Thursday 9 November 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बालदिन व राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

 जालना दि. 9 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनूसार अल्लामा इकबाल उच्च माध्यमिक शाळा, जालना येथे मंगळवार दि.7 नोव्हेंबर 2023 रोजी बालदिन व राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.

शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ आणि सहदिवाणी न्यायाधीश निलीमा वानखेडे आदि उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मोहिते यांनी पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 या विषयी माहिती सांगितली. कायदेशीर प्रकियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबून कायदेशीर चौकट पुरवण्यासाठी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 तयार करण्यात आला आहे. हा कायदा तयार करतांना बालक प्रथम या तत्वाचा अंगीकार करण्यात आला असे त्यांनी सांगितले. बालकांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन घडल्यास त्याबाबत आपल्या जवळच्या व्यक्तीकडे त्वरित सांगावे. तसेच अशा व्यक्तींने त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असेही सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती भारसाकडे यांनी आपला न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास विद्यार्थांना सांगितला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात कसे पुढे गेले पाहिजे आणि त्यासाठी आपण खुप खुप मेहनत घेतली पाहिजे. आयुष्यात कितीही दुःखद प्रसंग आले तरीही न डगमगता आपण आपल्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे तसेच मनापासून जर आपण ठरवलेल्या ध्येयाच्या मागे लागलो तर यश निश्चितच आपले आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीस सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती वानखडे यांनी बाल न्याय मुलाची काळजी आणि संरक्षण कायदा, 2015 विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावुन सांगितला. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment