Saturday 30 July 2016

पीकविमा भरण्यास 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जालना – खरीप हंगाम 2016 साठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2016 अशी होती.  परंतू केंद्र शासनाने या पीकविमा भरण्याच्या मुदतीत वाढ केली असून 2 ऑगस्ट, 2016 पर्यंत हा पीकविमा भरता येणार असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

*******

स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

जालना – जिल्हा पुरवठा विभाग तसेच दालमील ओनर्स असोशिएशन यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा शुभारंभ राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जालना येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात करण्यात आला.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती भास्कर दानवे, बाजार समितीचे सचिव विष्णुकुमार चेचाणी, संचालक सर्वश्री अनिल सोनी, रमेश तोतला, गणेश चौघुले, तुळशीराम काळे, श्री मोटे, सुभाष बोडके, श्रीकांतराव घुले, श्री काजळकर, बाबाजी मोटे, पंडितराव भुतेकर, विष्णु पाचपुले, वसंत जगताप, भागवत बावने, सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री भारस्कर, तहसिलदार बीपीन पाटील, नायब तहसिलदार गणेश पोलास, नंदकुमार दांडगे, सतीष पंच, शांतीलाल चोरडिया, श्री भानुशाली, श्री भाईश्री आदींची उपस्थिती होती.
         यावेळी बोलताना राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की,  दाळीचे उत्पादन, मागणी आणि पुरवठा यांच्या तफावतीने मुळे तुरदाळीचे भाव वाढलेले आहेत.  आलेल्या अडचणीतून मार्ग काढून शासनाने नागरिकांना स्वस्त दरात तुरदाळ उपलब्ध करुन दिली असून सर्व रेशन दुकांनावर अंत्योदय योजना तसेच बीपीएल कार्ड धारक जनतेला ही दाळ स्वस्त दरात उपलब्ध करुन दिली जात आहे.   दालमील ओनर्स असोशिएशन यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या विक्री केंद्रावर सर्वच नागरिकांना ही दाळ 120 रुपये किलो एवढ्या माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगत राज्यातील सर्व पशुधनांचा विमा 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत उतरविण्यात येणार असून दारिद्रय रेषेखालील पशुपालकांच्या पशुधनाच्या विम्याची 70 टक्के तर इतर पशुपालकांच्या पशुधनाच्या विम्याची 50 टक्के रक्कम शासन भरणार असल्याचे सांगून या विम्यामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील एकही पशुधन विम्याच्या संरक्षणापासून वंचित राहणार नाही, याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
            शेतीला जोडधंदा म्हणून रेशमी उद्योग हा एक किफायतशीर व कमी पाण्याचा उपयोग करुन होणारा व्यवसाय आहे. राज्याच्या तुलनेत जालना जिल्ह्यात सर्वाधिक 5 हजार एकरवर तुतीची लागवड करण्यात येते.  आजघडीला रेशीम कोषांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बेंगलोर येथे जावे लागत असून रेशीम कोष खरेदी व विक्री केंद्र जालन्यामध्ये लवकरात लवकर सुरु करुन रेशीम उद्योगाला अधिक गतीने चालना देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील कापूस उद्योग तसेच मत्सव्यवसाय उद्योग वाढीस लागण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
           यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे कडधान्याचे उत्पादन अत्यंत कमी झाले आहे.  तुरदाळीचे उत्पादन भारतात सर्वाधिक होत असल्याने ही दाळ बाहेर देशातून आयात करण्यासाठीही मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत.  यंदाच्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होत असून तुरदाळीचे चांगल्या प्रमाणात उत्पादन होईल. परंतू तोपर्यंत नागरिकांनी तुरदाळीला पर्याय म्हणून मुगदाळ वापरण्याचे आवाहन करत यामुळे शेतकऱ्यांच्या मुगदाळीलासुद्धा चांगला भाव मिळेल असे सांगून दालमील ओनर्स असोशिएशन यांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्र सुरु केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
      यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती भास्कर दानवे यांचेही समयोचित भाषण झाले.       सर्वप्रथम स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.  कार्यक्रमाचे आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अनिल सोनी यांनी मानले.
            कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व पदाधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते. 


Thursday 28 July 2016

जालना जिल्ह्यात सरासरी 2.49 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 29 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 2.49 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 0.75 (428.75), बदनापूर-1.40 (431.80), भोकरदन- 8.25 (322.38),जाफ्राबाद-9.00  (311.40), परतूर-निरंक (478), मंठा- 0.50 (431.75), अंबड-निरंक (415) घनसावंगी-निरंक (386.71) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून  1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 401.23  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 58.29 टक्के एवढी आहे.

***-*** 

तंबाखु सेवनापासून तरुणांनी दूर रहावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

जालना – तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर मोठे घातक परिणाम होत असून तरुण पिढीमध्ये हे व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या पदार्थांच्या व्यसनापासून तरुणांनी दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगरेट व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 व  27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान आयोजित कर्करोग दिनाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की,   तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या व्यवसापासून दूर करण्याची गरज असल्याचे सांगून शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसराच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री तसेच सेवनाला बंदी असल्याचे बोर्ड दर्शनी भागात लावण्यात यावेत.  तसेच शाळेमध्ये प्रार्थनेच्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला मी तंबाखुचे सेवन करणार नाही अशा प्रकारची शपथ देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयातसुद्धा तंबाखु सेवनास बंदी असल्याचे बोर्ड लावण्यात येऊन शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किंवा अभ्यागत तंबाखु सेवन करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सुचनाही श्री जोंधळे यांनी यावेळी दिल्या. 
            शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक असल्याने तंबाखू सेवनामुळे होणारे आजार याची जनजागृती ग्रामीण भागात अधिक प्रमाणात करण्यात यावी.  ग्रामीण भागात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या छायाचित्रांचे बोर्ड नागरिकांना सहज दिसतील अशा भागात लावण्याच्या सुचना करत अनाधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी               श्री जोंधळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. दि.   27 जुलै  ते 3 ऑगस्ट या कालावधीत जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येत असून या कालावधीत शाळा, महाविद्यालयात मौखिक आरोग्य तसेच तंबाखुमुक्त शाळाबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. तसेच मौखिक आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी पॉवर पाँईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगरेट व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 बाबत सविस्तर अशी माहिती दिली.
            या बैठकीस विक्रीकर अधिकारी एस.एम. देशपांडे, मोहिम अधिकारी अ.गो. देशपांडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) ए.बी. देशपांडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एन. बारडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*******     

जालना जिल्ह्यात सरासरी 36.19 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 28 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 36.19 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
     जालना- 55.75 (428.00), बदनापूर-56.40 (430.40), भोकरदन- 26.50 (314.13),जाफ्राबाद-18.60  (302.40), परतूर-26.80 (478), मंठा- 50.00 (431.25), अंबड-33.86 (415) घनसावंगी-21.57 (386.71) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून  1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 398.74  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 57.93 टक्के एवढी आहे.

***-*** 

Wednesday 27 July 2016

माध्यमिक शाळांच्या घेण्यात येणा-या परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू

जालना -  जिल्हयात जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परिक्षा 18 जुलै ते 3 ऑगस्ट 2016 पर्यंत घेण्यात येणार असल्याने परीक्षाच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार हाऊ नये या करिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी जालना जिल्हयात अधिसूचित केलेलेल्या संबंधित परिक्षा केंद्राच्या परिसरात 200 मीटरच्या परिसरात परिक्षा चालु असतांना काही पालक परिक्षा व परिक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करु नये म्हणुन 144 कलम लागू केले आहे.
            या परिक्षा  केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या परिक्षा केंद्राजवळच्या 200 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी बुथ, फॅक्स,झेराक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.तसेच परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची श्क्यता असल्यने अपर जिल्हादंडाधिकारी आर.टी.इतवारे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन दि. 18 जुलै 2016 ते  3 ऑगस्ट 2016  या कालावधीत   परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू

जालना -  सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परिक्षा 2016   च्या परिक्षा  शहरातील पुढील केंद्रावर आयोजित करण्यात आल्या आहे. मत्स्योदरी विद्यालय, मोतीबागजवळ, जालना, सिटी. एम. के. गुजराती हायस्कुल, फुलब्रीकर नाटयगृहाजवळ, जालना आर.जे. बगडीया (जे.ई.एस.महाविद्यालय) दुर्गामाता रोड,जालना  या केंद्रावर दि. 31 जुलै 2016 रोजी घेण्यात येणार आहेत.
            या परिक्षा  केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या परिक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी बुथ, फॅक्स,झेराक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.तसेच परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची श्क्यता असल्यने अपर जिल्हादंडाधिकारी आर.टी.इतवारे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन दि. 31 जुलै 2016 चे सकाळी 8.00 वाजेपासून सांयकाळी 6.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करिअर गाईडन्स शिबीर संपन्न

जालना – जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स शिबीर अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नुकतेच संपन्न झाले.
            या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे तसेच रिलायबल ॲकॅडमी, औरंगाबादचे धनंजय आकात हे उपस्थित होते.
            यावेळी औरंगाबाद येथील रिलायबल ॲकॅडमीचे धनंजय आकात यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअरबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले.  यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनीही विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत असलेल्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त बी.ए. शिंदे यांनी शिबीर आयोजनामागचा उद्देश विषद केला.  कार्यक्रमाचे सुत्र संचलन तालुका समन्वयक मनिषा आतकरे यांनी केले तर आभार विशेष अधिकारी वाय.आय. गायकवाड यांनी मानले.
            कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. 
            कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******

जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन

जालना -  1 ते 3 ऑगस्ट, 2016 या कालावधीत मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग आरोग्य शिबीराचे जिल्हा रुग्णालय, जालना येथे सकाळी 10-00 ते दुपारी 1-00 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.   जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग क्रमांक 11, 12 व 13 या ठिकाणी रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून यावेळी दंत शल्यचिकित्सक, कान,नाक व घसा तज्ज्ञ उपलब्ध राहणार असून गरजुंनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक,जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

******* 

Tuesday 26 July 2016

जालना जिल्ह्यात सरासरी 14.38 मि.मी. पावसाची नोंद

जालना- जिल्ह्यात 27 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 14.38 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 10.50 (372.25), बदनापूर-8.40 (374), भोकरदन- 24.88 (287.63),जाफ्राबाद-15.60  (283.80), परतूर-15.60 (451.20), मंठा- 16.75 (381.25), अंबड-3.14 (381.14) घनसावंगी-20.14 (365.14) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून                1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 362.56  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 52.67 टक्के एवढी आहे.

***-*** 

जिल्हा उद्योग मित्र समितीची जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

जालना, दि. 1 – जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा आजारी उद्योग पुनर्वसन समिती तसेच जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगारा प्रधान्य समितीची बैठक जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
            यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, व्यवस्थापक किरण जाधव, विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री भालशंकर, एमएसएसआयडीचे श्री शिरोळे, गोपाल मानधने, पंकज लड्डा, अनिल तलरेजा, पूर्णा ॲग्रोटेक, जाफा्रबादचे विष्णू पवार, सम्यक मसाले क्लस्टरचे श्री दाभाडे, लेदर क्लस्टर, मंठाचे श्री वाघमारे यांच्यासह सबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.  तसेच एमआयडीसी परिसरातील अंतर्गत स्ट्रीट लाईटसही नादुरुस्त असल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. एमआयडीसी परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याबरोबरच स्ट्रीट लाईटही सुरळीत सुरु राहतील यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने या संदर्भात्‍ काम करण्याच्यासुचनाही श्री जोंधळे यांनी यावेळी दिल्या.
            जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन होते.  या मोसंबीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना करत हा उद्योग करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

            *******

चंदन शेती लागवडीसंदर्भात कार्यशाळा संपन्न

जालना – चंदन शेतीची लागवड कशी करावी तसेच शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे यासाठी जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था जालना येथे शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यशाळेत ज्येष्ठ चंदन तज्ज्ञ तथा हरितमित्र परिवार, पुणेचे संस्थापक महेंद्र घाघरे यांनी चंदन शेतीची लागवड कशा पद्धतीने करावी याबाबत शेतकऱ्यांना सखोल अशी माहिती दिली. 
            यावेळी वन प्रशिक्षण संस्था, जालनाचे संचालक व्ही.एम. गोडबोले यांनी शेतकऱ्यांना चंदन शेती तसेच यासंदर्भात शासनाचे असलेले कायदे व नियमांची माहिती दिली. 
            सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक शहाजीराव नारनवर यांनी वन विभागातील कायदे व नियमांना चंदन लागवड व तोंडीसंदर्भात होणारा वापर याची विस्तृतपणे माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
            या कार्यशाळेस सामाजिक वनीकरण विभागाच्या सहाय्यक संचालक पुष्पा पवार, श्री पांडे, श्रीमती तांबे, रोपवन अधिकारी मनोहर महाडिक सी.व्ही. हुल्ले, दीपक बुनगे, सुदर्शन म्हस्के, ज्ञानेश्वर खैरे, दिलीप चव्हाण, लक्ष्मण नाईकवाडे, प्रल्हाद दहिभाते आदी उपस्थित होते.

*******

जात प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या बळकटीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न

जालना, दि. 26 – जात प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या बळकटीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
            या व्याख्यानाच्या कार्यक्रमात ॲड खिल्लारे यांनी  उपस्थित अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र देतेवेळी घ्यावयाची काळजी तसेच या विषयासंदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले.
            या कार्यशाळेस सर्व उप विभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

******* 

शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जालना -  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयामध्ये बँकेची कर्ज वसुलीची प्रलंबित दावे व दावा दाखलपूर्व प्रकरणे तसेच 138 एन.आय. ॲक्टची प्रलंबित प्रकरणे व दावा दाखलपूर्व प्रकरणे यासाठी शनिवार दि. 13 ऑगस्ट, 2016 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

            सर्व संबंधितांनी या संधीचा फायदा घेऊन आपली प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेऊन ती तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव सत्यशिला तु. कटारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
                                                             *******

जालना जिल्ह्यात सरासरी 6.88 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 26 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 6.88 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 14.13 (361.76), बदनापूर-23.00 (365.60), भोकरदन- 2.13 (262.76),जाफ्राबाद-2.00  (268.20), परतूर-3.00 (435.60), मंठा- 7.25 (364.50), अंबड- निरंक (378.00) घनसावंगी-3.57 (345.00) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 348.18  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 50.58 टक्के एवढी आहे.

***-*** 

Monday 25 July 2016

जालना जिल्ह्यात सरासरी 26.59 मि.मी. पावसाची नोंद

        जालना - जिल्ह्यात 25 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 26.59 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
 जालना- 21.63 (347.53), बदनापूर-32.40 (341.60), भोकरदन- 16.75 (261.16), जाफ्राबाद-35.40 (266.70), परतूर-37.80 (432.60), मंठा- 13.00 (357.25), अंबड- 28.71 (377.98) घनसावंगी-27 (341.56) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 340.80  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 49.51 टक्के एवढी आहे.

***-*** 

Friday 22 July 2016

संत रविदास पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जालना –चर्मकार व दलित समाजाच्या उद्धारासाठी काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांनी सन 2016-17 च्या संत रविदास पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी केले आहे.
            या पुरस्कारासाठी अर्ज करणारी व्यक्ती चर्मकार व दलित समाज, सामाजिलक दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत.  सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षे काम केलेले असावे.  पुरुषांसाठी वयोमर्यादा 50 किंवा त्यापेक्षा जास्त तर स्त्रींयासाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.  हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र ह्या गोष्टींचा विचार केला जाणार नाही.  पुरस्कार मिळण्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सभासद किंवा कोणतेही पदाधिकारी पात्र असणार नाहीत. या पुरस्कारासाठी अर्ज करणारी संस्था समाजकल्याण क्षेत्रात चर्मकार व दलित समाजाच्या उन्नतीसाठी, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागरण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था पुरस्कारासाठी पात्र असतील. स्वयंसेवी संस्था, पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 व सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार पंजीबद्ध असावी. समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य 10 वर्षाहून अधिक झालेली असावी.  विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थासाठी ही अट अपवाद म्हणून शिथील करण्यात येईल.  सामाजिक संस्था ही राजकारणापासून अलिप्त असावी. 
            या पुरस्कारासाठीचे प्रस्ताव तीन प्रतीमध्ये 25 जुलै, 2016 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

*******

अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी 25 जुलै रोजी करिअर गाईडन्स शिबीराचे आयोजन

जालना – अनुसूचित जातीमधील इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाच्यावतीने दि. 25 जुलै, 2016 रोजी दुपारी 12-30 वाजता सामाजिक न्याय भवन, जालना येथे एक दिवशीय करिअर गाईडन्स शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरात विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरविषयी रिलायबल ॲकॅडमी, औरंगाबाद येथील धनंजय आकात हे मार्गदर्शन करणार आहेत. 

            जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी 26 ते 30 जुलै दरम्यान फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

जालना– क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 26 ते 30 जुलै,2016 या कालावधीत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल व शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत 15 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले, मुली तसेच शालेय फुटबॉल स्पर्धेत 14,17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींचा सहभाग असणार आहे.
            दि. 26 जुलै रोजी 15 वर्षाखालील मुलांसाठी तर 27 जुलै रोजी 17 वर्षाखालील मुला-मुलींसाठी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा, 28 जुलै रोजी 14 वर्षाखालील मुला-मुलींसाठी, 29 जुलै रोजी 17 वर्षाखालील मुला-मुलींसाठी तर 30 जुलै, 2016 रोजी 19 वर्षाखालील मुला-मुलींसाठी शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या सर्व स्पर्धा रेल्वेस्टेशन मैदान, रेल्वेस्टेशन जवळ, जालना येथे होणार असून  जिल्ह्यातील इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांचे संघ वेळापत्रकानुसार स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश अर्ज, ओळखपत्र, खेळाचे गणवेश व संघ व्यवस्थापकासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

******* 

जालना जिल्ह्यात सरासरी 1.34 मि.मी. पावसाची नोंद

जालना, दि. 21- जिल्ह्यात 21 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 1.34 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- निरंक (278.70), बदनापूर-निरंक (256.40), भोकरदन- निरंक (182.50),  जाफ्राबाद निरंक (198.10), परतूर-7.60 (361.00), मंठा- निरंक (301.00), अंबड- निरंक (325.14)                 घनसावंगी-3.14 (284.86) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 277.83  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 40.36 टक्के एवढी आहे.

***-***

Tuesday 19 July 2016

जलयुक्त शिवार अभियानामुळे पन्नास हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली पाणी पातळीत दीड मिटरने वाढ: लोकसहभागाचाही झाला फायदा

जालना - दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या जयलुक्त शिवार अभियानाचे जालना जिल्हयातील दुष्य परिणाम अशादायी आहेत. मागिल आठवडयात झालेल्या दमदार पावसामुळे जलयुक्त शिवाराअंतर्गत झालेल्या बहुतांश कामामध्ये पाणी साचले आहे. जिल्हयातील आज घडीला 49 हजार 550 हेक्टर क्षेत्र सरक्षित सिंचनाखाली आले आहे. 
जलयुक्तच्या पहिल्या टप्यात निवडलेल्या 212 गावामध्ये सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, बांधबंदिस्ती, सलग समतल चर, नदी खोलीकरण, या सारखी 3 हजार 558 कामे पूर्ण करण्यात आली असून शासकीय यंत्रणा लोकसहभागातून 55 लाख 89 हजार घनमिटर गाळ उपसा करण्यात आला असून 228 किलोमिटर नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. 
वर्ष 2016-17 मध्ये जलयुक्त शिवारअंतर्गत 186 गावे निवडलेली असून आतापर्यंत 329 कामे पूर्ण झाली असून 173 कामे प्रगती पथवार आहेत. 14 लाख 9 हजार घनमिटर गाळ उपसा करण्यात आला आहे. या कामामध्ये 49 हजार 550 टीसीएम एवढा पाणी साठा होणार आहे. या महिन्यात जिल्हयातील अनेक भागात पावसाने समाधान कारक हजेरी लावल्यामुळे जलयुक्तची कामे झालेल्या गावाच्या परिसरात कोरडया पडलेल्या विहीरींना पाणी आले आहे. त्यामुळे उन्हाळयात जिल्हयात साडे सहाशेवर वर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्यात आले होते. ती संख्या आता कमी होऊन आज रोजी 67 टँकरवर आली आहे. 
जिल्हयातील जलयुक्तची फलश्रुती
निर्माण झालेला पाणी साठा: 49,550 टीसीएम
पाणी पातळीत झालेली वाढ: दीड मिटर
नाला खोलीकरणाची कामे: 288.09 कि.मी.
काढलेला गाळ: 55 लाख 89 हजार घनमिटर
लोकसहभागाची रक्कम :14 कोटी 44 लाख
जलयुक्त शिवार अभियान ही एक लोकचळवळ बनली असून जिल्हा प्रशासन  जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच महाराष्ट राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष तथा सध्या कार्यरत असलेले पशुसंवर्धदुग्धव्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने लोकसहभागातून सुमारे साडे 14 कोटींची कामे झाली असून या पुढील काळात निवडलेल्या गावांमध्ये मोठया प्रमाणात कामे केली जाणार आहेतजिल्हयातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचे काम जलयुक्तमुळे शक्य होत आहेजिल्हा कृषी अधीक्षक तथा सदस्य सचिव जलयुक्त शिवार अभियान चे दशरथ तांबोळे यांनी नमुद केले.