Friday 9 December 2022

कचरेवाडी येथे महारेशीम अभियानातंर्गत प्रशिक्षण व चर्चासत्र संपन्न शेतकऱ्यांनी रेशीम विषयक शासकीय योजनांचा लाभ घेवून आपली आर्थिक प्रगती साधावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 


 

जालना दि. 9 (जिमाका) : रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असून जालना जिल्ह्यात रेशीम शेतीकरिता अंडीपुंज निर्मिती ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतचे चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक खरेदी-विक्री होणारी रेशीम कोषांची बाजारपेठ जालना जिल्ह्यात असुन या ठिकाणी राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी कोष विक्रीसाठी दुरवरुन येत असतात. तरी जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेवून रेशीम ‍विषयीच्या शासकीय योजनांचा लाभ घेवून आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.

जालना तालुक्यातील कचरेवाडी येथे दि. 9 डिसेबर 22 रोजी जिल्हा रेशीम कार्यालय तसेच सॉईल टु सिल्क रेशीम फार्मर प्रोडुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेशीम शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सदर प्र‍शिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,  प्रादेशिक रेशीम कार्यालय उपसंचालक  दिलीप हाके, आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती शीतल चव्हाण, शास्त्रज्ञ रामप्रकाश वर्मा, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, सॉईल टु सिल्क रेशीम फार्मर प्रोडुसर कंपनीचे अध्यक्ष विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर जवळच बाजारपेठ उपलब्ध आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम शेतीकरिता 340000/- पर्यंत अनुदान देण्यात येते, तसेच पोकरा योजनेतुन ही तुती लागवड, किटक संगोपन गृह उभारणी, किटक संगोपन साहित्य करिता शेतकऱ्यांना तर चॉकी केंद्र उभारणी, ॲटोमॅटीक रिलींग केंद्र उभारणीसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना अनुदान  देण्यात येत असते. असेही सांगितले.

यावेळी रेशीम शेतीतुन उत्कृष्ट उत्पादन घेवून  आपल्या शेतात बंगला बांधणाऱ्या पाच शेतकरी  1) विजय साहेबराव शेळके, वाल्हा ता.बदनापुर, 2) साईनाथ शिंदे,वरूडी ता.बदनापुर, 3) राजेंद्र कचरे, कचरेवाडी, 4) कैलास दत्तात्रय शेजुळ,खरपुडी ता.जालना, 5) सिध्देश्वर भानुसे, भानुसे बोरगाव ता.घनसावंगी यांचा सपत्निक सत्कार जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.                          

युवा शेतकरी  श्री.गणेश तुकाराम दाते, शिंदे वडगाव ता.घनसावंगी, यांनी दि.08.12.22 रोजी जालना रेशीम कोष बाजारपेठेत रू.164645/- चे 269.91 कि.ग्रॅम रेशीम कोषांची विक्री केली आहे. या युवा शेतकऱ्याकडे एकुण 2.00 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड असुन त्यांनी सन 2021-22 मध्ये एकुण 12.00 लाखाचे उत्पादन घेतले आहे.चालु वर्षी आतापर्यंत 4.5 लाख रूपयाचे रेशीम कोषांची विक्री केली आहे.त्त्यांचा मा.जिल्हाधिेकारी यांचे हस्ते जिल्हातील दुसरी ऑरेंज कॅप देवुन सत्कार करण्यात आला.

श्रीमती शीतल चव्हाण यांनी पोकरा योजनेतुन शेतकऱ्यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांना भरीव मदत करण्यात येते याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, श्री.विजय पाटील यांचे शेतकरी कंपनीचे चॉकी केंद्र उभारणी करीता पोकरा योजनेतुन मदत करण्यात आली असुन जालना जिल्ह्यातील ईतर ईच्छुक शेतकरी कंपनीसही याचा लाभ देण्यात येईल याच्या माध्यमातुन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या चॉकी अळयांचा पुरवठा होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति 100 अंडीपुंजास उत्पादनात वाढ होते. आत्मा चे माध्यमातुनही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना उझी माशी नियंत्रणासाठी कामगंध सापळा व परोपजिवी किटकांचे प्रात्यक्षित करीता निधी रेशीम विभागास उपलब्ध करून देण्यात आला आहे.असे सांगितले.

केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ.रामप्रकाश वर्मा यांनी शेतकऱ्यांना उझी माशीचे नियंत्रण कसे करावे याबाबत माहिती व प्रात्यक्षिक दाखविले. रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम किटक संगोपन गृहाचे निर्जंतुकीकरण कसे करावे याची विस्तृत माहिती दिली. तसेच महारेशीम अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडी करिता नोंदणी करावी असे आवाहन केले. सॉईल टु सिल्क रेशीम फार्मर प्रोडुसर कंपनीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी चॉकी किटक संगोपन केंद्राचे शेतकऱ्यांना होणाऱ्या फायदेविषयी माहिती दिली. चर्चासत्रात सुत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक एस.आर.जगताप यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment