Thursday 31 October 2019

जालना येथे एकता दौड संपन्न जालना शहर वासियांना नोंदवला उत्स्फुर्त सहभाग जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन एकता दौडचा शुभारंभ



जालना, दि. 31 - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले एकता दौडला हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ केला.
याप्रसंगी  नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, सिद्धीविनायक मुळे, डॉ. सचदेव,  तहसिलदार श्रीकांत भुजबळ, उपअधिक्षक श्री. देशपांडे, उपशिक्षणधिकारी श्री. मापारी,  जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड, जिल्हा क्रिडा अधिकारी  श्रीमती प्रबोधिनी अमृतवाड, केशव कानफुडे, श्री. भोरे, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी आदींनी वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कायंदे यांनी केले. मस्तगड येथुन सुरु झालेली ही रॅली मंमादेवी, सुभाषचंद्र बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी पुतळा येथे येऊन विसर्जित करण्यात आली. या दौडमध्ये नुतन प्रशालेच्या विद्यार्थिनी,  फन रन ग्रुपचे सदस्य, एन.सी.सी. चे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस दलाचे जवान, यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. 



पदवीधर मतदारसंघ यादीत अधिकाधिक पदवीधरांनी मतदार म्हणुन नोंदणी करावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



जालना, दि. 31 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील मतदार यादी तयार करण्यात येत आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेले कोरे फॉर्म तहसिल कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात उपलब्ध असुन अधिकाधिक अर्हताधारक   पात्र  पदवीधरांनी  मतदार  म्हणुन  नोंदणी  करावी.  तसेच सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या अखत्यारित असलेल्या पदवीधर अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतदार म्हणुन नोंदणी करण्यासाठी पदवीधर प्रमाणपत्र, निवडणुक ओळखपत्र  आधारकार्ड  छायाचित्र आदी  कागदपत्रे  संबंधित  विभागात 6 नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
दवीधर मतदारसंघ मतदारयादी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी श्री परळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, विभाग प्रमुखांच्या अधिनस्‍त असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची पदवीधर मतदार यादीत नोंदणी होणे आवश्‍यक असून त्‍यानूसार त्‍या त्‍या कार्यालय प्रमुख यांनी संबधीत पात्र कर्मचा-यांचे न.पं.18 भरुन संबधीत तहसील कार्यालयात सादर करावेत.  पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी प्रत्‍येक निवडणूकीपूर्वी  नव्‍याने तयार करणे आवश्‍यक असल्‍यामुळे या मतदार संघातील सध्‍या अस्तीत्‍वात असलेल्‍या मतदार यादीत ज्‍या व्‍यक्‍तींची नांवे समाविष्‍ट आहेत अशा सर्व व्‍यक्‍तींनी देखील विहीत नमून्‍यात (नमूना नंबर 18) नव्‍याने अर्ज सादर करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील सर्व शाळा, हाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांना या मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत माहिती देऊन शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या सर्व पदवीधर शिक्षक व कर्मचारी तसेच पात्र पदवीधर विद्यार्थी यांची नाव नोंदणी करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या. या बाबत शिक्षणाधिकारी  यांनी त्‍यांचे अधिनस्‍त असलेले महाविदयालयीन प्राध्‍यापक, मुख्‍याध्‍यापक यांची बैठक आयोजित करुन मतदार यादीच्या नोंदणीबाबत सुचना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पदवीधर मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्हता
Ø  अर्हता :- प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरीक आहे त्या मतदारसंघातील सर्वसाधारणर हिवासी आहे. आणि ती व्यक्ती 1 नोव्हेंबर 2019 पुर्वी (म्हणजे अर्हता दिनांक) किमान 3 वर्ष भारतातील विदयापीठाचा पदवीधर असेल किंवा त्यांच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदारयादीमध्ये नांवसमाविष्ट करण्यासाठी पात्र आहे. तीन वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हताकारी पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असेल आणी तो विदयापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधिकरण यांच्याकडुन प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासुन मोजण्यात येईल.
Ø  विवाहीत महिला मतदारांचे शैक्षणिक कागदपत्रे ही पूर्वाश्रमीच्‍या नांवाने असल्‍याने त्‍यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र/पॅन कार्ड अर्जासोबत जोडावे. 
Ø  पदवीधर मतदार संघासाठी नव्‍याने मतदार यादया ( de-novo) तयार करावयाच्‍या असून मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 हा अर्हता दिनांक निश्चित केला आहे.   मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारांचे नमुना 18 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी सर्व तालुकांच्या महसूल मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार  हे त्यांच्याशी संबंधीत निर्वाचन क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत माहिती दिली. तसेच पदवीधर मतदार संघासाठी फक्‍त ऑफ लाईन पध्‍दतीने अर्ज स्विकारण्‍यात येणार आहेत याची आयोगाने घोषित केलेल्‍या कार्यक्रमानूसार दिनांक 6 नोव्‍हेंबर 2019 पर्यंत फॉर्म भरुन जमा करणे आवश्‍यक असल्‍याबाबत जाणीव करुन देण्‍यात येत आहे.तशी आपले अधिनस्‍त सर्व  संबधीत पात्र पदवीरधारक यांचे निदर्शनास आणावी, आदी माहितीही या बैठकीत देण्यात आली.
बैठकीस सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते



Monday 14 October 2019

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे तर्फे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन



                जालना, दि. 14 - भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य व स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा मतदार जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते रिबन कापून व व्हॅनला झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी फिल्ड आउटरिच ब्यूरो, औरंगाबादचे सहा. निदेशक, निखिल देशमुख, प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.
या             अभियानामध्ये फिरते प्रदर्शन वाहन व सांस्कृतिक (लोककला) कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिनांक 14 व 18 ऑक्टोबर पर्यंत जालना, परतूर, भोकरदन  बदनापुर मतदारसंघातील 15 ते 20 ठिकाणांना रोज हे फिरते प्रदर्शन वाहन भेट देईल. नागरिकांना मतदानाचे महत्‍व पटवून देण्‍याकरिता या महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.



स्वीपअंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न मतदानाचा हक्क बजावुन लोकशाही अधिक मजबुत करा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन



        जालना, दि. 14 – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान होत असुन या दिवशी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावुन लोकशाही अधिक मजबुत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. यावेळी गुरु गणेश विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी गीताच्या माध्यमातुन प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन केले.
            स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगासाठी मतदार जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी श्री बिनवडे बोलत होते. 
            यावेळी निवडणूक निरीक्षक श्री सहदेब दास, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हनुमंत गुट्टे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ, दिव्यांग आयकॉन निकेश मदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका सर्वांना ॲक्सीसेबल व्हाव्यात त्यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासन काम करत आहे.  दिव्यांगांना मतदानाच्यावेळी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  निवडणूक निरीक्षक श्री दास यांच्या प्रेरणेतुन मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दिव्यांगाचा समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातुन मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगत  दिव्यांगाचे आयकॉन असलेले निकेश मदारे हेही प्रत्येक ठिकाणी स्वत: उपस्थित राहून मतदानाविषयी जनजागृती करत असुन याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. गुरुगणेश विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर  सादर केलेल्या गीताची प्रशंसा करत लोकशाहीला मजबुत करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले.
            निवडणूक निरीक्षक श्री सहदेब दास म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करावी. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या  मतदान केंद्रावर कमी मतदान झाले अशा ठिकाणी जनजागृतीवर विशेष भर देण्यात यावा.  त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच दिव्यांगाचा समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातुन मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.