Monday 2 January 2017

दुधाळ जनावरांच्यावाटपाचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व बँकर्सनी सहकार्य करावे – राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर



जालना, दि. 2 – मराठवाडा पॅकेजअंतर्गत लाभार्थींना दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी  प्रकल्प राबविण्यासाठी जालना जिल्ह्याची निवड करण्यात आली असून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व बँकर्सनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पशुसंवर्ध व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व बँक अधिकारी तसेच वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.राऊतमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, मराठवाडा पॅकेजअंतर्गत 50 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी जालना जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या प्रकल्पांतर्गत जवळपास 2 हजार लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील बँकांनी पतपुरवठ्याचे नियोजन करुन अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे.   जालना जिल्ह्यात दुध उत्पादनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  जिल्ह्यातील दुधाचे प्रमाण वाढावे  व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडावी या उद्देशाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 

            लाभार्थ्यांना जनावरे उपलब्ध करुन देताना ती अत्यंत चांगल्या प्रतीची असतील याची खबरदारी घेण्याच्या सुचना करत शेतकऱ्यांच्या संकलित दुधाला चांगला भाव देण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगत सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वासही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी व्यक्त केला.
            शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग हा अत्यंत किफायतशीर असा उद्योग असून राज्यात एकूण 4 हजार एकरवर तुतीची लागवड करण्यात येते.  त्या तुलनेत एकट्या जालना जिल्ह्यात एक हजार एकरवर तुतीची लागवड करण्यात येते.  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषाच्या विक्रीसाठी जालना येथे  रेशीम कोष खरेदी केंद्र उभारणीसाठी 5 कोटी 86 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी एक हेक्टर जागासुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  येणाऱ्या काळात या जागेवर रेशीम कोष खरेदी केंद्राची सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            जालना जिल्हा हा दुधनिर्मिती तसेच रेशीम कोष उत्पादनामध्ये राज्यात अव्वल क्रमांकावर यावा यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            या बैठकीस जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी, वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
***-***

           

No comments:

Post a Comment