Sunday 6 October 2019

निवडणुक निरीक्षकांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती करा- निवडणूक निरीक्षक सहदेब दास


जालना,दि.6 - भारत निवडणूक आयोगाने परतूर व घनसावंगी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निरिक्षक (सामान्य) सहदेब दास यांनी जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणेकडून  निवडणूक पुर्व तयारीचा आढावा घेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्पीप मोहिमेंतर्गत मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री भाऊसाहेब जगताप, गणेश नि-हाळी, शिवकुमार स्वामी, श्रीमंत हारकर, शशीकांत हदगल यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
            निवडणूक निरीक्षक श्री सहदेब दास म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करावी. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या  मतदान केंद्रावर कमी मतदान झाले अशा ठिकाणी जनजागृतीवर विशेष भर देण्यात यावा.  त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच दिव्यांगाचा समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातुन मतदानाविषयी जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            निवडणुकीच्या पूर्वतयारीची माहिती देताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण 1653 मतदान केंद्र असुन यापैकी 38 मतदान केंद्र संवेदनशिल आहेत.  संवेदनशिल मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे.  मतदानाविषयी मतदारांमध्ये निबंध, रांगोळी स्पर्धा, रॅली या  माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असुन दिव्यांगासाठी निकेश मदारे यांची आयकॉन म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. श्री मदारे यांच्यामार्फतही विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, साहित्य, वाहने यासह इतर आवश्यक बाबींचे काटेकोर असे नियोजन करण्यात आले असुन निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली.
******* 



No comments:

Post a Comment