Monday 8 January 2024

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद मलकापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेस लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन

 







 

जालना, दि. 8 (जिमाका) :- केंद्र शासनाकडून सर्वसामान्य माणसाला केंद्रीत ठेवून अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून  या योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत येत आहेत. तरी याचा ग्रामस्थांनी  अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिरत्या एलईडी वाहनांवरील दूरदृश्यप्रणालीव्दारे विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  भोकरदन तालुक्यातील मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात श्री. दानवे बोलत होते.

 

मंचावर आमदार संतोष दानवे पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

श्री. दानवे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी अनेक नवनवीन योजना कार्यान्वित करण्यात येत असतात. आपल्या देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता आयुष्यमान कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. यातून पाच लाख रुपयांपर्यंतचे आता शासकीय व शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्त करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली असून याद्वारे दीड लाखापर्यंतची रक्कम बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना आपत्तीजनक परिस्थितीत साहाय्य मिळावे याकरिता केवळ एका रुपयात पीक विमा योजना या वर्षी पासून लागू केली आहे. तसेच  कमी वेळात पिकांवर फवारणी करता यावी यासाठी  शेतकऱ्यांना शासनाकडून ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे ड्रोन चालविण्यासाठी गावातील एका महिलेला प्रशिक्षण देण्यात येणार असून तिला नमो दीदी या नावाने संबोधले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा 2014 ला केंद्रात निवडून आल्यानंतर त्यांनी आमचे सरकार हे गरीब आणि शेतकरी यांच्यासाठी समर्पित असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्य व्यक्ती आणि युवकांच्या कल्याणासाठीही अनेक योजना राबवित आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या लोक कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या मार्गदर्शनात  श्री. दानवे यांनी किसान क्रेडिट कार्ड, किसान सन्मान योजना, उज्वला गॅस योजना,

प्रधानमंत्री घरकुल योजना,  प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र, आयुषमान भारत योजना, गरीब कल्याण योजना,  जन धन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर  आदीबाबत माहिती देऊन कल्याणकारी योजनांचा  लाभ घेण्याचे आवाहन केले.

    यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई पांडे यांनी मलकापूर येथे करण्यात आलेल्या विविध विकास कामांची, शासनाच्या लोक कल्याणकारी विविध योजनांची माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडावा यासाठी नियोजनपूर्वक आखलेल्या  योजना ग्रामस्तरावर  पोहचविणे हाच विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रथम उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी काही लाभार्थ्यांनी  आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी लाभ घेतलेल्या शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या जीवनात झालेला बदल सांगितला. कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या विविध  शासकीय योजनांच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली. तसेच ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविण्यात आले.

या ठिकाणी  प्रधानमंत्री  जनऔषधि परियोजना, कृषी, नाबार्ड, महाराष्ट्र बँक (जनधन योजना), उज्वला योजना, आधार नोंदणी/नूतनीकरण, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत  ( प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ), पशुधन विकास ( पशुधन विषयक किसान क्रेडिट कार्ड), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बचत गट आदी स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलला भेट देण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी  झाली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाची फीत कापून करण्यात आली तर समारोप  विकसित भारत संकल्प शपथ देऊन करण्यात आली.

        जिल्ह्यातील गावागावात जाऊन  केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिम दि. 26 जानेवारी, 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment