Tuesday 28 November 2023

सामाजिक न्याय भवनात संविधान दिन सोहळा उत्साहात संपन्न

 







 

जालना, दि. 26 (जिमाका) - संविधान दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विदयमाने आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते. प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे  सामुहिक वाचन करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात भारतीय राज्यघटनेची मुलभूत तत्वे व वैशिष्टये विषद करुन राज्यघटनेचे महत्वाचे अंग म्हणून न्यायपालिकेचे अधिकार व कर्तव्ये यावर भाष्य केले. त्यांनी  सांगितले की, घटनाकारांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांचे अधिकार संरक्षित केले आहेत. करीता न्यायपालिकेतील न्यायाधीशांनी या घटकांचे अधिकार अबाधीत राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांचे मुलभूत अधिकार व त्यांची मुलभूत कर्तव्ये यावर भर देताना नागरिकांनी मुलभूत अधिकारासोबतच आपल्या कर्तव्याबाबतही जागरुक राहण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की, भारतीय राज्यघटनेला फार मोठा इतिहास आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, अमेरिका, कॅनडा अशा जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करुन आपल्या देशातील सर्व घटकांना न्याय देणारी राज्यघटना तयार केली. त्यामुळे अनेक प्रकारची विविधता असताना आपला भारत देश एकसंध राहण्यास मोठया प्रमाणात मदत झाली आहे, असे सांगितले.

प्रमुख व्याख्याते सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी भारतीय संविधानावर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्यकक्षा व कार्यपध्दती याबाबत सविस्तर माहिती देवून समाजातील गरीब व दुर्बल घटकांना त्यांचे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक सहायक आयुक्त, समाजकल्याण, प्रदिप भोगले यांनी केले. तर मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, भोकरदन येथील मुख्याध्यापक रघूनाथ  खेडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, विधिज्ञ, जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment