्णय व ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 200 च्या नियम 5 (3) नूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील खालील सण / उत्सव व उपक्रमाच्या दिवशी  सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय  राठोड यांनी जारी केले आहेत.

सण, उत्सव व उपक्रमामध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी (दि. 7 सप्टेंबर 2023) अनुक्रमे एक दिवस तर गणपती उत्सवासाठी दिनांक 19, 26, 27, 28 सप्टेंबर रोजीचे 4 दिवस तसेच नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमीचे दोन दिवस आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर रोजी आणि महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव एक दिवस अशी सुट जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सण, उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व ध्वनी प्रदुषण प्राधिकरणाची राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

अंबड व घनसावंगी तालुक्यातील वाळु घाटातील अवैध चोरी रोखण्यासाठी फौजदारी दंड संहिता 1973 चे 144 कलम लागू


 

जालना, दि.22 (जिमाका): जिल्ह्यात अंबड व घनसावंगी तालुक्यातील वाळु घाटांचे लिलाव झालेले नसुन या वाळु घाटातून वाळुची अवैध चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध वाळु चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत या तालुक्यातील नदीपात्रांमध्ये वाळु चोरी रोखण्याकरीता व कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेश अंबडचे उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी निर्गमित केले आहेत.

उपविभागीय दंडाधिकारी  यांनी फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनुक्रमे अंबड तालुक्यातील आपेगाव,  बळेगाव,  गोरी, गंधारी, शहागड, साष्टपिंपळगाव, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बु., गोंदी, हसनापुर, कोठाळा खु., साडेगाव, इंदलगाव, गंगाचिंचोली (सर्व गोदावरी नदीपात्र) तसेच आवा-अंतरवाला, माहेरभायगाव, चिकनगाव, साडेसावंगी, मठपिंपळगाव (दुधना नदीपात्र) तर घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, मंगरुळ, भोगगाव, शिवणगाव, शेवता, लिंगसेवाडी, बाणेगाव, राजाटाकळी (गोदावरी नदीपात्र) व  रांजणी,  मुढेगाव (दुधना नदीपात्र) मध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला आहे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्याच्या दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार सदर आदेशाची प्रसिध्दी उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड यांनी करावी. हे आदेश दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अंमलात राहतील.असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 150                                                                                                          

जालना जिल्हयात बालविवाह प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 




 

       जालना, दि.22 (जिमाका): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची जनमाणसांत प्रभावीपणे जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने जालना जिल्हा माहिती कार्यालयाने जनजागृतीपर चित्ररथाची निर्मिती केली असून बालविवाह प्रतिबंधबाबत जिल्ह्यात शहरीसह ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चित्ररथाला उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून व फित कापून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, कर्मचारी अनिल परदेशी, पुष्पा धाडगे, मधूकर खांडेभराड  आदी उपस्थित होते.

चित्ररथाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील गर्दीच्या व बाजाराच्या तसेच  बसस्थानक, चावडी आदीच्या परिसरात बालविवाहास प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची जनजागृती करण्यात येणार आहे.  बालविवाहास प्रतिबंध कायदा व जबाबदाऱ्यांची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य जनजागृतीपर चित्ररथातून केले जाणार असून या चित्ररथात बालविवाहमुक्त जालना जिल्हा अभियान फ्लेक्ससह श्राव्य संदेशाचाही समावेश करण्यात आलेला आहे.

-*-*-*-*-

Tuesday 21 February 2023

बारावीच्या परीक्षा सुरु; कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई जिल्हाधिकारी यांनी केली परीक्षा केंद्रावर थेट पाहणी

 




     

 

      जालना, दि.21 (जिमाका): - जालना जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. जिल्ह्यात

 कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः सेवली येथील परीक्षा केंद्रावर  जावून पाहणी केली. दरम्यान, परिक्षेदरम्यान गैरअवलंब करणाऱ्या सेवली येथील लोकमान्य विद्यालय येथे 6 विद्यार्थ्यांवर तर सेवली येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे  10 विद्यार्थ्यांवर   कारवाई करण्यात आली. तर सत्यशोधक माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे एका  विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.   जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी देखील परीक्षा केंद्रांना भेट दिली. अशी माहिती शिक्षणाधिकारी (मा) यांनी दिली आहे.

       जिल्ह्यात परिक्षेदरम्यान गैरअवलंब करणा़ऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहेत. पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी अंजली कानडे यांना जालना तालुका नेमून दिला असून आज त्यांनी जिल्हा परिषद शाळा, सेवली येथे भेट दिली. पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांना बदनापुर तालुका नेमुन दिला असून आज त्यांनी राजकुंवर ज्युनियर कॉलेज हिवराळा येथे भेट दिली. पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी (निवडणुक) ज्ञानोबा बानापूरे यांना जाफ्राबाद तालुका नेमुन दिला असून आज त्यांनी नव भारत हायस्कूल, टेंभुर्णी येथे भेट दिली. पथक प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी  रिना बसैये यांना अंबड तालुका नेमुन दिला असून आज त्यांनी जाबुवंत विद्यालय रोहिलागड येथे भेट दिली. पथक प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण)  कोमल कोरे यांना परतुर तालुका नेमुन दिला असून आज त्यांनी लाल बहादुर शास्त्री विद्यालय परतुर येथे भेट दिली. पथक प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती नंदनवनकर यांना मंठा तालुका नेमुन दिला असून त्यांनी स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज जालना रोड मंठा येथे भेट दिली. पथक प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (जिल्हा परिषद) प्रदीप काकडे यांना भोकरदन तालुका नेमुन दिला असून आज त्यांनी बालाजी माध्यमिक विद्यालय वालसावंगी येथे भेट दिली. पथक प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संजय इंगळे यांना घनसावंगी तालुका नेमुन दिला असून आज त्यांनी संत रामदास कनिष्ठ महाविद्यालय घनसावंगी तालुका येथे भेट दिली. पथक प्रमुख प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राजेंद्र कांबळे यांना मंठा  तालुका नेमुन दिला असुन आज त्यांनी रेणुका ज्युनियर कॉलेज, मंठा येथे भेट दिली.

      पथक प्रमुख शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  कैलास दातखीळ यांना  बदनापुर तालुका नेमुन दिला असुन आज त्यांनी सोनामात ज्युनियर कॉलेज ढासला, येथे भेट दिली. पथक प्रमुख शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगल गायकवाड- धुपे यांना भोकरदन तालुका नेमुन दिला असुन आज त्यांनी सत्यशोधक माध्यमिक विद्यालय गोषेगाव, येथे भेट दिली. पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांना जालना व बदनापुर तालुके नेमुन दिले असुन आज त्यांनी लोकमान्य टिळक महाविद्यालय सेवली, येथे भेट दिली.  पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी, भोकरदन भाऊसाहेब जाधव यांना परतुर व मंठा तालुके नेमुन दिले असुन आज त्यांनी स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, मंठा येथे भेट दिली. पथक प्रमुख  उपविभागीय अधिकारी भोकरदन अतुल चोरमारे यांना भोकरदन व जाफ्राबाद तालुके नेमुन दिले असुन आज त्यांनी राजे संभाजी उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा, येथे भेट दिली. पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी अंबड स्वप्नील कापडनीस यांना अंबड व घनसावंगी तालुके नेमुन दिले असुन आज त्यांनी आदर्श ज्युनियर कॉलेज जामखेड, येथे भेट दिली तसेच उपशिअ योजना जिल्हा परिषद जालना श्रीमती सय्यद तलद आलम यांना जालना तालुका नेमुन दिला असुन आज त्यांनी पार्थ ज्युनियर कॉलेज राठोड नगर जालना, येथे भेट दिली. असे शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2022; प्रस्तावासाठी 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

 


 

            जालना, दि. 21 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2023 अशी होती. आता 8 मार्च, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी अधिकाअधिक पत्रकारांनी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

     उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या  www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

     राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

-*-*-*-*-*-

लोककलेच्या माध्यमातून शासकीय योजनाची जनजागृती; कलाकारांचे सादरीकरण आणि वेशभूषा ठरतेय लक्षवेधी

 

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा 16 ते 23 फेब्रुवारीपर्यंत लोककलांच्या माध्यमातून जागर




 

       जालना, दि.21 (जिमाका): लोककलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना  जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येत असून गावांमध्ये लोकगीते, पोवाडा, भारुड, गोंधळ आणि नाट्यस्वरुपात सादरीकरण करत शासकीय योजना व निर्णयांची जनजागृती करण्यात येत आहे.  जालना जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विविध कल्याणकारी शासनाच्या योजना जन सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन निर्णयान्वये निवड करण्यात आलेल्या जालना जिल्ह्यातील एकुण 16 कलापथकाद्वारे लोककलेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामस्थांचे मनोरंजन करुन प्रबोधनातून विविध उपक्रमांची माहिती व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती कलापथकाद्वारे जनतेला दिली जात आहे.

जालना जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत  शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर दि.16 ते 23 फेब्रुवारी 2023 या कालावधीत करण्यात येत असून या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.   लोककलेच्या माध्यमातून शुभमंगल सामुहिक /नोंदणीकृत विवाह योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा  व जबाबदाऱ्या, रोजगार मेळावा-प्लेसमेंट ड्राईव्ह, कौशल्य विकास मोफत प्रशिक्षण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, हर घर नर्सरी उपक्रम, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, 2023 पौष्टीक तृणधान्य वर्ष, रेशीम शेती योजना, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आजच तंबाखु सोडा निरोगी आयुष्याशी नाते जोडा, आपल्या बाळाचे संपूर्ण लसीकरण करुन घ्या, मुलगी वाचवा…, आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या विविध योजना आदी शासनाच्या कल्याणकारी योजना व निर्णयांची भारुड, पोवाडा, व नाट्यस्वरुपात जिल्ह्यातील प्रमुख गावात आणि आठवडे बाजार ठिकाणी सादरीकरण करुन जनजागृती केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत लोककला पथकातील कलाकार वातावरण निर्मिती करत माहिती देत आहेत. ग्रामीण व शहरी भागात या लोककलेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या योजनेच्या जनजागृतीला जिल्ह्यात उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळत आहे.

-*-*-*-*-

जालना जिल्हयाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना -2022-23 अंतर्गत मंजूर निधी वेळेत पूर्ण खर्च करावा -- पालकमंत्री अतुल सावे

 जालना जिल्हयाच्या विकासासाठी

जिल्हा वार्षिक योजना -2022-23 अंतर्गत
मंजूर निधी वेळेत पूर्ण खर्च करावा
-- पालकमंत्री अतुल सावे


जालना, दि. 20 (जिमाका) :- जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना - 2022-23 अंतर्गत मंजूर निधी सर्व विभागांनी वेळेत पूर्ण खर्च करावा. एक पैसाही परत जाता कामा नये. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल. असे निर्देश राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना - 2022-23 बाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरटंयाल, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ज्या विभागाच्या प्रशासकीय मान्यता बाकी आहे, त्यांनी याच आठवडयात मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करावेत. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करु नये. या वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 282 कोटी निधी मंजूर आहे, हा संपूर्ण निधी वेळेत खर्च केल्यास पुढील वर्षी कुठलाही कट न लागता जिल्हयाला पूर्ण निधी मिळेल. याचबरोबर अनुसूचित जाती उपयोजना आणि ओ.टी.एस.पी.चा निधीही वेळेत खर्च करावा.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न मांडले. आमदार कैलास गोरटंयाल यांनी दुर्गा माता मंदिर परिसरात पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आजुबाजूला असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी केली. पालकमंत्री यांनी नगर पालिका प्रशासनाला सात दिवसांत अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना केली. वाळू चोरी व बोगस टरबूज बियाण्यांबाबत आमदार राजेश टोपे यांनी प्रश्न मांडला. यावर निर्देश देताना पालकमंत्री म्हणाले की, वाळू चोरी ही गंभीर बाब असून शासनाच्या महसुलाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल व पोलीस विभागाने कडक कारवाई करावी. यात कुठल्याही प्रकारची हयगई करु नये. मुरुम चोरीबाबत आमदार लोणीकर यांनी मांडलेल्या प्रश्नालाही पालकमंत्री यांनी वरीलप्रमाणे निर्देश दिले. कुठल्याही प्रकारच्या पिकांच्या बोगस बियाणे तक्रारीची कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी. केवळ बियाणे विक्रीच्या दुकानावर कारवाई न करता थेट कंपनी विरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी सूचना त्यांनी केली. पोकराची प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावीत. आमदार संतोष दानवे यांनी मांडलेल्या फळपिक विमाबाबत तक्रारींचे कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ निरसन करावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
बैठकीत मागील बैठकीच्या कार्यवृत्तास व अनुपालन अहवालास मान्यता, चालू वर्षातील खर्चाचा आढावा आणि जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत कामात बदलासंदर्भात यंत्रणेच्या प्रस्तावास मान्यता आदी विषय मांडण्यात आले होते. सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी केले.
***

जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष द्यावे -- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 


जालना, दि. 20 (जिमाका) – जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळाव्दारे शुध्द पाणी पुरवठा करणे (हर घर नल हर जल) ही केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्हयात 6 तालुक्यांत 634 योजनांची निवड करण्यात आली आहे. संबंधित विभागाने दर्जेदार पध्दतीने या योजनांची कामे पूर्ण करुन घ्यावीत. महत्त्वाचे म्हणजे गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी आपल्या गावात या योजना कशा चांगल्या पध्दतीने होतील, याकडे स्वत: लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेचा ग्रामीण पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्यावतीने आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्हयातील नळ पाणी पुरवठा योजनांचा ई-उदघाटन सोहळा श्री. पाटील यांच्या हस्ते जालना येथील पोलीस क्रीडा मैदानावर आज संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीव्दारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरटंयाल, आमदार संतोष दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, मानवी जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्त्व असून मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाणी पुरवठा योजना वेळेत आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी कामाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावातील घरात नळाव्दारे शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाव्दारे मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजना सोलारवर राबविण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. गाव पातळीवर सरपंचांनी जल जीवन मिशनच्या कामात स्वत: लक्ष घालून अधिक गतीने व चांगले काम करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा नियमित आढावा घ्यावा. कुठल्याही कामाला मी स्वत: अचानक भेट देईल.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या संकल्पनेतून 2019 पासून केंद्र शासनाद्वारे जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील ५५ लिटर प्रति माणसी प्रती दिन पाणीपुरवठा करण्याचे धोरण या योजनेचे आहे. जालना जिल्ह्याचा जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद च्या मंजूर कृती आराखडा अंतर्गत ७१९ गावांकरिता ६९७ योजना मंजूर असून त्याची एकूण किंमत रुपये ४८५ कोटी आहे. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे ७ योजना आहेत ज्यामध्ये २ ग्रीड पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. या योजना मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. ते म्हणाले की, एकेकाळी जालना जिल्हा एक टँकरग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात होता. ही ओळख आता पुसल्या जात आहे. या वर्षी वार्षिक सरासरीच्या १४३.३५ टक्के पाऊस झाला आहे. सर्व प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०१९ पासून केंद्र शासनाद्वारे जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना देशात राबविण्यात येत आहे. हर घर नल हर घर जल हे त्याचे ब्रिदवाक्य आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक गावातील ५५ लिटर प्रति माणसी प्रती दिन पाणीपुरवठा करण्याचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना ही ३० वर्षाच्या संभाव्य लोकसंख्येकरता संकल्पित करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याचा जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद च्या मंजूर कृती आराखडा अंतर्गत ७१९ गावांकरिता ६९७ योजना मंजूर असून त्याची एकूण किंमत रुपये ४८५ कोटी आहे. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे ७ योजना आहेत ज्यामध्ये २ ग्रीड पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. या योजना मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के निधी मिळणार आहे. समाविष्ट गावाला योजनेच्या किमतीच्या १० टक्के लोक वर्गणी जमा करावयाची असून हा निधी योजना पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्ती करीता वापरावयचा आहे. सदरील कार्यक्रम हा व्यापक स्वरूपाचा असल्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असणारे अपुरे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून WAPCOS Limited या सहाय्य संस्थेची शासनाकडून निवड झाली आहे. सदर संस्थेने पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक पर्यवेक्षण करणे इत्यादी कामे करावयाची आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामे ही गुणवत्तापूर्वक व चांगल्या दर्जाची व्हावी याकरिता शासनाने योजनेची त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची नेमणूक केली आहे. आजच्या समारंभामध्ये ६ तालुक्यांतील (अंबड, घनसावंगी, जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद)जिल्हा परिषदेकडे असलेल्या योजनांपैकी ६२७ व - मजीप्रा कडील ७ योजनांची निवड करण्यात आली आहे. यासाठी एकूण किंमत रु. ५५९.१२ कोटी खर्च लागणार आहे. आभार श्रीमती वर्षा मीना यांनी मानले.
जल जीवन मिशनअंतर्गत मौजे अकोला (नि) व धोपटेश्वर
येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बदनापूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत मौजे अकोला (नि) येथील 1 कोटी 9 लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच धोपटेश्वर येथील जलजीवन मिशन अंतर्गत 93 लक्ष रुपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाऊसाहेब घुगे, अकोला गावच्या सरपंच रुख्मिनबाई केकान, धोपटेश्वर गावचे सरपंच ताराचंद फुलमाळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्री. रबडे, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-