Saturday 16 December 2017

एक्स्पो 2017 प्रदर्शनाच्या माध्यमातुन नवीन उद्योजक घडण्यास मदत होणार -- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

जालना, दि. 15 -  जालना शहरात भरविण्यात आलेल्या जालना एक्स्पो 2017 प्रदर्शनाच्या माध्यमातुन उद्योग व्यवसाय वाढीसाठी नवनवीन कल्पना समोर येऊन नवीन उद्योजक घडण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.
          रोटरी क्लबच्यावतीने कलश सिडसच्या प्रांगणात 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत जालना एक्स्पो 2017 चे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसाद कोकिळ यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री खोतकर बोलत होते.
          यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटेश चन्ना हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन राजेंद्र बारवाले, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, रोटरीचे अध्यक्ष अकलंक मिश्रीकोटकर, एक्स्पोचे प्रोजेक्ट चेअरमन सुनिल रायठठ्ठा, दीपक बगडीया, शरद लाहोटी, एक्स्पोचे सचिव हेमंत ठक्कर आदींची उपस्थिती होती.
          राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, रोटरीच्या क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक्स्पोच्या माध्यमातुन उद्योगांना आकार प्राप्त होऊन अनेक उद्योजक घडले आहेत.  एक्स्पोमध्ये संपुर्ण राज्यभरातुन अनेकविध तंत्रज्ञानावर आधारित विविध उद्योगांची मांडणी होऊन उद्योग हे जगाच्या पातळीवर गेले आहेत  हे एक्स्पोचे मोठे यश आहे. उद्योग हा वेगळया प्रकारची उर्मी मनात तयार करतो असे सांगत एकाच छताखाली विविध तंत्रज्ञान येऊन चर्चेच्या माध्यमातुन अनेक नवीन उद्योजक तयार होण्यास एक्स्पो हे अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरत असुन जालना जिल्ह्यात एक्स्पोचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त करत एक्स्पोच्या माध्यमातुन प्राप्त होणरा निधी गरजु रुग्णांवर प्लास्टीक शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. ही बाब अतिशय वाखाणण्याजोगी असुन रोटरीच्यावतीने अनेकविध समाजहिताचे उपक्रम राबविले जातात ही अतिशय स्तुत्य बाब असुन शेतकरी बांधवासाठीही रोटरीने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करुन जालना शहरात अशा प्रकारच्या प्रदर्शनच्या सेंटरची उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केल्या.
          उदघाटनपर भाषणात प्रसाद कोकिळ म्हणाले की, जालना हे मराठवाड्याचं भुषण आहे.  सीडस् व स्टीलच शहर म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या एक्स्पोच्या माध्यमातुन उद्योग विश्वातील नवनवीन संकल्पना समोर येण्यास मदत होणार असुन हे केवळ प्रदर्शन नसुन यशस्वी उद्योजकांनी केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची एकाच छताखाली उपलब्धी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          अध्यक्षीय समारोपात व्यंकटेश चन्ना म्हणाले की,  रोटरीच्या माध्यमातुन संपुर्ण जगभर समाजहितासाठी कार्य करण्यात येते.  जगभरात 34 क्लबच्या माध्यमातुन तर महाराष्ट्र राज्यात 11 जिल्ह्यात 104 क्लबच्या माध्यमातुन 4 हजार 300 रोटरीयन काम करत आहेत.  जालन्यामध्ये 4 क्लबच्या माध्यमातुन यशस्वीरित्या काम करण्यात येत असुन एक्स्पो 2017 च्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
          यावेळी सुनिल रायठठ्ठा, राजेंद्र बारवाले, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
          कार्यक्रमाचे संचलन डॉ. रमेश अग्रवाल यांनी केले तर आभार दीपक बगडीया यांनी मानले.  कार्यक्रमास रोटरीचे सर्व पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

*******