Sunday 28 January 2024

सर्वेक्षणातून अचूक व प्रमाणबध्द माहिती वेळेत उपलब्ध होण्यासाठी कामास गती द्यावी

 मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने  जमीन अधिग्रहण व सर्वेक्षणाचा आढावा संपन्न








सर्वेक्षणातून अचूक व प्रमाणबध्द माहिती वेळेत

उपलब्ध होण्यासाठी कामास गती द्यावी

                                                                        - राज्य मागासवर्ग आयोग सदस्य डॉ. गोविंद काळे

 

जालना, दि. 28 (जिमाका) :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची बिनचूक माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर यावी यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात घरोघरी भेट देवून प्रगणकाद्वारे आयोगाकडून निर्माण करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती संकलीत केली जात आहे.  तरी सर्वेक्षणातून अचूक व प्रमाणबध्द माहिती वेळेत उपलब्ध होण्यासाठी कामास गती द्यावी, अशी सूचना  राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसुल विभागातील जमीन अधिग्रहण व सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी सुचिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी संगिता सानप, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले, उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची  प्रमुख     उपस्थिती होती.

डॉ. काळे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक हे एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलीत करण्यासाठी सर्वेक्षण करीत आहेत.  सर्व्हेक्षण करताना येणाऱ्या त्रुटी गोखले इन्स्टीट्युटशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती देऊन तात्काळ दूर कराव्यात.  सर्वेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. सर्वेक्षण करताना कुटुंबप्रमुखाशी प्रत्यक्ष भेटून 154 प्रश्न व त्यांच्या उपप्रश्नांची उत्तरे प्रगणकाने अचूकपणे भरुन घ्यावीत.  अत्यंत कमी कालावधीत होणारे हे सर्वेक्षण  देशापुढे एक आदर्श मापदंड ठरेल, यात शंका नाही. असेही ते म्हणाले.  

मराठा समाजाला आरक्षणाची  जी मागणी आहे, त्यासाठी दुय्यम डेटा आवश्यक आहे. पुर्वी मराठा समाज हा सक्षम होता. आज पूर्वीची स्थिती नाही. आज तो समाज मागास होताना दिसत आहे. त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. पूर्वी त्यांच्याकडे असलेल्या जमिनी सिलींगमध्ये गेल्या. विविध जमीन अधिग्रहण कायद्यामुळे, शासनाच्या विविध प्रकल्प, सिंचन प्रकल्प, रस्ते विकास यासह विविध विकास कामांसाठी त्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. त्यामुळे ही माहिती देखील तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, असेही डॉ.काळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने स्वत: मास्टर्स ट्रेनर होवून राज्य मागासवर्ग आयोगाचे काम सोपे केले व आयोगाला पाठबळ दिले याबाबत कौतूक करत डॉ. काळे यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले.  

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात जलदगतीने सर्वेक्षण करण्यात येत असून अधिकारी यांच्या देखरेखीखाली हे काम अतिशय तत्परतेने सुरू आहे.

 

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती देताना जिल्हास्तरीय विशेष कक्ष, जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी नोंदीचा तपशिल, कुणबी नोंदीची यादी चावडीवर प्रसिध्द केल्याची कार्यवाही, जिल्ह्यात आजपर्यंत निर्गमित करण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे, मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त नोडल अधिकारी, खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची अंदाजित संख्या, जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणक, पर्यवेक्षक यांची 26 जानेवारी अखेरपर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती तसेच जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षण करत असतांना येणाऱ्या अडचणींची माहितीही त्यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

 

-*-*-*-*-

 

Friday 26 January 2024

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबध्द - पालकमंत्री अतुल सावे

 













       भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

 

जालना, दि. 26 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरीता तसेच जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्री. सावे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा मीना,  जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदींसह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, दि. 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय.

जालना जिल्हा विकाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, अनेक योजनांच्‍या  यशस्‍वी अंमलबजावणीमुळे  जिल्हा सतत ग्रेसर राहिला आहे. जिल्हयातून जाणारा समृध्दी महामार्ग, रेल्वेमार्ग, पीट लाईन, नुकतीच मुंबईसाठी सुरु करण्यात आलेली वंदे भारत रेल्वे, आयसीटी कॉलेज, ड्रायपोर्ट यामुळे जालना जिल्हा वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाईचे सावट असले तरी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन सदैव कटीबध्द आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम – 2023  मध्ये चार लाख 18 हजार शेतकऱ्यांना रुपये  152 कोटी अग्रीम वितरीत करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत     8 हजार 856 शेतकऱ्यांना 3 कोटी  59 लक्ष रक्कम वितरीत करण्यात आली आहे. पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार-2022-23 मध्ये 24 हजार शेतकऱ्यांना रुपये 85 कोटी नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. तसेच एक रुपयामध्ये सर्व समावेशक पिकविमा योजना रब्बी -2023 मध्ये जिल्ह्यात सहा लक्ष 10 हजार 884 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरी व इतर लाभाकरीता या वर्षासाठी  रुपये 15 कोटी मंजूर करण्यात आले असून  362 लाभार्थ्यांच्या विहिरीचे कामे सुरु झाली आहेत. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत रुपये 45 लक्ष मंजूर करण्यात आले असून 8 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राज्य सरकार निश्चितपणे करेल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिले.  

पालकमंत्री पुढे म्हणाले की, स्टील व सीडस उद्योगानेसुध्दा आपला जिल्हा ओळखला जातो. यापुढे जाऊन सिल्क अर्थात रेशीम शेती व त्यावरील प्रक्रिया उद्योगाने जिल्हयाची नवीन ओळख  निर्माण होत आहे. चालू वर्षात नवीन तुती लागवड करण्यासाठी जिल्ह्याला 350 एकर लक्षांक देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन हजार 46 एकरकरीता नोंदणी झाल्याने जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटीक रिलींग मशीनचीही उभारणी करण्यात आली असून याव्दारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाचे रेशीम सुताची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला असून  या ठिकाणी पैठणी साडीकरीता आवश्यक उच्च दर्जाचे सूत तयार होत आहे.  रेशीम सूत उत्पादनाची पुढील प्रक्रीया जसे हातमागावर कापड बनविणेचे काम लवकरच जालना येथे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे रेशीम कोषांवर सर्व प्रक्रिया जिल्ह्यातच होऊन जालना सिल्क ब्रॅण्डचा रेशीम कपडा जालना येथेच तयार होईल.

छोट्या व्यवसायिकांना लघु व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडून पीएम स्वनिधी कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात उद्दिष्टपूर्तीमध्ये जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.  जिल्ह्यात 11 हजार 53 छोट्या व्यावसायिकांना सुमारे 12 कोटी 11 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने अंतर्गत जिल्हयातील मनपा, नगर पालिका व ग्रामपंचायत स्तरावर  एकूण सात हजार 852 कारागीरांची नोंदणी झाली आहे. याबाबत लवकरच प्रक्रिया पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीन हजार 30 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 31 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. तर सारथी संस्थेमार्फत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेतंर्गत शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी आर्थिक लाभ देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात चार लाख 72 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेने सण उत्साहात साजरे करावेत यासाठी गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त जिल्हयातील 3 लाख 44 हजार  शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.  तसेच  श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा  व शिवजंयतीनिमित्त सध्या आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन नेहमीच काळजी घेत आले आहे. यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सात हजार 720 लाभार्थ्यांचे आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दोन हजार 276 लाभार्थ्यांचे घरकुलसाठीचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.  तर मोदी आवास घरकुल योजना सन 2023-24 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या चार हजार 634 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हयातील एकूण 44 गावांमध्ये तीन हजार 397 कामांसाठी रुपये 77 कोटींच्या आराखड्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मान्यता मिळाली आहे. तर एक हजार 241 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 783 कामे पूर्ण झालेली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत मागील वर्षात पंधरा जलसाठ्यातून एक लक्ष 76 हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ  239 शेतकऱ्यांच्या शेतात टाकून जमीन सुपीक करण्यात आली आहे. चालू वर्षात जास्तीतजास्त जलसाठे गाळमुक्त करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

            भाषणानंतर  पालकमंत्री यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिकांची पालकमंत्री यांनी भेट घेतली.  महारेशीम अभियान-2024 अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाच्या अटल भूजल समृध्द ग्रामस्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायत अंबा, ता. परतूर, बोररांजणी, ता. घनसावंगी व हातडी, ता. घनसावंगी ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे  श्री गणपती नेत्रालय आणि महिला रुग्णालय, जालना यांच्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच मतदार नोंदणीत उत्तम काम केल्याबद्दल विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

            प्रारंभी ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस,  होमगार्ड, सैनिक शाळेचे विद्यार्थी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सलामी देण्यात आली. विविध विभागांनी चित्ररथाव्दारे योजनांचे सादरीकरण केले. शेवटी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्य सादर केले.  

 

                                                                        ***

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण

 




 

29 बोलेरो व 15 मोटारसायकल पोलीस दलाकडे सुपूर्द

 

जालना, दि. 26 (जिमाका) :- जिल्हा नियोजन समिती  व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या 29 बोलेरो  आणि 15 मोटारसायकल वाहनांचे पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत जालना पोलीस दलासाठी राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वाहनांच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा मीना,  जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे उपस्थित होते.

 जालना पोलीस दलाला यापूर्वी जिल्हा नियोजन समिती  व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्यावतीने 14 बोलेरो आणि 20 मोटारसायकल देण्यात आल्या होत्या. एकूण 78 वाहने चालू वर्षात जालना पोलीस दलाला देण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला वाहन मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.  

***

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 

 



 

जालना, दि. 26 (जिमाका) :- प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                           -*-*-*-*-

Thursday 11 January 2024

राज्य क्रीडा दिनानिमित्त 15 व 16 जानेवारीला विविध कार्यक्रम

 


 

जालना दि. 11 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या योजनेद्वारे संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्म़ दिवस 12 जानेवारी हा युवादिन म्ह़णून व त्यानिमित्ताने 12 ते 19 जानेवारी हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. देशाची सर्वांत मोठी शक्त़ी ही युवाशक्ती ही युवाशक्ती असून युवकांमध्ये असलेल्या सुप्त़ गुणांना विकसित करण्यासाठी व 15 ते 35 वयोगटातील युवकासाठी एक संदेश या माध्य़मातून देण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे करण्यात येतो.

दरवर्षी प्रमाणे दिनांक 12 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जालना मार्फत विविध शाळा व महाविद्यालये यांच्या संयुक्त़ विद्यमाने युवादिन युवा सप्ताहाचे आयोजन खालील कार्यक्रम पत्रिकेनुसार करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.सदर कार्यक्रमात त्यात आपलया शाळेचे /महाविद्यालयाने / संस्था यांनी मोठया संख्येने सहभागी व्हायचे आहे.अधिक माहीतीसाठी यूवा सप्ताह कार्यक्रम प्रमुख क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशीयांना 9022951924 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

 जिल्हाक्रीडाअधिकारीकार्यालय,जालना,नेहरूयुवाकेंद्रजालना व जालनापिथीयनकौन्सिलयांच्यासंयुक्त़ विद्यमाने

आयेाजित

 

युवादिनयुवासप्ताहसाजराकरण्यासाठीकार्यक्रमाचातपशिलसन 2023-2024

अ.क्र.

दिनांक व वेळ

कार्यक्रमाचेतपशिल

कार्यक्रमाचे ठिकाण

1

12/01/2024

सकाळी 10.00 वाजता

स्वामी विवेकानंद जन्म़दिन

युवादिन युवा सप्ताहाचे उद्घाटनकार्यक्रम, स्वामी विवेकानंद यांचे तत्व़ज्ञान व शिकवण, कार्य प्रेरणादायी विचारावर व्याख्यान

शांतीनिकेतन विद्यालय,संभाजीनगर,जालना

गाढवे 9421073719

2

13/01/2024

सकाळी 10.00 वाजता

सांस्कृतिक कार्यक्रम

सामाजिक व राष्ट्र्रीयगितांचे विद्यार्थ्यांचे गायन स्पर्धा

कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय,योगेश्वरीकॉलनी ,जुना जालना, श्री.इंगोले 9600665100

3

14/01/2024

सकाळी 10.00 वाजता

युवाशांती दिवस

देशात शांतता राखणे यात युवांची कर्तव्य़ या विषयावर वादविवाद स्पर्धा

आदर्श विद्यालय,सायगांव डोंगरगांव,ता.बदनापूर

श्री.मगर8975258123

4

15/01/2024

सकाळी 10.00 वाजता

समाजसेवा दिवस

युवक व युवती यांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबविणे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन,पिंपरखेडागरड,ता.परतुर

श्री.शिरसाठ 9421327121

6

16/01/2024

सकाळी 10.00 वाजता

सहभागदिन

युवक व युवतीसाठी सांस्कृतीक कार्यक्रम

जि.प.प्रशाला भोकरदन

श्री.जंजाळ 9309185507

7

17/01/2024

सकाळी 10.00 वाजता

शारीरिकसदृढतादिवस

विविधखेळांच्यास्पर्धा

फुटबॉल

जिल्हा क्रीडा संकुल,जालना

श्री.मोहमंद शेख 8788360313

खो-खेा

 

कै.नानासाहेब पाटील विद्यालय,नजीकपांगरी,ता.बदनापूरश्री.संतोष वाबळे 7588169493

व्हॉलीबॉल

अंबड काजी कल्ब,अंबड श्री.काझी 9922369858

मैदानी

क्रीडा प्रबोधिनी ,जालनाश्री.खरात 7972899348

फेंटबॉल

जे.ई.एस.कॉलेज ,जालनाश्री.शेखचाँद 9822456366

योगा

जे.ई.एस.कॉलेज,जालनाश्री.वैभवआर्या 9373702137

8

18/01/2024

सकाळी 10.00 वाजता

कौशल्यदिवस

युवकयुवतीकरीता वकृत्व़ स्प़र्धा

मत्स्योदरी कॉलेज,अंबड श्री.तौर 9421933003

9

19/01/2024

सकाळी 10.00 वाजता

समारोपदिवस

युवा सप्ताहाचा समारोप कार्यक्रम

जिल्हा क्रीडासंकुल,जालनाडॉ.रेखापरदेशी 9022951924

 

 

(अरविंदविद्यागर)

जिल्हाक्रीडाअधिकारी

जालना

 

 

Wednesday 10 January 2024

राज्यस्तरीय बैठकः जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)-2024-25 कृषी, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रातील विकास कामांवर प्राधान्याने निधी खर्च करावा -- उपमुख्यमंत्री अजित पवार

 





जालना, दि. 10 (जिमाका) --- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- 2024- 25 अंतर्गत जालना जिल्ह्याला 298 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून पालकमंत्री अतुल सावे व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन यापेक्षा जास्त निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांनी दिली. तसेच जालना जिल्हयात विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. विशेषत: कृषी, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील विकास कामांवर प्राधान्याने निधी खर्च करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

जिल्हा वार्षिक योजनेची सन 2024-25 (सर्वसाधारण) राज्यस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबई येथील दालनात आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, परिवहन विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव पराग जैन उपस्थित होते.  तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार बबनराव लोणीकर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी उपस्थित होते.

 

जालना जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन 2024-25 करीता 298 कोटी रुपये नियतव्यय मर्यादा ठरवून दिलेली होती. तर  450 कोटी रुपयांचा प्रस्तावित वाढीव आराखडा सादर करण्यात आला.

 

श्री. पवार म्हणाले की, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीची मागणी विचारात घेता सर्वसाधारण योजनेत निश्चितपणे निधी वाढून दिला जाईल, मात्र तो वेळेत विकास कामांवर खर्च करण्यात यावा. त्या-त्या विभागाच्या यंत्रणांनी दिलेल्या निधीचा योग्य कामांसाठी वापर होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्यात यावा. याशिवाय राज्य शासनासोबतच केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सुचनाही त्यांनी केली.

 

पालकमंत्री श्री. सावे यांनी जालना जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी करताना जालना शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तसेच पोलीस विभागाकरीता नवीन वाहने खरेदी, शाळा, अंगणवाडयांचे बांधकाम व दुरुस्ती, ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीसाठी निधीची मागणी केली. श्री. लोणीकर यांनी जिल्हयाला वाढीव निधी मिळावा, अशी मागणी करुन शासकीय कामांसाठी वाळू वेळेत उपलब्ध व्हावी, याकरीता वाळू डेपो तात्काळ सुरु करण्याचेही मागणी केली.

 

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2023-24 या वर्षात झालेल्या खर्चाचा आढावा सादर केला. तसेच सन 2024-25 या वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाची माहिती दिली. नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत जालना जिल्हयात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहितीही दिली. यामध्ये चला जाणूया नदीला या अभियानातंर्गत कुंडलीका सीना व जिवरेखा नदी तीरावरील गावांत संवाद यात्रेचे नियोजन करणे. घाणेवाडी तलाव गाळमुक्त करणे. कृषी प्रक्रीया उद्योगावर भर देणे. रेशीमवर आधारीत कापड निर्मितीकरीता निर्जंतुकीकरण, रंगकाम, हातमाग इत्यादी प्रक्रीया उद्योगास प्रोत्साहन देणे. नवउद्योजकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप येण्यासाठी आयटीआय, जालना येथे मॅजिक इन्क्युबेशन सेंटर स्थापन करणे. माझी कन्या माझा अभियान अंतर्गत मुलीच्या जन्माच्या सन्मानार्थ तिच्या नावाची पाटी घरावर लावणे. फाऊंडेन्शल लिटरसी अँड न्यूमर्सी अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मुलांची अभ्यासक्रमावर आधारीत स्पर्धात्मक चाचणी परिक्षा तसेच राष्ट्रपती भवन व वैज्ञानिक प्रकल्प यांना भेटीसाठी शैक्षणिक सहल आयोजित करणे याबाबत माहिती दिली.

***