Thursday 28 December 2023

भरडधान्य जनजागृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन - जेईएस महाविद्यालयात आयोजित महोत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद - जनजागृतीपर भव्य रॅलीने शहर दुमदुमले - भरड धान्य विक्री व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी - मार्गदर्शकांनी तृणधान्याचे महत्त्व केले विषद - तृणधान्यपासून पाककृती, रांगोळी, पोस्टर्सने उपस्थितांचे वेधले लक्ष - सकाळी 10 पासून महोत्सवाला देता येईल भेट

 


जालना, दि. 28 (जिमाका) :- निरोगी शरीरासाठी भरडधान्य (पौष्टिक तृणधान्य) अत्यंत गरजेचे आहे. दररोजच्या आहारात भरडधान्यापासून बनविलेले पदार्थ जरुर खावेत. मीठ, साखर, तेल कमी आरोग्याची हमी. नाचणी/रागी/नागली, वरई, राळा, कोद्रो, सावा, सामा, भगर, ज्वारी, बाजारी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचा जेवणात अवश्य समावेश करावा. मुलांना तृणधान्याचे महत्त्व समजून सांगावे, अशा प्रतिक्रीया भरड धान्य मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाल्या.

जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या परिसरात अतिशय भव्य प्रमाणात आयोजित दोन दिवसीय भरड धान्य जनजागृती महोत्सवाचा आज थाटात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे तीस स्टॉलच्या माध्यमातून भरड धान्य विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, भरड धान्याचे महत्त्व सांगणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या मेळाव्यास नागरिक, विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रत्येक स्टॉलला भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी होती.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरड धान्य जनजागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे, अन्न व औषधी  प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ,  जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर. कापसे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दयानंद पाटील, प्रमुख वक्ते शशिकांत बोडखे, जेईएस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, कोषाध्यक्ष हेमेंद्र लखोटिया, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विनीत सहानी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्रीमती सुत्रावे म्हणाल्या की, भरडधान्य शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. या धान्याची उत्पादकता वाढावी व त्याचा दैनंदिन आहारात समावेश व्हावा, यासाठी शासनाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासन हे तृणधान्याची मोठया प्रमाणात जनजागृतीही करीत आहे. तृणधान्यामुळे उत्तम आरोग्य राहण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्नातही भर पडेल. मुलांच्या आहारात जास्तीतजास्त तृणधान्याचा वापर करावा. व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी  भरडधान्याची विक्री व त्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर भर द्यावा.

श्री. बगडिया यांनी आठवडयातून एकदा तरी भरड धान्य खावे, असे आवाहन करुन भरड धान्यामुळे शरीर निरोगी राहते, शेतकऱ्यांना भरड धान्यापासून चांगला भाव मिळेल आणि भरड धान्याच्या प्रक्रीया उद्योगातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी त्रिसूत्री सांगितली.

प्रमुख वक्ते शशिकांत बोडखे यांनी भरड धान्य म्हणजे काय, ते किती प्रकारचे आहेत,  त्याचे फायदे, भरडधान्यातून उद्योगाची उभारणी याबाबत अतिशय सविस्तरपणे मार्गदर्शन केले. जुन्या काळात आहारामध्ये भरडधान्याचा मोठया प्रमाणात वापर केल्यामुळे आजाराचे प्रमाण फार कमी होते, असे सांगून ते म्हणाले की, आजच्या जीवनशैलीत मात्र, भरडधान्य फारसे वापरले जात नसल्याने माणुस कुठल्यानकुठल्या आजाराने त्रस्त आहे. उपाचारासाठी सातत्याने त्याला डॉक्टरांकडे जावे लागते. हे सर्व टाळायचे असेल आणि शरीत मजबूत व निरोगी ठेवायचे असेल तर भरडधान्य जरुर खावे, असे आवाहन करुन त्यांनी प्रामुख्याने नाचणी/रागी/नागली, वरई, राळा, कोद्रो, सावा, सामा, भगर या तृणधान्याचे महत्त्व विषद केले. त्याचप्रमाणे तृणधान्याच्या प्रक्रीया उद्योगातून एका मोठा उद्योजक‍ कसे होता येते, याचा मूलमंत्रही उपस्थितांना दिला. आहारात तृणधान्य वापराची प्रतिज्ञा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

श्री. भुजबळ यांनी जनतेस सकस व निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन कशा पध्दतीने काम करते याची माहिती दिली. श्री. कापसे यांनी प्रास्ताविकात तृणधान्याचे  महत्त्व विषद करुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाबद्दल माहिती दिली. दयानंद पाटील यांनीही तृणधान्याचे महत्व सांगितले. दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर वाढविण्याबरोबरच आहारात मीठ, साखर, तेल कमी आरोग्याची हमी, असा मंत्रही दिला. प्राचार्य डॉ. अग्निहोत्री यांनी भरडधान्य महोत्सवामागील उद्देश स्पष्ट करुन भरडधान्याच्या जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती भाषणातून दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे फित कापून व दीपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या पौष्टिक तृणधान्य आरोग्याची शिदोरी या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब वाघ यांनी केले. तर डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. गणेश कुलकर्णी, प्रा. सुषमा दीपवाल यांच्यासह नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी तृणधान्याच्या जनजागृतीसाठी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची भव्य  रॅली काढण्यात आली. महाविद्यालयाच्या परिसरात तृणधान्यापासून विविध पाककृती, तृणधान्यापासून काढण्यात आलेल्या रांगोळी, पोस्टर्सने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. महोत्सवाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 5.00 वाजेपर्यंत आहेत. दि. 29 डिसेंबर रोजी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवास जनतेने अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-*-*-*-*-

 

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे 29 डिसेंबरला जालना जिल्हा दौऱ्यावर

 


जालना, दि. 28 (जिमाका) :-महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे हे दि.29 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यांत्रा-2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा आढावा घेणार आहेत.

दौरा कार्यक्रमानूसार जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दि.29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता आयुष्मान भारत/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11 वाजता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीस डॉ.ओमप्रकाश शेटे उपस्थित राहतील.

-*-*-*-*-

पोस्टाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 5 जानेवारीला डाक अदालतीचे आयोजन

 


जालना, दि. 28 (जिमाका) :- भारतीय पोस्ट खात्यामध्ये सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाड़ा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. तरी अशा तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रवर अधिक्षक डाकघर या कार्यालयामधे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील पोस्टल सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे डाकघराच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. डाक अदालतीमध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.

छत्रपती संभाजीनगर डाक विभागाअंतर्गत संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु / मनी ऑर्डर/ बचत बैंक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  संबधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार, प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, - 431001 या नावे दोन प्रतीसह दि. 1 जानेवारी 2024 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन · पुस्तके पाठविण्याचा कालावधी 31 जानेवारी 2024 पर्यंत

 


जालना, दि. 28 (जिमाका) :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार देण्यात येत असतो. तरी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपले साहित्य दि. 1 ते 31 जानेवारी 2024 या विहीत कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी  केले आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२३ Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी, 2024 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर/ पाकीटावर 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय  पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2024 हा राहील. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. असे तहसीलदार(सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

“विकसित भारत संकल्प यात्रेच्या"माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावात जागर

 

 

जालना, दि.28 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे.  शासकीय योजना गावागावात नेणाऱ्या या  विकसित भारत संकल्प यात्रे ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा – जालना तालुक्यातील ढगी व शंभू सावरगाव, अंबड तालुक्यातील बनगाव व रुई, घनसावंगी तालुक्यातील रांजणीवाडी व रांजणी, बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी व देवगाव, परतूर तालुक्यातील रायगव्हाण व फुलवाडी, भोकरदन तालुक्यातील भिवपूर व वडी बु., येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील. विकसित भारत संकल्प  यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

-*-*-*-*-

12 जानेवारीला पेंशन अदालत

 


 

जालना दि.28 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत.  त्यानूसार पेंशन अदालत दि.12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.30 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

राज्य उत्पादन शुल्क विभागाची 'थर्टी फर्स्ट' च्या पार्ट्यावर राहणार नजर

 


 

जालना दि.28 (जिमाका) :-  राज्य उत्पादन शुल्क विभागाची 'थर्टी फर्स्ट' च्या पार्ट्यावर राहणार नजर राहणार असून 1 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्यविक्री राहणार सुरु आहेत. 'थर्टी फर्स्ट' च्या पार्श्वभुमीवर, महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये जालना शहरातील सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या 1 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी व विदेशी मद्य अनुज्ञप्त्या 1 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

पोलिस विभागाशी समन्वय ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभाग जालना यांच्या संयुक्त मोहिम देखील या काळात घेण्यात येणार आहेत. अवैध मद्यविक्री व निर्मितीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, जालना यांचे पथक सज्ज करण्यात आले आहे. मद्य विक्रीसाठी अधिकृत परवान्याची गरज असते. त्याचप्रमाणे मद्य खरेदीसाठी / पिण्यासाठीही परवाना घ्यावा लागतो व हा परवाना ऑनलाईन घेता येतो. 1 दिवस, एक वर्ष आणि आजीवन असे तीन प्रकारचे परवाने घेता येतात. एक दिवसासाठी देशी मद्याचा दोन रुपये आणि विदेशी मद्याचा पाच रुपये शासन शुल्क भरुन परवाना घेता येतो. तसेच एक वर्षासाठी 100  रुपये आणि आजीवन परवान्यासाठी 1 हजार रुपये शासन शुल्क भरुन मद्य पिण्याचा परवाना घेता येतो.

राज्य उत्पादन शुल्क, जालना विभागाची 1 जानेवारी 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत एकुण 890 गुन्हे नोंद करण्यात आले असुन 595 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये रु.95 लाख 39 हजार 641 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 32 वाहनांचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये 72 गुन्हे 58 अटकेत तर 26 तारखेपर्यंत अवैध दारु धंद्या प्रकरणी 72 गुन्हे दाखल केले. यात 58 जणांना अटक करण्यात आली तर 12.73  लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्षभरात 595 अटकेत तर वर्षभरात धडक कारवाई करत 890 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यामध्ये एकुण 595 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकुण 32 वाहने जप्त करण्यात आली आहेत. अवैध दारुधंद्या संदर्भात 18002339999 या टोल फ्री कमांकावरुन किंवा 9284617614 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरुनही तक्रार दाखल करता येते.

थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने परवानगी न घेता हॉटेल्स किंवा बाहेरच्या भागात होणाऱ्या मद्यांच्या पार्ट्यावरही उत्पादन शुल्कच्या येथील विभागाची करडी नजर राहणार आहे. फार्म हाऊस किंवा अन्य बाहेरच्या ठिकाणी पार्टी करावयाची असल्यास उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 अंतर्गत 68 व 84 कलमांतर्गत 25 हजारपर्यंत दंड होणार आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून उद्योजकांनी एक दिवसीय (क्लब) परवाना घेवुनच पार्टी आयोजित करावी. असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

           31 डिसेंबर कालावधीत शासनाने दारु विक्री करणाऱ्या दुकानांना वेळ वाढवुन दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जालना जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या 1 जानेवारी 2024 राजी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात अवैध दारु विक्री होणार नाही किंवा बाहेरुनही येणार नाही, यासाठी उत्पादन शुल्काकडुन दक्षता घेतली जाणार आहे. त्याकरीता अंबड, जालना व भोकरदन या तीन कार्यक्षत्रामध्ये पथके तैनात केली आहेत. हानिकारक हातभट्टया उध्दवस्त करण्याच्या दृष्टीने धडक कारवाई केली जात आहे. - डॉ. पराग नवलकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना

 

 

-*-*-*-*-

 

 

Tuesday 26 December 2023

वीर बाल दिवसानिमित्त अभिवादन

 



जालना, दि. 26 (जिमाका) :- वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वीर साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानास विनम्र अभिवादन करण्यात आले. तहसीलदार वैभव महेंद्रकर यांनी साहिबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती..

-*-*-*-*-

27 डिसेंबर रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ जागेवर निवड संधीचे आयोजन

 


जालना, दि. 26 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्याकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना  येथे बुधवार दि. 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी युवक-युवतींनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.

मातोश्री स्किल डेव्हल्पमेंट सेंटर प्रा. लि. जालना यांची बी.एस्सी/बी.सी.ए/बी.ई कॉम्प्युटर उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रोजेक्ट समन्वयक/वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षक उमेदवारांसाठी 5 पदे, तर कोणतीही पदवी उत्तीर्णांसाठी समुपदेशक पदाकरिता 2 पदे, ब्युटी पार्लर / शिवणकाम प्रशिषक पदाकरिता करिता दहावी/बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4 पदे, तर इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिशन पदासाठी आय टी आई / डिप्लोमा/बी.ई. उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4 आहेत. तसेच श्री रेणुकादेवी नागरी पतसंथा जालना यांची व्यवस्थापक, क्लार्क, कॅशिअर पदासाठी बी.कॉम उत्तीर्ण उमेदवारांकरिता 11 पदे, तर एम.बी.ए मार्केटिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी मार्केटिंग प्रतिनिधी पदाकरिता 3 पदे, तर दहावी/ बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पिग्मी एजंट पदासाठी 5 पदे असे एकूण 34 पदाकरीता मागणीपत्र प्राप्त झाले असून नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिककरून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-14 (2023-24) जालना याची निवड करावी. उद्योजक / नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इत्यादी कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दि. 27 डिसेंबर 2023, रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना  येथे उपस्थित रहावे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांसाठी अर्ज सादर करावेत

 


जालना, दि. 26 (जिमाका) :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचतगटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदान तत्वावर वितरीत करण्याची योजना जालना समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधीत बचतगटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ पुरुष व महिला बचत गटांना देण्यात येतो. सन 2023-24 या चालु आर्थिक वर्षात लाभ मिळविण्यासाठी इच्छुक व पात्र बचत गटांकडुन दि.20 जानेवारी, 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

रेल्वेत सापडलेल्या अज्ञात बाळाबाबत आवाहन



 

जालना, दि. 26 (जिमाका) :- रेल्वे पोलीस जालना यांना दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी नंदीग्राम एक्सप्रेस कोच बी -२ मध्ये शौचालयाच्या आतील कचऱ्याच्या पेटीत स्त्री जातीचे बाळ, वय अंदाजे 15 दिवस अंगात गुलाबी रंगाचा ड्रेस व बाळाला हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून अज्ञात पालकाने टाकून दिले होते. सापडलेल्या बाळाचा वर्ण गोरा आहे. रेल्वे पोलीस यांच्याद्वारे व  बाल कल्याण समिती जालना यांच्या समोर हजर केले असता सदर बालकास जालना येथे शिशुगृह नसल्याने बाल कल्याण समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने साकार संस्थेत 7 नोव्हेंबर 2023 रोजी दाखल केले. सदर बालिकेचा सांभाळ करण्याची इच्छा असल्यास तिच्या नैसर्गिक पालकांनी किंवा नातेवाईकांनी आजपासून 30 दिवसाच्या आत साकार (सोसायटी फॉर अडोप्शन नॉलेज अवेअरनेस ॲण्ड रिसोर्स) प्लॉट नं. 177, अजमेरा कॉम्प्लेक्स, ज्योती नगर मेन रोड, ज्योती नगर, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क तुषार दापके 9673101760  किंवा बाल कल्याण समिती हडको, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन (1098) अथवा रेल्वे पोलीस स्टेशन, जालना यापैकी कुठेही संपर्क साधून पालक म्हणून आपला दावा सिद्ध करावा अन्यथा साकार संस्थेतर्फे सदर बालिकेचे दत्तक विधानाद्वारे कायदेशीर पुनर्वसन करण्यात येईल, असे आवाहन साकार संस्थेचे व्यवस्थापक तुषार दापके यांनी केले आहे. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जालना यांचे कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 


जालना जिल्ह्यात “विकसित भारत संकल्प यात्रा" गावागावात जावून करतेय शासकीय योजनांची जनजागृती बुधवार 27 डिसेंबर रोजीचे वेळापत्रक

 


 जालना, दि.26 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे.  शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या  विकसित भारत संकल्प यात्रे ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

बुधवार, दि. 27 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा - घनसावंगी तालुक्यातील करडगाव व अंतरवाली दाई, बदनापूर तालुक्यातील नाणेगाव व रोषनगाव, जालना तालुक्यातील पाष्टा व सोनदेवधरा, भोकरदन तालुक्यातील मुठाड व तांदूळवाडी, परतूर तालुक्यातील परतवाडी व पांडे पोखरी, अंबड तालुक्यातील वसंतनगर व कुक्कडगाव, जालना येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील. विकसित भारत संकल्प  यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

              -*-*-*-*-

अन्न-औषध प्रशासन, कृषी विभाग, जेईएस महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भरड धान्य मेळाव्यात होणार भरड धान्य व खाद्य पदार्थांची विक्री 28 व 29 डिसेंबर रोजी जेईएस महाविद्यालयात होणार भरड धान्य मेळावा

 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त अन्न व औषध प्रशासन, कृषी विभाग आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जेईएस महाविद्यालय परिसरात दि. 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी भव्य भरड धान्य मेळावा-2023चे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आले आहे.

भरड धान्य मेळाव्यानिमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्य मेळाव्याच्या ठिकाणी दोन दिवसांत विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री तसेच  भरड धान्यापासून बनविण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे 30 स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलमध्ये बचतगट, शेतकरी, धान्य व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्या स्टॉलचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या सर्व स्टॉलवर भरड धान्य व या धान्यापासून बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार आहे.

या भरड धान्य मेळावा-2023च्या  प्रचार-प्रसारासाठी आणि भरड धान्याचे महत्त्व लोकांना समजण्याकरीता पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, रांगोळी, पाककृती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

भरड धान्य मेळावानिमित्त दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची रॅली निघणार आहे. ही रॅली आरपी रोड मार्गे, कॉलेज रोड आणि जेईएस महाविद्यालय येथे जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी उदघाटन, विविध मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे. मेळाव्याच्या परिसरातच भरड धान्य विक्री व खाद्यपदार्थांचे स्टॉल राहणार आहेत. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-*-*-*-*-

Friday 22 December 2023

जालना शहरात 28 व 29 डिसेंबरला “भरड धान्य मेळावा” - जेईएस महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन - विविध स्पर्धांच्या माध्यमातून भरड धान्याचा प्रचारप्रसार - मेळाव्याच्या ठिकाणी भरड धान्य विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल - विविध मार्गदर्शकांच्या व्याख्यानाचे आयोजन - विद्यार्थ्यांची निघणार भव्य रॅली

 



जालना, दि. 22 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जालना शहरातील जेईएस महाविद्यालय परिसरात दि. 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी भव्य भरड धान्य मेळावा-2023चे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भरड धान्य मेळाव्यानिमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्य मेळाव्याच्या ठिकाणी दोन दिवसांत  विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री तसेच भरड धान्यापासून बनविण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे 30 स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलमध्ये बचतगट, शेतकरी, धान्य व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्या स्टॉलचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या सर्व स्टॉलवर भरड धान्य व या धान्यापासून बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार आहे.

या भरड धान्य मेळावा-2023च्या  प्रचार-प्रसारासाठी आणि भरड धान्याचे महत्त्व लोकांना समजण्याकरीता पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, रांगोळी, पाककृती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीस कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, महिला अर्थिक विकास महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र, उमेद आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह हॉटेल व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधित विभागाने समन्वयाने भरड धान्य मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन करावे, अशी सूचना श्रीमती सुत्रावे यांनी यावेळी केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त द.वि. पाटील यांनी मेळाव्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. तर जेईएस महाविद्यालयाचे प्रा. गणेश कुलकर्णी यांनी सादरीकरणाव्दारे मेळावानिमित्त घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

भरड धान्य मेळावानिमित्त दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची रॅली निघणार आहे. ही रॅली आरपी रोड मार्गे, कॉलेज रोड आणि जेईएस महाविद्यालय येथे जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी उदघाटन, विविध मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे. मेळाव्याच्या परिसरातच भरड धान्य विक्री व खाद्यपदार्थांचे स्टॉल राहणार आहेत. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन  श्रीमती सुत्रावे व श्री. द.वि. पाटील यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

 


जालना, दि. 22 (जिमाका) :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान  योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल दि. 3 डिसेंबर 2023 रोजी  तयार करण्यात आले आहे. तरी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरुन सुरु आहे. योजनेचा उद्देश -  दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे,  दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.  सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा आहे.

-*-*-*-*-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

 


जालना, दि. 22 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यावतीने आज  दीपभारती माध्यमिक विदयालय, माहोरा, ता.जाफ्राबाद, जि. जालना येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.

या शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, मुख्याध्यापक सांडु पांडे आदी  उपस्थित होते.

श्रीमती मोहिते यांनी पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 या कायदयाबद्दल माहिती दिली. कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्हयांपासुन बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरिता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 तयार करण्यात आला आहे. हा कायदा तयार करतांना बालक प्रथम या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत श्रीमती भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत मोफत विधी सल्ला आणि मोफत वकील दिले जातात ही माहिती विदयार्थ्यांनी आपल्या आई वडीलांना व त्यांच्या इतर नातेवाईकांना द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

बालकांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन घडल्यास त्याबाबत आपल्या जवळच्या व्यक्तीकडे त्वरीत सांगावे तसेच अशा व्यक्तीने तात्काळ त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. असे  त्यांनी सांगितले. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात “विकसित भारत संकल्प यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद लोककल्याणकारी शासकीय योजनांची जनजागृती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शनिवार, 23 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक

 


जालना, दि. 22 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा”  जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जालना जिल्हयात “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

शनिवार, दि. 23 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा - विकसित भारत संकल्प यात्रा शनिवार, दि. 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जालना तालुक्यातील मोहाडी व खांबेवाडी, परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी व पिंपरुळा, मंठा‍ तालुक्यातील जयपूर व शिवनगरी, जाफ्राबाद तालुक्यातील सावंगी व गोधनखेडा, भोकरदन तालुक्यातील गारखेडा/ जोमाला व नांजा/शिरसावर, अंबड तालुक्यातील धाळसखेडा व पराडा,  येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-  

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :- दि.24 डिसेंबर हा  राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिनानिमित्त दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12.00  वाजता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 या चर्चासत्रास  अप्पर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे, वरीष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, तहसिलदार छाया पवार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्हि.व्हि. महिंद्रकर, अॅड. महेश एस. धनावत, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चळवळीचे मोहन इंगळे, संजय देशपांडे व इतर सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रतिवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने केंद्र शासनाने ग्राहक आयोगातील तक्रारी प्रभावीपणे निकाली काढणे  या संकल्पनेवर आधारीत शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे चर्चासत्र आयोजित केले आहे.चर्चासत्रास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर- पालवे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

Thursday 21 December 2023

मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक --- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

 




 

जालना, दि. 21 (जिमाका) - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असून मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांनी शासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे  मनोज जरांगे यांची  अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केलेल्या कार्यवाहीची त्यांना माहिती दिली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे  हे उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले की, सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी जे-जे काही करायचं आहे, ते सगळं करण्याची तयारी असल्याचे सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. आरक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, त्यामुळे शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घ्यावी. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. राज्यातील कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनासह न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. आरक्षणासाठी ज्या त्रुटी असतील, त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव निमित्त साखळी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिली. आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही कारणाने समाजा-समाजात वितुष्टता येऊ नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

-*-*-*-*-*-*-*-

Tuesday 19 December 2023

मतदार जनजागृती चित्ररथाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन

 




 

जालना, दि. 19 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार नवीन मतदार नाव नोंदणी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतदान यंत्र जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेल्या एलईडी चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी फित कापून मार्गस्थ केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज पार पडलेल्या या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, डॉ.दयानंद जगताप, डॉ.श्रीमंत हारकर, प्रतिभा गोरे, तहसीलदार सुमन मोरे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात नवीन मतदार नाव नोंदणी, मृत झालेल्या व्यक्तींचे नाव मतदार यादीतून वगळणे, मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे, ऑनलाईन मतदार नोंदणी आणि ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतदान यंत्राच्या जनजागृतीबाबत एकुण 10 एलईडी चित्ररथ गावागावात जाणार असून मतदारांनी ईव्हीएम मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान करुन आपल्या शंकेचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाभरात राबविली जातेय ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यातील  पाच विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 699 मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात व परतुर, घनसावंगी, जालना, बदनापूर व भोकरदन येथील तहसील कार्यालयात मतदान प्रात्यक्षिक केंद्र स्थापन केले असून याठिकाणी तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

                                                                       

                                                                        -*-*-*-*-

घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 22 डिसेंबरला तंत्र प्रदर्शन

 


जालना, दि. 19 (जिमाका) :- घनसावंगी  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन केले असून तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे. तरी घनसांवगी परीसरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी व परिसरातील नवउद्योजकांनी उपस्थित राहून तंत्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन प्राचार्य देविदास राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रदर्शनास जालना येथील उद्योजक सुनिल रायठठ्ठ्ठा, जितेंद्र राठी, नितीन काबरा, घनश्याम गोयल, मुकुंदराम मंत्री, संतोष निंबोळकर, संजय देशमुख, सुनील शिंदे, अक्षय चव्हाण व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तरी जालना व घनसांवगी परिसरातील जनतेने या तंत्रप्रदर्शनास भेट देवून नव कल्पनेतून साकार झालेले मॉडेल्सपाहून हरहुन्नरी प्रशिक्षणार्थींचे कौतूक करावे. या सादरीकरण होणाऱ्या प्रकल्प, मॉडेलमधील 10 मॉडेलची निवड जिल्हास्तरावर केली जाणार असून या निवड झालेले मॉडेल्स राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनासाठी पाठविले जाणार आहे. यावेळी जालना जिल्ह्यांतील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणांतर्गत तयार केलेल्या नाविन्यपूर्ण वस्तुंचे, मॉडेलचे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन होणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

शासकीय योजना गावागावांत नेणारी “विकसित भारत संकल्प यात्रा” बुधवार, 20 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक जालना, दि.19 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा” - विकसित भारत संकल्प यात्रा बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जालना तालुक्यातील राठोडनगर व शिवणी, जाफ्राबाद तालुक्यातील अळंद व हिवराबळी, अंबड तालुक्यातील मसई व गोविंदपूर, भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी, खोडकी, मंठा तालुक्यातील किरला व दघ, परतूर तालुक्यातील रायपूर व सिरसगाव येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील. विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. -*-*-*-*-



 


जालना, दि.19 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या  “विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा - विकसित भारत संकल्प यात्रा बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जालना तालुक्यातील राठोडनगर व शिवणी, जाफ्राबाद तालुक्यातील अळंद व हिवराबळी, अंबड तालुक्यातील मसई व गोविंदपूर, भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी, खोडकी, मंठा तालुक्यातील किरला व दघ, परतूर तालुक्यातील रायपूर व सिरसगाव

येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-