Friday 6 January 2017

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार – पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 6 -  समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात. अशा पत्रकारांच्या असलेल्या समस्या मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
            येथील मातोश्री लॉन्स येथे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, घनश्याम गोयल, शहाजी राक्षे, सिद्धविनायक मुळे, विरेंद्र धोका, सुनिल आर्दड, भाऊसाहेब कदम, राजु मोरे, अंकुशराव अवचार, पंजाबराव बोराडे, कल्याणराव खरात, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्ध आपल्या दर्पण या वृत्तपत्रामधून प्रखर असे लिखाण करुन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनतेमध्ये एक चळवळ निर्माण केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन पत्रकारांनी समाजामधील दुष्ट प्रवृत्तीबद्दल लिखाण करावे. 
आजच्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्र चालविणे अत्यंत जिकीरीचे बनले असून पत्रकार हे निस्वार्थपणे समाजासाठी लढत असतात.  अशा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आपण दर्पण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करुन पत्रकारांचा सन्मान करत आहोत.   राज्य शासनही पत्रकारांसाठी योजना राबवित असून पत्रकारांना गंभीर आजार झाल्यास, अपघात झाल्यास किंवा अकस्मात निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत केली जाते.  या कल्याण निधीची रक्कम 5 कोटी रुपयांवरुन 10 कोटी रुपये करण्यात आली आहे.  राज्यात जवळपास 2 हजार पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका प्रदान केल्या असल्याचे सांगत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश केला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून जनतेला बसल्या ठिकाणी जगात चाललेल्या गोष्टींची माहिती काही क्षणात मिळत असली तरी प्रिंट मिडियाचे महत्तव आजही तेवढेच असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, भारत धपाटे, पारस नंद, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांचीही समयोचित भाषणे झाली.
            या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातुन उपस्थित राहिलेल्या पत्रकारांचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध वृत्तपत्राचे संपादक, कार्यकारी संपादक, जिल्हा प्रतिनिधी, तालुका वार्ताहर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे स्ट्रिंजर, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***


No comments:

Post a Comment