Saturday 16 September 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मानवंदना



मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मानवंदना
        जालना, दि. 17 –  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. जिल्हयात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
            शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास आज मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेशही दिला.
            याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रामश्वरजी दायमा, सुभद्राबाई शंकरराव देशमुख, आशाबाई मदनलाल चरमरे, प्रभावती गजानन जोशी, जानीबाई माणिकचंद कटारे, प्रयागबाई हरिशचंद्र हावळे, मालनबाई विठ्ठलराव चव्हाण, जाईबाई, खंडेराव खलसे, मालनबाई राजाराम बरवे, राणीरक्षा अब्दुल अजीज खॉ, कांताबाई विश्वंभरराव मिटकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे,  नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर  गांधीचमन जवळील आठवडी बाजार परिसरात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याबरोबरच स्वच्छतेचा उपक्रमही राबविण्यात आला.
***-***  



Friday 8 September 2017

जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे पाठपुरावा करुन सोडवणार - पालकसचिव श्री वाघमारे



जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेली
प्रकरणे पाठपुरावा करुन सोडवणार - पालकसचिव श्री वाघमारे
            जालना, दि. 8शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्याबरोबर जिल्ह्यात विकासाची अनेकविध कामे सुरु आहेत. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
            जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मागदर्शन करताना श्री वाघमारे बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री वाघमारे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेकविध योजना आहेत.  या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याबरोबरच  रमाई आवास योजनेच्या माध्यमातुन अनुसूचित जाती, जमातीच्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना येत्या 2019 पर्यंत घरे देण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असुन त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विशेष घटक योजनेंतर्गत विकास कामांसाठी देण्यात येणारे अनुदानाच्या वितरणाचे अधिकार हे प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत.  त्यामुळे या योजनेचा निधी संपूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
            संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला असुन जालना जिल्हाही यामध्ये मागे राहता कामा नये.  यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत शौचालयांची देखभाल व दुरुस्ती बरोबरच त्याचा वापरही नियमित व्हावा यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक शौचालायापेक्षा वैयक्तिक शौचालय उभारणीवर भर देण्यात यावा.
केवळ शौचालयांची उभारणी करुन चालणार नाही तर त्याचा नियमितपणे वापर होण्याच्यादृष्टीकोनातुन नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या सुचनाही श्री वाघमारे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी पालकसचिव श्री वाघमारे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, जलसाठा, पीकविमा, पीककर्ज, जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, जिल्हा वार्षिक योजना निधी, मग्रारोहयो, ई-7/12, ई-फेरफार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यासह विविध विकास कामांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत जिल्ह्यातील विकास कामे गतीने करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी जिल्ह्यात विविध विकास कामांची माहिती पॉवर पाँइटच्या माध्यमातुन पालकसचिवांना दिली.
            या बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******

Tuesday 5 September 2017

तरुणांनी स्वयंरोजगाराच्यामाध्यमातुन उद्योजक बनावे प्राचार्य श्री गायकवाड यांचे संवादपर्व कार्यक्रमात आवाहन



तरुणांनी स्वयंरोजगाराच्यामाध्यमातुन उद्योजक बनावे
प्राचार्य श्री गायकवाड यांचे संवादपर्व कार्यक्रमात आवाहन

            जालना, दि. 5         आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता तांत्रिक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.आर. गायकवाड यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी श्री गायकवाड बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, माहिती सहाय्यक अमोल महाजन, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस. जुमनाके आदींची उपस्थिती होती.
            श्री गायकवाड म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना विविध व्यवसायावर अधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. आजच्या वाढत्या मागणीनुसार युवतींसाठीही फॅशन डिझायनिंगसारखे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनले असुन विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचेही श्री गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
             प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान यासह विविध योजनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत.  कौशल्यावर आधारित तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजने अंतर्गत विनातारण 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने तरुणांनी या संधीचा अधिकाधिक प्रमाणात फायदा घेण्याचे आवाहनी श्री गायकवाड यांनी यावेळी केले.
            जिल्हा माहिती अधिकारी श्री बावस्कर यांनी गणेशोत्सवाच्या काळामध्ये संवादपर्व या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमाद्वारे तसेच विविध वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कशा प्रकारे करण्यात येते याची सविस्तर माहिती दिली.
            कार्यक्रमाचे संचलन व आभार गटनिदेशक एस.जी तोंडारे यांनी केले. 
            कार्यक्रमास प्रशिक्षण संस्थेतील गटनिदेशक बी.डी. वाणी, आर.एस. साळवे, डी.के. करंगळे, बी.एस. आर्दड, पी.डी. जुंजे श्रीमती ए. एम. कुलकर्णी, पी.यु. खताडे, जी.डी. केवट यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
***-***