Friday 22 December 2023

जालना शहरात 28 व 29 डिसेंबरला “भरड धान्य मेळावा” - जेईएस महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन - विविध स्पर्धांच्या माध्यमातून भरड धान्याचा प्रचारप्रसार - मेळाव्याच्या ठिकाणी भरड धान्य विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल - विविध मार्गदर्शकांच्या व्याख्यानाचे आयोजन - विद्यार्थ्यांची निघणार भव्य रॅली

 



जालना, दि. 22 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जालना शहरातील जेईएस महाविद्यालय परिसरात दि. 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी भव्य भरड धान्य मेळावा-2023चे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भरड धान्य मेळाव्यानिमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्य मेळाव्याच्या ठिकाणी दोन दिवसांत  विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री तसेच भरड धान्यापासून बनविण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे 30 स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलमध्ये बचतगट, शेतकरी, धान्य व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्या स्टॉलचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या सर्व स्टॉलवर भरड धान्य व या धान्यापासून बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार आहे.

या भरड धान्य मेळावा-2023च्या  प्रचार-प्रसारासाठी आणि भरड धान्याचे महत्त्व लोकांना समजण्याकरीता पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, रांगोळी, पाककृती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीस कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, महिला अर्थिक विकास महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र, उमेद आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह हॉटेल व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधित विभागाने समन्वयाने भरड धान्य मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन करावे, अशी सूचना श्रीमती सुत्रावे यांनी यावेळी केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त द.वि. पाटील यांनी मेळाव्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. तर जेईएस महाविद्यालयाचे प्रा. गणेश कुलकर्णी यांनी सादरीकरणाव्दारे मेळावानिमित्त घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

भरड धान्य मेळावानिमित्त दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची रॅली निघणार आहे. ही रॅली आरपी रोड मार्गे, कॉलेज रोड आणि जेईएस महाविद्यालय येथे जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी उदघाटन, विविध मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे. मेळाव्याच्या परिसरातच भरड धान्य विक्री व खाद्यपदार्थांचे स्टॉल राहणार आहेत. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन  श्रीमती सुत्रावे व श्री. द.वि. पाटील यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment