Tuesday 31 October 2023

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर

 

 

जालना दि. 31 (जिमाका) :-  1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सेना दलातील मतदार यादीतील शेवटच्या भागाची प्रारुप मतदार यादी सुध्दा जालना जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाचही विधानसभा मतदार संघामध्ये पदनिर्देशित ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

नेहरु युवा केंद्राकडून राष्ट्रीय एकता दिवस साजरा

 


 

जालना दि. 31 (जिमाका) :-  जालना येथील नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या , भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक व भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जिल्हा क्रीडा कार्यालय, जालना येथे साजरी करण्यात आली.     

यावेळी विस्तार अधिकारी श्री. लहाने, राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे व गणेश दाभाडे यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला  तसेच राष्ट्रीय एकता दिन निमित्त़ राष्ट्रीय एकता दौड संपन्न झाली. यावेळी उपस्थित नारायण वाघमारे, पवन देशमुख, जयपाल राठोड, अक्षय साने, सुजित शिंदे, पवन दांडगे इत्यादी उपस्थित होते. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

 


 

जालना, दि. 31 (जिमाका) : माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन तर माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा केली जाते. सदर कार्यक्रमप्रसंगी सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

-*-*-*-*-

निवृत्तीवेतन धारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 31 (जिमाका) : राज्य शासनाचे सर्व निवृत्तीवेतन धारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी दरवर्षी माहे नोव्हेंबरमध्ये हयातीचे दाखले बँकेत सादर करण्यात येतात. त्याअनुषंगाने हयात प्रमाणपत्राची संगणकीकृत यादी कोषागारातून बँकेत पाठविण्यात आली आहे. सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी त्यांचे हयात असल्याचे प्रमाणपत्र दि. 1 नोव्हेंबर 2023 नंतर संबंधीत बँकेत जाऊन दि. 10 डिसेंबर 2023 पुर्वी यादीमध्ये स्वाक्षरी करुन द्यावे, तसेच स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक नमुद करावा,  असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांनी केले आहे.

बँकांनी निवृत्तीवेतन धारकांची यादीमध्ये त्यांच्या नांवासमोर स्वाक्षरी घ्यावी, तसेच हयातीबाबत स्वाक्षरी घेणे चालु आहे अशा आशयाची दर्शनिभागावर सुचना लावावी. स्वाक्षरी झालेली संगणकीकृत यादी सर्व संबंधीत बँकांनी आपल्या प्रतिनिधीद्वारे व्यक्तीश: दि. 15 डिसेंबर 2023 पर्यंत कोषागारामध्ये सादर करावी.

ज्या सेवानिवृत्तीवेतन धारकांची नावे बँकांना सादर केलेल्या यादीत नसतील त्यांनी हयातीचे दाखले दि.5 डिसेंबर 2023 पुर्वी कोषागार कार्यालयात वैयक्तीकरित्या ओळखपत्रासह व बँकेचे पेन्शन बँक खाते पासबुकसह उपस्थित राहून भरुन द्यावीत. तसेच ज्या तालुक्यामधील बँकामध्ये आपण निवृत्तीवेतन घेतात त्या तालुक्यामधील कोषागार, उप कोषागारामध्ये जाऊन जीवनप्रमाण प्रणालीमध्ये सुध्दा हयातीचे प्रमाणपत्र नोंदवावे. सोबत आधार कार्ड, पी.पी.ओ. क्रमांक, बँकेचे पेन्शन बँक खाते पासबुक तसेच मोबाईल सोबत घेऊन जावा. असे जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

ग्रंथालयांना विविध योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


जालना, दि. 31 (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुकांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहीत मार्गाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना येथे दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जीवने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळ पहावे, यावर अटी व अर्जाचा नमुना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सन 2023-24 साठीच्या समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्यक योजना 25 लाख रुपये असे आहे. सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य तसेच राष्ट्रीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य याप्रमाणे आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

शेतकऱ्यांनी विविध कृषी औजारासाठी पंचायत समितीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत

 

 

जालना, दि. 31 (जिमाका) : जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2023-24 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कृषी औजारे पुरविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी औजारे मागणीसाठी संबंधित पंचायत समितीमध्ये दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व अतिरिक्त मुख्य  कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.

कृषी औजारामध्ये एच.पी.ओपनवेल सबमर्सिबल विद्युत पंपसंच, कडबाकुटी विना विद्युत मोटार, ट्रॅक्टर चलित औजारात पल्टीनांगर व पेरणी यंत्र, ब्लोअर, रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे सातबारा व वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपर्यत असावे. असे कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday 30 October 2023

समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक तीन दिवस काही तासांसाठी वळविली

 


 

जालना दि. 30 (जिमाका) :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुची वाहतूक दि.31 ऑक्टोबर ते   दि.2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3.30 या वेळेत पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे, तरी या दिवशी इतर वेळेत याभागातील समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहील. असे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.

समृध्दी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-१४) ते सावंगी इंटरचेंज (१०-१६) दरम्यान समृध्दी महामार्गवरुन नागपूरकडुन मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४ मधुन बाहेर पडुन निधोना एमआयडीसी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना - छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत - नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर)" येथे समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

समृध्दी महामार्गावरील शिर्डीकडुन नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडुन वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुध्द दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४" या ठिकाणी समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले  आहे.

-*-*-*-*-

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज करावेत

 


 

जालना दि. 30 (जिमाका) :- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासूची तयार करावयाची आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी मंगळवार    दि. 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.

संसाधन व्यक्तींसाठी सर्व प्रकारच्या पदवीधारकांना आणि ज्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे (DPR) ज्ञान व अनुभव असलेले उमेदवार तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन, वृध्दी, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी, व्यवस्थापन यासाठी अन्न सुरक्षा सल्ला देण्यासंदर्भात 3 ते 5 वर्षाचा अनुभव असावा.

संसाधन व्यक्तींना त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टीने जे सहाय्य केले त्यानुसार मोबदला दिला जाईल. संसाधन व्यक्तीस मंजुरीनंतर प्रती बँक कर्जासाठी रु. 20000/- (अक्षरी-वीस हजार रु.) देण्यात येतील. त्यापैकी 50 टक्के रक्कम ही बँक कर्ज मंजुरीनंतर व उर्वरीत 50 टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, आधार नोंदणी एफएसएसएआयची उत्पादन मानके दर्जा पूर्तता, उद्योगाची कार्यवाही व लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाईल. या व्यतिरिक्त मार्गदर्शक सूचना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक व इतर (मानधन) अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांचे कार्यालयात व योजनेच्या www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


 

जालना दि. 30 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानूसार सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना येथे Pre- Institution Mediation and Settlement (PIMS) in Commercial Dispute and Cyber Security या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

मार्गदर्शन शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश किशोर जयस्वाल, आणि सायबर सुरक्षा विश्लेषक अॅड. स्वरदा कबनूरकर, हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस जिल्हा न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी Pre-Institution Mediation and Settlement (PIMS) in Commercial Dispute याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सायबर सुरक्षा विश्लेषक अँड स्वरदा कबनुरकर, यांनी सायबर सिक्युरिटी विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपण दैनंदिन जिवनात मोबाईल कसा हाताळला पाहिजे आणि हाताळतांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी अगदी सोप्या शब्दात उपस्थितांना माहिती सांगितली. प्रत्येकाने मोबाईलमध्ये कोणते अॅप्लीकेशन मोबाईलमध्ये घेतले पाहिजे आणि त्याची परवानगी अॅक्सेस दिला पाहिजे याबद्दल त्यांनी सांगितले. आपण आपल्या मोबाईलमध्ये अँटी व्हायरस या अॅप्लीकेशनचा वापर केल्याने आपला मोबाईल हॅक होण्यापासुन सुरक्षित राहील. तसेच झोपतांना मोबाईल जवळ बाळगु नये आणि आवश्यकता नसल्यास मोबाईल नेट बंद करून ठेवावे असेही त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे सहायक लोक अभिरक्षक अँड यश लोसरवार, यांनी केले तन आभार हे अँड. पठाण यांनी मानले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

Friday 27 October 2023

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

 


जालना दि. 27 (जिमाका) :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सलेक्शन  बोर्ड या  परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक-युवतींसाठी दि.  20 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 55 पुर्व प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.  तरी जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

सर्विस सलेक्शन  बोर्ड कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजनासह प्रशिक्षणाची  नि:शुल्क सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येतेवेळी  संकेतस्थळावर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयर पुणे सर्च करुन त्यामधील एसएसबी-55 कोर्ससाठी किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.    

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवुन यावेत. कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ सर्टीफिकेट ‘ए’ किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखती साठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय. डी. traing.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 व व्हॉट्सप क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

कृषी विभागाचे आवाहन मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावेत

 


जालना दि. 27 (जिमाका) :-  मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2023-24 अंतर्गत जालना जिल्ह्याकरीता 5 अन्न प्रक्रिया उद्योगांना 135.00 लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेत पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी घेवु शकतात. तरी इच्छुकांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.

साधारण एका प्रकल्पाचे मुल्य 90 लाख असल्यास 30 टक्के अनुदान रक्कम रु. 27 लाख मिळु शकते. या योजनेंतर्गत शेतमालाचे मुल्यवर्धन व गुणवत्ता वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला इत्यादी शेतमालाकरीता नवीन अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापित करण्यास तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृध्दी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणास 30 टक्के अनुदान (कमाल मर्यादा रु.50.00 लाख) देण्यात येते.

योजनेमध्ये कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना (नवीन प्रकल्प उभारणी) व कार्यरत असलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृध्दी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण.  मुल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभुत सुविधा या तीन उपघटकांचा समावेश आहे. योजनेच्या माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकाकडे  संपर्क साधुन त्वरीत अर्ज करण्यात यावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

आगामी काळातील निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ


जालना दि. 27 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे सुरू असून या कार्यक्रमांतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या दरम्यान दावे व हरकतीचा कालावधी निश्चित केलेला आहे. जिल्ह्यातील ज्या तरुणांना वयाची 18 वर्षे पूर्ण होत असतील अशा सर्व तरुणांनी आगामी काळातील निवडणूकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात शुक्रवार दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,मतदार नोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व 1699 मतदान केंद्रावर प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 09 डिसेंबर 2023 या कालावधीत राबवला जाणार आहे. 01 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 01 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल; मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले आहे. प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही या मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते. दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या दावे व हरकतीच्या कालावधीत दि. 4 व 5 नोव्हेंबर 2023 व दि. 25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी 1699 मतदान केंद्रावर मतदार नोंदणी करीता विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील 348 महाविद्यालयात महाविद्यालयीन तरुणांच्या नावनोंदणीसाठी दि. 23 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे यासाठी 100 महाविद्यालयांना बॅनर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिला मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील 10 हजार घरगुती गॅस कनेक्शनवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत महिला मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात येणार आहे. सोबतच महिलाच्या मतदार नोंदणी शिबिरांसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दि. 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. सोबतच तृतीयपंथी व्यक्ती, शरीरव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी दि .02 व 03 डिसेंबर 2023 या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सदर समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे, त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत. ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 01 ते 07 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्विया गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 20 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान घरोघरी अधिकारी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हातील सर्व मतदान केंद्रावर कार्यरत असलेल्या सर्व मतदान केंद्र अधिकारी यांनी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांचे नाव तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाहीत याची तपासणी केली.ज्या नव मतदारांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केले आहेत अशा नवमतदारांचे मतदार यादीत नोंदविले, तसेच प्रत्येक मतदाराचा मतदार यादीती वैयक्तिक तपशील पत्ता यात काही दुरुस्ती असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले.सोबतच लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांचे नावे बदलून घेण्याची कार्यवाही करण्यात आली, स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नव्या पत्त्याची नोंद करून घेण्याबाबतची मोहीम सुद्धा राबविण्यात आली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 15 लाख 54 हजार 515 मतदारांपैकी 15 लाख 48 हजार 970 मतदारांची पडताळणी करण्यात आली. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पूर्व पुनरिक्षण उपक्रमातर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे हे नमूद केले होते. त्यानुसार मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्राचे विभाजन करुन नवीन मतदान केंद्र तयार करणेबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले होते.या अनुषंगाने दि. 18 आक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या कडून मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे,नवीन मतदान केंद्रांना मंजुरी याबाबत आदेश प्राप्त झाले. यानुसार जिल्हात नवीन 49 मतदान केंद्र, 34 मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल, 34 मतदान केंद्राच्या नावात बदल झाले असून आज रोजी जिल्हात एकुण 1699 मतदान केंद्र आहेत. मतदार जनजागृती करण्यासाठी दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने 3 लाख विद्यार्थांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तर अनुसूचित जातीच्या मतदार नोंदणीसाठी जिल्हात 82,अनुसुचित जमातीसाठी 49,विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मतदार नोंदणीसाठी 44,दिव्यांग मतदार नोंदणीसाठी 9,तरुण मतदार नोंदणीसाठी 36,गणेशोत्सवादरम्यान 20,तर नवरात्रोत्सवादरम्यान 20 ठिकाणी विशेष शिबीरांचे आयोजन केले होते. दि. 5 जानेवारी 2023 रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या 1544834 इतकी होती. तर दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हातील मतदार संख्या 1554515 एव्हढी आहे. दि. 5 जानेवारी 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान मतदार यादीत नवीन नावनोंदणीसाठीचा नमुना अर्ज क्रमांक 6 चे 27026 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 15987 नवमतदारांचा मतदार यादीत समावेश करुन घेण्यात आला आहे. तर विविध कागदपत्रे व अर्ज भरण्यातील त्रुटी यामुळे 2017 अर्ज नाकारण्यात आले आहेत. उर्वरित 9022 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया जिल्हातील पाचही मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून राबविली जात आहे. दि. 5 जानेवारी 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान मतदार यादीत नवीन मतदार यादीतून मयत मतदार,स्थलातंरीत मतदार व दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळणीसाठीचा नमुना अर्ज क्रमांक 7 चे 9190 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 5378 अर्जांवर निर्णय घेण्यात येऊन ती नावे वगळण्यात आली. तर 1378 अर्ज नाकारण्यात आले. व 2434 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया जिल्हातील पाचही मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून राबविली जात आहे. दि. 5 जानेवारी 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान मतदार यादीत नमुना क्रमांक 8 मतदार यादीतील मतदारांच्या तपशीलातील दुरुस्ती, विधानसभा मतदारसंघातर्गंत स्थलांतर दिव्यांग मतदारांची मार्किंग, मतदारांचे ओळखपत्र बदलण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 8 चे 13704 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 9944 अर्जांवर निर्णय घेण्यात आला. तर 730 अर्ज नाकारण्यात आले. व 3030 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया जिल्हातील पाचही मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून राबविली जात आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, अंबडचे उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, जालनाचे उप विभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, भोकरदनचे उप विभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, मंठा तहसीलदार रुपा चित्रक, परतुर तहसीलदार प्रतिभा गोरे, घनसावंगी तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर, अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके, जालना तहसीलदार छाया पवार, बदनापूर तहसीलदार सुमन मोरे, तहसीलदार संतोष बनकर, जाफ्राबाद तहसीलदार सारिका भगत यांच्यासह सर्व निवडणूक नायब तहसीलदार, ऑपरेटर परिश्रम घेत आहेत. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि.27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या दावे व हरकतीच्या कालावधीतील मतदार नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबिरात दि.5 ते 6 नोव्हेंबर 2023 रोजी 1699 मतदान केंद्रावर मतदारांच्या नोंदणीसाठी शिबीर, दि.25 व 26 नोव्हेंबर रोजी 1699 मतदान केंद्रावर मतदारांच्या नोंदणीसाठी शिबीर, दि.23 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील 348 महाविद्यालयात महाविद्यालयीन तरुणांच्या नाव नोंदणीसाठी शिबीर, दि.2 व 3 डिसेंबर रोजी 1699 मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, तृतीय पंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमातीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत 768 ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली. -*-*-*-*-

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे एकत्रित कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

 


 

जालना दि. 27 (जिमाका) :-  आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी स्वतः आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअरवरून आयुष्यमान अॅप  डाऊनलोड करुन आपले आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढावेत.  तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेमध्ये देखील आपल्या जालना जिल्ह्यातील एकूण 7 लाख 90 हजार लाभार्थी आहेत, तरी या लाभार्थ्यांची यादी आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहोचविण्यात आले आहेत, तरी पात्र लाभार्थ्यांनी वरील दिलेल्या सुचनेनूसार आपले एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचे कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे-या योजनेमध्ये एकूण 5 लाख रुपयांपर्यंत प्रती कुटुंब वार्षिक लाभ दिला जातो तसेच या योजने अंतर्गत 1359  आजार समावेश आहेत, या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांकडे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड असणे अनिवार्य आहे आपल्या जालना जिल्ह्यातील एकूण 22 रुग्णालय या योजनेत अंतर्गत अंगीकृत आहेत. आयुष्मान भारत योजनेचे पात्र लाभार्थी संख्या 8 लाख 24 हजार 905 आतापर्यंत आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 10 हजार 9 अशी आहे.

आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे कार्ड कसे काढावे - आपल्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्र आशा कार्यकर्ती व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डेटा एन्ट्री ऑपरेटर व योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयातील आरोग्य मित्र व स्वतः यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढावे. आयुष्मान ॲप लिंक  https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp ही आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियानातंर्ग दिव्यांग मेळाव्याचे जालन्यात 3 नोव्हेंबरला आयोजन दिव्यांगांच्या जाणून घेतल्या जाणाऱ्या समस्या

 


जालना, दि. 27 (जिमाका) -- दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी हे अभियान जालना शहरातील पोलीस परेड ग्राउंड येथे  शुक्रवार, दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या दिव्यांग मेळाव्यास  अभियानाचे  मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्याकरीता सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा उपस्थित राहणार आहे. मेळाव्यात  दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी सुध्दा केली जाणार आहे. याशिवाय दिव्यांगांना  शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्याकरीता त्यांना माहिती देवून अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. यासह  विविध दाखल्यांची नोंदणी तसेच युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय महामंडळे आणि शासकीय विभागांकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत.

या मेळाव्यात  जिल्हा परिषद, महसुल विभाग, आरोग्य विभाग, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांच्यासह सर्व महामंडळं, महानगरपालिका, नगरपालिका व इतर  शासकीय कार्यालयांचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

 जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस परेड ग्राउंड सर्वे क्र. 488, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday 26 October 2023

जालन्यात 3 नोव्हेंबरला “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियान अभियानाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


जालना दि. 26 (जिमाका) :- दिव्यांग कल्याण विभागाचा 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.  जालना येथील पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी शुक्रवार, दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान या अभियानाचे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांच्या प्रमुख  उपस्थित दिव्यांग अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. तसेच  अभियानाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशी सुचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या नियोजनासाठी बुधवारी (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्योती राठोड, यांच्यासह मनपा, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध महामंडळांचे व्यवस्थापक, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

जालना येथे 3 नोव्हेंबर रोजी आयोजित अभियानात महसुल विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिव्यांग वित्त विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महानगरपालिका, नगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, व इतर 40 शासकीय कार्यालयांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

तसेच अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी माहिती देवून अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. यासोबतच विविध दाखल्यांची नोंदणी तसेच युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय महामंडळे आणि शासकीय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत.

या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करावे. दिव्यांगांना कुठलीही अडचण जाणवणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की,  संबंधित विभागप्रमुखांनी कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करावे. दिव्यांगांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. कार्यक्रमस्थळी दिव्यांगांसाठी नोंदणीची व्यवस्था, जेवन/चहापान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून  हे अभियान  यशस्वी करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. 

या अभियानामध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.  जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस परेड ग्राउंड सर्वे क्र. 488, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

लोकशाही दिनाचे 6 नोव्हेंबर रोजी आयोजन

 


 

          जालना दि. 26 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही  दिनाचे  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते.  तरी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही  दि  सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित  करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी संगिता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

              लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.  लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी,  विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.   तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना  https://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Wednesday 25 October 2023

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शिबिराचे आयोजन जालना येथे 2 नोव्हेंबर रोजी शिबीर

 


जालना दि. 25 (जिमाका) :- मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत 21 ऑक्टोबर 2023 रोजी  मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

मराठवाड्यात जिल्हानिहाय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक जिल्ह्यात कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व माहिती नागरिकांना देणे. लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, योजनेची विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जालना येथे दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिबिराच्या आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे - सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023-24 या वर्षात मराठा, कुणबी  व कुणबी मराठा अशा एकूण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रमाची मागणी नोंदणीचा अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

 एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज भरून सारथी संस्थेचे माहितीपत्रक वाटप करण्यासोबत एमकेसीएल मार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत या कार्यक्रमात ऐकवले जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन  सत्र आयोजन, शिबिराच्या ठिकाणी सारथी संस्थेचे यशस्वी विद्यार्थ्याचे बॅनर तयार करून लावल्यास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सारथी संस्थेचे योगदान कळेल तसेच सारथीचे कोचिंग घेण्यास प्रेरणा मिळणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम पुढीप्रमाणे -

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत योजनेची माहिती देण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महामंडळाचे नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व विभागात प्रचार प्रसिध्दीसाठी समाज माध्यमवरुन, रेडिओ एफएम आणि एस. टी. महामंडळाच्या बसेस, बस स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग्जच्या माध्यमातून समाजापर्यंत योजनेची माहिती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मेळाव्याच्या ठिकाणी बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच काही छोट्या उद्योगाबाबत आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी संबंधी उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती देणारे कर्मचारी  उपस्थित राहून याबाबत माहिती देणार आहेत.

 संस्थांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्याची निवड, व्यवसायातील प्रगती याबाबतची सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याबाबत नियमित आढावा घेणार आहे.

 सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना तात्काळ योजनांचे लाभ मिळवून देण्याबाबतच्या शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीरासाठी  जिल्ह्यातील महत्त्वाच्या बँकांचे प्रतिनिधी, विविध व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती सविस्तरपणे सांगून पात्र लाभार्थ्यापर्यंत या संस्थांच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या करण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त व इतर विभाग प्रमुख यांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात. तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, सारथी व व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी उपस्थित राहून शिबिराचे यशस्वी आयोजन करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभाग सचिव सुमंत भांगे यांनी केले आहे.

पहिला टप्पा जिल्हा निहाय कार्यक्रम पुढील प्रमाणे -

         बीड जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जालना येथे 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना, लातूर येथे 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, धाराशिव येथे ४ नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे सकाळी 11 वाजता , परभणी येथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, हिंगोली येथे 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली, नांदेड येथे 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या जिल्ह्यांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

माणसाशी नाळ जोडणारा उपक्रम म्हणजे ‘मेरी माटी, मेरा देश’ - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ *जिल्हा परिषद परिसरात अमृत कलश यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 











 

जालना दि. 25 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम जिल्हाभरात उत्स्फुर्तपणे राबविण्यात आला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही लाभला.  गावापासून ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश असून जनतेशी नाळ जोडणारा उपक्रम म्हणजे ‘मेरी माटी, मेरा देश’ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या परिसरात ग्रामसेवक संघटना व जिल्हा परिषदेचा पंचायत विभागाने बुधवार दि.25 ऑक्टोबर 2023 रोजी अमृत कलश यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा ) राजेंद्र तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं ) अंकुश चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा व स्व) बालचंद जमधडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी राजेंद्र सोळुंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( बाक) कोमल कोरे, समाजकल्याण अधिकारी तथा गट विकास अधिकारी बदनापूर ज्योती राठोड, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.बी. काळे, सचिव पी. एस . वाघ, मानद अध्यक्ष प्रवीण पवार  यांची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून गावागावात केलेल्या जाणीव जागृतीचे महत्व सांगितले. या सोबतच स्वयं प्रेरणेने जिल्हा परिषदेने जो कार्यक्रम आयोजित केला त्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. विविध जिल्ह्यातील कामाचा अनुभव ही त्यांनी यावेळी विशद करून मराठवाड्यात जनताभिमुख काम करण्याची अधिक संधी असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. 

ग्रामसेवकांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मी भावूक झाले असल्याची भावना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून एकत्रित केलेली माती राज्यस्तरावर संकलित केली जाणार असून, तेथून ते दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प) अंकुश चव्हाण यांनी या उपक्रमामागील पार्श्वभूमी प्रास्ताविकात सांगितली. जिल्हा बाल विवाह मुक्त व्हावा यासाठी त्यांनी सादर केलेल्या कवितेस उपस्थितानी प्रचंड दाद दिली. 

ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. बी काळे यांनी यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून केलेले जिल्हाभरातील कार्यक्रमाची  माहिती दिली.  गट विकास अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील अमृत कलश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुपूर्द केले व त्यांनी ते नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकाकडे सुपूर्द केले. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून ते मुंबई व दिल्ली येथे पोहोचवले जाणार आहेत. यावेळी जालना पंचायत समितीच्या महिला ग्रामसेवकांनी सादर केलेले देशभक्ती गीताने वातावरण भारावून गेले. ग्रामसेवकांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. या वेळी सर्व गट विकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सुरुवातीस सर्व ग्रामसेवक यांनी जिल्हा परिषद पासून अंबड चौफुली , जिल्हाधिकारी कार्यालय व परत जिल्हा परिषद या दरम्यान रॅली काढली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष, सचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका सदस्यांनी प्रयत्न केले. सूत्र संचालन राज्यउपाध्यक्ष डी. पी भालके यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव पी.एस.वाघ यांनी मानले.

-*-*-*-*-