Thursday 30 November 2023

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद ; शेतकऱ्यांनी चिंता करु नये, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

 


 

जालना, दि. 30  (जिमाका) – जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांत  अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांची आज राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली व  शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. दरम्यान, झालेल्या पिक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

            बदनापूर तालुक्यातील राजेवाडी शिवार परिसरातील मोसंबी, डाळिंब व इतर नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

            पालकमंत्री म्हणाले की, तीन दिवसांत झालेला अवेळी पाऊस व  वादळी वाऱ्याने जिल्हयात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  3  हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठीही सर्वतोपरी प्रतत्न केले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करु नये, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे.

-*-*-*-*-*-

अवेळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा - पालकमंत्री अतुल सावे पिक नुकसानीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न

 





 

जालना, दि. 30 (जिमाका) :- जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, डाळींब या फळपिकांसह कापूस, ज्वारी, हरबरा यासह इतरही पिकांचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल म्हणाले की, अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर सरसकट सर्वच शेतपिकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करावा. अधिवेशनापुर्वीच यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु. शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रलंबित ई-केवायसीचे कामही जलदगतीने पूर्ण करुन घ्यावे. पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे असून मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या प्रलंबित पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच पिक विमाची प्रक्रीया करताना काही त्रुटी आढळल्यास त्या दूर कराव्यात. तसेच मागील वर्षीचे अतिवृष्टीमुळे प्रलंबित पिक नुकसानीचे पैसेही शेतकऱ्यांना अदा करावेत.

प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाव्दारे जिल्हयातील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहिती दिली.

 

-*-*-*-*-*-

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल -- पालकमंत्री अतुल सावे

 




जालना, दि. 30 (जिमाका) – केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जालना जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सुखी जीवनासाठी कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेत आज बदनापूर तालुक्यातील ढासला या गावात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास आमदार नारायण कुचे,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सरपंच राम पाटील, उपविभागीय अधिकारी  श्रीमंत हारकर, तहसिलदार सुमन मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा कृषी अधिक्षक गहिनीनाथ कापसे, गट विस्तार अधिकारी ज्योती राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासन हे लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवित आहे. उज्वला गॅस, जनधन योजना, आयुष्यमान योजना या सारख्या योजनांमुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये समाधान निर्माण झाले आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत असल्याने भ्रष्टाचारालाही आळा बसला आहे. राज्यशासनाच्या विविध योजनांचीही प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्यशासन जनतेच्या पाठीशी असून अवेळी पावसाने झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी दु:खी होऊ नये, त्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचे लाभ वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. अनेक शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत, वंचित व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उद्देश हा विकसित भारत संकल्प यात्रेचा आहे. ग्रामीण/शहरी/नगरपालिकास्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-

 

 

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 30 (जिमाका) :-   सध्या मराठा आरक्षण आंदोलन अनुषंगाने  जिह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. तसेच दि. 1 डिसेंबर 2023 रोजी मराठा समाजातर्फे आरक्षण सभा आयोजीत केलेली आहे. दि. 6 डिसेंबर 2023 रोजी आयोध्या, बाबरी मस्जीद मुस्लीम समाजातर्फे काळा दिवस, हिंदु धर्मीयांचा विजय दिवस, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिवर्तन दिन असल्याने विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातात. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण  व धनगर समाज आरक्षण मिळावे या मागणीसाठी  जिल्ह्यामध्ये विविध स्वरुपाचे आंदोलने करीत आहे.

     तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द विविध कारणास्तव आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकरता येत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच

अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.1 डिसेंबर 2023 रोजीच्या 7.00 वाजेपासुन ते  दि. 14 डिसेंबर 2023  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-        

 

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

 


 

 जालना दि. 30 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनूसार जिल्हा परिषद शाळा, जालना येथे दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात संपन्न झाले.

शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ आणि उपशिक्षणाधिकारी श्री. सेवलीकर आदि उपस्थित होते.         प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मोहिते यांनी पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 या विषयी माहिती सांगितली. कायदेशीर प्रकियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबून कायदेशीर चौकट पुरवण्यासाठी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 तयार करण्यात आला आहे. हा कायदा तयार करतांना बालक प्रथम या तत्वाचा अंगीकार करण्यात आला असे त्यांनी सांगितले. बालकांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन घडल्यास त्याबाबत आपल्या जवळच्या व्यक्तीकडे त्वरित सांगावे. तसेच अशा व्यक्तींने त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असेही सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

1 डिसेंबरला जालना शहराजवळील प्रमुख रस्ते मार्गावरील जड वाहतूकीच्या मार्गात बदल

 


जालना दि. 30 (जिमाका) :-  सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील पांजरपोळ मैदान येथे दि.1 डिसेंबर 2023 रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येवून मोटार सायकल रॅली काढणार आहेत. तरी या मोटार सायकल रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतुकीचे नियमन व नियंत्रण होणे गरजेचे आहे. तरी 1 डिसेंबर 2023 रोजी जालना शहराजवळील प्रमुख रस्ते मार्गावरील जड वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जालना शहरातील वाहतुक खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये अंबड-जालना मार्गे राजूर- भोकरदन मार्गावरील जड वाहतुक अंबड-पारनेर-किनगाव-बदनापूर-निकळक अकोला-चनेगाव-राजूर मार्गे भोकरदनकडे जाईल व येईल. मंठा-जालना मार्गे राजूर-भोकरदन मार्गावरील जड वाहतुक अंबड-जालना-कन्हैयानगर चौफुली- देऊळगाव राजा मार्गे राजूर-भोकरदकडे जाईल व येईल. भोकरदन-राजुर-जालना मार्गावरील जड वाहतुक भोकरदन-राजुर-देऊळगाव राजा मार्गे जालनाकडे जाईल व येईल. देऊळगाव राजा ते  छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जड वाहतूक देऊळगाव राजा-राजूर-हसनाबाद-फुलंब्री मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल व येईल. मंठा ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जड वाहतूक मंठा-वाटुर फाटा-परतूर-आष्टी-कु.पिंपळगाव-घनसावंगी-अंबड-शिरनेर-पाचोड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल व येईल. सिंदखेड राजा ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जड वाहतूक सिंदखेड राजा- देऊळगाव राजा-राजूर-चनेगाव-निकळक अकोला-बदनापूर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल व येईल. तसेच सिंदखेड राजा   देऊळगाव राजा - अंबड- बीड मार्गावरील जड वाहतूक देऊळगाव राजा- अकोला देव-राजूर-चनेगाव-बदनापूर-किनगाव-पाचोड मार्गे जाईल व येईल. जालना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी या अधिसुचनेची प्रत चिटकावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 


जालना दि. 30 (जिमाका) :- जागतिक कौशल्य स्पर्धा  सन 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे होणार असून याकरीता  जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर  स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धेत नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर, 2023 पर्यंत आहे.  तरी  स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी www.kaushalya.mahaswayam.gov.in किंवा https://www.skillindiadigital.gov.in/home या लिंकवर भेट देऊन नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा,  असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

सदर स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये  भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन  करण्याच्या दृष्टीने जालना जिल्हयातील युवक-युवतींनी  विविध 52 क्षेत्रामध्ये होणा-या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in किंवा https://www.skillindiadigital.gov.in/home या वरील वेबपोर्टलवर संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.          यापुर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधुन 50 देशातील 10000 उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवडयासाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रांन्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे.

            जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००२ किंवा तद्नंतरचा असावा. तसेच, आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन & वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकीता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.   

          याप्रमाणे, फ्रांन्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हा, विभाग, राज्य, आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व  शासकीय आणि खाजगी औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम/हॉस्पिटेलिटी इंस्टीट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था,  कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी कडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने  यांचेकडील  विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल.  तसेच, या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

           

 

Wednesday 29 November 2023

जागतिक एडस दिनानिमित्त रॅलीसह विविध स्पर्धेंचे आयोजन

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :- 1 डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तरी दि.1 डिसेंबर 2023 हा जागतिक एडस दिनानिमित्त युवा वर्गामध्ये एचआयव्ही, एडस संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत रेड रिबन क्लबच्या सदस्यासह जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थींनींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

1 डिसेंबर 2023 रोजी जागतिक एडस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम स्पर्धां पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुगणालये व उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे 1 डिसेंबर 2023 रोजी प्रभातफेरी सकाळी 9 वाजता काढण्यात येईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून एचआयव्ही/एडस जनजागृती, माझ्या स्वप्नातील भारत आणि स्त्री-पुरुष समानता या विषयावर दि.1 ते 15 डिसेंबर या कालावधीत चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात येतील. तसेच कविता व निबंध लेख स्पर्धा ग्रह पृथ्वी माझे घर, माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिण, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिन, माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर घेण्यात येईल. रेड रिबन क्लबकडून दि.1 ते 15 डिसेंबर या कालावधीत सर्व कनिष्ठ व वरिष्‍ महाविद्यालयात मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळास एचआयव्ही/एडस पासून संरक्षण, एचआयव्ही/एडसचे संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही/एडस प्रतिबंध व कायदा -2017 तसेच एचआयव्ही/एडस जनजागृती टोल फ्री क्रमाक 1097 या विषयावर पोस्टर मेकिंग, सोशल मीडिया पोस्ट मेकिंग, डिजिटल पोस्टर, प्रश्नमंजूषा, रिल मेकिंग फेस पेंटींग, रांगोळी, निबंध लेखन, कविता लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच कालावधीत तालुकास्तरावरील महाविद्यालयात व्याख्यान व माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

-*-*-*-*-

जालना येथे मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती-जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन             दि.1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक व विभागीय अधिकारी डी.यु. थावरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जालना आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत निःशुल्क 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमांचे सविस्तर माहिती मिळण्याच्या दृष्टीने दि. 1  डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, (सभागृह) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना मो.९६८९६७३९४२, ९५७९२६४८६८ यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

नवमतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थांशी संवाद; महाविद्यालयीन स्तरावर 8 डिसेंबरपर्यंत विशेष शिबीर

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :- नवमतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर दि. 8 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा जिल्ह्यातील वय वर्ष अठरा पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीत नवमतदार नावनोंदणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी धरती जनसेवा प्रतिष्ठान कॅम्पसमधील ओजस कॉलेज ऑफ फार्मसी याठिकाणी आयोजित विशेष शिबीरास भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यात नवमतदार नाव नोंदणीसाठी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन प्रथमच करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहायक मतदार यादी निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार, समर्पित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी आसावरी काळे, डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भागवत शिंदे, प्राचार्य डॉ. विठ्ठल कुचके, प्राचार्या डॉ. मिनल ठोसर, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य विजय जराड, महसुल सहाय्यक अनिरुद्ध जुंबड, तालुका  स्वीप समन्वयक सतिष पडघन यांच्यासह जालना तहसील स्वीप कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

1 डिसेंबर रोजीच्या मोटार सायकल रॅलीनिमित्त वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील पांजरपोळ मैदान येथे दि.1 डिसेंबर 2023 रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येवून मोटार सायकल रॅली काढणार आहेत. तरी या मोटार सायकल रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतुकीचे नियमन व नियंत्रण होणे गरजेचे आहे. तरी याकरिता खालील मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरातील वाहतुक खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगरकडुन जालना मोतीबाग बायपास रोडने अंबड, घनसावंगी व मंठा कडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पॉईन्ट, बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. (मोटार सायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासुन समोर गेल्यावर ग्रेडर टी पॉईन्ट पासुन बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मार्ग नाव्हा मंठा, अंबड चौफुलीकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येऊन ती वाहतुक पुर्ववत सिटीझन टी पॉईन्ट, मोतीबाग मार्गे अंबड - मंठा, नाव्हा - देऊळगावराजा कडे जाईल व येईल.) नुतन वसाहत, शनि मंदीर, मार्ग नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. रेल्वे स्टेशन कडुन गांधी चमन, मंमादेवी मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.

गणपती गल्ली, दिपक हॉस्पिटल, माळीपुराकडुन येणारी व गांधी चमन मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही मोटार सायकल रॅली पुढे जाई पर्यंत थांबविण्यात येईल व मोटार सायकल रॅली पुढे गेल्यावर शनि मंदीर किंवा रेल्वे स्टेशन मार्गे अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. बसस्थानक, सिंधी बाजार, सदर बाजार, बडी सडक परीसरातुन येणारी व जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही जिजामाता प्रवेशद्वार, मंठा चौफुली, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल. मंगळ बाजार, गोल मस्जिद, चमडा बाजार, पंचमुखी महादेव मंदिर या परिसरातील वाहतुक सुभाष चौक मार्गे जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही राजमहेल टॉकीज समोरील पुलावरुन,ग्लोबल गुरुकुल शाळा, बायपास रोड, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल.  संभाजीनगर भागातून बसस्थानक मार्गे सदर बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंठा चौफुलीकडे जाणारी वाहतुक ही गोल्डन जुब्ली स्कुल, संतोषी माता रोड, विवेकानंद हॉस्पिटल, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. सिटीजन पॉईन्ट, दुःखी नगर, रामतिर्थ भागातून बसस्थानक मार्गे शहरात येणारी वाहतुक ही भोकरदन नाका येथे मोटार सायकल रॅली नवीन मोंढा रोडकडे पास होईपर्यंत थांबविण्यात येईल व नंतर पुर्ववत भोकरदन नाका बसस्थानक मार्गे वाहतुक सुरु करण्यात येईल. आदेश दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपासून मोटार सायकल रॅली संपेपर्यत अंमलात राहील. जालना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी या अधिसुचनेची प्रत चिटकावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

समाज कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन रविवार दि.26 नाव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता समाज कल्याण कार्यालय, जालना येथे साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ,  सेवानिवृत्त उपप्राचार्य बी. वाय. कुलकर्णी, आणि कार्यक्रमाचे आयोजक समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदिप भोगले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी संविधानाचे महत्व उपस्थितांना सांगितले आणि संविधानाने आपणास मतदानाचा हक्क दिला आहे तो आपण बजावला पाहिजे तसेच नैतिक मुल्ये आपण आपल्या आयुष्यात पाळले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी वर्षा मोहिते यांनी अध्यक्षीय भाषण केले. आपले दैनंदिन कामकाज करतांना संविधानातील मुल्यांचा व कर्तव्यांचा आपण प्रमाणिकपणे अंगीकार केला पाहिजे व आपल्या अधिकाराबाबत जागृत राहतांना आपल्या कर्तव्याचा देखील आपल्याला विसर पडता कामा नये असेही सांगितले.

कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक प्रदिप भोगले यांनी केले त्यानंतर कार्यकमाचे प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले दैनंदिन कामकाज करतांना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या गरीब आणि गरजु व्यक्ती ज्या की न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांचा खर्च करू शकत नाही त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत मोफत विधी सल्ला आणि मोफत वकील दिले जातात याची माहिती द्यावी असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमास जिल्हा न्यायालय आणि समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा संपन्न


 

जालना, दि. 29 (जिमाका) :- सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना येथे मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात आली. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सायबर सुरक्षा तज्ञ अॅड.स्वरदा कबनुरकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक आयुष नेपानी, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

कार्यकमाची प्रस्तावना प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाविषयी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली. सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन कामकाज करतांना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या गरीब आणि गरजु व्यक्ती ज्या की न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांचा खर्च करू शकत नाही त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत मोफत विधी सल्ला आणि मोफत वकील दिले जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. स्वरदा कबनुरकर यांनी म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात मोबाईल कसा हाताळला पाहिजे आणि हाताळताना कशी काळजी घ्यावी. मोबाईलमध्ये कोणते अॅप्लिकेशन घेतले पाहिजे आणि त्याची परवानगी अॅक्सेस दिला पाहिजे याबद्दल त्यांनी सांगितले तसेच आपल्या मोबाईलमध्ये आपण अॅटी व्हायरस हे अॅप्लिकेशनचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध गुन्ह्यांमध्ये तपास कसा करावा आणि सायबर गुन्हे यांना आळा कसा घालावा याविषयी माहिती सांगितली. कार्यकमाचे सुत्रसंचालन हे अॅड. यश लोसरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. योगेश खरात यांनी केले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

महारेशीम अभियानातंर्गत भोगगाव येथे शेतकरी चर्चासत्र शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी वेळेत नोंदणी करावी - रेशीम उपसंचालक एम.बी. ढवळे

 


जालना, दि. 29 (जिमाका) :- रेशीम उद्योगातुन दरमहा वेतनप्रमाणे हमखास उत्पन्न मिळते, मनरेगा अंतर्गत एक एकर करीता 3.97 लाख रूपये अनुदान देण्यात येते. जे शेतकरी मनरेगा योजनेस पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्यांना ‘सिल्क समग्र’ या योजनेतून अनुदान देण्यात येते त्यामुळेच आता सर्व वर्गातील रेशीम ऊद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी वेळेत नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले. 

महारेशीम अभियान अंतर्गत सोमवार दि.27 नोव्हेंबर रोजी शेतकरी चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास नागपूर रेशीम संचालनालय उपसंचालक महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरीष्ठ क्षेत्र सहायक शरद जगताप, रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी भाऊसाहेब निवदे व मोठ्या प्रमाणावर भोगगाव, बाणेदार, शेवता येथील शेतकरी उपस्थित होते.

      रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते म्हणाले की,  जालना येथील रेशीम कोष बाजारपेठेत इतर जिल्ह्यातील शेतकरी जास्तीचे  वाहतूक भाडे खर्च करून कोष विक्री करण्यासाठी येतात असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे सांगितले.  नागपूर येथून उपसंचालक भोगगावात मार्गदर्शन करणेसाठी आल्यामुळे शासनाने खऱ्या अर्थाने या गावाची दखल घेतली आहे. ऊस पिकातून 18  महिन्यांनी उत्पादन मिळते, रेशीम पिकापासुन शेतकरी दरमहा उत्पादन घेत आहेत. त्यामुळे महारेशीम अभियानांतर्गत दि.20 डिसेंबर 2023 पुर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन केले. रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त भाऊसाहेब निवदे यांनी रेशीम शेतीतील आपला अनुभव व फायदे सांगितले.

भोगगाव येथील सरपंच ऊध्दव मुळे म्हणाले की,  भोगगाव येथील युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता तूती लागवड करून दरमहा कमाई करावी असे सांगितले. माजी सरपंच  ज्ञानोबा  मुळे यांनी भोगगावमध्ये सर्व शेतकऱ्यांना बारमाही सिंचन सुविधा ऊपलब्ध असून सर्वच शेतकऱ्यांनी तुती लागवड करून जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिमाशंकर मुळे यांनी गावातील लोकांनी तुती लागवड केल्यास ऊत्पादनात वाढ झाल्यामुळे तंटाच राहणार नाही असे मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमास बाणेगावचे सरपंच बालाजी ऊढाण यांच्यासह गावकरी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेअरमन रामभाऊ जंगले यांनी केले.

-*-*-*-*-

Tuesday 28 November 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली जालना जिल्ह्यात; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले उदघाटन जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरकारच्या योजना घेऊन पोहचेल यात्रा ▪विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना ग्रामपंचायत स्तरावर दिली जाणार - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

 






जालना , दि.27  ( जिमाका) : ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत  देशाच्या सर्व भागात जाणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना ग्रामपंचायत स्तरावर  दिली जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

       जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाचा शुभारंभ  करण्यात आला. या यात्रेच्या रथांना श्री. दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या ' विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

       श्री. दानवे म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2023 या कालावधीत  गरीबांसाठी, शेतकरी व तरुणांसाठी जी विकासाची कामे झाली आहेत, ही सर्व कामे जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांची माहितीही या यात्रेच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आपला भारत देश विकसनशील देश असून आपल्याला विकसित देशाच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्या दृष्टीने पुढील 25 वर्षाचा विचार करून पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार नारायण कुचे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

       जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली, त्याअंतर्गत पंचवार्षिक योजना पुढील पाच वर्षाचा विकास व प्रगतीचा दृष्टीकोन समोर ठेवून कार्यान्वित करण्यात येत असतात. हा पाच वर्षाचा आराखडा देशपातळीवर प्रभावीपणे राबविण्यात येवुन विकास साधला जातो. ‘विकसित भारत संकल्प यात्रे'च्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत. या योजनांचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा.

 ‘विकसित भारत संकल्प यात्रा’या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा मुळ उद्देश आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                                                        -*-*-*-*-

सामाजिक न्याय भवनात संविधान दिन सोहळा उत्साहात संपन्न

 







 

जालना, दि. 26 (जिमाका) - संविधान दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विदयमाने आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते. प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे  सामुहिक वाचन करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात भारतीय राज्यघटनेची मुलभूत तत्वे व वैशिष्टये विषद करुन राज्यघटनेचे महत्वाचे अंग म्हणून न्यायपालिकेचे अधिकार व कर्तव्ये यावर भाष्य केले. त्यांनी  सांगितले की, घटनाकारांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांचे अधिकार संरक्षित केले आहेत. करीता न्यायपालिकेतील न्यायाधीशांनी या घटकांचे अधिकार अबाधीत राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांचे मुलभूत अधिकार व त्यांची मुलभूत कर्तव्ये यावर भर देताना नागरिकांनी मुलभूत अधिकारासोबतच आपल्या कर्तव्याबाबतही जागरुक राहण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की, भारतीय राज्यघटनेला फार मोठा इतिहास आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, अमेरिका, कॅनडा अशा जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करुन आपल्या देशातील सर्व घटकांना न्याय देणारी राज्यघटना तयार केली. त्यामुळे अनेक प्रकारची विविधता असताना आपला भारत देश एकसंध राहण्यास मोठया प्रमाणात मदत झाली आहे, असे सांगितले.

प्रमुख व्याख्याते सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी भारतीय संविधानावर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्यकक्षा व कार्यपध्दती याबाबत सविस्तर माहिती देवून समाजातील गरीब व दुर्बल घटकांना त्यांचे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक सहायक आयुक्त, समाजकल्याण, प्रदिप भोगले यांनी केले. तर मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, भोकरदन येथील मुख्याध्यापक रघूनाथ  खेडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, विधिज्ञ, जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-