Tuesday 27 November 2018

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ कु. ओवी बिनवडेस लस टोचून मोहिमेचा शुभारंभ नागरिकांनी पाल्यांना गोवर-रुबेलाची लस टोचून घ्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन



            जालना, दि. 27 :- गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत कु. ओवी बिनवडे हिस लस टोचून  येथील फँटसी किड्स झोन या शाळेत मोहिमेचा शुभारंभ  करण्यात आला.
        यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे, पंचायत समितीचे सभापती पांडूरंग डोगंरे,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, डॉ. स्वाती रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कडले, डॉ. बारडकर, डॉ. लोणे, डॉ. म्हस्के, डॉ. सोनी, डॉ. राजे, डॉ. एस.बी. जगताप, उपशिक्षणाधिकारी श्री मापारी, डॉ. गोंदीकर, डॉ. अनुराधा राख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की,  9  महिने ते 15 वर्षाखालील जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 15 हजार 82 लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून याचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. आपल्या स्वत:च्या मुलीला गोवर-रुबेलाची  लस टोचून  या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला असल्याचे सांगत नागरिकांनी पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले. 
       यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे म्हणाले की, गोवर-रुबेला लसीकरणाची मोहिम यशस्वी करण्यासाठी एएनएम, आशा व अंगणवाडी सेविकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून व त्यांना एक विशेष किट देखील देण्यात आले आहे. ज्या मध्ये लसीकरण कसे करावे याची संपूर्ण माहिती पुरविण्यात आली आहे.  जिल्ह्यातील 6 लाख 15 हजार बालकांना ही लसदेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असुन या लसीपासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
यावेळी फँटसी किड्स झोन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया नाईक, अश्विनी देशपांडे, ज्योति अग्निहोत्री, अल्पना पुरी, श्वेता बर्दापुरकर, सिमरण बैजल यांच्यासह पालक व विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
*******




Saturday 17 November 2018

वलखेड येथे 3 कोटी 32 लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध जिल्ह्यातील एकही गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नाही - पालकमंत्री बबनराव लोणीकर



             जालना, दि. 17 –   जिल्ह्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देत येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एकही गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            परतूर तालुक्यातील वलखेड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 3 कोटी 32 लक्ष रुपये किंमतीच्या रामा 220 ते बामणी वलखेड ते तालुका सरहद या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, अशोकराव बरकुले, सुरेशराव सोळुंके, रमेशराव भापकर, गावचे सरपंच बबन येडेकर, उपसरपंच विश्वनाथ सुरंग, नितीन जोगदंड, रमेश केवारे, संपत टकले, शिवाजी पाईकराव, राजू ढवळे, नारायणराव सुरंग, आसाराम सुरंग, भगवान सुरंग, दत्ता बिल्लारे, शहाजी सुरंग, माऊली डवारे, गंगाधर सुरंग, श्रीहरी सुरंग, अंकुशराव नवल, ओमप्रकाश मोरे, कार्यकारी अभियंता               श्री चौधरी आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.  गेल्या तीन वर्षाच्या काळात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत.  गावांना रस्ते व्हावेत,  शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत.  या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.  येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.    राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे. तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  येणाऱ्या आठ महिन्यांच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगत राज्यात 60 लक्ष शौचालयांची उभारणी करुन महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल ठरले आहे.  दिल्ली येथे आयेाजित करण्यात आलेल्या जागतिक परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचा देशाचे प्रधानमंत्री यांच्याहस्ते गौरवही करण्यात आला असल्याचे  श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री चौधरी यांनी केले.
यावलपिंप्री तांडा येथे 3 कोटी 51 लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शुभारंभ
            पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री तांडा-1 येथे राजेगाव-गडमंदिर-यावलपिंप्री तांडा ते रामा -224 या 3 कोटी 51 लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
            यावल पिंप्री तांडा येथे झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार विलास खरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सरपंच छबुराव राठोड, संजय तौर, रमेश महाराज वाघ, देवनाथ जाधव, अंकुश बोबडे, प्रकाश टकले, विष्णु जाधव, नारायण राठोड, प्रमोद राठोड, एकनाथ चव्हाण, बाबुराव पवार, संतोष पवार, शंकर चव्हाण, रामनाथ पवार, अर्जुन पवार, हिंमतराव पवार, वामनराव राठोड, तहसिलदार संजयकुमार डव्हळे,   यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
********




Friday 16 November 2018

पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा -- प्रा. बी.वाय. कुलकर्णी



          जालना, दि. 16 –   पत्रकारीता क्षेत्रात कालानुरुप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.  माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ई-माध्यमामुळे पत्रकारिता क्षेत्रात अधिक गतिमानता आली आहे. आयुष्यातील चढ उताराप्रमाणे पत्रकारितेमध्येही चढ-उतार येत असुन नकारात्मक चर्चेपेक्षा पत्रकारांनी आपल्या सकारात्मकतेने लेखणीची ताकद जाणुन समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रा. बी.वाय. कुलकर्णी यांनी केले.  
            16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय जालना येथे डिजिटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर दै. दुनियादारीचे कार्यकारी संपादक किशोर आगळे, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री कुलकर्णी म्हणाले की, माध्यमासमोर सद्या समाज माध्यमांचे मोठे आव्हान उभे आहे. समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या बातम्या व व्हिडीओ बाबतच्या सत्यतेची पडताळणी करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. त्याच प्रमाणे सामाजिक समस्या व ग्रामीण भागातील प्रश्न यांना माध्यमात मोठया प्रमाणात जागा देणे आवश्यक असल्याचे मत या चर्चेत मांडण्यात आले. आयुष्यातील चढ उताराप्रमाणे पत्रकारितेमध्येही चढ-उतार येत असुन नकारात्मक चर्चेपेक्षा पत्रकारांनी आपल्या सकारात्मकतेने लेखणीची ताकद जाणुन समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
किशोर आगळे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी केलेल्या पत्रकारितेचा आदर्श समोर ठेऊन त्यांच्या प्रेरणेतुन आपण आज या क्षेत्रामध्ये काम करत आहोत.  समाजातील गोरगरीब व वंचिताला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीची ताकद वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात माहिती सहाय्यक अमोल महाजन यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.
सर्वप्रथम  राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर  व पत्रकारांनी  आचार्य बाळशास्त्री जांभेकर व बाबुराव विष्णु पराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आभार राजेंद्र वाणी यांनी मानले. कार्यक्रमास मुद्रीत माध्यमांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी तसेच ई-माध्यमांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*******



Saturday 3 November 2018

जनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांनी अधिक कार्यक्षम रहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




            जालना, दि. 3 – जनतेला सुरक्षितता वाटली पाहिजे. यादृष्टीने पोलीस विभागाने अधिक कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतला. यावेळी ते बोलत होते.
            बैठकीस पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश टोपे, तसेच मुख्यमंत्र्‌यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती  निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस.चैतन्या उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुन्हे प्रकरणातील दोषसिद्धीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेने वाढले असले तरी पोलीस विभागाने व शासकीय लोक अभियोक्त्यांनी अधिक जागरुकपणे लक्ष घालणे गरजेचे आहे. गुन्हे प्रकरणे सुटण्यामागील कारणमीमांसा करीत शासनाने निर्गमित केलेल्या 14 शासन निर्णयाच्या आधारे अधिकाधिक प्रकरणात दोषसिद्धी होण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावेत. यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांच्या बैठकांचे नियमित आयोजन करुन सबळ पुराव्याची शहानिशा करुनच प्रकरणे न्यायप्रविष्ट होतील, याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
            यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस स्थानकनिहाय व शासकीय लोकअभियोक्तानिहाय दोषसिद्धीच्या प्रमाणाचा आढावा घेऊन त्यामागील कारणे जाणून घेतली. समन्स आणि वॉरंट देण्याचे प्रमाण गरजेनुसार वाढले पाहिजे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या दाखल गुन्ह्यातील प्रकरणात हयगय न करता आरोपीविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश यावेळी दिले. याशिवाय त्यांनी अशा घटकांना प्रतिबंध घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचीही यावेळी माहिती घेतली.
            गुन्हे उघडकीचे प्रमाण, वाळुचोरीविरुद्ध कारवाई, अवैध हत्यार व अवैध गुटखा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई तसेच अवैध दारुविक्री, जुगार, मोटारवाहन कायद्यांतर्गत कारवाईच्या पोलीस विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
            पोलीस गृहनिर्माण विषयक कामांचा आढावा घेऊन गृहनिर्माण महामंडळाला अधिकगतीने जालना येथील पोलीसांच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्याचे निर्देशही या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. प्रारंभी पोलीस अधीक्षक एस.चैतन्या यांनी सादरीकरणाद्वारे कामकाजाची माहिती दिली. बैठकीस सर्व पोलीस अधिकारी, अभियोक्ता उपस्थित होते.
*******







पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य दुष्काळाशी सामना करण्यासाठी यंत्रणांनी संवेदनशील रहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



          जालना, दि. 3 –  येत्या  तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला समोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभुमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिले.
            जालना जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांचा व शासनाच्या  महत्वकांक्षी योजनांचा आढावा मुख्यमंत्र्‌यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला, यावेळी ते बोलत होते.
            बैठकीस पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,आमदार राजेश टोपे, तसेच मुख्यमंत्र्‌यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती  निमा अरोरा तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांविषयी जाणून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालना जिल्ह्यातील यावर्षी झालेल्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे व पाटबंधारे प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुढील तीन–चार महिन्यांसाठी पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यांच्या पर्यायी उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करावे. आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देतानाच  इतरही उपाय योजनांची प्राधान्याने अंमलबजावणी केली पाहिजे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्धतेच्या भागात रोपे व बियाणे  देवून चारा उत्पादनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी बारकाईने नियोजन आराखडा तयार करावा. डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी आत्तापासूनच पुढील नियोजन करण्यात यावे.
            जालना शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देऊन योजना पुर्ण केल्यास उन्हाळ्यात नगरवासीयांना दिलासा देता येईल. यादृष्टीने काम पुर्णत्वाच्याबाबत पुढाकार घ्यावा. शासनस्तरावरुन सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
            पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने 11 कोटी 54 लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला असुन विहिर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी उपाययोजना प्राधान्याने राबवुन टंचाईची झळ जनतेला पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, शहरी भागातील नगरपालिकांनी व नगरपंचायतींनी पाणीटंचाईच्या निवारणासाठी गंभीरपणे पाऊले उचलावीत.
            राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनांच्या जिल्ह्यातील कामगिरीचा आढावा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सादरणीकरणाद्वारे दिला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सर्वात कमी काम असलेल्या तालुक्यातील अडचणी अधिकाऱ्यांकडून समजावून घेतल्या. सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरकुल बांधकामासाठी पुढाकार न घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन अडचणींचे निराकरण करावे. जमीन उपलब्ध नसल्यास दिनदयाळ योजनेतुन शासकीय जमीन उपलब्ध करुन द्यावी. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरे दिली पाहिजेत. यासाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची अंमलबजावणी करावी.  डिसेंबरमध्ये आणखी सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट दिले जाणार आहे, असे सांगुन मुख्यमंत्र्यांनी उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.
            प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरी भागातील घरकुल बांधकामासाठी नगरपरिषदांनी पुढाकार घ्यावा. जमीनीचा प्रश्न असेल तर प्रस्तावित लाभार्थ्यांच्या झोपडपट्टया नियमित करुन तिथेच जमीनीचे पट्टे मालकी त्यांना देऊन घरकुल बांधकाम करण्यात यावे, असे निर्देश देऊन ग्रामीण व शहरी भागांचे घरकुलांचे उद्दिष्ट 2019 पर्यंत पुर्ण करावे, अशी सुचनाही मुख्यमंत्री        श्री फडणवीस यांनी यावेळी केली.
            परतूर येथील भुयारी गटार योजना, नागरी वस्ती सुधार योजना आणि दलित वस्ती सुधार योजनांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे अधिक गतीने व मिशन मोडवर करण्याचे आवाहन केले.  जिल्ह्यातील पथदर्शी प्रकल्पाची माहिती घेऊन त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा व मागेल त्याला शेततळे तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या महत्वाच्या योजनांना गती देण्याचे आवाहन केले.  जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी 206 गावे निवडली असुन आता दुष्काळी परिस्थितीत या कामांना अधिक गती देण्याची गरज आहे.  जिओ टॅगींगची कामे गतीने पुर्ण करण्यात यावी.  शेततळयांचे महत्व लक्षात घेऊन जिल्ह्याने सहा हजार उद्दिष्ट असताना 7 हजार 35 कामे पुर्ण करुन चांगले कार्य केले आहे. मात्र अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना शेततळे देण्याची मोहिम राबवावी.  खडकाळ जमीनीमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेततळयांची योजना नरेगाशी जोडुन शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार उपक्रमात गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना काही मदत करण्याची भूमिका शासनाने आखली असुन स्वयंसेवी संस्थांना या कामात प्रशासनाने अधिकाधिक सहकार्य करावे, असे सांगुन त्यांनी शेततळयांमुळे झालेल्या सामाजिक प्रभावाचाही आढावा प्रशासनाने घेण्याची गरज प्रतिपादन केली.
            महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी ग्रामसभेने तयार केलेल्या आराखड्याला जिल्हा परिषदेची मान्यता घेऊन त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची सुचना केली. रोजगार हमीच्या कामावर राज्यात जवळपास तीन पटीने खर्च वाढला आहे. तरी जालना जिल्ह्याने पुढे येऊन अधिक कामे सुरु केली पाहिजेत. सिंचन विहिरीच्या जुन्या कामांना प्राधान्य दिले गेले असले तरी 60 टक्क्यापेक्षा जास्त कामे केले त्यांना नवीन विहिरी घेण्याची मुभा देण्याबाबत यावेळी विभागाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचना केली.
            अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांमधुन गरजुंना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने कर्जाची हमी घेतली असल्याचे सांगुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा घेतला. महाडीबीटी योजनेंतर्गत सर्व महाविद्यालयांची जिल्हास्तरावर बैठक घेऊन समन्वय साधण्याची सुचना करुन त्यांनी ज्या महाविद्यालयांचे अथवा संस्थांचे सहकार्य मिळत नसेल अशांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देश दिले.  यावेळी त्यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेऊन बळीराजा जलसंजीवनी योजनेतील सहापैकी तीन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत व उर्वरित तीन प्रकल्पांच्या कामांतील भुसंपादन प्रक्रियेच्या अडचणीबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर आढावा घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.  जिल्ह्यातील रस्त्यांची कामे, ग्रामसडक योजना, समृद्धी महामार्गाच्या तसेच ड्रायपोर्ट, रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय आणि सीडपार्क आदी कामांचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
*******\









Thursday 1 November 2018

जलयुक्तच्या कामामुळे पीकांना नवसंजीवनी मात्रेवाडी गाव टँकरमुक्त जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला दुग्धव्यवसायामध्ये भरभराटी



            जालना, दि. 1 –  जिल्ह्यात शाश्वत पाणी साठे निर्मितीवर भर देऊन जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यात  येत आहेत.  जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा खंड असला तरी बदनापुर तालुक्यातील केळीगव्हाण, नजीकपांगरी व मात्रेवाडी या गावात जलयुक्तच्या पाण्यामुळे पीकांना नवजीवन मिळाले असुन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटण्याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही भरभराटीस येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
            केळीगव्हाण येथील शेतकरी पंडित मदन  यांची एक एकर शेती असुन या शेतीवर डाळींबाची लागवड केली आहे तर सखाराम अंबादास मदन यांनी दीड एकर शेतीवर ऊस व टोमॅटो तसेच चारा पीकाची लागवड केली आहे. याच गावातील शेतकरी विष्णु मदन यांनी साडेचार एकरवर मोसंबीच्या 300 झाडांची बाग फुलवली असुन दहा टन डाळींबाचे उत्पादन या माध्यमातुन होणार असुन जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन झालेल्या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असल्याचे येथील शेतकरी संतोष मदन यांनी सांगितले.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला
            दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येतो. परंतू केळीगव्हाण या गावात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या कामांमुळे परिसरातील दीड किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या असलेल्या विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले असुन यामुळे इतर पीकांच्या लागवडीबरोबरच जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चारापीकांची लागवड करण्यात येऊन चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 
दुग्ध व्यवसायाला भरभराटी
            गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे चांगल्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली असुन शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय भरभराटीस आला आहे.  गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे देशी तसेच संकरित वाणाचे जनावरे असुन या माध्यमातुन दरदिवसाला सरासरी प्रत्येकी 20 ते  25 लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे.  दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळाला असल्याची भावानाही शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.
            केळीगव्हाण गावाचे भौगोलिक क्षेत्र 714.91 हेक्टर एवढे असुन लागवडीयोग्य क्षेत्र 580.89 हेक्टर एवढे आहे.  गावामध्ये एकूण 227 एवढ्या विहिरी तर 14 बोअरवेल आहेत. गावात ठिबक/तुषार सिंचनाचे क्षेत्र 150 हेक्टर एवढे असुन सन 2016-17 या वर्षात गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदीखोलीकरण, सिमेंट नालाबांध, मातीनालाबांध, कंपार्टमेंट बंडीगची कामे करण्यात आली आहेत.  गावात मोसंबी पीकाचे 43 हेक्टर, कापुस 332 हेक्टर डाळींब 25.50 हेक्टर द्राक्ष 3 हेक्टर, सोयाबीन 96 हेक्टर, मका 44 हेक्टर, तूर 117 एवढे क्षेत्र असुन गावात दोन शेततळेही असल्याची माहिती कृषि पर्यवेक्षक पी.एस. इंदलकर व मंडळ  कृषी अधिकारी आर.जी.सुरडकर यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानामधील कामांमुळे मात्रेवाडी गाव टँकरमुक्त
            मात्रेवाडी गावामधून वाहणाऱ्या भोरडी नदीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन खोलीकरण करण्यात आल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.  तसेच यापूर्वी गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता परंतू जलयुक्तच्या कामात झालेल्या पाण्याच्या संचयामुळे गाव टँकरमुक्त्‍ झाले असुन या गावाला जलमित्र पुरस्कारही मिळाला असल्याचे गावकऱ्यांसह कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सव्वाचार एकरवर फुलवली द्राक्षाची बाग
द्राक्षाच्या माध्यमातुन वीस लाख रुपयांचे उत्पन्न
            मात्रेवाडी गावातील शेतकरी लक्ष्मण दामोधर खडेकर या शेतकऱ्यांने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन संचय झालेल्या पाण्याच्या जोरावर त्यांच्याकडे असलेल्या सव्वाचार एकर जमीनीवर द्राक्षाची बाग फुलवली असुन या द्राक्षाच्या माध्यमातुन 20 लक्ष रुपयांची कमाई केली आहे.  त्याचबरोबर दाळींब या पीकाचीही लागवड करुन आदर्श अशी शेती केली आहे.  जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढून त्याचा फायदा झाला. पूर्वी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करुन पीके जगवावी लागत होती.  परंतू एवढे करुनसुद्धा अपेक्षित उत्पादन होत नव्हते.  परंतू आजघडीला ही परिस्थिती बदलून अपेक्षापेक्षा अधिक उत्पादन होत असल्याची भावना   श्री  खडेकर यांनी बोलून दाखवली.