Sunday 19 November 2017

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग आवश्यक पालकमंत्री बबनराव लोणीकर

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्हा
 टंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग आवश्यक
                                                 पालकमंत्री बबनराव लोणीकर
       जालना,दि.19 – शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत व मुबलक पाणी पुरवठयासाठी जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणीसाठे निर्मितीवर भर देण्यात येत आहे. शासन, स्वयंसेवी संस्थेच्या  माध्यमातून जलयुक्त शिवार अभिनाची कामे प्रभापीपणे करण्यात येत आहेत. संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            आष्टी येथे ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळयांचे लोकार्पण, सोयाबीन खरेदी केंद्राचे उदघाटन तसेच महाजन ट्रस्टच्यावतीने अकोली ता. परतूर येथे करण्यात येणाऱ्या कामांचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, महाजन ट्रस्टच्या श्रीमती नुतन देसाई, मदनलाल सिंगी, रामेश्वर तनपुरे, सुदाम प्रधान, प्रदीप ढवळे, रामप्रसाद थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षात जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान अत्यंत प्रभापीपणे राबविण्यात आले आहे. जिल्हयातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच 600 बंधाऱ्यांच्या निर्मितीबरोबर जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. महाजन ट्रस्टच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील 47 गावात, अंबड तालुक्यातील 80 गावात जलसंधारणाची कामे करण्यात आली असून आष्टीसह परिसरातील गावांमध्ये आता या ट्रस्टच्या माध्यमातून कामे करण्यात येणार आहेत.
            शासकीय येाजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा असून संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी शासनामार्फत मशिनला डिझेलचा पुरवठा करण्यात येईल. असेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
श्री. लोणीकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव शासनाने जाहीर केलेला असताना शेतमालाला कमी भावाने काही व्यापारी खरेदी करत असून त्याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन आपला माल कृषी उत्पन बाजार समितीमध्ये आणावा. ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचे हित जोपासले जाणार असून व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा व पारदर्शीपणे शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ऑनलाईन नोंदणीमुळे तात्काळ मोजमाप होऊन लवकरात लवकर मोबदला देण्यात येणार आहे. मागे झालेल्या तूर घोटाळ्याची आठवण देत व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
            परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांच्या विकासासाठी राष्ट्रीय रुरबन येाजनेतून उपलब्ध 185 कोटी रुपयांच्या माध्यमातून गावांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतीपिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटेछोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन या पिकांचे या भागात मोठया प्रमाणावर उत्पादन होते या पिकापासून तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत मोठया प्रमाणात मागणी असून गावातील शेतकऱ्यांचे बचतगट तसेच महिलांच्या बचतगटांना एकत्रित करुन परतूर तालुक्यात 100 प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय रुरबन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशात या माध्यमातून 100 तर राज्यात सहा क्लस्टर करण्यात येत असून यामध्ये आष्टीसह 16 गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            परतूर तालुक्याच्या सर्वांगिण विकास करण्यात येत असल्याचे सांगत ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून 124 व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या व्यापारी गाळयामुळे एकाच ठिकाणी बाजारपेठ विकसित व्हावी व व्यापाऱ्यांना हक्काची जागा मिळावी या हेतूने या गाळयाची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून सर्वसामान्य नागरिकांसाठी एकाच छताखाली बाजारपेठ मिळणार आहे. येणाऱ्या काळात या ठिकाणी आणखीन 124 व्यापारी गाळयांची निर्मिती करण्यात येणार असून तालुक्याच्या विकासासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्हयातील रस्ते विकासावर भर देण्यात येत असून शेगाव ते पंढरपूर हा 2 हजार कोटी रुपये खर्चून पक्का व मजबूत असा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. मतदारसंघातून जवळपास 95  कि.मि. हा रस्ता जात असून या रस्त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कमी वेळेत बाजारपेठ घेवून जाण्यास मदत होण्याबरोबरच या रस्त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी पंढरपूर ला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाचाही प्रश्न यामुळे सुटणार आहे. जिल्हयात रस्ते विकासासाठी साडेपाच हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून अनेक भागात रस्त्यांची कामेही सुरु झाली आहेत. जालना-अंबड-वडीगोद्री या 300 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून या रस्त्यांच्या कामासाठी लवकरच सुरुवात करण्यात येईल. येणाऱ्या काळात जिल्हयातील एकही रस्ता पक्या व डांबरी रस्त्याशिवाय वंचित राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            राज्यावर मोठया प्रमाणात कर्ज असतांनासुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील सर्व पात्र व गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
            यावेळी महाजन ट्रस्टच्या श्रीमती नुतन देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सुरेश केसापूरकर आदींचीही समयोचित भाषणे झाली.
            या कार्यक्रमाला सुदाम प्रधान, रामप्रसाद थोरात, बंकटराव सोळंके, अशोक बरकुले, डिगांबर मुजमुले, अर्जुन राठोड, शिवाजी पाईकराव, रंगनाथ येवले, विष्णू शहाणे, गणपत सातपूते, माणीकराव वाघमारे, सिध्देध्वर सोळंके, जिजाबाई जाधव, तुकाराम सोळंके, बाबाराव थोरात, संपत टकले, माऊली सोळंके, सरपंच अमोल जोशी, शे.अहमद, मुजीब भाई, इस्माईल पठाण, सुभाणी जमीनदार, आदित्य पांचाळ, रामदास सोळंके, व्यापारी महासंघाचे राजेंद्र बाहेकर, नारायण पळसे, तहसीलदार फुफाटे, गटविकास अधिकारी राजेंद्र तांगडे, कृषी अधिकारी कांबळे, ए.आर.देवरे, कैलास मुजमुले, आत्मासाहेब ढवळे, रमेश आढाव, ग्रामसेवक डी.बी. काळे यांनी संचलन केले. सिध्देश्वर केकाण यांच्यासह            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, यांच्यासह नागरिक महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
****-***