Tuesday 30 August 2016

महाअवयव दान अभियानानिमित्त आयोजित भव्य रॅलीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नोंदविला उत्स्फुर्त सहभाग

जालना -  महा अवयवदाना संदर्भात जनमानसामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत जिल्ह्यात महाअवयवदान अभियान राबविण्यात येत असून  त्याअनुषंगाने दि. 30 ऑगस्ट, 2016 रोजी जालना शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  गांधीचमन येथे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
            यावेळी रामेश्वर भांदरगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्री राठोड, बालकामगार प्रकल्पचे मनोज देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            गांधीचमन येथून रॅलीची सुरुवात होऊन मस्तगड, सुभाष चौक, काद्राबाद, मंगळ बाजार मार्गे निघून शिवाजी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.  या रॅलीमध्ये जेईएस, दानकुंवर,                   डॉ बारवाले या महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, बालकामगार प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी, बदनापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह नागरिकांनी या रॅलीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत अवयव दान, श्रेष्ठ दान अशा आशयाचे फलक हाती घेऊन नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती केली. 
            या रॅलीमध्ये डॉ. व्ही.व्ही. इंगे, डॉ. म्हस्के, डॉ. बी.के. नागरे, डॉ. एस.जी. पंडित, डॉ. ए.एस. खरात, डॉ. जगन्नाथ खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते श्री केळवदे, डॉ. राजेंद्र गाडेकर, डॉ. शिगेदार, प्रकाश मेटकर, डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. एस.व्ही. कुलकर्णी, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. नितेश अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

******* 






Friday 19 August 2016

“स्वच्छ महाराष्ट्रासाठी 18 लाख गृहभेटी, कुटूंबस्तर संवाद अभियानात” राज्यात राबविणार सर्वांनी सहभाग नोंदवावा – पालकमंत्री बबनराव लोणीकर

                           अभियानाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात 63 हजार गाठीभेठीचे नियोजन
                           अभियानादरम्यान सेल्फी विथ स्टीकर अनोखा उपक्रम राबविणार
               अभियान यशस्वी करण्यासाठी उद्योजकांबरोबरच साधु-संतांची मदत 
         जालना - महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख गृहभेटी  हा उपक्रम राबविण्यात आहे. जालना जिल्ह्यातही या अभियानांतर्गत 63 हजार कुटूंबाच्या गाठीभेठीचे नियोजन करण्यात येत असून या अभियानात सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
            22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात कुटूंबस्तर संवाद 18 लाख गृहभेटी अभियान राबविण्यात येणार असून स्वच्छ व सुंदर जालना जिल्ह्यासाठी 63 हजार गाठीभेठीच्या नियोजनासंदर्भात मराठवाड्यातील स्वच्छता विभागांशी निगडीत अधिकारी तसेच जालना जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मातोश्री लॉन्स, अंबडरोड, जालना येथे दि. 19 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, संचालक (वासो) मुंबई सतीष उमरीकर, जयंत रसाळ, राहूल लोणीकर, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, युनिसेफचे जयंत देशपांडे, प्रचार व प्रसार सल्लागार कुमार खेडकर, उद्योगपती राम भोगले, विवेक देशपांडे, मनिष धुत, सुनिल रायठ्ठा, धनश्यामसेठ गोयल, सुनिल आर्दड, किशोर अग्रवाल, नामदेव चारठाणकर महाराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी. ताठे, भुपेश पाटील, नम्रता गोस्वामी, वास्तु विशारद सतीष नागरे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनाद्वारे जनतेला स्वच्छतेचा संदेश गावोगावी दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनीही संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  राज्यात 7 हजार 314 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील 15 तालुके पूर्णत: हागणदारी मुक्त झाले असून चालु वर्षात राज्यातील 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर अभियाना दरम्यान शौचालय नसलेल्या राज्यातील 18 लाख कुटूंबियांपर्यंत पोहोचून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील सर्व मंत्री, मुख्य सचिव, विविध खात्याचे सचिव तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी या अभियानांतर्गत प्रत्येकी एका गावास भेट देऊन कूटूंबस्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

..2..

जालना जिल्ह्यात अभियानादरम्यान 63 हजार कुटूंबियांच्यागाठी भेठी
             जालना जिल्हाही या अभियानात मागे राहू नये यासाठी हे अभियान जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यासाठी व जिल्ह्यातील 63 हजार कुटूंबियांच्या या अभियानादरम्यान गाठीभेठी घेण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भात राज्यातील पहिल्या अशा आगळयावेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या अभियानादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे.  ही मोहिम केवळ अभियानापुरती न राहता ती एक स्वच्छतेची लोकचळवळ होऊन नागरिकांनी अधिकाधिक शौचालयांची उभारणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
सेल्फी विथ स्टीकर अनोखा उपक्रम राबविणार
            या अभियानादरम्यान जनतेच्या भेठीगाठी घेत असताना ज्यांच्याकडे शौचालय आहेत त्यांच्या घराच्या दारावर लयभारी अशा मजकुराचे हिरव्या रंगाचे स्टीकर व ज्यांच्याकडे शौचालय नाहीत अशा कुटुंबाच्या दारावर धोक्याचा इशारा देणारे लाल रंगाचे स्टीकर चिटकविण्यात येणार असून हे स्टीकर चिटकवताना सेल्फी विथ स्टीकर हा अनोखा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
अभियान यशस्वी करण्यासाठी उद्योजकांबरोबरच साधु-संतांची मदत
            22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2016 दरम्यान राज्यात राबविण्यात येत असलेल्या 18 लाख गृहभेटी कुटूंबस्तर अभियान यशस्वी करण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था, उद्योगपतींची मदत घेण्यात येणार असून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्यातील साधु-संत, महंत, विविध धर्माचे गुरु आपल्या किर्तनाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणार असून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसह  विद्यार्थी विद्यार्थीनींनी या अभियान सहभाग नोंदवावा,असेही श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            स्वच्छतेचे महत्व पटवून देतांना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, स्वच्छता ही यशाची गुरुकिल्ली आहे.  स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य सदृढ राहण्याबरोबरच मनही प्रसन्‍न राहते.  अस्वच्छतेमुळे मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.  स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगत आपले तन व मन सदृढ राहण्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             राज्यातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने राज्य शासन आपले काम सक्षमपणे करीत असून राज्यातील प्रत्येक नागरिक सुखी व्हावा, प्रत्येकास चांगले आरोग्य अणि शिक्षण मिळण्याबरोबरच देश हागणदारीमुक्त झाला पाहिजे.  यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात हिरिरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी केले.
            खेडयाचा विकास झाला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होऊन देश बलशाली होईल.  राज्यात आदर्श ग्राम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून आपण स्वत: सहा गावे दत्तक घेऊन ती आदर्शग्राम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  या गावांमध्ये अनेकविध सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगत 21 प्रकारची कामे करण्यात येत आहेत.  तसेच हवेतुन पाणी शोषून घेऊन शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या आकाश अमृत मशिन्सही या गावांमधून कार्यान्वित करण्यात येऊन या गावांना पिठाच्या गिरण्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या गिरण्यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मोफत दळण देण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            गेल्या तीन वर्षापासून राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले असून यासाठी केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर यासाठी आपणही कारणीभूत आहोत.  मुबलक प्रमाणात पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्याचे संगोपन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, ह.भ.प. नामदेव चारठाणकर महाराज, उद्योजक राम भोगले, विवेक देशपांडे, प्रचार, प्रसिद्धी सल्लागार कुमार खेडकर, युनिसेफचे जयंत देशपांडे, संचालक (वासो) मुंबई सतीष उमरीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाच्या समारोपात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी राज्याप्रमाणेच जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी  कुटूंबस्तर संवाद अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत हे काम केवळ अभियानापुरते न करता एक सामाजिक दृष्टीकोन ठेऊन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी म्हणाले की, जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील 63 हजार कुटूंबियापर्यंत पोहोचून त्यांच्या गाठीभेठी घेत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार असून त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आज या आगळयावेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 420 गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेचे आभार प्रदर्शन जि.प.चे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी करुन उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली व या अभियानात सर्वांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
            या अभियानादरम्यान वापरण्यात येणाऱ्या पोस्टर, हँडबील व घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  सर्वप्रथम संत तुकडोजी महाराज व संता गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
            कार्यशाळेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ताठे, नम्रता गोस्वामी यांच्यासह सर्व टीमचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यशाळेस मराठवाड्यातील स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******* 




Monday 15 August 2016

राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी “अठरा लाख गृहभेटी” या उपक्रमांत सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा – पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना -  महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख गृहभेटी  हा उपक्रम राबविण्यात येणार असून या अभियानात सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.  
            भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या  69 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ताठे, श्री इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक              डॉ. सरिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जनतेला उद्देशुन संदेश देताना पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की,  राज्यात 7 हजार 314 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील 15 तालुके पूर्णत: हागणदारी मुक्त झाले असून चालु वर्षात राज्यातील 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर अभियाना दरम्यान शौचालय नसलेल्या राज्यातील 18 लाख कुटूंबियांपर्यंत पोहोचून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील सर्व मंत्री, मुख्य सचिव, विविध खात्याचे सचिव तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी या अभियानांतर्गत प्रत्येकी एका गावास भेट देऊन कूटूंबस्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणार आहेत.  शासनाच्या या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत होते.  परंतू आता यावर्षी वरुणराजाची चांगली कृपा आपल्यावर होत असून आजपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाच्या 63 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे जायकवाडीसह जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आगामी काळात शेती, उद्योग व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
              राज्य शासन शाश्वत पाणी साठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार हे अभियान गतवर्षापासून राज्यात राबवित आहे. जालना जिल्ह्यात गतवर्षात 212 गावांची निवड करुन 412 सिमेंट बंधारे, 604 नाल्यांचे खोलीकरण आणि    3 हजार 214 बांध-बंधिस्तीची कामे करण्यात आली असून या कामावर 72 कोटी 55 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.   या अभियानामुळे पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब साठविण्यात व अडविण्यात आला असून  याद्वारे 49 हजार 550 टी.सी.एम. एवढा पाणीसाठा निर्माण होऊन जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती आपणास पहावयास मिळत असल्याचे सांगत  चालू वर्षातही हे अभियान 186 गावातून राज्य शासनासह स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून राबविण्यात येत  आहे. येणाऱ्या काळातही जिल्ह्यातील सर्व गावात हे अभियान यशस्वीरित्या राबवून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.  या कामी सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
           नैसर्गिक आपत्तीमुळे गतवर्षात खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास  3 लाख 81 हजार शेतकऱ्यांना 221 कोटी 46 लक्ष रुपयांचे अनुदान त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच यावर्षी जिल्ह्यातील 1 लाख 62 हजार 239 शेतकऱ्यांना जवळपास 1 हजार 132 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करुन 102 टक्के वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तसेच 23 हजार 531 शेतकऱ्यांच्या 217 कोटी 70 लाख एवढ्या पीककर्जाचे पुनर्गठण करण्यात आले असून पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 475 कर्जदार शेतकरी व 45 हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले असल्याचेही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात घटत चाललेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. जालना जिल्ह्याला या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 3 लाख 36 हजार वृक्षांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपनही करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड ही केवळ मोहिम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या व  कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपन करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.  
            केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात 14 हजार 500 विद्युत खांबावर एलईडी लाईट लावण्यासाठी दिल्ली येथील ईएसएल या कंपनीशी शासनाचा करार झालेला आहे. या करारापोटी शहरात 10 हजार एलईडी लाईट उपलब्ध झालेले असून एलईडी लाईट बसवणारी जालना नगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            सध्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणापद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. सद्य:स्थितीत राज्यात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत असून प्रतिदिन ही संख्या वाढत आहेत.  या रुग्णांना पुनर्जीवन देण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदानाचे महत्व आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे.  अवयव दानाचे महत्व लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयव दानाचा महोत्सव घेण्याच्या सुचना केल्या असून त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान अवयवदान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.  आपण सर्वांनी या महोत्सवात हिरिरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशिल आहे.  त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने अनयुटी तत्वावरील रस्त्यांसाठी प्रतीवर्षी 500 कोटीची तरतूद उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरविले असून या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने  1 हजार 343 कोटी रुपयांचा आराखडा शासनास सादर केलेला आहे.   तसेच केंद्रीय मार्ग निधीमधून 166 कोटी रुपयांची 9 कामे, अर्थसंकल्पीय तरतुदीमधुन 131 कोटी रुपयांची 97 कामे, नाबार्ड अंतर्गत 52 कोटी रुपयांची 47 कामे मंजूर करण्यात आली आहेत.
            राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटर अंतराच्या रस्त्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून केंद्रीय वार्षिक नियोजनात 860 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही पालकमंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान, 2 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत वृक्ष लागवड, स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी यांचा तसेच महसुल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा, प्रचार व प्रसाराचे उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत कुटूंब नियोजनांतर्गत शस्त्रक्रिया केलेल्या मातांचाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमाचे सुत्र संचलन निशिकांत मिरकले व तेजस्विनी माटोले यांनी केले.  कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***-**** 

सायबर गुन्हेगारांवर वचक बसवून गुन्ह्यांची तात्काळ उकल होण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार – पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हेगारांवर वचक बसविण्याबरोबरच गुन्ह्यांची तात्काळ उकल होऊन आरोपींचा तातडीने शोध लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेले जालना जिल्हा सायबर लॅब  हे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्र इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या जालना जिल्हासायबर लॅबचे उदघाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, लॅबचे प्रमुख व्ही.एच. इज्जपवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            या सायबर लॅबच्या माध्यमातून डाटा चोरणे, गोपनीय सांकेतिक चिन्ह चोरणे, इंटरनेटद्वारे फसवणुक करणे, बदनामी करणे, दहशतवादी कट रचणे, देशाविरुद्ध छुप्या पद्धतीने युद्ध पुकारणे, एटीएम संबंधित गुन्हे, आर्थिक फसवणुक, सोशल मिडियावर खोटे अकाऊंट करणे, हॅकींग करणे, मालवेअर तयार करणे आदी गुन्ह्यांना आळा घालण्यात येणार असून या लॅबमध्ये अत्याधुनिक अशी संगणक यंत्रणेबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विनालिफ्ट सॉफ्टवेअर, नेसा सॉफ्टवेअर, ॲडव्हीक सीडीआर. ॲनॅलिसीस सॉफ्टवेअर, सायबर चेक सुट सॉफ्टवेअर, मोबाईल चेक आदी सॉफ्टवेअर बसविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना‍ दिली.
            सर्वप्रथम कोनशिला अनावरण तसेच फित कापून पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते या सायबर लॅबचे उदघाटन करण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, पोलीस विभागातील सर्व अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******  


Thursday 11 August 2016

अंत्योदय शिधापत्रिकाधारक शेतक-यास अन्नधान्याचा ऑगस्ट महिन्याचा तालूका निहाय तूरडाळ पुरवठा जाहीर

           जालना - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा एपीएल अन्नधान्याचा पुरवठा  शिधापत्रिकाधारकास  देण्यासाठी नियतन प्राप्त झाले आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला एपीएल  योजनेचा तूरडाळीचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

       जालना  शासकीय गोदामावरील 29231  शिधापत्रिकाधारकांसाठी  292 क्क्टिंल तूरडाळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 8749  शिधापत्रिकाधारकांस 88 क्क्टिंल तुरडाळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 20126  शिधापत्रिकाधारक 201 क्विंटल तूरडाळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 16083 शिधापत्रिकाधारकास 161  क्क्टिंल तूरडाळ, परतूर- शासकीय गोदामावरील 13817  शिधापत्रिकाधारकास 138  क्क्टिंल तूरडाळ, मंठा शासकीय गोदामावरील 15164  शिधापत्रिकाधारकास 152  क्क्टिंल तूरडाळ, अंबड शासकीय गोदामावरील 29236  शिधापत्रिकाधारकास 292 क्क्टिंल तूरडाळ, आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 25114 शिधापत्रिकाधारकास 251  क्क्टिंल तूरडाळ .    *******

एपीएल शिधापत्रिकाधारक शेतक-यास अन्नधान्याचा सप्टेंबर महिन्याचा तालूका निहाय पुरवठा जाहीर

जालना - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा एपीएल अन्नधान्याचा पुरवठा  शिधापत्रिकाधारकास  देण्यासाठी नियतन प्राप्त झाले आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला एपीएल  योजनेचा गहू, तांदूळाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

       जालना  शासकीय गोदामावरील 44501  शिधापत्रिकाधारकांसाठी  1335 क्क्टिंल गहू, 782 ‍क्क्टिंल तांदूळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 18775  शिधापत्रिकाधारकांस 563 क्क्टिंल गहू, 376 क्क्टिंल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 53533  शिधापत्रिकाधारक 1606 क्विंटल गहू,1071 क्क्टिंल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 25128 शिधापत्रिकाधारकास 754  क्क्टिंल गहू,503 क्क्टिंल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 28756  शिधापत्रिकाधारकास 862  क्क्टिंल गहू,575 क्क्टिंल तांदूळ, मंठा शासकीय गोदामावरील 25661  शिधापत्रिकाधारकास 770  क्क्टिंल गहू, 514 क्क्टिंल तांदूळ, अंबड शासकीय गोदामावरील 34287  शिधापत्रिकाधारकास 1028 क्क्टिंल गहू,651 क्क्टिंल तांदूळ आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 18740 शिधापत्रिकाधारकास 512  क्क्टिंल गहू 00 क्क्टिंल तांदूळ.    *******

अंत्योदय योजनेचा अन्नधान्याचा सप्टेंबर महिन्याचा तालूका निहाय पुरवठा जाहीर

           जालना,दि,11:- जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा अन्नधान्याचा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय गोदामात केला आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला अंत्योदय  योजनेचा गहू, तांदूळाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
       जालना  शासकीय गोदामावरील 9027  शिधापत्रिकाधारकांसाठी  1895 क्क्टिंल गहू, 1262 ‍क्क्टिंल तांदूळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 3758  शिधापत्रिकाधारकांस 789 क्क्टिंल गहू, 525 क्क्टिंल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 7279  शिधापत्रिकाधारक 1528 क्विंटल गहू,1018 क्क्टिंल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 3981 शिधापत्रिकाधारकास 835  क्क्टिंल गहू,557 क्क्टिंल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 3876  शिधापत्रिकाधारकास 813  क्क्टिंल गहू,542 क्क्टिंल तांदूळ, मंठा शासकीय गोदामावरील 4075  शिधापत्रिकाधारकास 855  क्क्टिंल गहू, 570 क्क्टिंल तांदूळ, अंबड शासकीय गोदामावरील 5839  शिधापत्रिकाधारकास 1225 क्क्टिंल गहू,817 क्क्टिंल तांदूळ आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 5144 शिधापत्रिकाधारकास 1080  क्क्टिंल गहू ,719 क्क्टिंल तांदूळ.

                                                                        *******

सप्टेंबर महिन्याचा प्राधान्य कुटूंबांच्या लाभार्थीचा तालूका निहाय अन्नधान्याचा पुरवठा जाहीर


      जालना - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा  प्राधान्य कुंटूंबाच्या लाभार्थींना अन्नधान्याचा पुरवठा  देण्यासाठी जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय गोदामात केला आहे. तसेच या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रती कार्ड  गहू व तांदूळ  वितरीत करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार यांना केल्या आहेत. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला   गहू, तांदळाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
        जालना (ए.आर) शासकीय गोदामावरील 269104 लाभार्थ्यांसाठी 8074 क्क्टिंल गहू, 5381 क्क्टिल तांदूळ, जालना टीएफ (बदनापूरसाठी) या शासकीय गोदामावरील 101722 शिधापत्रिकाधारकांस 3052 क्क्टिंल गहू, 2034 क्विंटल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 199168 शिधापत्रिकाधारक 5976 क्विंटल गहू, 3983 क्क्टिंल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 107765 शिधापत्रिकाधारकास 3233 क्क्टिंल गहू, 2155 क्क्टिंल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 108050 शिधापत्रिकाधारकास 3242 क्क्टिंल गहू, 2161 क्क्टिंल तांदूळ, मंठा- शासकीय गोदामावरील 110306  शिधापत्रिकाधारकास 3310 क्क्टिंल गहू, 2206 क्क्टिंल तांदूळ, अंबड- शासकीय गोदामावरील 160808 शिधापत्रिकाधारकास 4825 क्क्टिंल गहू, 3216 क्क्टिंल तांदूळ आणि अंबड टीएफ (घनसावंगीसाठी)   शासकीय गोदामावरील 139250 शिधापत्रिकाधारकास 4178 क्क्टिंल गहू .2784 तांदूळ. ******

जालना नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न

जालना, दि. 11 – आगामी जालना नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची बैठक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जालन्याचे तहसिलदार डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसिल कार्यालय, जालना येथे संपन्न झाली.
            यावेळी तहसिलदार डॉ. पाटील यांनी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या वेळेत मतदान केंद्रावर दररोज सकाळी 8 ते 10 या वेळेत सायंकाळी 5-00 ते 7-00 या वेळेत व  शनिवार व रविवारी पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या.  तसेच निवडणुकीसाठी नियुक्त संबंधित पर्यवेक्षकांनी संकलित झालेले नमुना क्रमांक 6,7,8 व 8अ- दैनंदिन नायब तहसिलदार (निवडणूक), जालना यांच्याकडे सादर करावे.  तसेच ज्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून मतदान केंद्रनिहाय नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांनी त्यांचा रुजू अहवाल संबंधित पर्यवेक्षकाकडे सादर करावा.  कामात हयगय करणाराविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******

Monday 8 August 2016

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा

जालना- जिल्ह्याच्या विविध विकास कामांची प्रगती तसेच प्रलंबित असलेल्या बाबींचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेतला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी         श्री ताठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंगळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री खांडेकर, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री भालशंकर यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जालना शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत.  पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.  नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने विद्युत कंपनीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.  नगरपालिकेने विद्युत मंडळाला तात्पुरत्या स्वरुपात काही प्रमाणात रक्कम भरणा करण्याचे निर्देश देत विद्युत मंडळाने पथदिव्यांची जोडणी तातडीने करुन देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.
            शहरातल्या 14 हजार 500 विद्युत खांबावर एलईडी बसविण्यासाठी दिल्ली येथील कंपनीशी शासनाचा करार झाला असून या एलईडीमुळे मोठ्या प्रमाणात वीजबीलात बचत होणार असल्याचे सांगत हे विद्युत दिवे अखंडित सुरु राहतील याची दक्षता घेण्यात यावी.  तसेच याची देखभाल दुरुस्तीही कंपनी करणार असल्याचे सांगून शहरात काही ट्रान्सफार्मर खराब झाले असतील तर ते तातडीने दुरुस्त करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
            स्वच्छतेच्या संदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले की, स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात शौचालय उभारणीसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा आपण संकल्प केला असून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटीतपणे काम करण्याची गरज असून या कामी अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्याच्या सुचना करत शौचालय उभारणीचा तालुकानिहाय आढावाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी घेतला.

            जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात होणारी विकास कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत.  दिलेला निधी वेळेत व विहित केलेल्या कामावर खर्च करण्यात यावा.  या निधीपैकी एकही रुपया परता जाता कामा नये याची दक्षता सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर यांनी घनकचरा प्रकल्प निधी, परतूर येथील सॅनिटरी पार्क बांधकाम, परतूर तालुक्यातील सहा आदर्श गावांची प्रगती, ई लर्निंग, ई-लायब्ररी यासह जिल्ह्यातील सर्वच विकास कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या.

******* 

Sunday 7 August 2016

परतूर येथील न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून पाहणी

जालना - महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लेाणीकर यांनी आज परतूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. काम प्रगतीपथावर असून उत्कृष्ट काम करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी दिल्या. न्यायालयाच्या वास्तू बांधकामाबाबत सविस्तर माहिती श्री.लोणीकर यांनी घेतली.

            तहसील कार्यालयाच्या काही भागात आजपावेतो न्यायालय आहे. परंतू ती जागा देखील न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडते ही बाब पालकमंत्री लोणीकर यांच्या निदर्शनास आली. वकील संघाच्या वतीने नवीन इमारतीची मागणी करण्यात आली. ती मागणी पुर्णत्वास नेताना ना.लोणीकरांनी 6.53 कोटी रु. किंमतीची प्रशासकीय मान्यता असणारी न्यायालयाची इमारत मंजूर करुन घेतली. 1 मार्च रोजी इमारतीचे भूमीपूजन झाले असून मार्च 2017 अखेर इमारतीचे कामकाज पूर्ण होईल असे पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगीतले.
            या इमारतीमध्ये 2 कोर्ट हॉल, 1 लोक अदालत पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र तरुंग, रेकॉर्ड रूम, मिटींग हॉल, कॅन्टीन, संगणक कक्ष, ग्रंथालय, वकील कक्ष इत्यादी अत्याधुनिक सुविधेसह कंपाउंड वॉल, गॅरेज, बोअरवेल, पंपहाऊस, सायकल स्टॅण्ड, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, अंतर्गत रस्ते, गार्डन, ध्वजस्तंभ, विद्युतीकरण यासह अनेक सुविधा असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी दिली.
            न्यायालयीन व्यवस्थे सेाबतच न्यायाधिश निवासस्थान व कर्मचारी निवासस्थानासाठी सुध्दा या ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचे ना. लोणीकर यावेळी म्हणाले. लवकरच 4 एकर परिसरात न्यायालयाची सुसज्ज इमारत दिसेल असा विश्वास ना.लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. कामाचा दर्जा पाहता या इमारतीवर आणखी तीन मजले सुव्यवस्थीत उभारले जाऊ शकतात व भविष्यात अतिरिक्त न्यायालय देखील या‍ ठिकाणी उभारले जाऊ शकते असेही पालकमंत्री लोणीकर पुढे म्हणाले.
            यावेळी जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, रमेश भापकर,भगवान मोरे, संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, ओम मोर, सेापान जईद, प्रकाश दिक्षीत, विशाल कदम, दया काटे, श्रीधर डोंगरे, एकनाथ थोटे, बालाजी सांगुळे, गंगाधर माने, श्रीरंग जईद, मलीक कुरेशी, शांतीलाल अग्रवाल, राजू मुंदडा, सुभाष बन्सीले, अंकुश भालेकर, संजय राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Saturday 6 August 2016

जाफ्राबाद तालुक्यातील हिवराबळी गणाच्या रिक्त पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

जालना – जालना जिल्हा परिषद व पंचायत समित्यामधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील 28-हिवराबळी ता. जाफ्राबाद या गणाच्या रिक्त पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम               8 ऑगस्ट, 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे व मतदान दि. 28 ऑगस्ट, 2016 रोजी होणार असून उमेदवारांनी             8 ते 12 ऑगस्ट, 2016 या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र व त्यासोबतची आवश्यक कागदपत्रे संबंधित ठिकाणी सादर करावेत, असे जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

जालना – जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची बैठक जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
            या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जे.एम. बुकतरे, नगरपालिकचे प्रशासकीय अधिकारी श्री पसाले, परिवहन विभागाचे पी.बी. काटकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ए.एन. वायकोसे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  प्राणीक्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी या समितीची निगडीत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.   बाजारपेठेत वाहनातून जनावरांना उतरविणे तसेच चढविण्यासाठी स्वसंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने चबुतरे बनविण्यात यावीत.  तसेच विविध माध्यमांद्वारे प्राणीक्रुरतेविरुद्ध कार्यक्रम राबवून जनमानसांमध्ये या कायद्यासंदर्भात जनजागृती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

*******  

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयामार्फत वृक्षांचे संगोपन

जालना – 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली.  जालना जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. राष्ट्रीय बालकामगार प्रक्लप, जालना यांच्यावतीने या मोहिमेंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय ते अंबड चौफुली रोडच्या दोनही बाजुस वृक्ष लागवड करण्यात आली होती.  या लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्यात येत असून या झाडांची देखरेख, झाडाच्या बाजुला असलेले गवत काढणे, झाडांना वेळेवर पाणी देण्याबरोबरच जी झाडे व्यवस्थित लावली गेलेली नाहीत अशी झाडे व्यवस्थित लावण्यात येत असून या कामासाठी प्रकल्प संचालक मनोज देशमुख, विशेष प्रशिक्षण केंद्रातील शिक्षण निर्देशक क्षेत्रिय अधिकारी मदत करत असल्याचे प्रकल्प संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******* 

1 ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

जालना, दि. सर्वसामान्य नागरिकांत व नव्या पिढीमध्ये निसर्ग आणि वन्यजीव या विषयीची आस्था  वाढत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 1 ते 7 ऑक्टोबर, 2016 या कालावीधत शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीं व मुक्त गटातील विद्यार्थ्यांसाठी गटवार विविध विषयावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट प्रवेशिकेस प्रथम,द्वितीय व तृतीय अशा पद्धतीने पारितोषिके देण्यात येणार आहेत. 
            या स्पर्धेत अधिकाधिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी व्हावे तसेच या स्पर्धेच्या नियम, अटी व अधिक माहितीसाठी उपवनसंरक्षक, औरंगाबाद वनविभाग, औरंगाबाद यांच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 0240-2345422 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

******* 

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांनी 8 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

जालना -  शासनाच्या दि. 7 ऑक्टोबर, 2015 च्या निर्णयान्वये धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यास शासनाने 3 ऑगस्ट, 2016 च्या परिपत्रकान्वये मंजुरी दिली असून सन 2016-17 या वर्षासाठी संबंधित संस्थांनी परिपूर्ण असे प्रस्ताव दि. 8 ऑगस्ट, 2016 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, जालना यांनी एक पत्रकाद्वारे केले आहे.

******* 

जालना जिल्ह्यात सरासरी 9.22 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 6 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 9.22 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
       जालना- 5.13 (463.76), बदनापूर-13.20 (475), भोकरदन-7.88(362.51),जाफ्राबाद-10.00  (331.20), परतूर-14.60 (518.80), मंठा- 0.50 (470.15), अंबड- 14.29 (451.71) घनसावंगी-8.14 (407.57) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 426.89  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 63.36 टक्के एवढी आहे.
***-***    

जालना जिल्ह्यात सरासरी 9.22 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 6 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 9.22 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
       जालना- 5.13 (463.76), बदनापूर-13.20 (475), भोकरदन-7.88(362.51),जाफ्राबाद-10.00  (331.20), परतूर-14.60 (518.80), मंठा- 0.50 (470.15), अंबड- 14.29 (451.71) घनसावंगी-8.14 (407.57) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 426.89  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 63.36 टक्के एवढी आहे.
***-***    

Friday 5 August 2016

फिरत्या मृदचाचणी प्रयोगशाळेचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जालना - राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत         कै. सुमनताई बहुउदेशीय सेवाभावी संस्था, सातोना बु. ता.परतूर जि.जालना या संस्थेची जय किसान फिरती माती पाणी परिक्षण प्रयोगशाळा या फिरत्या मृद चाचणी प्रयोगशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मोतीबाग,  जालना येथे फित कापून करण्यात आले.  
            यावेळी औरंगाबादचे  विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पी.डी. लोणारे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, कृषी उपसंचालक बी.बी.धालगडे, मृदचाचणी अधिकारी एस.जी. टिक्कस, औरंगाबादचे कृषी अधिकारी बी.व्ही. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी फिरत्या मृद चाचणी प्रयोगशाळेची संपूर्ण पहाणी करुन पाणी परिक्षण कशा प्रकारे करण्यात येते याची तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.  या फिरत्या प्रयोगशाळेसह कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतजमीनीच्या माती परिक्षणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना देत  शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीची आरोग्य पत्रिका मिळाल्यामुळे पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही           श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
            याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी जिल्ह्यात एक शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा व कृषि विज्ञान केंद्राकडे मृद चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध असून मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जिरायत क्षेत्रातून 10 हेक्टर क्षेत्रालय एक व बागायत क्षेत्रातून 2.5 हेक्टर क्षेत्राला एक अशा प्रकारे मृत नमुने तपासणीकरिता काढण्यात आलेले असून त्याद्वारे त्या गटातील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
***-*** 




Tuesday 2 August 2016

जालना जिल्ह्यात सरासरी 14.70 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 3 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 14.70 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 20.00 (458.13), बदनापूर-22.80 (461.40), भोकरदन-15.63(346.13),जाफ्राबाद-8.20  (318.80), परतूर-10.40 (502.60), मंठा- 15.00 (467.50), अंबड- 16.71 (436.28) घनसावंगी-8.86 (399.43) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून    1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 424.73  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 61.71 टक्के एवढी आहे.

***-***  

सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी समजुन घेऊन तत्परनेते सोडवाव्यात – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना – महसुल विभाग हा प्रशसनाचा कणा आहे.  नागरीसेवेचा दर्जा महसुल विभागासच प्राप्त झालेला असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  व्यासपीठावर सेवानिवृत्त अपरआयुक्त श्री लवांदे, ॲड राम शेलकर, उप विभागीय अधिकारी सर्वश्री चिंचकर, श्रीमंत हारकर, अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, लेखाधिकारी श्री देशपांडे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत सर्व कामे करण्याचा मान महसुल विभागास प्राप्त झाला आहे.  सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेची कामे अधिकाऱ्यांनी समजून घेऊन ती तत्परनेते सोडवावीत.  शासकीय नोकरीमध्ये पगार घेऊन सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झालेली आहे.  या संधीचे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने व पारदर्शकपणे काम करुन सर्वांना समान न्याय, त्यांचा असलेला हक्क मिळवून देऊन जनतेचा दुवा घ्यावा. 
            जालना जिल्हयाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमामध्ये भरीव काम केले असून  येणाऱ्या काळातसुद्धा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटीतपणे काम करावे. जेणेकरुन जालना जिल्हा    कोणत्याही विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, असा विश्वासही श्री जोंधळे यांनी व्यक्त केला.
            यावेळी सेवानिवृत्त अपर आयुक्त श्री लवांदे म्हणाले की, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला त्यांचे हक्क व समान न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर असले पाहिजे.  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायद्याचं परिपूर्ण असं ज्ञान संपादन करुन त्यांच्या कामात सचोटी, पारदर्शकता व जबाबदारीने व विनाआक्षेप काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            यावेळी ॲड राम शेलकर यांनी जमीन कायदा याबाबत तर लेखाधिकारी श्री देशपांडे यांनी आहरण व संवितरण अधिकारीयांची जबाबदारी व कर्तव्ये या विषयावर उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. तहसिलदार महेश सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिताखटावकर यांनी केले तर आभार उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांनी मानले.
            या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये उप विभागीय अधिकारी सर्वश्री अरविंद लोखंडे, श्रीमंत हारकर, तहसिलदार एल.डी. सोनवणे, महेश सावंत, लघुलेखक एस.बी. सुर्यवंशी, नायब तहसिलदार पी.यु. कुलकर्णी, संदीप ढाकणे, ए.डी. पुरी, अव्वल कारकून बी.एस.गीर, मंडळ अधिकारी आर.ई. घुले, सुनिल कारमपुरीकर, तलाठी सय्यद युनुस, लिपीक श्रीमती ज्योती वाघ, शिपाई श्री खंडागळे, समाधान गायकवाड आदींचा समावेश होता.
            कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

******* 

Monday 1 August 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन संपन्न जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

जालना-  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन पाळण्यात येतो.  त्याअनुंषगाने जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिन संपन्न झाला.  या  लोकशाही दिनामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभाग एक व जिल्हा पोलीस विभागाची एक असे एकूण दोन  तक्रार अर्ज प्राप्त झाले. 
            यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून विविध विषयावर आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून या सप्ताहामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.  शासनाच्या विविध योजनांचा महिलांना लाभ देऊन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            आपले सरकार या शासनाच्या वेबपोर्टलवर सर्वसामान्यांच्या तक्रारी येत असतात.  या प्राप्त तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व वेळेच्या आत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            2 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सुचना करत दरवर्षी जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात येते.  प्रत्येक शासकीय विभागाला देण्यात आलेले उद्दिष्टही 100 टक्के पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील शासकीय इमारतीमध्ये अनेक असुविधा असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.  यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत यासह शासकीय निवासस्थानामध्ये अनेक गैरसोयी असून याबाबत आवश्यक ठिकाणी डागडुजीसह आवश्यक ती सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून अनेक मोक्याच्या ठिकाणी रत्यावर खड्डे पडलेले आहेत.  रस्ते दुरस्तीसह शहरातील विद्युत दिव्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी केल्या. 
            या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तहसिलदार अनिता भालेराव, नायब तहसिलदार डीन. एन. पोटे  यांच्यासह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******                                 

जालना जिल्ह्यात सरासरी 4.34 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 4.34 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 4.75 (434.88), बदनापूर-4.00 (436.40), भोकरदन-2.38(326.77),जाफ्राबाद-1.60  (314.20), परतूर-8.60 (489.00), मंठा- 11.00 (445.75), अंबड- निरंक (415) घनसावंगी-2.43 (389.14) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून  1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 406.89  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 59.11 टक्के एवढी आहे.

***-***