Wednesday 25 January 2017

तरुणांनी अधिकाधिक संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना, दि. 25 –  तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. तरुणांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन  मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन समृद्ध व सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, तहसिलदार श्री पाटील, उपशिक्षणाधिकारी श्रीमती धुपे,प्रकल्प संचालक मनोज देशमुख, नायब तहसिलदार गणेश पोलास आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनांक 25 जानेवारी 2011 रोजी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू असल्याचे सांगत जिल्ह्यातीन भावी युवा मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण जिल्हाभर विविध जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये जिल्ह्यात 25 हजार 399 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी दिली.
            संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाही भक्कम व यशस्वी असल्याचे निवडणूक आयोगाने सिद्ध केले आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व देशाच्या विकासासाठी मतदारांनी पुढे येऊन मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे अवाहनही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी केले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चौधरी म्हणाले की, लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा.  लोकशाही टिकली तरच देश टिकेल.  समाजाचे नेतृत्व मतदानाच्या माध्यमातून योग्यपणे निवडल्यास देशाचा व पर्यायाने समाजाचा विकास चांगल्या पद्धतीने होणार असल्याचे सांगत शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालयांमधून नवमतदारांना मतदानाचे महत्व पटवून द्यावे.  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमधून मतदानचे महत्व पटवून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेशी जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व विषद करुन ‘सक्षम करूया युवा व भावी मतदार’ हे ब्रीद स्वीकारून सध्या मतदार जनजागृती अभियानाच्या माध्यमातून तरूणाईला प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात असून भावी युवा मतदारांमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीची माहिती दिली.
             यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर,उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थीनींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी, विद्यार्थींनींचा प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.  याप्रसंगी नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्राचे वाटपही करण्यात आले.  उपस्थित मतदारांना प्रतिज्ञाही देण्यात आली.
            कार्यक्रमाचे सुत्र संचलन संजय कायंदे यांनी केले तर आभार उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांनी मानले.
            कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली संपन्न
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मतदार जनजागृती अभियानांतर्गत रॅलीस अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
            यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
             रॅलीची सुरुवात गांधीचमन येथून करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विसर्जित करण्यात आली.  या रॅलीमध्ये बालकामगार संस्था, सरस्वती भुवन प्रशाला, जे.ई.एस. महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्याल, संस्कार प्रबोधिनी हायस्कूल, जिल्हा परिषद प्रशाला, शिवाजी हायस्कुल, किडस् केंब्रीज हायस्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच राज्य राखीव पोलीस दलातील जवानांनी सहभाग घेतला.
******* 

No comments:

Post a Comment