Wednesday 10 January 2024

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालमहोत्सवास प्रारंभ विद्यार्थ्यांनी खेळातून आपले करियर घडवावे -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ




 


   जालना दि. 10 (जिमाका) :- सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जात असले तरीही प्रत्येकाने शालेय जीवनात विविध स्पर्धांसह खेळात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. सर्वांनी खेळणे महत्वाचे असून खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तरी शालेय विद्यार्थ्यांनी खेळाकडे केवळ खेळ म्हणून न पाहता खेळातून आपले करियर घडवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

            चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर,  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, माविंमचे जिल्हा समन्वयक श्री.कहाते आदीची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, लहानपणीचे जीवन फार सुखी असते. यामध्ये आपण विविध गोष्टी शिकत असतो व आत्मसात करत असतो. पंडित नेहरु यांनी मुले ही देवाघरची फुले असे म्हटले आहे. आजचे विद्यार्थी हे पुढे चालून भविष्यातील जबाबदार नागरिक बनतात. त्यामुळे त्यांच्यावर या वयात चांगले संस्कार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते.  पुढील उज्वल आयुष्यात आपला विद्यार्थी चांगला घडावा असे शिक्षकांना मनोमन वाटत असल्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन करावे.  महोत्सवात सामिल झाल्याची आठवण राहावी याकरिता जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून सर्व विद्यार्थ्यांना टी-शर्ट व ट्रॅकसुट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

        मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, आयुष्य ही एक स्पर्धाच आहे. प्रत्येकाला जिंकण्याची संधी नेहमी मिळत असते. चाचा नेहरु बाल महोत्सवानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेचा आनंद घेत सर्व स्पर्धेत सहभाग नोंदवावा. सध्याचे स्पर्धेचे युग असून सहभाग नोंदविणे गरजेचे झाले आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवाच्या उदघाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून 100 मीटर धावणे स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांनी केले तर आभार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी मानले. दि.10 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धां, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदिंचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थींनी, बालगृह अधिक्षक,शिक्षक, खेळाडू यांच्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment