Tuesday 9 January 2024

महासंस्कृती महोत्सवाचे पाच दिवस आयोजन

 





 

         जालना, दि. 9 (जिमाका) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध प्रांतातील कला, संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ,  तसेच स्वातंत्र्य लढयातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

            महासंस्कृती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व विभागप्रमुख उपस्थित होते.

            राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महासंस्कृती महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जाणार आहे. शासन निर्णयान्वये जालन्यात महोत्सवाचे आयोजन व सुयोग्य नियोजनासाठी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

            पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचारित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार, विविध भागातील तसेच स्थानिक  दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम, कवी संमेलन/व्याख्याने, देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सचित्र दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, जिल्हयातील ऐतिहासिक, संरक्षित स्मारके यांच्यावर आधारीत प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. लुप्त होत चाललेल्या विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरणही केले जाणार आहे.

            महासंस्कृती महोत्सवाचे आपल्या जिल्हयात यशस्वीपणे आयोजन करण्याची सूचना करताना श्री. दानवे म्हणाले की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या महोत्सवात स्थानिक कलावंतांना प्राधान्याने सहभागी करावे. आपल्या जिल्हयाची कला, संस्कृती यांचे सादरीकरण करावे. तसेच महोत्सव आयोजनाची तारीख, स्थळ याचे व्यवस्थित नियोजन करावे. सर्व विभागांनी समन्वयाने हा महोत्सव यशस्वी करावा.

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment