Saturday 11 March 2017

“महाराष्ट्र माझा” छायाचित्र प्रदर्शनास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची भेट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा स्तुत्य उपक्रम

जालना, दि. 11 –डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दि. 11 मार्च रोजी भेट देऊन प्रदर्शनाची पहाणी करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम स्तुत्य असून संपूर्ण राज्यभर अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केली.  
      याप्रसंगी माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक  ॲङ पी.जे. गवारे, विरेंद्र धोका, ज्येष्ठ छायचित्रकार बाबुराव व्यवहारे, प्रा. रेणुका भावसार, ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालयाचे श्री हनवते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तींचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जलयुक्त शिवार, मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान, विद्युत विकास, रस्ते विकास, कृषिविकास, कौशल्यविकास यासारख्या योजनांबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीला, वीज, पाणी, शेतमालाला भाव देण्यासाठी अनेकविध उपक्रम शासन राबवित आहे. शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया माध्यमातून तर तरुणाईला ही माहिती सोशल मिडिया माध्यमातून देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करत असल्याचे गौरदवोदगार त्यांनी यावेळी काढले.
     जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत जिल्ह्यात ड्रायपोर्ट, सीडस् पार्क, रसायन तंत्र महाविद्यालयासारखे विकासात्मक प्रकल्प आणण्यात आले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची सोय निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री                  श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन सुरु असून                 दि. 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी                 श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******


Monday 6 March 2017

नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा" प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जालना -  प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जालना येथे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुराव व्यवहारे, लक्ष्मण राऊत, तालुका विधी न्या विभागाचे समन्वये ॲड पी.जे. गवारे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनात कला, संस्कृती, इतिहास वारसा यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असलेल्या विषयावरील अप्रतिम अशा छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून या प्रदर्शनाचा लाभ शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींसह सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन आज दि. 6 मार्च, 2017 पासून भरविण्यात आले असून 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 या उदघाटन समारंभास पत्रकार अंकुश गायकवाड, अभयकुमार यादव, नारायण माने, अतुल व्यवहारे, अनिल व्यवहारे, साबेर खान, जावेद तांबोळी, किरण खानापुरे, सुनिल खरात, शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******







Friday 3 March 2017

श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या 16 गावांच्या विकास कामांचा डीपीआर तातडीने सादर करा– पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना –   केंद्र शासनाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये परतूर तालुक्यातील 16 गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.  या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे असून निवड झालेल्या गावांमध्ये आर्थिक व तांत्रिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.  त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी या गावांचा विकास करण्यासाठी जबाबदारीने व समन्वयाने कामे करावीत.  या कामात हगगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री       श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.          
 श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत निवड झालेल्या गावात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनामार्फत 70 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून उर्वरित 30 टक्के निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या 16 गावांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्चशिक्षण सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गावअंतर्गत गटारे, रस्त्यावरील पथदिवे, गावअंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतुक, एलपीजी गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता, नागरी सेवा केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत.  गावात कामे करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव श्री भालेराव यांनी योजनेचे महत्व व कशापद्धतीने ही योजना राबवावयाची आहे या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांनासविस्तर अशी माहिती दिली. तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आजपर्यंत या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा व केलेल्या नियोजनाचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
            या बैठकीस संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

*******