Saturday 21 January 2017

निवडणूका शांततेत व सुरळीरित्या पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्भयपणे व समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना दि. 21 :-  जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका शांततेत व सुरळीरित्या पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्भयपणे, निष्पक्षपातीपणे तसेच समन्वयाने काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिल्या.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडूळकर, जिल्हा कोषागार अधिकारी श्री पाटील, तहलिसदार श्रीमती अनिता भालेराव आदींची प्रमुख उपस्थित होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे भरुन घेण्यात येणार आहेत.  उमेदवारांकडून अचुक अर्ज प्राप्त व्हावेत यासाठी तालुकास्तरावर उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे.  उमेदवारांना फॉर्म भरण्यास तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने इतर शंकाचे निरसन होण्यासाठी मदत कक्षाची स्थापना करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
         निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या सुचना करत सामान्य नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी थेट निवडणूक विभागाकडे दाखल करता याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ‘कॉप’ (COP) सिटिझन ऑन पेट्रोल हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या सहाय्याने घटनेची माहिती प्रशासनास देऊ शकणार आहेत.  यासाठी या ॲपसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी नागरिकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबरोबरच ॲपच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर घटनेच्या ठिकाणाहून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत मेसेज प्राप्त होणार आहे.    आचारसंहिता भंगाबाबत ॲपद्वारे मेजेस प्राप्त होताच अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन घटना घडलेल्या जागेवर तातडीने जाऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
            निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना देत जिल्ह्यातील संवेदनशिल मतदान केंद्राची माहिती तयार करण्यात यावी.  आठही तालुक्याच्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात उप विभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.  जिल्ह्यात अवैध दारुविक्री करणाऱ्या अड्ड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतरही सुरु राहणारे हॉटेल्स, ढाबे यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.   निवडणुकीच्या कालावधीमध्ये रात्रीची गस्त वाढविण्याबरोबरच जागोजागी नाकाबंदी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी पोलीस विभागाला दिल्या. 
            उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या एक खिडकी योजनेंतर्गत देण्याचे निवडणुक आयोगाने निर्देश दिले असून या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे.  तसेच परवानाधारक शस्त्रधारकांनी त्यांची शस्त्रे तातडीने जमा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी केले.
            या बैठकीस निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment