Thursday 30 November 2023

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद ; शेतकऱ्यांनी चिंता करु नये, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

 


 

जालना, दि. 30  (जिमाका) – जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांत  अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांची आज राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली व  शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. दरम्यान, झालेल्या पिक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

            बदनापूर तालुक्यातील राजेवाडी शिवार परिसरातील मोसंबी, डाळिंब व इतर नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

            पालकमंत्री म्हणाले की, तीन दिवसांत झालेला अवेळी पाऊस व  वादळी वाऱ्याने जिल्हयात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  3  हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठीही सर्वतोपरी प्रतत्न केले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करु नये, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment