Saturday 6 January 2018

एस.टी. महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या
राज्य शासनाच्या माध्यमातुन सोडविणार  - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
            जालना, दि.6 -  राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत जनतेला एस.टी. महामंडळाच्या माध्यमातुन सेवा देण्यात येते. या महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्या राज्य शासनाच्या माध्यमातुन सोडविण्यास प्राधान्‍य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
            येथील विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना गणवेष वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री खोतकर बोलत होते.
            व्यासपीठावर भास्कर आंबेकर, बाला परदेशी, विभाग नियंत्रक प्रशांत भुसारे आदींची उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, एस.टी. महामंडळाच्या माध्यमातुन समाजातील प्रत्येक गोरगरीबांसह समाजातील प्रत्येक नागरिकाला सेवा देण्याचे काम करण्यात येते.  आजच्या स्पर्धेच्या युगात एस.टी. महामंडळाची विश्वासार्हता आजची कायम आहे. असे असले तरी बदलत्या युगाप्रमाणे महामंडळाला बदल करावा लागेल. आजच्या महागाईच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागत आहे.   महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी मंडळातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने संकल्प करण्याची गरज असुन हे महामंडळ माझे आहे या भावनेतुन काम केल्यास महामंडळाच्या उत्पन्नात भर पडून त्याचा मोबदला अधिक चांगल्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.  एस.टी. महामंडळात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या लक्ष देऊन त्या सोडविण्यावर भर देणार असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग नियंत्रक प्रशांत भुसारे यांनी सांगितले की, बदलत्या काळाप्रमाणे प्रवाशांना अधिक चांगल्या प्रमाणात सेवा देण्यासाठी एस.टी. महामंडळात अनेक बदल करण्यात येत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना नवीन गणवेषाचे वाटप करण्यात येत आहे.  जालना महामंडळात 35 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असतानासुद्धा अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन दररोज 80 ते 90 हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमास पदाधिकारी  तसेच एस.टी. महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
पत्रकारांनी वाईटप्रवृत्तीबरोबरच सकारात्मक लिखाणाच्या माध्यमातुन
समाजाला जागृत करावे – पालकमंत्री बबनराव लोणीकर
            जालना, दि. 6 – बाळशास्त्री जांभेकरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्ध आपल्या दर्पण या वृत्तपत्रामधून प्रखर असे लिखाण करुन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनतेमध्ये एक चळवळ निर्माण केली होती. पत्रकारांनी समाजामधील वाईट प्रवृत्तीबरोबरच सकारात्मक गोष्टीबद्दल लिखाण करुन समाजजागृती करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.  
            येथील मातोश्री लॉन्स येथे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, ॲड विलास खरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, रामेश्वर भांदरगे, सुनिल आर्दड, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हाफीज, ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद लुलेकर, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, बाबुजी तिवारी, ज्ञानदेव पायगव्हाणे, भारत धपाटे, अविनाश कव्हळे, फकीरा देशमुख,ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुराव व्यवहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्र चालविणे अत्यंत जिकीरीचे बनले असून पत्रकार हे निस्वार्थपणे समाजासाठी लढत असतात.  अशा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आपण दर्पण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करुन पत्रकारांचा सन्मान करत आहोत.    देशाच्या स्वातंत्र्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनीसुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातुन समाजाचे प्रबोधन केले. आजच्या पत्रकारांनी समाजातील वाईट प्रवृत्तीबद्दल लिखाणाबरोबरच समाजातील चांगल्या गोष्टीही समाजासमोर मांडून त्यांना जागृत करावे.  केंद्र तसेच राज्य शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
 या योजना सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठीही पत्रकारांनी आपल्या लेखणीचा उपयोग प्रामाणिकपणे करावा, असेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात भरीव अशी कामगिरी करण्यात आली असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, स्वच्छता विभागामार्फत राज्यात 52 लाख शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे.  मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासुन राज्यातील 15 जिल्हे, 204 तालुके, 22 हजार 600 ग्रामपंचायती व 32 हजार गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत.  महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशामध्ये यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. शासनामार्फत नागरिकांना शौचालयाच्या उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या  4 हजार रुपयांच्या अनुदानात वाढ करुन ते 12 हजार रुपये एवढे करण्यात आले आहे.  नागरिकांना देण्यात आलेल्या शौचालयाचा वापर प्रत्येकाना करावा व स्वच्छ व सुंदर महाराष्ट्र घडविण्यास हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात या राज्याच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातुन शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  या योजनेचे 45 टक्के काम पुर्ण झाले असुन येणाऱ्या काळात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला, उद्योगाला व जनतेला एकत्रितरित्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत आहे.  या योजनेचा डीपीआर करण्यासाठी शासनाने 15 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला असुन जागतिक स्तरावरील संस्थेमार्फत या कामाचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            याप्रसंगी माजी आमदार अरविंद चव्हाण, ॲड विलास खरात, रामेश्वर भांदरगे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हाफीज, ज्येष्ठ साहित्यिक          श्री लुलेकर, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, बाबुजी तिवारी, ज्ञानदेव पायगव्हाणे, भारत धपाटे आदीनींही आपले मनोगत व्यक्त केले.

            या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातुन उपस्थित राहिलेल्या पत्रकारांचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध वृत्तपत्राचे संपादक, कार्यकारी संपादक, जिल्हा प्रतिनिधी, तालुका वार्ताहर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे स्ट्रिंजर, छायाचित्रकार तसेच तालुका व ग्रामीण भागातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.