Thursday 7 December 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मध्यस्थी जनजागृती शिबीर संपन्न

 


जालना दि. 7 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिनदर्शिकेत नमुद केल्यानुसार व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी निर्देशित केल्यानुसार दि. 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मध्यस्थी जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल, हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या आयोजक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ उपस्थित होत्या तसेच जालना जिल्हयामधील मत्सोदरी विधी महाविद्यालय, जालना आणि डॉ. सुभाषराव ढाकणे विधी महाविदयालय, जालना या महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

किशोर जयस्वाल म्हणाले की, दिवसेंदिवस आपली सहनशीलता कमी होत आहे, आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये खटल्यांची अत्यंत वेगाने वाढ होत आहे. या प्रकरणांमध्ये आपला पैसा, अमुल्य वेळ आणि जीवनाचा आनंद खर्ची पडतो. नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाची प्रकरणं निकाली काढली जातात. आपली प्रकरणं ही मध्यस्थी मार्गाने निकाली निघाली तर त्यामध्ये दोन्ही पक्षांचा विजय होतो. भारतीय संविधानात 'सामाजिक न्याय' ही संकल्पना आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना म्हणजे समाजातील दुर्बल व वंचीत घटक म्हणजेच मागासवर्गीय, गरीब, स्त्रिया तसेच मुल हे न्यायापासुन वंचित राहू नये म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य दिले जाते.  असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment