Friday 28 April 2023

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कार्यशाळा


ग्रामीण भागातील सर्व जाती- धर्माच्या लोकांनी

समता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करावेत

- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 

जालना, दि. 28 (जिमाका) :- भारतीय  संविधानातील विविध कलमानूसार सर्व भारतीय व्यक्तींना जीवन जगत असतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत अधिकारासह इतरही समान अधिकार प्राप्त झाले आहेत. जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व जाती- धर्माच्या लोकांनी समता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्ह्यात सामाजिक न्याय समता  पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनाबाबत थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समाज कल्याण कार्यालय जालना व उज्ज्वल बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि.26 एप्रिल 2023 रोजी मौजे मौजपुरी येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1986 व सुधारित नियम 2016 या विषयावर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेस जिल्हाधिकारी     डॉ. विजय राठोड, पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, जिल्हा शासकीय अभियोक्ता बाबासाहेब इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजु मोरे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी एस.आर.कुलकर्णी, सरपंच ज्योती राऊत व उज्ज्वल बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती करुणा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, बाल वयात विवाह झाल्याने त्या मुलां-मुलींवर दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे सजग गावकऱ्यांनी आपल्या गावात बालविवाहास प्रतिबंध करावा असे असे सांगून त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.

पोलिस अधिक्षक  अक्षय शिंदे म्हणाले की, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र सलोख्याने राहून गावामध्ये शांतता नांदेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे व अनाधिकृत कॉलमुळे होणाऱ्या दुष्पपरिणामाची त्यांनी यावेळी माहिती दिली.

समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रास्ताविकात समता पर्वनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करुन ही कार्यशाळा ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यामागचा मुळ उद्देश हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत दाखल गुन्ह्याचे प्रमाण कमी करणे हाच असल्याचे सांगितले.

 जिल्हा शासकीय अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कायद्याची गरज का पडली याबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट करत अधिनियमातील कलमनिहाय गुन्ह्याच्या स्वरुपाची माहिती सविस्तर विशद केली.

मौजपूरी गावातील उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामस्थांचा व संबंधित तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अच्युत मोरे यांनी केले तर आभार मौजपुरीच्या सरपंच ज्योती राऊत यांनी मानले. या कार्यशाळेस मौजपूरी   परिसरातील सरपंच, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, पोलिस पाटील, ग्रामस्थांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-


विविध खेळाच्या मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात नाव नोंदणी करुन सहभागी व्हावे

 

जिल्हा क्रीडा ‍विभागाचे आवाहन


 

जालना, दि. 28 (जिमाका) :- जिल्ह्यात खेळांचा प्राथमिक कौशल्य विकास व नवीन विद्यार्थी खेळाडूंना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी फुटबॉल, खो-खो, तलवारबाजी, योगासन, कबड्डी, तायक्वांदो, टेनिक्वाईट, नेटबॉल, सेपाक टकरा, स्केटींग, बॉक्सींग, आर्चरी, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल खेळाच्या प्रशिक्षण शिबिराचे दि.3 ते 12 मे 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये नाव नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

जिल्ह्यात खेळाचा प्रचार व प्रचार होवून जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत न करता गावपातळीपासून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी 8 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर खेळनिहाय व शारिरीक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे दरवर्षी  आयोजन करण्यात येत असते. उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सकाळी 6.30 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंतच्या वेळेत जिल्हा क्रीडा संकुलासह इतर ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

खेळांमध्ये फुटबॉल प्रशिक्षक महमद शेख (मो.8788360313), खो-खो प्रशिक्षक संतोष वाबळे (मो.7588169493), तलवारबाजी प्रशिक्षक विजय गाडेकर (मो.9271783313), योगासन प्रशिक्षक देवानंद चित्राल (मो.9421687666), कबड्डी प्रशिक्षक  रवी ढगे (मो.9503556809), तायक्वांदो प्रशिक्षक  मयुर पिवळ (मो.7721094109), टेनिक्वाईट व नेटबॉल आणि सेपाक टकरा प्रशिक्षक शेख चाँद (9822456366), स्केटींग व बॉक्सींग प्रशिक्षक सय्यद निसार (मो.9764333166), आर्चरी प्रशिक्षक सचिन टेकुर (मो.8983608413), सॉफ्टबॉल आणि बेसबॉल प्रशिक्षक (मो.9011854192) आदी क्रीडा मार्गदर्शकांशी संपर्क साधून खेळाडूंनी नाव नोंदणी करावी व उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास दि. 3 मे 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

सफाई कर्मचारी व त्यांचे पुर्नवसन कायद्याअंतर्गत कार्यशाळा संपन्न

 


 

जालना, दि. 28 (जिमाका) :- सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांचा थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. समाज कल्याण कार्यालय व नगर परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी व त्यांचे  पुर्नवसन कायदा 2013 अंतर्गत जनजागृती कार्यशाळा दि.27 एप्रिल 2023 रोजी जालना येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टाऊन हॉलमध्ये संपन्न झाली.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर,  विधीज्ञ ज्ञानेश्वर शेंडगे, सफाई कर्मचारी आंदोलन जिल्हा समन्वयक सिध्दार्थ इंगळे, सहाय्यक आयुक्त अमित घवले,  मुख्याध्यापक एम.डी.गिरी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे, सहाय्यक आयुक्त अमित घवले, विधीज्ञ ज्ञानेश्वर शेंडगे, जिल्हा समन्वयक सिध्दार्थ इंगळे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्द देवून सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेस जालना नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

कष्टाची कामे दुपारच्या वेळी करणे टाळावे व आपला उष्माघातापासून बचाव करावा

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन


* कंट्रोल रुम टोल फ्री क्रमांक-1077

 

जालना, दि. 28 (जिमाका) :- आगामी काळात बदलते हवामान लक्षात घेवून उष्मालाटेपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे व क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांमध्ये सुयोग्य समन्वय ठेवून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. संबंधित विभागाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हास्तरावर कंट्रोल रुमची उभारणी करण्यात आली असून 1077 हा टोल फ्री क्रमांक उष्माघातविषयक माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कष्टाची कामे दुपारच्या वेळी करणे शक्यतो टाळावे व आपला उष्माघातापासून बचाव करावा, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि.28 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2 वाजता उष्णतेच्या लाटेवर करावयाच्या उपाययोजनेबाबत आढावा बैठक पार पडली, यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय मेश्राम, विभाग नियंत्रक डी.एम.जाधव, सहाय्यक अभियंता एम.आय.शहा, ललित कासार, प्रशांत वरुडे, श्रीमती कल्पना दाभाडे यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नेटके म्हणाले की, आरोग्य विषयक बाबींसाठी जिल्हा शल्यचिकित्सक हे संपर्क अधिकारी म्हणून काम करणार असून त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून आरोग्य सेवेविषयक प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य विषयक सोयी-सुविधा पूर्णवेळ उपलब्ध राहतील याची वेळोवेळी खात्री करावी. भारतीय हवामान खात्यामार्फत उष्णतेच्या लाटेसंदर्भात पुर्व सुचना व अंदाज वर्तविण्यात येत असतात. ही माहिती जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित करुन जिल्हाधिकाऱ्यांना नेहमी अवगत करावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व प्रदुषण नियंत्रण मंडळाने आठवड्याच्या दर सोमवारी अहवाल सादर करावा. अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे,  शक्य असल्यास दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर पडू नये तसेच घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी  छत्री अथवा टोपीचा वापर करावा. हलकी पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. उन्हात काम करीत असतांना टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकून ठेवावा, शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस किंवा घरी बनविलेली लस्सी, कैरीचे पन्है, लिंबूपाणी, ताक आदिचा वापर करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, सतत येणारा घाम दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहाटेच्यावेळी जास्तीच्या कामाचा निपटारा करावा. तसेच बाहेर कामकाज करीत  असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेवून आराम करावा. तर उन्हात अतिकष्टाची कामे करु नये, दारु चहा कॉफीसह कार्बोनेटेड थंड पेये पिणे टाळावे.  दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथीनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे.  मुलांना अथवा पाळीव  प्राण्यांना बंद खोलीत अथवा बंद केलेल्या मोटारगाडीत ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. उन्हामध्ये काम करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकाची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. अशा सुचनाही निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी बैठकीत दिल्या.

-*-*-*-*-

Thursday 27 April 2023

चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत कुंडलिका-सीना नदी पुर्नरुज्जीवनचे कामे 15 जुनपर्यंत नियोजनबध्दपणे पूर्ण करावीत -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड



 

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी घेतला जलसंधारण कामांचा आढावा


       जालना दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील चला जाणूया नदीला उपक्रमासह जलसंधारण विषयीच्या कामांना मान्सून पुर्व गती देणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात जलशक्ती अभियानाअंतर्गत एक जलशक्ती केंद्र तयार करण्यात येत आहे. पोकरा योजना व अटल भूजल योजना, शेतीबांध बंदिस्ती आदी योजनेतील कामे पुढील दीड महिन्यात पूर्ण करावीत. जिल्ह्यात चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत कुंडलिका-सिना नदी पुर्नरुज्जीवनचे काम करण्यात येत असून ही कामे 15 जुनपर्यंत नियोजनबध्द पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आढावा बैठकीत दिले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्यासह संबंधित  यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत गावनिहाय सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवकासह तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रशिक्षण येत्या शुक्रवारपर्यंत पूर्ण करावे व या प्रशिक्षणात भविष्यातील नियोजन काय व कसे असेल याबाबत सखोल माहिती उपलब्ध करुन द्यावी. अशी सूचना केली.    तसेच यावेळी वनविभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, सामाजिक  वनीकरण, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नगर परिषद, उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेत विविध सूचना त्यांनी केल्या.

जलयुक्त शिवार 2.0 ची  कामे प्रगती अहवाल जाणून घेत कामांची संख्या अंतिम करुन कार्यादेश लवकरात लवकर तयार करावेत, असेही आदेश दिले. तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील अल्पभूधारक पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा. या कामाच्या तपशिलासाठी अवनी ॲप तयार करण्यात आले असून यावर कार्यमुल्यमापन करण्यात येणार आहे. एका जलसाठ्यातील गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अधिक अशासकीय संस्थेचे अर्ज आल्यास संबंधित संस्थांची क्षमता तपासून जिल्हा समिती एका जलसाठ्यासाठी एका अशासकीय संस्थेची निवड करण्यात येणार आहे असे सांगून यात टप्प्याटप्प्याने कामे करावीत. अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

-*-*-*-*-

 

 

Wednesday 26 April 2023

वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता नागरिक, शेतकरी यांना खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

 

जिल्हा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. ०२४८२-२२३१३२

 

जालना, दि. 26 (जिमाका) :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 28 एप्रिल 2023 या पर्यंत यलो अलर्ट जारी केला असून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची व ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबकळणा-या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवात्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील दुरध्वनी क्र. ०२४८२-२२३१३२ या वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतीचे 30 एप्रिल रोजी आयोजन

 

 

          जालना, दि. 26 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसाटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा फायदा घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षेच्या केंद्र परिसरात 144 कलम लागू


 

जालना दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2023 चे रविवार दि.30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.  जालना शहरातील जिल्हा केंद्रावरील एकुण 28 उपकेंद्रावर महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून एकुण 7 हजार 584 उमेदवार परिक्षा देणार आहेत. तरी संयुक्त परिक्षा सुरळीतपणे पार पडण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिला 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यातील मस्त्योदरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनियरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी नागेवाडी जालना, शासकीय तंत्रनिकेतन नागेवाडी जालना, बद्रीनारायण बारवाले कॉलेज जालना,अंकुशराव टोपे कॉलेज जालना, सीटीएमके गुजरातील हायस्कुल जालना, नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जुना जालना, राष्ट्रीय हिंदी विद्यालय देऊळगाव राजा रोड जालना, आरजी बागडीया कला व एसबी लखोटीया वाणिज्य आणि आर बेंन्झोंन्जी विज्ञान महाविद्यालय जालना, श्री एमएस जैन इंग्लिश स्कुल जालना,  राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना, उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेज जालना,  सेंट मेरी हायस्कुल जालना, जिल्हा परिषद मुलींची शाळा जालना, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय जालना, श्री एमएस जैन विद्यालय जालना, रयान इंटरनॅशनल स्कुल जालना, विद्यांचल शिक्षण संस्था व्हीएसएस कॉलेज जालना, जिल्हा परिषद मुलांची शाळा जालना, शासकीय तंत्रनिकेतन अंबड,  मत्स्योदरी विद्यालय अंबड, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंबड, ओम शांती विद्यालय अंबड, आरपी इंटरनॅशनल स्कुल बदनापूर, निर्मल क्रीडा आणि समाज प्रबोधन ट्रस्टचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बदनापूर, रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी बदनापूर, श्रीमती मथूरादेवी महाविद्यालय बदनापूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर आणि श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या 28 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

संयुक्त परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात  सर्व सार्वजनिक टेलिफोन,  एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवावेत. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144  (2)  नूसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. या आदेशाची प्रसिध्दी पोलिस अधिक्षक जालना यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे करावी. हा आदेश दि.30 एप्रिल 2023 रोजीचे सकाळी 9 वाजेपासून  ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतीचे 30 एप्रिल रोजी आयोजन

 

 

          जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसाटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा फायदा घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Tuesday 25 April 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात 2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


        जालना दि. 25 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याचे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे निर्देश दिलेले आहेत. परंतू एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन म्हणून पाळण्यात यावा असे निर्देश आहेत. तरी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवार दि.2 मे 2023 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  अशी माहिती  उपजिल्हाधिकारी संगिता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यांतील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व सदर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यत दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन सुचीत केलेले आहे. कोणत्याही  स्तरावर लोकशाही दिनात  न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.   तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागद पत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्यात अर्ज  https:jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा महिला रुग्णालयात जागतिक हिवताप दिन साजरा

 जालना दि. 25 (जिमाका) :- जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून जिल्हा महिला रुग्णालय जालना येथे साजरा करण्यात आला. सुरुवातीस सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येवून प्रभातफेरीस जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.डी. गावंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

हिवताप रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियंत्रणाकरीता चित्रप्रदर्शन व परिचारिकांनी साकारलेल्या प्रबोधनानात्मक रांगोळीचे उदघाटन महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गौल व डॉ. श्रध्दा उणवणे यांच्या हस्ते करण्यात आले.  हिवताप जनजागृती महिना साजरा करत असतांना घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वर्षभरात उत्कृष्टरित्या काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून यावेळी गौरव करण्यात आला.

दैनंदिन जीवनातील परिसर स्वच्छता तसेच वैयक्तिकरित्या करावयाच्या उपाययोजना तसेच दारे व खिडक्यांना  डास प्रतिबंधक जाळी बसविणे, पाण्याची डबकी वाहती करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, झोपतांना मच्छरदानीचा वापर करणे आदी उपाययोजना माहिती व हिवताप रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या नष्ट करणारे गप्पी मासे  पाळा, हिवताप आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, तापात चढ-उतार होणे, मळमळ, डोकेदुखी, घाम येणे अशी असून लक्षणे दिसताच मोफत शासकीय रुग्णालयात तपासणीचे  आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित परिचारिका, जिल्हा महिला रुग्णालय व जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना हिवताप रोग नियंत्रणाबाबत शपथ देवून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा हिवताप अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday 24 April 2023

मुंबई अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून यशदा पुणे येथे राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) :- उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येत असून निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे.  क्षेत्रकामातून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या द‌ृष्टीकोनातून सन 2021-22 या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा दि. 19 ते 21 एप्रिल, 2023 या कालावधीत नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई तर्फे यशदा पुणे येथे संपन्न झाली.

कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशदा महासंचालक  एस. चोकलिंगम, व प्रमुख पाहूणे म्हणून सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक , औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी पुणे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक पी.डी.रेंदाळकर, आणि  अर्थ व सांख्यिकी संचालनालय संचालक विजय आहेर, प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक डॉ. किरण गिरगावकर, व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक कुंदन कांबळे व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होते.

भारत सरकार राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती यांनी जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहीत वेळेत संकलीत करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले. विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी या


प्रशिक्षणाचा पुरेपुर लाभ घ्यावा व जरी मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन देणेच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या तसेच उद्योगांनी देखील या कामी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन केले.  चोकलिंगम, महासंचालक यशदा यांनी देशातील सर्व्हेचा इतिहास, माहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह अतिशय रंजक पद्धतीने उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखिल सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. वार्षिक उद्योग पाहणीच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती दिपाली धावरे, उपसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. श्री. नवेन्दु फिरके, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

कार्यशाळेमध्ये  रणबीर डे व  बाप्पा करमरकर, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार कोलकाता, डॉ. प्रदिप आपटे, प्रख्यात अर्थतज्ञ व प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. जितेंद्र चौधरी, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), उपमहानिदेशक, यशदा, पुणे हे अध्यक्ष व पुष्कर भगूरकर, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.   क्षेत्र काम करणारे कर्मचारी यांच्यासह कार्यशाळेत एकुण 164 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. 

-*-*-*-*-

अनोळखी मृत पुरुषाची ओळख पटविण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) :- बसस्थानक जालना येथून अनोळखी वृध्द पुरुष अंदाजे वय 55 ते 60 वर्ष यास बेशुध्द अवस्थेत सामान्य रुग्णालय जालना येथे औषधोपचारासाठी  दाखल करण्यात आले होते. परंतू जिल्हा वैद्यकीय अधिकारी  श्रीमती डॉ. कराडकर यांनी अनोळखी इसमाची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे सांगितले. एमएलसी रिपोर्टवरुन सदर बाजार पोलिस ठाण्यात आ.मृ.क्र.8/2023 कलम 174 सीआरपीसीप्रमाणे दाखल केला असून या अनोळखी इसम पुरुष जातीचा वय 55 ते 60 वर्षादरम्यानचा आहे. अंगात भुरकट रंगाचा लांब बाह्याचा शर्ट व काळ्या रंगाची लुंगी आहे. यास टक्कल पडलेले असून दाढीचे काळे पांढरे केस तसेच लांब वाढलेली आहे. नाक सरळ, रंग गोरा असून शरीर बांध सडपातळ आहे. तरी या इसमाची ओळख पटविण्यासाठी आवाहन पोलिस निरीक्षक, सदर बाजार, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

सर्वांनी एकाच वेळी एकदिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल

 

जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन


 

जालना, दि. 24 (जिमाका) :- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासून होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न झाले, त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एकदिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत  25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजर करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या  वर्षाचे घोषवाक्य टाईम टू डिलीव्हर झिरो इन्वहेस्ट, इनोव्हेट, इम्पिंमेंट असे असून भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना  राबविण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येत असते. दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दुर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असेही जिल्हा हिवताप अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतीचे 30 एप्रिल रोजी आयोजन

 


 

          जालना, दि. 24 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसाटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा फायदा घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

 

Friday 21 April 2023

बांधकाम कामगारांना आवाहन

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ हे संगणकीकृत प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणीअंती सदरचे लाभ हे कामगारांच्या थेट खात्यात जमा केले जातात. कामगारांना आपली कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी खाजगी व्यक्तीच्या कोणत्याही आमिषास अथवा दबावाला बळी पडू नये. तसेच अशा बाबी निदर्शनास आल्यास जवळच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागास अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा. सरकारी कामगार अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतीचे 30 एप्रिल रोजी आयोजन

 


 

          जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसाटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा फायदा घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

अक्षयतृतीयानिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

 


  जिल्हाधिकारी  डॉ.विजय राठोड यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश

जालना, दि. 21 (जिमाका) :-  जिल्ह्यात अक्षयतृतीयानिमित्त शनिवार, दि. 22 एप्रिल 2023 रोजी संभावित बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसह बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना  दिले.

अक्षयतृतीयाच्या दिवशी होणारे बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एन.चिमंद्रे, गजानन इंगळे, सचिन चव्हाण यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

अक्षयतृतीयानिमित्त होणारे बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांनी पुढील सूचना दिल्या. बालविवाह  निर्मुलन व प्रतिबंधाबाबत सर्व गावांमध्ये दवंडी देणे. दवंडीद्वारे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे तसेच 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे विवाह लावणे हा बालविवाह समजण्यात येईल व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल, असे आवाहन करावे. आपल्या गावामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच बालविवाह होत असल्यास 1098 या क्रमांकावर फोन करुन माहिती देण्यात यावी. असेही आवाहन करावे.  अक्षयतृतीयेच्या दिवशी सर्व ग्रामसेवकांनी गावातच थांबुन बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी बालविवाहाचे प्रकरण प्राप्त झाल्यास, बालविवाह निर्मुलन कृती आराखडयात नमुद प्रक्रीयेनुसार कार्यवाही करावी. अक्षयतृतीयेच्या दिवशी बालविवाह झाल्यास संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी तात्काळ संबंधितावर गुन्हे दाखल करावे. दि.22 एप्रिल 2023 रोजी शिक्षक शाळेवर उपस्थित राहतील जेणेकरुन आवश्यकता पडल्यास बालविवाह संदर्भात वयाची खात्री करण्याकरिता प्रवेश निर्गम उतारा वेळेत मिळु शकेल याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांना सूचना देण्यात याव्यात. महिला बचतगट, गावातील स्वयंसेवक यांच्यामार्फत गावात बालविवाह निर्मुलनासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. गावात ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे इ. ठिकाणी चाईल्डलाईन नं.1098 हा हेल्पलाईन क्रमांक व आपल्या गावात बालविवाह होत असल्यास कळवावे आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असा संदेश भिंतीवर पेंट करावा. बालविवाहबाबतची माहिती दर महिन्याला ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी गुगल फॉर्ममध्ये भरावी. त्याचबरोबर बालविवाह अधिसुचना दि.31 ऑक्टोबर 2022 नुसार आवश्यक नमुना तीनमध्ये मासिक अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना सादर करण्यात यावा. गटविकास अधिकारी यांनी सर्व अधिनस्त ग्रामसेवकांना लेखी सुचना, आदेश तात्काळ निर्गमित करावेत. अशा सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित  यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

-*-*-*-*-

समाज कल्याण कार्यालयाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीर व मेळावा संपन्न

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने समता पर्व अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व मेळावा शुक्रवार दि.21 एप्रिल 2023 रोजी जालना येथील टाऊनहॉल डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जालना ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कंकाळ तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नागरिक मंचाचे महासचिव रावसाहेब ढवळे, अनिसचे जिल्हाध्यक्ष मोहन  राठोड, डॉ.संजय मेश्राम, वसंतराव सांबरे, एल्डर लाईनचे स्वप्नील बारहाते  उपस्थित होते.  श्री. ढवळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना, कायदे व त्यांच्या समस्याबाबत मार्गदर्शन केले. एल्डर लाईनचे स्वप्नील बारहाते यांनी राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवाबाबत ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे  सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बालाजी चव्हाण यांनी मानले, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 







 

जालना, दि. 21 (जिमाका) :-   भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा प्रशासन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व धरतीधन ग्रामविकास संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2023 रोजी जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाट्न तहसीलदार छाया पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रविण उखळीकर,  क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्रबंधक संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक एस एस कापसे, श्री. जुंजे आणि धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.

            तहसीलदार छाया पवार व सर्व मान्यवरांनी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले आणि मिलिंद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत शाहीर जाधव आणि संच छत्रपती संभाजीनगर तर्फे पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृतीपर व प्रोत्साहनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. तहसीलदार छाया पवार व प्रविण उखळीकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री.आर्दड व श्रीमती साकोते यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली तसेच आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी मानले.

             चित्रकला स्पर्धेचे विजेते ऋतुजा खरात, पवन पवार, दुर्गेश्वरी गोखरे, गौरी वडगावकर, रांगोळी स्पर्धेचे विजेते  आरती तानगे, रीना जातोडे, आंचल नवले आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते  दिशा पगारे, कृष्णा अदबाने, विशाल मडके यांना केंद्रीय संचार ब्युरो मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी एकत्र तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमानंतर सर्वांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व कर्मचारी आणि धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदींनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-