Wednesday 30 November 2022

संविधान दिन सप्ताहानिमित्त 'मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये' या विषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित कार्यक्रम संपन्न

 

 

            जालना, दि. 30 (जिमाका) :- संविधान दिन सप्ताहानिमीत्त "मुलभुत अधिकार व मुलभुत कर्तव्ये' या विषयी दि. २९ नोव्हेंबर  रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यावतीने जीवनराव पारे विद्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. अहिर, मुख्याध्यापक सुभाष  पारे आदीची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानावर विद्यार्थ्यांना उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुणे सचिव आर. आर. अहिर यांनी संविधान म्हणजे काय? संविधानाने नागरिकांना दिलेले नागरिकांचे मुलभूत कर्तव्ये व मुलभुत अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावुन सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक एन. बी. गोरे व रमेश हिरगुडे, दिपक चिंचा व जीवनराव पारे शाळेतील शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले. आभार भोसले यांनी मानले.

-*-*-*-*-

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 


 

            जालना दि. 30 (जिमाका) :-   भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2022-23 वर्षात प्रवेशित असलेले सर्व अनुसूचित जाती ,विजा, भज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ अर्ज नोंदणी करावेत, आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी करीता जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांचे दि. 24 नोव्हेंबर 2022 पासून तालुकानिहाय कॅम्प घेण्यात येत आहेत. दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी जे. ई.एस. महाविद्यालय जालना येथे जालना तालुक्यामधील महाविद्यालयांची बैठक सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. सन 2022 -23 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ अर्ज नोंदणी, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क वसुल न करणे तसेच समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी महाविद्यालयांचे प्राचार्य यांना सुचना दिल्या.

           दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी अंबड तालुका, दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी घनसावंगी तालुका आणि दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी बदनापूर तालुकामधील इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर महाविद्यालयांत कार्यशाळा घेऊन शिष्यवृत्ती विभाग प्रमुख एस. जी. कांबळे, तालुका समन्वयक  मिलिंद गाडे यांनी सुचना दिल्या. तसेच उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती यांनी महाविद्यालयांना कळविल्यानुसार इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखामधील प्रवेशित अनुसूचित जाती,इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याबाबत समतादुत मांडलिक यांनी सर्व महाविद्यालयांना आवाहन केले. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

पेंशन अदालतीचे 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. आयोजन

 

जालना दि. 30 (जिमाका) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार दर दोन महिन्यांनी पेंशन अदालत घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तक्रारी निकाली काढणेबाबत सुचित केले आहे. त्यानूसार पेंशन अदालत दि. 12 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. त्याऐवजी सदरील पेंशन अदालत दि. 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे आयोजित केली आहे. या पेंशन अदालतीसाठी प्रलंबित सेवानिवृत्ती, कुटुंबनिवृत्ती प्रकरणाच्या माहितीसह विभाग  प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

अनुसूचित जातीच्या घटकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी 1 डिसेंबरला कार्यशाळा

 


जालना दि. 30 (जिमाका):- सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग व युवा गटांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक वर्गांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आली. सर्व नागरिकांना संविधानाची ओळख करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान निर्मीतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्यादृष्टीने दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिन ते दि. ६ डिसेंबर, २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निमित्ताने आयोजित सदर कार्यशाळेस श्रीमती के. व्ही. खरात, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना, प्रेशित मोघे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, जालना, संपत चाटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना, तेजस क्षीरसागर, जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड तसेच मंगेश डामरे, संचालक (RSETI), जालना हे कार्यशाळेस उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबंधित विभागाच्या योजनांविषयी माहिती देणार आहेत. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून प्रभात फेरी निघणार सकाळी 9 वाजता

 


जालना दि. 30 (जिमाका) :-      दि. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणुन साजरा केला जातो युवा वर्ग हा एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून या निमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु) कडुन जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन दि. 1 डिसेंबर 2022 रोजी सामान्य रुग्णालय, जालना येथे सकाळी 9.00 वाजता करण्यात आले आहे. प्रभातफेरीचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रभात फेरीमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु), सामान्य रुग्णालय यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

-*-*-*-*-

Tuesday 29 November 2022

पत्रकारांसाठी 30 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

 

 

            जालना, दि. 29 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत दि. 26 नोव्हेंबर 2022, संविधान दिन ते दि. 6 डिसेंबर 2022, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत "समता पर्व" साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने पत्रकारांसाठी बुधवार, दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” या विषयावर आयोजित कार्यशाळेत मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून सचिव, (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना) राजेश अहिर तर प्रमुख वक्ते म्हणून जे. ई. एस. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकारांनी या कार्यशाळेस अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण अमित घवले यांनी केले आहे.

-*-*-*-*-

अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी 90 टक्के अनुदानाबाबत आवाहन

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :-  जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनांतर्गत सुक्ष्म सिंचन योजना ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन https://mahadbtmahait.gov.in/  संकेतस्थळावर तातडीने अर्ज दाखल करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस. रणदिवे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचनासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनांतर्गत सुक्ष्म सिंचन योजना ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी सन 2022-23 साठी अनुसूचित जातीसाठी 1 कोटी व अनुसूचित जमातीसाठी  23 लाख निधी उपलब्ध झाला आहे. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनुज्ञेय खर्चाच्या 55  टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 55 टक्के यापैकी कमी असेल ते व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी अनुज्ञेय खर्चाच्या 45 टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 45 टक्के यापैकी कमी असेल ते अनुदान जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडुन देय असून उर्वरीत देय अनुदान 90 टक्केसाठी जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांचेकडून देण्यात येणार आहे. तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींनी नवीन सिंचन विहिरीची कामे पुर्ण केली आहेत त्यांच्यासाठी  90 टक्के अनुदान देय आहे. तरी अनुसुचित  जाती व जमातीच्या पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 डिसेंबरला कार्यशाळा व आरोग्य शिबीराचे आयोजन

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्ह्यात दि.26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्वचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने शुक्रवार दि.2 डिसेंबर 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी दि.2 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित  राहून आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत - ‍जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रणदिवे

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :-  मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2022-23 या वर्षामध्ये अन्न प्रक्रिया प्रकल्प प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी घेवु शकतात. तरी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, बचत भवन, मोतीबागसमोर, जालना येथे प्रस्ताव तात्काळ सादर  करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2022-23 अंतर्गत जालना जिल्ह्याकरीता 5 अन्न प्रक्रिया उद्योगांना 149 लाख रुपये इतके लक्षांक प्राप्त झाला आहे. साधारण एका प्रकल्पाचे मुल्य 98 लाख असल्यास 3 टक्के अनुदान रक्कम 29.40 लाख मिळू शकते. या योजनेंतर्गत शेतमालाचे मुल्यवर्धन व गुणवत्ता वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला इत्यादी शेतमालाकरिता नवीन अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापित करण्यास तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृध्दी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणास 30 टक्के अनुदान ( कमाल मर्यादा रुपये 50 लाख ) देण्यात येते. या योजनेमध्ये खालील तीन उपघटकांचा समावेश आहे. 1) कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना ( नवीन प्रकल्प उभारणी ) व कार्यरत असलेल्या कृषि व अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृध्दी , विस्तारीकरण व आधुनिकीकरण. 2) मुल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभुत सुविधा आणि  3) मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना होय. योजनेच्या अधिक माहितीसाठी  कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याकडे संपर्क साधुन त्वरीत अर्ज करावेत. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

           -*-*-*-*-

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :-  सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याचे निर्देश आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत  आचारसंहिता लागू राहणार असल्याचे कळविले आहे. तरी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे नमूद केले आहे. तरी सोमवार दि.5 डिसेंबर 2022 रोजी आयोजित लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जागतिक एड्स दिनानिमित्त 1 ते 31 डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन यावर्षीची थिम "आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरीता" *1 डिसेंबरला सामान्य रुग्णालय, जालना येथून सकाळी 9 वाजता रॅलीचे आयोजन

 


 

            जालना दि. 29 (जिमाका) :-  जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर  रोजी साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही/ एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून या निमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग हा सृजनशील असल्याने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन त्यांच्यात जागृती आणता येईल  यासाठी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जालना जिल्ह्यात युवा पिढीमध्ये एड्स विरोधी अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यात दि.1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी एड्स दिनानिमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा,  असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

या वर्षीची थिम  "आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता" अशी असून मोफत तपासणी व मोफत उपचार यावर जास्त लक्ष केंद्रीत करुन 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अतिजोखमीचे गट, स्थलांतरीत कामगारांच्या रहिवाशी तसेच कामाच्या ठिकाणी, मुख्य चौक, बाजार, गर्दीचे इत्यादी ठिकाणी व्यापक प्रमाणात जनजागृती करुन मोहिम अधिक प्रभावी करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना एचआयव्ही तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे. जे एआरटी औषधोपचारांपासून दुरावले आहेत, उपचारात खंड पडला आहे अशा सर्वांना पुन्हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाशी जोडावे इत्यादी उदिद्ष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक व सरकारी पातळीवर जबाबदारी घेऊन व जागरुक राहून सातत्याने  जागतिक एड्स दिनानिमित्त येणारे उपक्रम हे मुख्यत: जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या एचआयव्ही संसर्ग  प्रभावित भागात व गटात तसेच जिल्ह्याच्या रिस्क प्रोफाईलनुसार राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यांतील विविध खाजगी संस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी अथक प्रयत्न करुन विविध स्थानिक तथा खाजगी संस्थांच्या आर्थिक सहाय्यातुन एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती उपक्रमाचा सकारात्मक उद्देशाचे फलित, मुख्यत: अतिजोखमीच्या गटात पोहचून त्यांची तपासणी करुन एचआयव्ही, एड्स पॉझिटीव्ह रुग्ण शोधणे हे आहे.

            हा दृष्टिकोन ठेऊन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाकडुन जागतिक एड्स दिना निमित्त जिल्हाभरात दि. 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात  आले आहे. यात दि. 1 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून तसेच अंबड उप जिल्हा रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालयातूनही सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात येणार असून याच दिवशी सामान्य रुग्णालयाकडून एचआयव्ही/एड्सबाबत कलंक व भेदभाव मिटविणे याबाबत पथनाट्य स्पर्धा घेण्यात येईल. दि.1 ते 31 डिसेंबरपर्यंत तालुकास्तरावर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात एचआयव्ही/एड्सबाबत कलंक व भेदभाव मिटवून समानता आणणे या विषयावर चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात येतील. तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स विषयी मुलभूत माहिती, एचआयव्ही प्रतिबंध, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी आदि विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजनही करण्यात येणार आहे. चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये रेड रिबन क्लबच्या सदस्यासह जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयांकडून करण्यात आले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*- 

Wednesday 23 November 2022

अंमली पदार्थांविषयी माहिती जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला तात्काळ द्यावी - जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे


 


जालना, दि. 23 (जिमाका) :- अंमली पदार्थासंबंधीची विक्री, साठवणूक अथवा वाहतुकीबाबतचे कृत्य जिल्ह्यात कुठे होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळचे पोलिस स्टेशन, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष किंवा डायल 112 वरती ही माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे. अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन करताना ते बोलत होते. 

डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्हयात अंमली पदार्थाच्या वापरास प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून जर कुणी अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा वाहतुक करताना आढळल्यास  जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून  विविध उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थांचे अजिबात सेवन करु नये, याच्या सेवनाने आपल्या शरीरावरती अत्यंत घातक  परिणाम होवून यातून आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.  त्यामुळे अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीस समजावून त्याची मानसिकता बदलण्यावर भर द्यावा. तसेच अंमली पदार्थाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ  पोलिस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी  केले.

-----

 

26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 23 (जिमाका) :- भारतीय संविधानाविषयी जनतेमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन'  म्हणून साजरा  करण्यात येत असतो. तरी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत,  प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत त्या दिवशी 'संविधान यात्रा' काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची उद्देशिका, मुलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या आदी संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स व पोस्टर्स दाखवण्यात येतील.  शाळा, महाविद्यालयामध्ये निबंध, भित्तीपत्रक, सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तर शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करावे. उत्‍सवांचा एक महत्वाचा भाग म्हणजे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन आणि त्याची विचारधारा टिकवून ठेवण्याचा आपल्या वचनबध्दतेची पुष्टी करणे. राज्य सरकारची सर्व कार्यालये, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांनी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन आयोजित करावे. संविधानीक मुल्ये आणि भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांवर चर्चा, वेबिनारसह इतर कार्यक्रम   देखील आयोजित करावेत. संविधान दिन साजरा करण्यात येवून कार्यक्रमाचा सचित्र अहवाल सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना या कार्यालयास पाठविण्यात यावा. अशा सुचनाही जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या आहेत.

-*-*-*-*-

ग्रंथोत्सवात वाचकप्रेमींसाठी विविध कार्यक्रमांची मेजवाणी - दि. 25 व 26 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सव - परिसंवाद, अनुभवकथन, जागर कवितेचा, प्रगट मुलाखत, कवि संमेलनाचे आयोजन

 


 

जालना, दि. 23 (जिमाका) :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी जालन्यातील टॉऊन हॉल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे  दोन दिवसीय  ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथ दिंडी, परिसंवाद, अनुभवकथन, जागर कवितेचा, प्रगट मुलाखत, कवि संमेलन, आदी कार्यक्रम होणार आहेत. सोबतच कार्यक्रमस्थळी सदर दोन्ही दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6  या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर दोन्ही दिवस वाचकप्रेमींसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी राहणार आहे.  

दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवार, दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली तर सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व खासदार संजय जाधव, आमदार सतिश चव्हाण, आमदार ‍विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार‍ राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर  यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात  प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लहुजी कानडे मार्गदर्शन करणार आहेत. तर  सूत्रसंचालन प्रा. प्रदीप देशमुख हे करतील.

तत्पुर्वी सकाळी 9.30 वा. ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी विनीत साहनी, संगीताताई गोरंट्याल, मंगला धुपे, सुनिल हुसे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चमन येथील   महात्मा गांधीच्या पुतळयापासून काढण्यात येणार आहे.  

दि. 25 नोव्हेंबर  रोजी दुपारी 1 ते 2 या कालावधीत  ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशासमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे   अध्यक्ष म्हणून देविदास फुलारी तर  वक्ते म्हणून प्रा. बी. वाय. कुलकर्णी, मधुकर जोशी, डॉ. मधूकर गरड, प्रा.शशिकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.  तर सूत्रसंचालन प्रा.रंगनाथ खेडेकर करणार आहेत.

 दुपारी 2.30 ते 3.30 या कालावधीत ‘ग्रंथाने मला काय दिले’ हे या विषयावरील अनुभवकथन होणार आहेत. सुनिल हुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात   डॉ. राजशेखर बालेकर, अण्णासाहेब खंदारे, संतोष धारे, डी.बी.देशपांडे यांचा सहभाग राहणार आहे.  तर सूत्रसंचालन शाम शेलगांवकर करणार आहेत.

दुपारी 3.30 ते 5 या कालावधीत ‘जागर कवितेचा’  हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची  संकल्पना सतीश लिंगडे यांची असून दिनेश सन्यांसी, सुमित शर्मा, अंजली काजळकर,  प्रतिभा दहिवाळ शहाणे, रेखा चव्हाण, ओंकार बिनीवाले हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. निवेदक म्हणून  प्रा.रविंद्र मगर हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत चित्रकार श्रीधर अंभोरे यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. प्रा. डॉ. सतीश बडवे व रविंद्र सातपुते हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.  सूत्रसंचालन विनोद जैतमहाल करणार आहेत. तर  दुपारी 12 ते 1.30 या कालावधीत भारतीय संविधान  व आपण : काल, आज आणि उद्या या विषयावर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात  राजेश राऊत, प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे, एस.एन.कुलकर्णी, अरुण प्रधान हे सहभागी होणार आहेत.  सूत्रसंचालन राजीव हजारे करणार आहेत.

दुपारी 2 ते 4 या कालावधीत बश्वराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. निवेदक म्हणून राज रणधीर व सुहास पोतदार हे असणार आहेत.  या कविसंमेलनात शिवाजी कायन्दे, राम गायकवाड, सत्यशिला तौर, प्रणिता लवटे, श्रीकांत गायकवाड, लक्ष्मीकांत दाभाडकर, बाबू श्रीरामे, रेखा बैजल, ज्योती धर्माधिकारी, रमाकांत कुलकर्णी, कैलास भाले, सदाशिव कमळकर, डॉ.एकनाथ शिंदे, कविता नरवडे, सत्यभूषण अवस्थी, भिमराव सपकाळ, राजाराम जाधव, सुहास सदावर्ते, प्रभाकर शेळके, गणेश खरात, रेखा गतखने, जिजा वाघ, कैलास कोळेकर, मनोहर गाढवे, श्रीमंत ढवळे आणि कृष्णा कदम यांचा सहभाग राहणार आहे.

ग्रंथोत्सव समारोप कार्यक्रम दुपारी 4 वाजता अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली तर निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले,  उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील सर्व वाचनप्रेमींसह नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Monday 21 November 2022

अंमली पदार्थासंबंधीची माहिती नागरिकांनी पोलिस विभागाला तात्काळ द्यावी -- जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

 


   

जालना, दि. 21 (जिमाका) :- अंमली पदार्थाच्या सेवनाने पिढ्यानपिढ्या भरुन न येणारे नुकसान होत असते.  एखादा व्यक्ती अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबावर याचा विपरीत परिणाम होत असतो. परिणामी तो व्यक्ती आपल्या शरीरासह आर्थिक व सामाजिक प्रतिभा कालांतराने लोप पावतो. अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी  विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक अथवा साठवणूक होत असल्याचे आपल्या निदर्शनास येताच क्षणी ती माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

         अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात  पार पडली, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त  श्रीमती वर्षा महाजन, पोलिस उपअधिक्षक बी.एन.राजगुरु, आय.एम.बहुरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले, पोलिस निरीक्षक श्री.सय्यद, आरोग्य विभागाचे डॉ.गायके, रेल्वे, पोस्ट विभागासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी  श्री. राठोड म्हणाले की, अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देण्यासाठी शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावेत आणि या कार्यक्रमात नशेच्या आहारी जाणार नाही याबाबतची प्रतिज्ञा सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांस प्राधान्याने देण्यात यावी.   जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास पोलिस विभागाने वेळोवेळी कठोर कारवाई करुन अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

-*-*-*-*-*-*-

भूमि अभिलेख विभागातील सरळसेवा भरतीच्या परिक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करण्याचे उमेदवारांना आवाहन

 


जालना, दि. 21 (जिमाका) :-  भूमि अभिलेख विभागातील गट-क पदसमुह 4 भूकरमापक तथा लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दिनाक 9 डिसेंबर 2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार दि. 9 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यानंतर सदर अर्जदारांना विभागाकडून दि. 28 फेब्रुवारी ते 13 मार्च 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तरी अर्जाबाबतची सर्व पुर्तता करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दि. 28 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जालना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डी.एल.घोडके यांनी केले आहे.

         छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट-क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परिक्षा दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परिक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमुद परिक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday 18 November 2022

महिला लोकशाही दिनाचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन

 

 दि. 18 (जिमाका) :-  महिला व बाल विकास विभागाच्यावतीने समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यात येते त्यानुसार जिल्हास्तरावर  दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाख करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावी असे आवाहन  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाहीदिन यांनी केले आहे.

 अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

    निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

     महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-*-

नळ पाणी पुरवठा योजनांचा 19 नोव्हेंबर रोजी उद्घाटन सोहळा

 


                जालना दि. 18 (जिमाका) :-  जल जीवन मिशन, जिल्हा परिषद, जालना यांच्या अंतर्गत जालना  जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचा ई- उद्घाटन सोहळा दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा पोलीस स्पोर्टस् ग्राऊंड, (पोलिस मुख्यालय परेडच्या समोर), जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाजुला, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

नळ पाणीपुरवठा योजनांचे ई - उद्घाटन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे  यांच्या हस्ते व राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण  तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतिष चव्हाण, विक्रम काळे, राजेश राठोड, राजेश टोपे,  बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत अन्नधान्याचे वाटप


जालना दि. 18 (जिमाका) :-   प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत माहे डिसेंबर 2022 साठी नियतनाप्रमाणे पात्र लाभार्थ्यांसाठी तांदळाचे व गव्हाचे नियतन देण्यात येत आहे तहसिलदार यांनी प्रति लाभार्थी योजनेचे उपलब्ध साठ्यानुसार वितरण करावे.  अशी सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केली आहे. विवरण खालीलप्रमाणे.

     जालना  तालुका - 3 लाख 6 हजार 843 लाभार्थ्यांसाठी  6 हजार 862 क्विंटल तांदुळ ग्रामीणसाठी  5 हजार 412 क्विंटल तांदुळ व 1 हजार 353 क्विंटल गहु शहरासाठी. जालना टी. एफ. (बदनापुरसाठी)  - 1 लाख 14 हजार 144 लाभार्थ्यांसाठी 4 हजार 49 क्विंटल तांदुळ  व 1 हजार 17 क्विंटल गहु ग्रामीणसाठी,351  क्विंटल तांदुळ व 88 क्विंटल गहु शहरासाठी. भोकरदन तालुक्यासाठी -2 लाख 23 हजार 909 लाभार्थ्यांसाठी 8 हजार 222 क्विंटल तांदुळ व 2 हजार 53  क्विंटल  गहु ग्रामीणसाठी,673 क्विंटल तांदुळ व 168 क्विंटल गहु शहरासाठी. जाफ्राबाद तालुक्यासाठी -1 लाख 20 हजार 923 लाभार्थ्यांसाठी 4 हजार 282 क्विंटल तांदुळ ग्रामीणसाठी, 555 क्विंटल तांदुळ व 139 क्विंटल गहु  शहरासाठी. परतुर तालुक्यासाठी -1 लाख 21 हजार 861 लाभार्थ्यांसाठी  3 हजार 600 क्विंटल तांदुळ व 896 क्विंटल गहु ग्रामीणसाठी, 755 क्विंटल तांदुळ व 190 क्विंटल गहु शहरासाठी. मंठा तालुक्यासाठी- 1 लाख 23 हजार 778 लाभार्थ्यांसाठी 4 हजार 390 क्विंटल तांदुळ ग्रामीणसाठी, 561 क्विंटल तांदुळ व 140 क्विंटल गहु शहरासाठी. अंबड तालुक्यासाठी -1 लाख 80 हजार 983 लाभार्थ्यांसाठी 6 हजार 500 क्विंटल तांदुळ ग्रामीणसाठी  व 720 क्विंटल तांदुळ व 180 क्विंटल गहु शहरासाठी. घनसावंगी तालुक्यासाठी - 1 लाख 56 हजार 252 लाभार्थ्यांसाठी 6 हजार 71 क्विंटल तांदुळ व 1 हजार 518 क्विंटल गहु ग्रामीणसाठी  व 179 क्विंटल तांदुळ व 45 क्विंटल गहु शहरासाठी. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-