Thursday 7 December 2023

सशस्त्र सेना ध्वजदिन-2023 निधी संकलनाचा शुभारंभ सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये सढळ हाताने मदत करावी - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 







 

जालना दि. 7 (जिमाका) :- देशाच्या सुरक्षिततेसाठी भारतीय सैनिक सिमेवर कुठल्याही परिस्थितीत रात्रंदिवस संकटांचा सामना करत सेवा बजावत असतात. तसेच देशाअंतर्गत उदभवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीतही सैनिक आपल्या सेवेच्या माध्यमातून योगदान देत असल्याचे दिसून येते. सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांसाठी कार्यरत असणारा जिल्हा सैनिक कल्याण विभाग मोलाची कामगिरी करत असून  जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह नागरिकांनी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

जालना येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील महासैनिक लॉनवर सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ गुरुवार दि.7 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी वर्षा मीना, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ.निलेश पाटील, शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की,  भारताची  स्वातंत्र्यानंतरची झालेली प्रगती पाहता यामध्ये भारतीय जवानांचे खुप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आपल्या सिमा अबाधित ठेवण्यासाठी सैनिकांनी अमुल्य योगदान दिले आहे. एक सैनिक दुसऱ्या सैनिकाला भेटतांना ‘जय हिंद’ या अभिवादनाने सुरुवात करत असतो. सैनिक त्यांच्या नोकरीमध्ये असणारी शिस्त सेवानिवृत्तीनंतरही  संपूर्ण जीवनात अंमलबजावणी करत असतात. वेळोवेळी सैनिकांचे स्मरण करणे, त्यांच्या कार्याची जाणीव नवीन पिढीला होण्यासाठी दरवर्षी साजरा करण्यात येणारा ध्वजदिन निधी कार्यक्रम शुभांरभ फार मोलाची भूमिका बजावत असतो. भारत देशातील सर्व नागरिकांनी आपण सर्व एक आहोत ही सलोख्याची भावना कायम मनात ठेवणे अंत्यत आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनात वावरतांना सर्व नागरिकांनी सैनिक, माजी सैनिकांसह वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा नेहमी आदर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, देश, राज्य व जिल्हास्तरावर सर्व ठिकाणी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ केला जातो. गेल्या वर्षी दिले गेलेले निधी संकलनाचे  उद्दीष्ट जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनी पूर्ण केले आहे. आजच्या शुभारंभ कार्यक्रमात दिले गेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी तयारी करावी. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे महत्व सर्वांना समजावून सांगत या निधीमध्ये मनापासून सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. पाटील म्हणाले की, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मित्र परिवारालाही या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये मदत करण्यास प्रेरित करावे. कार्यक्रमात एनसीसी कॅडेट मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षी उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कल्याण संघटक अधिकारी गोविंद इंगोले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आभार मानले.  या कार्यक्रमास एनसीसी, सैनिकी शाळेतील विद्यार्थी, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, माजी सैनिक, विविध कार्यालय प्रमुखांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment