Tuesday 24 December 2019

बँकांनी कर्जवाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण करावे -- नरेंद्र पाटील



            जालना, दि. 24 –अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत समाजातील तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याबरोबरच बँकांना कर्जवाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण करण्याचे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.
            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री पाटील बोलत होते.
            यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निशांत ईलमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्यात येतात.  राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजनेंतर्गत तरुणांनी केलेल्या कर्जाच्या मागणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.  बँकांनी तरुणांची प्रकरणे विनाकारण नाकारु नयेत.  त्याचबरोबर सहाकारी बँकांनीही तरुंणाना कर्ज उपलब्ध करुन द्यावे.  ज्या बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले नसेल अशा बँकांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            समाजातील तरुणांनीही नोकरीच्या मागे लागता नोकरी मागण्यापेक्षा उद्योग व्यवसायाच्या माध्यमातुन नोकरी देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करावी.  या महामंडळाच्या माध्यमातुन ज्या बँकांकडून उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे त्याची परतफेड विहित वेळेत करावी.  येणाऱ्या कालावधीमध्ये या योजनेसंदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरावरही बैठकांचे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक गरजु तरुणाला या महामंडळाच्या माध्यमातुन कर्जाची प्रकरणे मंजुर करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनीही उपस्थित बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत तरुणांना अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देश दिले.
            बैठकीस सर्व बँकांचे व्यवस्थापक, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी तसेच समाजातील तरुणांची उपस्थिती होती.






Saturday 21 December 2019

महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज - सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी



            जालना, दि. 21 – शक्ती, संस्कृती, प्रगती, प्रकृती सर्वांततीचा उल्लेख होत असतो. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पादक्रांत करीत असली तरी महिलांना आजही सामाजिक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.  या अडचणींवर मात करण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महिला सुरक्षा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री कुलकर्णी बोलत होते.    
            यावेळी राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड पी.जे. गवारे, दै. दुनियादारी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक किशोर आगळे, वनस्टॉप सेंटरच्या व्यवस्थापक श्रीमती विद्या लंके, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
            श्री कुलकर्णी म्हणाले, महिलांची सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. आजघडीला सुशिक्षित असणाऱ्या समाजामध्येसुद्धा महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे.  ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. आजही अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. अशा माहिलांना त्यांच्या अडीअडचणीवर मात करुन सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर विविध कायदे तसेच योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. असे असले तरी पालकांनीही आपल्या मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज असुन मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
            राज्य महिला आयोगाचे समन्वयक श्री गवारे म्हणाले, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समितीची स्थापना करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असेल या समितीच्या माध्यमातुन त्यांना दाद मागण्याची सुविधा असुन या समितीला न्यायालयाप्रमाणे अधिकार देण्यात आलेले आहेत.  या समितीसमोर अशा प्रकारचे एखादे प्रकरण आल्यास तीन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.  त्याचप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीमध्येसुद्धा शासनाने कडक असे नियम केलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            श्रीमती लंके म्हणाल्या की,  जालना येथे गेल्या पाच महिन्यांपासुन संकटग्रस्त महिलांसाठी तात्पुरते निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले असुन पिडित महिलांना मानसिक आधार देण्याबरोबरच महिलांचे समुपदेशनही करण्यात येते. या केंद्राच्या माध्यमातुन महिलांना कायदेशिर मदत देण्याबरोबरच वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात येतात.   या केंद्रात आतापर्यंत 76 प्रकरणे दाखल असुन त्यापैकी 22 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती सहाय्यक अमोल महाजन यांनी कार्यशाळा आयोजनामागची भूमिका विषय केली.  कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रीमती पल्लवी बिदरकर यांनी केले तर आभार राजेंद्र वाणी यांनी मानले.
            कार्यक्रमास प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व महिला तसेच शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी उपस्थित होते.
*******




Monday 4 November 2019

पदवीधर मतदार नोंदणीसाठी 5 नोव्हेंबर रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन



            जालना, दि. 4 :--  मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्‍ली यांनी दि. १.११.२०१९ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्‍या अनुषंगाने मतदार संघाची मतदार यादी नव्‍याने    (De-novo) तयार करण्‍याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने 05 -औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी पात्र अर्जदारांनी मतदार म्हणुन नोंदणीसाठी  फॉर्म १८ मध्‍ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही दि. 6 नोव्हेंबर, 2019 अशी आहे.  पदवीधरांना मतदार म्हणून नोंदणी करता यावी यासाठी तहसिल कार्यालय, जालना येथे दि. 5 नोव्हेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून  विशेष नाव नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            औरंगाबाद विभागसह  जालना जिल्ह्यातील सर्वसाधारण रहिवासी असलेल्या तसचे दि.1 नोव्हेंबर 2016 पुर्वी सर्व प्रकारच्या विद्याशाखाचे पदवीधर असलेले सर्वसामान्य नागरिक, व्यवसायीक, विद्यार्थी,  डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार इ. यांच्यासह  सर्व पात्र पदवीधारकांनी मोठ्या संख्येने पदवीधर मतदार नोंदणीसाठी आयोजित विशेष मेळाव्याचा लाभ घेऊन मतदार म्हणून नोंदणी करावी.  मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आधार कार्डची छायांकित प्रत, मतदाराचे ओळखपत्र,  डिग्री सर्टिफिकेटची छायांकित प्रत किंवा पदवी परीक्षेच्या तृतीय वर्षाची मार्कमेमोची छायांकित प्रत,  एक पासपोर्ट साइज फोटो या कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतीयेळे, उप विभागीय अधिकारी श्रीमंत हरकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे.

भोकरदन व अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून पहाणी



            जालना दि.4-  जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपीकांची राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे संपुर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत.  आज दि. 4 ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
        पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन व मका या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. याशिवाय कापूस व इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण ६ लक्ष १५ हजार हेक्टरपैकी ४ लक्ष ३३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले असून जवळपास जल्ह्यातील ५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे यात जवळपास ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास कळविलेले आहे. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे. गेल्या पाच वर्षात राज्य शासनाने 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याची माहिती देत शासन शेतकऱ्यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
      या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भाऊसाहेब भुजंग, रामलाल चव्हाण, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार मनिषा मेने यांच्यासह तालुका कृषि अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
            पालकमंत्री श्री लोणीकर यांची सर्वप्रथम भोकरदन तालुक्यातील राजुर येथे दिगांबर पुंगळे, किसनराव टोम्पे या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतातील मका व बाजरी या नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली.  तपोवन येथे बाबुराव मालुसरे, नारायण मालुसरे यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन, मका पीकांची पहाणी केली. अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथे रामेश्वर जिगे, विमलबाई जिगे, रामदास जिगे यांच्या शेतीला भेट देत कापूस पिकाची पहाणी केली. शेवगा येथे रुक्मिणीबाई रांदवण, सुधाकर सराळे यांच्या शेतातील मका, कापूस पीकांची पहाणी केली.








Thursday 31 October 2019

जालना येथे एकता दौड संपन्न जालना शहर वासियांना नोंदवला उत्स्फुर्त सहभाग जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन एकता दौडचा शुभारंभ



जालना, दि. 31 - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले एकता दौडला हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ केला.
याप्रसंगी  नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, सिद्धीविनायक मुळे, डॉ. सचदेव,  तहसिलदार श्रीकांत भुजबळ, उपअधिक्षक श्री. देशपांडे, उपशिक्षणधिकारी श्री. मापारी,  जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड, जिल्हा क्रिडा अधिकारी  श्रीमती प्रबोधिनी अमृतवाड, केशव कानफुडे, श्री. भोरे, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी आदींनी वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कायंदे यांनी केले. मस्तगड येथुन सुरु झालेली ही रॅली मंमादेवी, सुभाषचंद्र बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी पुतळा येथे येऊन विसर्जित करण्यात आली. या दौडमध्ये नुतन प्रशालेच्या विद्यार्थिनी,  फन रन ग्रुपचे सदस्य, एन.सी.सी. चे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस दलाचे जवान, यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.