Friday 30 December 2022

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती 30 जानेवारीला मतदान, 2 फेब्रुवारीला मतमोजणी


 

जालना, दि. 30, (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे जिल्हयातज काटेकोर पालन होईल, या दृष्टीने नियोजन करावे तसेच निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत,  अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक कामाकाजासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अंजली कानडे, आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 29 डिसेंबर रोजी घोषणा केली. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा यात समावेश असून दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान तर मतमोजणी 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याची तारीख दि. 5 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख  दि. 12 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख दि. 16 जानेवारी 2023, मतदान दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत राहील. दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होईल.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, जालना जिल्हयात एकूण  15 मतदान केंद्र आहेत.  निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी कक्षनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी  जबाबदारीने कामे करावीत. कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. निवडणूक विषयक सर्व कामे वेळेत पार पाडावीत. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

निवडणूक कामे सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक समन्वय कक्ष, आचारसंहिता जिल्हा नियंत्रण कक्ष, प्रशिक्षण कक्ष, वाहन परवाना व विविध परवाने वितरण कक्ष, वाहतूक व्यवस्था कक्ष, विविध मतदान साहित्य व्यवस्थापन कक्ष, तांत्रिक सहायक, अवैध दारु वाटपास प्रतिबंध कक्ष, मतदार मदत कक्ष, जिल्हा माध्यम नियंत्रण कक्ष, स्वीप कक्ष, आरोग्य कक्ष, मुलभूत सोईसुविधा कक्ष आदी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

-*-*-*-*-*-*-

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

 


      जालना, दि.30 (जिमाका) :-   महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवासाठी जिल्हास्तरीय संघ निवडण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींकरिता जिल्हा क्रीडा संकुल, जालना  येथे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी  9 वाजता जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.

  

            जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य कलाप्रकारात 20 कलाकारांची संख्या असेल व वेळ 15 मिनिटे राहील.  लोकगीत कलाप्रकारामध्ये   कलाकारांची संख्या 10 असेल व वेळ  7 मिनिटे राहील. जिल्ह्यातील प्रतिभावंत कलाकार यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, युवक मंडळे, नामाकिंत कलाकार, संस्था यांनी कार्यालयीन वेळेत  क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे  7588169493 यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ,कलावंतानी आपले प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरून स्पर्धा स्थळी उपस्थित रहावे.  

            स्पर्धांसाठी कलाकाराचे, सहकलाकार, साथसंगत देणारे यांचे वय 15 ते 29 असा राहील, दि. 12 जानेवारी 2023 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावे. दि. 12 जानेवारी 2008  पुर्वीचा दि. 12 जानेवारी 1994  नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत जन्म तारखेचा पुरावा आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.  मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही.  लोकनृत्य- सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित 20 कलाकारांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल, नृत्य दिग्दर्शन, पोशाख, मेकअप, संच, एकत्रीत परिणाम याबाबीवरून काढण्यात येईल. लोकनृत्य पुर्वध्वनीमुद्रीत  टेप, कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही.  लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे तसेच लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही. एखादी स्पर्धा सुरू असतांना विद्युत पुरवठा बंद झाल्यास स्पर्धा आहे त्या परिस्थितीत चालू ठेवावयाची किंवा सुरूवातीपासून घ्यावयाची या बाबतचा निर्णय आयोजन समितीचा अंतिम राहिल. युवा महोत्सवातील कला प्रकारात सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना परिक्षकांचा निर्णय अंतिम मानावा लागेल. परिक्षकांबाबत कुठलाही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह रूपये 500/- भरून त्याच ठिकाणी आक्षेप सिध्द करावा लागेल. संयोजकामार्फत विद्युत पुरवठा व रंगमंचाची व्यवस्था करण्यात येईल. बाकी सर्व आवश्यक साहित्य त्या त्या स्पर्धकांनी सोबत आणावे लागेल. एखादी स्पर्धा त्या स्पर्धाच्या संकल्पनेनुसार सादर होत नसल्यास ती स्पर्धा थांबविण्याचे अधिकार संयोजक समितीचे राहतील युवा महोत्सवातील संख्या ही साथ - संगत देण्यासह असल्यामुळे वेगळे साथ- संगत घेता येणार नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा. प्रवास, निवास, भोजन सर्व स्पर्धकांनी स्वत:करावा लागेल,  असे जिल्हा क्रिडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

2 जानेवारी रोजीचा लोकशाही दिन रद्द

 


जालना, दि.30 (जिमाका) :-  भारत निवडणुक आयोगाकडील दि. 29 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसुचनेनुसार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द झाली असून पुर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. त्यामुळे दि. 2 जानेवारी 2023 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आयोजित लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी अंजली कानडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले  आहे.

-*-*-*-*-*-

Thursday 29 December 2022

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन खाजगी व शासकीय आस्थापनांनी 30 जानेवारीपूर्वी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करावेत

 


जालना, दि.29 (जिमाका) :-  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959  व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी नुसार सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/व्यवसाय/महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद/पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांनी डिसेंबर 2022 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहीती ई-आर 1 विवरणपत्र सोमवार दि.30 जानेवारी 2023 पुर्वी www.rojgar.mahaswayam.gov.in या  संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तरी जिल्ह्यातील खाजगी व शासकीय आस्थापनांनी डिसेंबर 2022 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई - आर 1 सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/व्यवसाय/महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद/पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखान्यांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई - आर 1 माहे डिसेंबर 2022 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत (30 जानेवारी 2023 पर्यत) सादर करणे बंधनकारक आहे. याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉगीनमध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याप्रमाणे नियोक्त्यांची डिसेंबर 2022 या तिमाहीचे विवरणपत्र ई - आर 1 दि. 30 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर जावून  एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉगीनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉगीन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी 10  ते सांयकाळी 6 वाजेपर्यत (02482) 299033 या कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करावा. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आवाहन

 


जालना, दि.29 (जिमाका) :-  जिल्ह्यातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता  राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अद्यापही अर्ज सादर केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव  www.bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करुन अर्जाची मुळ प्रत संबंधित महाविद्यालयामार्फत समितीकडे सादर करावी, असे  आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त वैशाली हिंगे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता  राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील अकरावी व बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी जात पडताळणी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशापासून तसेच इतर लाभापासून वंचित राहत असतात. जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी विहित वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे उपायुक्त, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

 

Wednesday 28 December 2022

31 डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर जालना उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथकांद्वारे करडी नजर अवैध हॉटेल व ढाबा चालकावर कारवाई

 

 

जालना, दि.28 (जिमाका) :-   नाताळ व नविन वर्षानिमित्त आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे व राज्य उत्पादन शुल्क पराग अधीक्षक नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व परिसरात अवैध हॉटेल व ढाबा चालकावर धाडी टाकुन 02 गुन्हे नोंदविण्यात आले.             सदर गुन्ह्यात १३ आरोपींना अटक करण्यात आली. दि.26 डिसेंबर 2022  रोजी ढाबा चालकासह आरोपी मद्यपींना मा. न्यायालयात हजर केले असता. मा. न्यायालयाने ढाबा चालकास प्रत्येकी 35000/- व ग्राहकांना प्रत्येकी 1000/- अशी एकुण रू. 81000/- दंडाची शिक्षा मा. न्यायाधिश महोदया, श्रीमती. डि. एम. शिंदे यांनी सुनावली आहे.

सदर कारवाई अधीक्षक, पराग मो. नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ए. गायकवाड, एम. एन. झेंडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना यांनी केली असुन आर. एन. रोकडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भि. सु. पडूळ, पी. बी. टकले, आ. अ. महिंद्रकर, सं. म. पवार व ए. ए. औटे सर्व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तसेच वि. पां. राठोड. ए. आर. बिजुले, आर. ए. पल्लेवाड सर्व सहाय्यक दुय्यम निरीक्षक, एस. जी. कांबळे, व्ही. डी. पवार, व्ही. डी. अंभोरे जवान-नि-वाहन चालक के. एस. घुणावत, एस. टी. डहाळे, डी. जी. आडेप सर्व जवान, राज्य उत्पादन शुल्क, तसेच महिला जवान श्रीमती आर. आर. पंडीत, यांनी उपरोक्त कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

राज्य उत्पादन शुल्क, जालना कार्यालयामार्फत विशेष पथकांची नेमणुक करण्यात आली असुन, पाट्यांमध्ये पुरविण्यात येणा-या मद्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जालना विभागाकडे ३ पथके कार्यरत आहेत. यात आणखी २ विशेष पथकांची भर पडणार आहे. ५ पथकांच्या माध्यमातून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर जालना जिल्ह्यात प्रवेश मिळणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर उत्पादन शुल्क, विभागाकडून तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना विभागाने अवैध मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यांवर मद्य सेवन करणाऱ्या तळीरामां विरोधत कारवाई केली आली असुन, ०९ गुन्हे दाखल करुन ४९ आरोपींना मा. न्यालयाकडुन शिक्षा सुनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माहे डिसेंबर २०२२ मध्ये अवैध व विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई करून एकुण गुन्हे ५७ नोंदविण्यात आले असुन या गुन्ह्यांमध्ये ५४ आरोपींना व १ दुचाकी वाहन ताब्यात घेऊन एकूण रू. ३.९५,६९२/- (रूपये तीन लाख पंच्यानव हजार सहाशे ब्यानव) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

भोकरदन तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली विविध कार्यालयांना भेट प्रलंबित कामांचा घेतला आढावा, स्वस्त धान्य दुकानांची केली तपासणी

 









जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज भोकरदन तालुक्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान त्यांनी  तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालयांना भेट देऊन दप्तर तपासणी  केली व  विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकारी व  कर्मचाऱ्यांना दिले.

यावेळी  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, भोकरदनाच्या तहसीलदार सारिका कदम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.

नागरिक व ग्रामस्थांच्या विविध कार्यालयीन कामांचा जलदगतीने निपटारा व्हावा तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी आज भोकरदन तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट देऊन दप्तरी कामांचा आढावा घेतला.  दौऱ्यादरम्यान त्यांनी भोकरदन येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची पाहणी केली. तसेच शहरातील व पिंपळगाव रेणुकाई, सेलू येथील स्वस्त धान्य दुकानांना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली.  याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामांचीसुध्दा पाहणी केली.

-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


     जालना, दि.28 (जिमाका) :-   जिल्ह्यात दि. 31 डिसेंबर 2022 रोजी नववर्ष दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरु आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.  हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.10 जानेवारी 2023  रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद आहे.

-*-*-*-*-*-        

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त 5 जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन

 


        जालना, दि.28 (जिमाका) :-   अल्पसंख्याक समाजातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीचे सदस्यांनी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने गुरुवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे हजर रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  

अल्पसंख्याक हक्क दिन म्हणुन 18 डिसेंबर 2022 हा दिवस साजरा करण्याबाबत शासनाच्या सुचनेनुसार शासकीय सुट्टी असल्यामुळे दि. 19 डिसेंबर 2022 रोजी अल्पसंख्याक हक्क दिन आयोजित करण्यात आला होता परंतु कमी प्रमाणात उपस्थिती असल्यामुळे अल्पसंख्याक हक्‍क दिन घेण्यात आला नाही.   अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीकरीता अल्पसंख्याक आयोगामार्फत 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे अल्पसंख्याक हक्क दिनाच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, असे तहसीलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

विभागस्तरीय शालेय शूटींगबॉल क्रीडा स्पर्धा सुरु

 


        जालना, दि.28 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा अंतर्गत क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्यावतीने विभागस्तर शालेय शुटींगबॉल (17 व 19 वर्षाआतील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धा-2022 दि. 27 डिसेंबर 2022 रोजी अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी  यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश भुतेकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. भुजंग डावकर, डॉ. संजय शेळके, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नवगीरे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विभागस्तरीय शालेय शुटींगबॉल (17.19 वर्षेआतील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धांसाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झालेले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली  क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, सिमोन निर्मळ इत्यादी परिश्रम घेत आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday 26 December 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापन

 


 

       जालना, दि.26 (जिमाका) :-  महाराष्ट्राचे मुख्य सचिवांच्या निर्देशानूसार जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे सर्वसामान्य जनतेकडून राज्याचे मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहीलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदन, संदर्भ इत्यादी स्विकारुन नागरिकांच्या अर्जासंदर्भात तातडीने उचित कार्यवाही करण्यात येईल. असे  निवासी उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी (सीएमओ कक्ष, जालना) केशव नेटके यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.

           मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दि. 18 डिसेंबर 2022 अन्वये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत आवाहन

 


 

       जालना, दि.26 (जिमाका) :-  जिल्ह्यातील ज्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्यांनी तात्काळ महाडिबीटी प्रणालीवरील लॉगिनमधुन सदरील कागदपत्र अपलोड करुन अर्ज सादर करावेत व महाविद्यालयांशी संपर्क साधून अर्ज मंजुर झाल्याची खात्री करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज केलेल्या परंतु त्रुटी पुर्ततेअभावी विद्यार्थी व महाविद्यालयीनस्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी शासन स्तरावरुन रिजेक्ट करण्यात आले होते. या अर्जावर कार्यवाही होण्यासाठी शासन स्तरावरुन पुर्नविलोकनासाठी महाविद्यालय लॉगिनवर अर्ज अद्यावत करुन दिले आहेत. अशा प्रलंबित अर्जामधील त्रुटींची पुर्तता महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांना संपर्क करुन त्यांच्याकडुन तात्काळ करुन घेण्यात यावी अन्यथा अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क घेण्याचा अधिकार महाविद्यालयांना राहणार नाही. तसेच ही प्रकीया विहीत मुदतीत न केल्यास व सन 2021-22 वर्षासाठीची लिंक बंद झाल्यास आणि शासन स्तरावरुन शिष्यवृत्ती  अर्ज रद्द (reject) झाल्यास त्यास समाज कल्याण विभाग जबाबदार असणार नाही. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

बुधवारी पेंशन अदालतीचे आयोजन

 

 

       जालना, दि.26 (जिमाका) :-  विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार दर दोन महिन्यांनी पेंशन अदालत घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत सुचित केले आहे. सोमवार दि.26 डिसेंबर 2022 रोजी आयोजित पेंशन अदालत तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली असून आता बुधवार दि.28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी या पेंशन अदालतीसाठी प्रलंबित सेवानिवृत्ती, कुटुंबनिवृत्ती प्रकरणाच्या माहितीसह विभाग प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तीसाठी 25 ते 31 डिसेंबरपर्यंत वेळेत सुट

 


 

     जालना, दि.26 (जिमाका) :-  जिल्ह्यात नाताळ व नववर्षानिमित्त दि.25 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्त्या निर्धारित वेळेनंतर रात्री उशीरापर्यंत उघड्या ठेवण्यासाठी आदेशान्वये सुट देण्यात आली आहे. तरी आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा-1949 चे कलम कलम 54 व  56 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल याची अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

            मद्यविक्री अनुज्ञप्ती एफएल-2  विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान आणि एफएलबीआर-2 या दोन्ही दि.25 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत चालु राहतील. मद्यविक्री अनुज्ञप्ती एफएल-3 परवाना कक्ष दि.25 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहतील तर सीएल-3 देशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान दि.25 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत अ व ब नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत चालु राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Friday 23 December 2022

सुशासन सप्ताहानिमित्त कार्यशाळा संपन्न शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे पार पाडत जनतेला वेळेत सेवा उपलब्ध करुन द्यावी -जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

 

 

जालना, दि.23 (जिमाका) :-   आपण जनतेच्या कामासाठी शासकीय सेवेत आलो आहोत, ही भावना सदैव मनात ठेवून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिस्त व जबाबदारीने कामे पार पाडत जनतेला वेळेत सेवा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले.

 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत दि. 19 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की और’ साजरा करण्यात येत आहे. सुशासन सप्ताहानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सुशासन पध्दती/उपक्रमांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्यै, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, सुशासनाचा मुख्य केंद्रबिंदू नागरिक हा आहे. त्याच्या सेवेसाठीच आपण कार्यरत आहोत, त्यामुळे प्रत्येक काम शिस्तबध्दपणे व मनापासून करुन उत्तमोत्तम सेवा नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्यात. आपल्या कामाप्रती आस्था ठेवत जास्त वेळ काम प्रलंबित राहणार नाहीत, ती वेळेत निकाली लागतील या भावनेने कामे करावीत. सध्याच्या युगाशी सुसंगत होण्यासाठी सर्व नोकरदारांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा कार्यालयीन वापर करण्यावर भर द्यावा. ‘प्रशासन गाव की और’ या थीमनुसार कामे करत शेवटच्या घटकांना सेवेचा लाभ देण्यासाठी नेहमी तत्परता बाळगावी व शिस्तप्रिय नोकरदार बनून सर्व जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी कृषी, अकृषीक, भोगवटदार जमीनीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी रस्ते अपघात व सुरक्षितता व वाहतुकीच्या नियमांचे पालनाबाबत माहिती दिली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी प्रदीप भोगले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत सविस्तर मार्गर्शन केले. तर समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी थोडेसे मायबापसाठी  पण या उपक्रमाची माहिती दिली. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी गजानन म्हस्के यांनी आयुष्यमान भारत योजनेसह  माता व बालकांचे लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.  कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक श्रीमती भोसले यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती मोरे यांनी केले तर आभार तहसिलदार संतोष गोरड यांनी मानले.  कार्यशाळेस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा थाटात प्रारंभ

 


            जालना, दि.23 (जिमाका) :-  दरवर्षी महसूल विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा आज  मोठ्या उत्साहात जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे टॉस करुन पार पडले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापूरे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्यै यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रिकेटच्या सामन्यात स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सहभाग घेत फलंदाजी करत महसूल कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा सामना,  खो-खो, गोळाफेक आणि 100 मिटर धावणे, भालाफेक, व्हॉलीबॉल आदी  प्रकारचे खेळ घेण्यात आले. या सर्व क्रीडा प्रकारात जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांसह महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अंजली कानडे यांनी केले तर सुत्रसंचालन नायब तहसीलदार पी.के.घुगे व एस.टी.चंदन यांनी केले. आभार डॉ. ज्ञानोबा बाणापूरे यांनी मानले.

-*-*-*-*-

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारुप यादी 24 डिसेंबरला होणार प्रसिध्द


जालना दि. 23 (जिमाका) :-  राज्यसभा आणि राज्य विधान परिषदेसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकेतील प्रकरण 2 परिच्छेद 14.1 मधील निर्देशानूसार 5-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक-2023 करिता मतदान केंद्राची प्रारुप यादी दि. 24 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदरची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदारांच्या कार्यालयात मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध राहील. तसेच सदरची प्रारुप यादी जिल्ह्याचे संकेतस्थळ https://jalna.gov.in  यावर देखील मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मतदान केंद्राच्या प्रारुप यादी संबंधाने हरकती व सूचना ही यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसापर्यंत (दि. 1 जानेवारी 2023 पर्यंत) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जालना यांच्याकडे सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  डॉ. विजय राठोड केले आहे.   

-*-*-*-*-

क्षय रुग्णांना रेशन किटचे वाटप

 


जालना दि. 23 (जिमाका) :-  प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानातंर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी बेस येथे जिल्हा क्षयरोग केंद्र, जालना  आणि क्षयरोग उपचार पथक, जालना तसेच विक्रम टी प्रोसेसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने क्षय रुग्णांना मोफत ड्राय रेशन किट काजल पटेल यांच्या हस्ते  वाटप करण्यात आली. याप्रसंगी क्षयरोग अधिकारी डॉ. जगताप, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सोनी तसेच श्रीमती राजे,  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र जालनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती वैष्णव, श्री. जावळे , आशिष ओझा, रवींद्र पाईकराव , जी व्ही राऊत व व्ही. व्ही.  मुंडे व क्षय रुग्णांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

Thursday 22 December 2022

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबरला विशेष चर्चासत्राचे आयोजन

 


 

 जालना दि.22 (जिमाका):- प्रतिवर्षी 24  डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय  ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शनिवार, दि.24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10  वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष चर्चासत्र कार्यक्रमास नागरिक, शेतकरी वर्गाने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आर.एम. बसैय्ये यांनी  केले आहे.

विशेष चर्चासत्रास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना,  अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रमुख मार्गदर्शक वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.अहिर, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही.व्ही. महिंद्रकर, अॅड. महेश एस. धनावत, राष्ट्रीय प्रशिक्षक राष्ट्रपाल जाधव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चळवळीचे मोहन इंगळे, संजय देशपांडे व इतर सदस्य याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने केंद्र शासनाने ग्राहक आयोगातील तक्रारी प्रभावीपणे निकाली काढणे या संकल्पनेवर आधारीत शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे चर्चासत्र आयोजित केले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

 


जालना दि. 22 (जिमाका) :-   क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्यावतीने विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल ( 14, 17, 19 वर्षाखालील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धा -2022 या दि. 22 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल ( 14, 17, 19 वर्षाखालील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडीत, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील, डॉ. रमेश भुतेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, डॉ. कैलास माने, क्रीडा विभागप्रमुख डॉ. भुजंग डावकर, डॉ. संजय शेळके, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नवगीरे, विजय गाडेकर आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले. खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. मिलिंद पंडीत यांनी खेळाडूंना खेळाडूवृत्तीने खेळावे, खेळात हार- जीत होणारच असते त्यामुळे पराभुत झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सराव करून खेळत रहावे, असे सांगितले.  विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल ( 14, 17, 19 वर्षाखालील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धांसाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिगोंली या जिल्ह्यातील खेळाडू आलेले आहेत. यावेळी पंच म्हणून नरेंद्र मुंडे, अमोल बिचाले, शिवप्रसाद घुकसे, गणेश दराडे, गणेश बेटूदे यांनी काम पाहिले. सदर विभागस्तर शालेय थ्रोबॉल  क्रीडा स्पर्धा 2022 जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली  क्रीडा मार्गदर्शक मोहमद शेख, सिमोन निर्मळ इत्यादी परिश्रम घेत आहेत, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

केंद्रीय संचार ब्यूरोच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या 40 लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

 


 

जालना दि. 22  (जिमाका) :-   भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद (कार्यक्षेत्र - औरंगाबाद, जालना व बुलडाणा), जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ते 21 डिसेंबर 2022 या कालावधीत जालना रेल्वे स्टेशन, मुख्य प्रवेश द्वार येथे केंद्र शासनाच्या 8 वर्षपूर्ती निमित्ताने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चित्रप्रदर्शनाचा लाभ घेतला. तसेच या ठिकाणी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या 40 लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे धनादेशाचे वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमात केंद्र शासनाच्या पंजीकृत मीरा उमप अँड पार्टी औरंगाबाद यांच्याकडून देशभक्तीपर गीत व शासनाच्या योजनांवर  सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. हे प्रदर्शन 17 ते 21 डिसेंबर, 2022 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 9 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य सुरू होते. चित्रप्रदर्शनात स्पिन 360 डिग्री सेल्फी पॉईंट, डिजिटल पझल्स, क्युआर वॉल, फ्लिपबॉक्स आदी नागरिकांना अनुभवायला मिळाले. चित्रप्रदर्शनाच्या ठिकाणी आरोग्य विभाग, पोस्ट विभाग, नगर परिषदेचा आधार कार्ड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, आधार जोडणी व नवीन नोंदणी, आयुष्मान भारत, जिल्हाधिकारी कार्यालयाचे महा ई सेवा केंद्र आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा, रॅली आदीचे आयोजन करण्यात आले. या  प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण, गतिशक्ती व शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली, असे केंद्रीय संचार ब्युरो प्रबंधक संतोष देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-