Thursday 31 August 2017

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा संवादपर्व कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांचे आवाहन



शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
           संवादपर्व कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांचे आवाहन
        जालना, दि. 31 – शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक स्तर उंचावण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर  यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जालना तसेच ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळ, जालना, जनसाथी दुष्काळ निवारण मंच व नवोदय क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदनापुर तालुक्यातील मान देऊळगाव येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री बावस्कर बोलत होते.
            यावेळी ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळचे सचिव पुष्कराज तायडे, नवोदय क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाचे शिवाजी तायडे, सरपंच हिराबाई डोंगरे, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री बावस्कर म्हणाले की, शासन सर्वसामान्यांसाठी अनेकविध योजना राबविते.  या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध माध्यमांद्वारे करण्यात येते.  त्याचाच एक भाग म्हणून आज संवादपर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असुन अस्वच्छतेमुळे आज आपल्याला अनेक आजारांचा सामाना करावा लागत आहे.  यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारी शौचालयाची उभारणी करावी.  शौचालयाच्या उभारणीसाठी शासनामार्फत 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याचे सांगत याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            शासन राबवित असलेल्या ध्येय, धोरण तसेच विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी व गुजराती या भाषेतुन लोकराज्य मासिक प्रकाशित होत असते.  एमपीएससी, युपीएससीची तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक हे अत्यंत उपयुक्त असुन यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत विविध मान्यवर तसेच अधिकाऱ्यांचे लेख यामधुन प्रकाशित होत असतात.  त्याचबरोबर प्रसंगानुरूप विशेषांकही काढण्यात येतात.  नाममात्र दरामध्ये वर्षभरात 12 अंक वर्गणीदारांच्या पत्त्यावर पोहोच केले जात असल्याचे सांगत गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन लोकराज्यचे वर्गणीदार व्हावे व आपले गाव लोकराज्य ग्राम करण्याचे आवाहन करत शासनाच्या विविध योजनांची माहिती श्री बावस्कर यांनी उपस्थितांना यावेळी दिली.
            यावेळी ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळाचे सचिव पुष्कराज तायडे म्हणाले की, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे.  यासाठी प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या योजना समजुन घेण्याची असल्याचे सांगत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत 11 कलमी कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असुन लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.  या योजनांचा गावकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन करत शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिवाजी तायडे यांनी केले.  कार्यक्रमास गणेश मंडळाचे पदाधिकारी, बचतगटाच्या महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                  ***-***




Tuesday 15 August 2017

राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व इमारतीच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान
व इमारतीच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखा
-         पालकमंत्री बबनराव लोणीकर
            जालना, दि. 15 – जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्यासक्षमीकरणासाठी शासनामार्फत 192 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन करण्यात येणारे काम वेळेत पुर्ण होण्याबरोबरच कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
          जालना येथील राज्य राखीव पोलीस बलगट क्र. 3 च्या 557 कर्मचारी निवासस्थान व प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, रामेश्वर भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, समादेशक भारत तांगडे, सहाय्यक समादेशक श्री मेटकर, विलास नाईक, किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, विरेंद्र धोका आदींची उपस्थिती होती.
          पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस आपल्या प्राणांची बाजी लावुन नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करत असतात. गेल्या 50- ते 60 वर्षात  जालना येथील राज्य राखीव दलातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची तसेच इमारतीची दुरुस्ती न केल्यामुळे  दयनिय अवस्था झाली होती. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना दिवस काढावे लागत होते.  जालना येथील राज्य राखीव दलातील कर्मचाऱ्यांनी 26/11 च्या मुंबई येथील हल्ल्यात अत्यंत चोख कामगिरीही बजावली आहे.  अशा कर्मचाऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या हेतुन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तसेच प्रशासकीय इमारतीसाठी  सातत्याने पाठपुरावा करुन 192 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला आहे.  कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाचा तसेच प्रशासकीय इमारतीचा दर्जा व गुणवत्ता अत्यंत चांगली राहील याकडे लक्ष देण्याची गरज असुन गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही.  या कामाची गुणवत्ता तपासणी पथकाकडुन तपासणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
          राज्य राखीव पोलीस दलाबरोबरच येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही अवस्था अत्यंत वाईट आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करुन याचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
          जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आपली सेवा बजवावी लागते.  वेळप्रसंगी कुटूंबपासुन दूर राहुन सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न पालकमंत्री यांच्या माध्यमातुन मार्गी लागला असुन कर्मचाऱ्यांसाठी होणारी अद्यावत अशा निवासस्थानाच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
          याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक भारत तांगडे यांनी केले. सर्वप्रथम कोनशिला अनावरण तसेच टिकाव मारुन या कामाचे भुमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
          या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***


आपला जिल्हा जालना माहिती पुस्तिका व घडीपत्रिकेचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विमोचन संपन्न माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा स्तुत्य उपक्रम



आपला जिल्हा जालना माहिती पुस्तिका व घडीपत्रिकेचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विमोचन संपन्न
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा स्तुत्य उपक्रम
            जालना, दि. 15 – जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या जालना जिल्ह्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती असलेल्या आपला जिल्हा जालना  पुस्तिका तसेच गेल्या अडीच वर्षाच्या काळात जिल्ह्यात झालेल्या विविध कामावर आधारित सचित्र घडीपत्रिकेचे विमोचन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियेाजन सभागृहात आज दि. 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उद्योगपती घनश्याम गोयल, विलास नाईक, जिल्हा माहिती अधिकारी एस.के.बावस्कर, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेली जालना जिल्ह्याची संपुर्ण माहिती असलेली पुस्तिका तसेच जिल्ह्याच्या विकासावर आधारित असलेली घडीपत्रिका ही सर्वसामान्यांना अत्यंत उपयोगी ठरणार असुन शासनाची ध्येय,धोरणे, शासनाच्या कल्याणकारी योजना विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम जालना जिल्हा माहिती कार्यालयामार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे.  संपूर्ण मराठवाड्यात जालना जिल्हा माहिती कार्यालयाचे काम अव्वल असल्याचे गौरवोदगारही त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***


संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री बबनराव लोणीकर



संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी
सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री बबनराव लोणीकर
जालना, दि. 15 – संपुर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छता विभागामार्फत यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येत असुन  राज्यात आजपर्यंत 11 जिल्हे, 157 तालुके आणि 17 हजार 700 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या जालना जिल्ह्यातील चार तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन‍ दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन संदेश देताना ते बोलत होते.
 यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, रामेश्वर भांदरगे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजु नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करुन एक मोठा क्रांतीकारी निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.  या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास 2 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. एक लाख 50 हजार रुपयांचे सरसकट कर्ज माफ केले आहे. ज्यामुळे राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. थकीत असलेल्या 90 टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमीत कर्ज भरणाऱ्यांना 25 हजार रुपयांपर्यंत शासन मदत  देणार आहे. जालना जिल्हयात 1 लाख 96 हजार शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये कृषी कर्ज थकीत आहे. निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना यामधून 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात घटत चाललेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 1 जुलै रोजी 4 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.  जालना जिल्ह्याला या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 8 लाख 56 हजार वृक्षांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपनही करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड ही केवळ मोहिम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या व  कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपन करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशिल आहे.  जालना जिल्ह्यात रस्ते विकासासाठी आजपर्यंत जवळपास  5 हजार 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत.  त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटर अंतराच्या रस्त्यास केंद्र शासनाने मान्यता देऊन वार्षिक नियोजनात 860 कोटी रुपयांची तरतूद केली असुन या रस्त्याच्या कामाचे नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपुजन झाले आहे.  येणाऱ्या 2 वर्षाच्या काळात हा रस्ता पूर्णपणे तयार होणार होऊन या रस्त्यामुळे 6 लाख वारकऱ्यांची पंढपरपुरला जाण्याची सोय होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.  जालना जिल्हा या कामामध्ये आघाडीवर असुन जिल्ह्यातील एकुण 2 लाख 44 हजार 541 सातबारा पैकी 2 लाख 43 हजार 630 सातबारा ची तपासणी करुन जिल्हा मराठवाड्यात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.  शेतकऱ्यांना आपले सरकार या पोर्टल व सेवा केंद्रावरुन 23 रुपये भरुन डिजिटली सही केलेला सातबारा उपलब्ध होणार आहे.  या सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारा ची प्रत कमी वेळेत व कमी पैशामध्ये उपलब्ध होणार आहे.
जलयुक्त शिवार अंतर्गत मागील 2 वर्षात 398 गावांमध्ये जवळपास 10 हजार कामे पूर्ण करण्यात आली असून त्याकरीता 185 कोटी खर्च झाला आहे. त्यामध्ये 615 सिमेंट बंधारे असून जलयुक्तच्या या कामामुळे 1 लाख 87 हजार हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. व 9 हजार 300 टीसीएम पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गतवर्षी टंचाई कालावधीत टँकरची संख्या 622 वरुन 147 वर आली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात 69 गावांसाठी 65 योजना मंजूर करण्यात येत असून त्यासाठी 52 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत 25 गावांकरीता रुपये 18 कोटी 85 लाख निधी उपलब्ध झाला आहे. तसेच भुजल खात्याकडून स्त्रोत बळकटी करणासाठी 4 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन वर्षात समृध्दी महामार्ग, ड्रायपोर्ट, सिडको, तसेच एमआयडीसी फेज-3 माध्यमातून शहरासह जिल्हयाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील विद्युत विकासावर भर देण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्हयासाठी 33 केव्हीची 49 केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. 132 केव्हीची 4 व 220 केव्हीची 4 केंद्रे मंजूर करण्यात आली असुन परतूर येथील 220 केव्हीचे केंद्र पूर्ण कार्यक्षमतेने चालू असून नागेवाडी येथील उपकेंद्राचे तसेच 33 के.व्ही. च्या 19 केंद्राचे भुमीपूजन नुकतेच करण्यात आले आहे.  जिल्हयातील 14 हजार 500 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला जोडणी देण्याचे काम पूर्ण होत असुन पॉवर फॉर ऑल या योजनेसाठी जालना जिल्हयाला 124 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण क्षमतेने वीज देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी Giosk मशिनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन देणाऱ्या मशिनचे पालकमंत्री श्री. लोणीकर यांच्या हस्ते फितकापून उदघाटन करत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पोलीस पथकाने पालकमंत्री महोदयांना मानवंदना दिली.  जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच स्काऊट गाईडना पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.
 या कार्यक्रमास पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.        
***-****