Saturday 30 July 2016

स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

जालना – जिल्हा पुरवठा विभाग तसेच दालमील ओनर्स असोशिएशन यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा शुभारंभ राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जालना येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात करण्यात आला.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती भास्कर दानवे, बाजार समितीचे सचिव विष्णुकुमार चेचाणी, संचालक सर्वश्री अनिल सोनी, रमेश तोतला, गणेश चौघुले, तुळशीराम काळे, श्री मोटे, सुभाष बोडके, श्रीकांतराव घुले, श्री काजळकर, बाबाजी मोटे, पंडितराव भुतेकर, विष्णु पाचपुले, वसंत जगताप, भागवत बावने, सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री भारस्कर, तहसिलदार बीपीन पाटील, नायब तहसिलदार गणेश पोलास, नंदकुमार दांडगे, सतीष पंच, शांतीलाल चोरडिया, श्री भानुशाली, श्री भाईश्री आदींची उपस्थिती होती.
         यावेळी बोलताना राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की,  दाळीचे उत्पादन, मागणी आणि पुरवठा यांच्या तफावतीने मुळे तुरदाळीचे भाव वाढलेले आहेत.  आलेल्या अडचणीतून मार्ग काढून शासनाने नागरिकांना स्वस्त दरात तुरदाळ उपलब्ध करुन दिली असून सर्व रेशन दुकांनावर अंत्योदय योजना तसेच बीपीएल कार्ड धारक जनतेला ही दाळ स्वस्त दरात उपलब्ध करुन दिली जात आहे.   दालमील ओनर्स असोशिएशन यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या विक्री केंद्रावर सर्वच नागरिकांना ही दाळ 120 रुपये किलो एवढ्या माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगत राज्यातील सर्व पशुधनांचा विमा 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत उतरविण्यात येणार असून दारिद्रय रेषेखालील पशुपालकांच्या पशुधनाच्या विम्याची 70 टक्के तर इतर पशुपालकांच्या पशुधनाच्या विम्याची 50 टक्के रक्कम शासन भरणार असल्याचे सांगून या विम्यामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील एकही पशुधन विम्याच्या संरक्षणापासून वंचित राहणार नाही, याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
            शेतीला जोडधंदा म्हणून रेशमी उद्योग हा एक किफायतशीर व कमी पाण्याचा उपयोग करुन होणारा व्यवसाय आहे. राज्याच्या तुलनेत जालना जिल्ह्यात सर्वाधिक 5 हजार एकरवर तुतीची लागवड करण्यात येते.  आजघडीला रेशीम कोषांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बेंगलोर येथे जावे लागत असून रेशीम कोष खरेदी व विक्री केंद्र जालन्यामध्ये लवकरात लवकर सुरु करुन रेशीम उद्योगाला अधिक गतीने चालना देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील कापूस उद्योग तसेच मत्सव्यवसाय उद्योग वाढीस लागण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
           यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे कडधान्याचे उत्पादन अत्यंत कमी झाले आहे.  तुरदाळीचे उत्पादन भारतात सर्वाधिक होत असल्याने ही दाळ बाहेर देशातून आयात करण्यासाठीही मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत.  यंदाच्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होत असून तुरदाळीचे चांगल्या प्रमाणात उत्पादन होईल. परंतू तोपर्यंत नागरिकांनी तुरदाळीला पर्याय म्हणून मुगदाळ वापरण्याचे आवाहन करत यामुळे शेतकऱ्यांच्या मुगदाळीलासुद्धा चांगला भाव मिळेल असे सांगून दालमील ओनर्स असोशिएशन यांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्र सुरु केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
      यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती भास्कर दानवे यांचेही समयोचित भाषण झाले.       सर्वप्रथम स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.  कार्यक्रमाचे आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अनिल सोनी यांनी मानले.
            कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व पदाधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment