Friday 8 September 2017

जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे पाठपुरावा करुन सोडवणार - पालकसचिव श्री वाघमारे



जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेली
प्रकरणे पाठपुरावा करुन सोडवणार - पालकसचिव श्री वाघमारे
            जालना, दि. 8शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्याबरोबर जिल्ह्यात विकासाची अनेकविध कामे सुरु आहेत. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
            जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मागदर्शन करताना श्री वाघमारे बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री वाघमारे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेकविध योजना आहेत.  या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याबरोबरच  रमाई आवास योजनेच्या माध्यमातुन अनुसूचित जाती, जमातीच्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना येत्या 2019 पर्यंत घरे देण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असुन त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विशेष घटक योजनेंतर्गत विकास कामांसाठी देण्यात येणारे अनुदानाच्या वितरणाचे अधिकार हे प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत.  त्यामुळे या योजनेचा निधी संपूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
            संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला असुन जालना जिल्हाही यामध्ये मागे राहता कामा नये.  यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत शौचालयांची देखभाल व दुरुस्ती बरोबरच त्याचा वापरही नियमित व्हावा यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक शौचालायापेक्षा वैयक्तिक शौचालय उभारणीवर भर देण्यात यावा.
केवळ शौचालयांची उभारणी करुन चालणार नाही तर त्याचा नियमितपणे वापर होण्याच्यादृष्टीकोनातुन नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या सुचनाही श्री वाघमारे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी पालकसचिव श्री वाघमारे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, जलसाठा, पीकविमा, पीककर्ज, जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, जिल्हा वार्षिक योजना निधी, मग्रारोहयो, ई-7/12, ई-फेरफार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यासह विविध विकास कामांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत जिल्ह्यातील विकास कामे गतीने करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी जिल्ह्यात विविध विकास कामांची माहिती पॉवर पाँइटच्या माध्यमातुन पालकसचिवांना दिली.
            या बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******

No comments:

Post a Comment