Wednesday 25 January 2017

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

जालना, दि. 26 –  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. 
या कार्यक्रमास आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल,  माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीसअधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उप‍ विभागीय अधिकारी केशव नेटके, कार्यकारी अभियंता श्री बेलापट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर  यांनी परेडचे निरीक्षण केले.  परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, पार्थ सैनिकी शाळा, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कुल, स्काऊट गाईड यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दल आदींचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी, वन विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, निवडणूक विभागासह विविध विभागांच्या चित्ररथाचाही यामध्ये समावेश होता.
            याप्रसंगी ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच परतूर व जाफ्राबाद तालुके हागणदारीमुक्त झाल्याबद्दल स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी, तंटामुक्त गाव मोहिमेध्यमे उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या सतीश पाटेकर व बाबासाहेब म्हस्के या पत्रकारांचा विद्यार्थी, विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
            कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.  कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, पत्रकार,विद्यार्थी, विद्यार्थीनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.         

*******


मनोधैर्य योजनेंतर्गत ट्रामा टीमसाठी प्रशिक्षण संपन्न

              जालना, दि. 25 - मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्कार, ऍ़सिड हल्ला, बाललैंगीक अत्याचार पिडीतांचे पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ट्रॉमा टिमसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक श्रीमती सरीता पाटील, मानसोपचार तज्ञ श्री पवार, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड. पी.जे गवारे,  पियुश गडे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, पोलीस,  महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग यांनी सामाजिक दृष्टीकोन ठेऊन संवेदनशिलपणे व तत्परनेते काम करावे. तसेच पोलीस विभागाने पिडीतांचा प्रथम खबरी अहवाल तातडीने नोंदवून घेऊन त्याची प्रत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्याच्या सुचना देऊन मनोधैर्य योजनेसंदर्भात उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड. पी.जे गवारे यांनी मनोधैर्य योजना व बालकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन करुन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. ॲड पियुष गडे यांनी ट्रॉमा टिमची कार्ये व भुमिका  या बद्दल माहिती विषद केली.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांनी मनोधैर्य योजनेची पार्श्वभूमी व सध्या जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.  
            मनोधैर्य योजोंतर्गत प्राप्त प्रकरणांवर केली जाणारी कार्यवाही व पोलीसांची भुमिका याबद्दल जिल्हा संरक्षण अधिकारी व्हि. पी. नागरे यांनी तर परिविक्षा अधिकारी श्री अमोल राठोड यांनी मनोधैर्य योजनेतून अनुदान वाटपाबाबत माहिती दिली.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय राठोड तर आभार समुपदेशक संतोष कऱ्हाळे यांनी मानले.  

*******

तरुणांनी अधिकाधिक संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना, दि. 25 –  तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. तरुणांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन  मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन समृद्ध व सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, तहसिलदार श्री पाटील, उपशिक्षणाधिकारी श्रीमती धुपे,प्रकल्प संचालक मनोज देशमुख, नायब तहसिलदार गणेश पोलास आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनांक 25 जानेवारी 2011 रोजी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू असल्याचे सांगत जिल्ह्यातीन भावी युवा मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण जिल्हाभर विविध जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये जिल्ह्यात 25 हजार 399 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी दिली.
            संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाही भक्कम व यशस्वी असल्याचे निवडणूक आयोगाने सिद्ध केले आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व देशाच्या विकासासाठी मतदारांनी पुढे येऊन मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे अवाहनही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी केले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चौधरी म्हणाले की, लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा.  लोकशाही टिकली तरच देश टिकेल.  समाजाचे नेतृत्व मतदानाच्या माध्यमातून योग्यपणे निवडल्यास देशाचा व पर्यायाने समाजाचा विकास चांगल्या पद्धतीने होणार असल्याचे सांगत शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालयांमधून नवमतदारांना मतदानाचे महत्व पटवून द्यावे.  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमधून मतदानचे महत्व पटवून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेशी जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व विषद करुन ‘सक्षम करूया युवा व भावी मतदार’ हे ब्रीद स्वीकारून सध्या मतदार जनजागृती अभियानाच्या माध्यमातून तरूणाईला प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात असून भावी युवा मतदारांमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीची माहिती दिली.
             यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर,उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थीनींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी, विद्यार्थींनींचा प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.  याप्रसंगी नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्राचे वाटपही करण्यात आले.  उपस्थित मतदारांना प्रतिज्ञाही देण्यात आली.
            कार्यक्रमाचे सुत्र संचलन संजय कायंदे यांनी केले तर आभार उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांनी मानले.
            कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली संपन्न
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मतदार जनजागृती अभियानांतर्गत रॅलीस अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
            यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
             रॅलीची सुरुवात गांधीचमन येथून करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विसर्जित करण्यात आली.  या रॅलीमध्ये बालकामगार संस्था, सरस्वती भुवन प्रशाला, जे.ई.एस. महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्याल, संस्कार प्रबोधिनी हायस्कूल, जिल्हा परिषद प्रशाला, शिवाजी हायस्कुल, किडस् केंब्रीज हायस्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच राज्य राखीव पोलीस दलातील जवानांनी सहभाग घेतला.
******* 

Tuesday 24 January 2017

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेले काम चोखपणे व जबाबदारीने पार पाडावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना, दि. 24 – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांनी दिलेले काम चोखपणे व जबाबदारीने पार पाडण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिल्या.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 साठी नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण श्री शिंदे, तहसिलदार श्रीमती अनिता भालेराव, नायब तहसिलदार श्रीमती खटावकर आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने तसेच मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.  यासाठी आवश्यक तेवढी शासकीय तसेच खाजगी वाहने अधिग्रहीत करण्यात यावीत. उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व परवान्याग्या देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने तालुकास्तरावर एकखिडकीच्या माध्यमातून परवानग्या देण्याची व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांना निवडणुकीचा खर्च ऑनलाईन सादर करावयाचा असल्याने तालुकास्तरावर उमेदवारांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशिन्स, ‘कॉप’ (COP) सिटिझन ऑन पेट्रोल मोबाईल अॅप, आचारसंहिता यासह इतर बाबींचाही जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******

Saturday 21 January 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2017 : 23 जानेवारी रोजी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांसाठी बैठक व प्रशिक्षणाचे आयोजन

जालना, दि. 21 – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक 2017 च्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी सोमवार दि. 23 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  बैठकीनंतर इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
            या बैठकीस व प्रशिक्षणास सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व शासकीय, खाजगी इंटरनेट ऑपरेटर, कॅफेचालक यांनी उपस्थित रहावे, असे डॉ. एन.आर. शेळके, उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रशासन तथा निवडणूक नोडल अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

निवडणूका शांततेत व सुरळीरित्या पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्भयपणे व समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना दि. 21 :-  जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका शांततेत व सुरळीरित्या पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्भयपणे, निष्पक्षपातीपणे तसेच समन्वयाने काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिल्या.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडूळकर, जिल्हा कोषागार अधिकारी श्री पाटील, तहलिसदार श्रीमती अनिता भालेराव आदींची प्रमुख उपस्थित होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे भरुन घेण्यात येणार आहेत.  उमेदवारांकडून अचुक अर्ज प्राप्त व्हावेत यासाठी तालुकास्तरावर उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे.  उमेदवारांना फॉर्म भरण्यास तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने इतर शंकाचे निरसन होण्यासाठी मदत कक्षाची स्थापना करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
         निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या सुचना करत सामान्य नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी थेट निवडणूक विभागाकडे दाखल करता याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ‘कॉप’ (COP) सिटिझन ऑन पेट्रोल हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या सहाय्याने घटनेची माहिती प्रशासनास देऊ शकणार आहेत.  यासाठी या ॲपसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी नागरिकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबरोबरच ॲपच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर घटनेच्या ठिकाणाहून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत मेसेज प्राप्त होणार आहे.    आचारसंहिता भंगाबाबत ॲपद्वारे मेजेस प्राप्त होताच अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन घटना घडलेल्या जागेवर तातडीने जाऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
            निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना देत जिल्ह्यातील संवेदनशिल मतदान केंद्राची माहिती तयार करण्यात यावी.  आठही तालुक्याच्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात उप विभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.  जिल्ह्यात अवैध दारुविक्री करणाऱ्या अड्ड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतरही सुरु राहणारे हॉटेल्स, ढाबे यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.   निवडणुकीच्या कालावधीमध्ये रात्रीची गस्त वाढविण्याबरोबरच जागोजागी नाकाबंदी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी पोलीस विभागाला दिल्या. 
            उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या एक खिडकी योजनेंतर्गत देण्याचे निवडणुक आयोगाने निर्देश दिले असून या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे.  तसेच परवानाधारक शस्त्रधारकांनी त्यांची शस्त्रे तातडीने जमा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी केले.
            या बैठकीस निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*******

Wednesday 18 January 2017

पंचायत समिती सभापती पदासाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर



जालना दि. 18 :- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्‍ह्यातील आठही पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, तहसिलदार श्रीमती अनिता भालेराव, नायब तहसिलदार श्री खटावकर यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शेळके म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून उमेदवारांनी इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणाहून अर्ज भरुन विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यांच्या नावे खाते उघडून घ्यावीत.  तसेच निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत खर्चाचा तपशिल सादर न करणाऱ्या उमेदवारांना पुढील सहा वर्षासाठी निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.  निवडणुका सुरळीत व पारदर्शी होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून 7 उपजिल्हाधिकारी दर्जाचे तर एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या त्या तहसिल कार्यालयाचे तहसिलदार हे सहाय्यक म्हणून काम पहाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्वे, सूचना यांची माहिती उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
            दरम्यान पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण शालेय विद्यार्थीनींच्या हस्ते काढण्यात आले. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे

1 मंठा (अनुसूचित जाती)
2 बदनापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला)
3 भोकरदन (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
4 अंबड, घनसावंगी,परतूर ( सर्वसाधारण – महिला)
5 जाफ्राबाद, जालना (सर्वसाधारण)
***-***


Friday 6 January 2017

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार – पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 6 -  समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात. अशा पत्रकारांच्या असलेल्या समस्या मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
            येथील मातोश्री लॉन्स येथे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, घनश्याम गोयल, शहाजी राक्षे, सिद्धविनायक मुळे, विरेंद्र धोका, सुनिल आर्दड, भाऊसाहेब कदम, राजु मोरे, अंकुशराव अवचार, पंजाबराव बोराडे, कल्याणराव खरात, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्ध आपल्या दर्पण या वृत्तपत्रामधून प्रखर असे लिखाण करुन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनतेमध्ये एक चळवळ निर्माण केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन पत्रकारांनी समाजामधील दुष्ट प्रवृत्तीबद्दल लिखाण करावे. 
आजच्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्र चालविणे अत्यंत जिकीरीचे बनले असून पत्रकार हे निस्वार्थपणे समाजासाठी लढत असतात.  अशा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आपण दर्पण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करुन पत्रकारांचा सन्मान करत आहोत.   राज्य शासनही पत्रकारांसाठी योजना राबवित असून पत्रकारांना गंभीर आजार झाल्यास, अपघात झाल्यास किंवा अकस्मात निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत केली जाते.  या कल्याण निधीची रक्कम 5 कोटी रुपयांवरुन 10 कोटी रुपये करण्यात आली आहे.  राज्यात जवळपास 2 हजार पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका प्रदान केल्या असल्याचे सांगत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश केला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून जनतेला बसल्या ठिकाणी जगात चाललेल्या गोष्टींची माहिती काही क्षणात मिळत असली तरी प्रिंट मिडियाचे महत्तव आजही तेवढेच असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, भारत धपाटे, पारस नंद, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांचीही समयोचित भाषणे झाली.
            या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातुन उपस्थित राहिलेल्या पत्रकारांचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध वृत्तपत्राचे संपादक, कार्यकारी संपादक, जिल्हा प्रतिनिधी, तालुका वार्ताहर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे स्ट्रिंजर, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***


Tuesday 3 January 2017

सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन त्यांच्या मनातील महाराष्ट्र निर्मितीसाठी शासन कटिबद्ध – शालेय शिक्षण मंत्री श्री तावडे



जालना, दि. 3 – गत दोन वर्षापासुन राज्य शासन पारदर्शीपणे व गतिमानतेने काम करत असून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याबरोबरच त्यांच्या मनातील महाराष्ट्र निर्मितीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
            परतूर येथे 176 गावांच्या ग्रीड पद्धतीने पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन श्री तावडे यांच्या हस्ते करण्यात आले तर 220 के.व्ही. विद्युत केंद्राचा लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम श्री तावडे बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, माजी आमदार अरविंद चव्हाण,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, राहुल लोणीकर, रामेश्वर भांदरगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री तावडे म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये जालना जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जलयुक्त शिवार, रस्तेविकास, विद्युत विकास यासारखी अनेकविध  विकास कामे यशस्वीपणे करण्यात येत आहेत.  श्री लोणीकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यास एक खंबीर असे नेतृत्व प्राप्त झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निश्चलीकरण करण्याच्या निर्णयामुळे देशातील बँकांमध्ये जवळपास 14 लाख कोटी रुपयांचे चलन जमा झाले आहे.  या चलनाच्या माध्यमातून देशात येणाऱ्या काळात अनेकविध विकास कामे राबविण्यात येणार असून या धाडसी निर्णयाला महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी त्रास सहन करत दिलेल्या पाठींब्याबद्दल शासनाच्यावतीने त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.
            वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी व योग्य दाबाने वीज देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.  राज्यात अनेक वर्षापासून सिंचनाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत.  केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिचाई योजनेच्या माध्यमातून राज्याला 18 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात प्रलंबित सर्व प्रकल्पाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.


जालना जिल्ह्यातील निम्नदुधना प्रकल्पाचे कामही अनेक दिवसापासून प्रलंबित होते.  पंतप्रधान सिचाई योजनेमधून या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमीनीचा मावेजा देण्यासाठीही निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या दोन-वर्षात  जनतेला दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागल्या.  राज्यात 6 हजार टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला तर लातुर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला.  या सर्व बाबींचा विचार करुन गुजरात, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत                15 हजार कोटी रुपयांच्या वॉटरग्रीड योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.  234 कोटी रुपये खर्चून परतूर येथे करण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या वॉटरग्रीड योजनेच्या माध्यमातून मंठा, परतूर व जालना तालुक्यातील 176 गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            ग्रामीण भागातील जनतेला योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात 33 के.व्ही ची उपकेंद्रे मंजुर करण्यात आली असून मंठा व परतूर शहरासाठी लोकार्पण करण्यात आलेल्या 220 के.व्ही. केंद्राच्या माध्यमातून अखंडितपणे वीज पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे सांगत  जिल्ह्यातील अपूर्ण असलेले सिंचनाचे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली. 
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून सिंचन, आरोग्य, शिक्षण यासह इतर सर्व बाबींचा अनुशेष भरुन काढत जिल्ह्याची यशस्वीपणे विकासाकडे वाटचाल सुरु असून राज्यातील पहिली वॉटरग्रीड परतूर येथे होत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, परतूर शहरात उभारण्यात येणाऱ्या ग्रीडवॉटर योजनेप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यासाठी अशी एक योजना येणाऱ्या काळात उभी करावी.  जिल्ह्याची पारदर्शीपणे व गतिमानतेने विकासाकडे वाटचाल सुरु असून  सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            अध्यक्षीय समारोपात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  या सर्व योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. राज्यात पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करण्यासाठी गत दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे.  येणाऱ्या काळातसुद्धा प्रत्येक गावात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करण्याबरोबरच पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंब जमिनीमध्ये अडविणे व जिरवणे गरजेचे आहे.

            जालना जिल्ह्याला गतकाळात 434 कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला असल्याचे सांगत येणाऱ्या काळातही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपिकाचा विमा काढण्याचे आवाहन करुन  केंद्र शासनाच्या जीवनसुरक्षा योजना तसेच अटल पेन्शन योजनेचाही प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परतूर व जाफ्राबाद तालुके हागणदारीमुक्त
            जालना जिल्ह्यातील परतूर व जाफ्राबाद हे दोन तालुके हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केली. संपूर्ण मराठवाड्यात परतूर व जाफ्राबाद तालुके स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हागणदारीमुक्त करणे शक्य झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  परतूर व जाफ्राबाद तालुके हागणदारीमुक्त झाल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते पालकमंत्री श्री लोणीकर यांच्यासह स्वच्छता विभागातील सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमास विजय गव्हाणे, भाऊराव देशमुख, विरेंद्र धोका, सुनिल आर्दड, विलास नाईक, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब कदम, हररिम माने, मदनलाल सिंगी, शहाजी राक्षे, गणेश खवणे, माऊली शेजुळ, राजेश मोरे, शिवाजी सवणे, शंतनु काकडे, सुरेश कदम, प्रकाश चव्हाण, संदीप बाहेकर, कृष्णा आरगडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत ताठे, गजानन देशमुख, दारासिंग चव्हाण, गणेश काजळे, लक्ष्मण इलग यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासह पंचक्रोशितील नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***