Wednesday 29 March 2023

शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :-   चालु शैक्षणिक वर्षात औरंगाबाद, जालना, बीड, व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला- मुलींना इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे . तरी जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2023-2024 या वर्षासाठी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज दि.30 एप्रिल 2023 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद या कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन औरंगाबादच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्र्य रेषा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही 1 लाख रुपये एवढी असुन अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समंतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्याचे पालक शासकीय अथवा निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असुन दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत परिपुर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे. तरी या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यावर होणारा संपुर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेणेसाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, औरंगाबाद येथे संपर्क साधावा. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घ्यावा. असे  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने 30 मार्च रोजी जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

 

 

जालना दि. 29 (जिमाका) :- श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने दि.30 मार्च 2023 रोजी जालना शहरात पारंपारिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीच्या वेळी मिरवणूकीस अडथळा निर्माण होवू नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी करुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यादृष्टीने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तरी श्रीराम नवमी उत्सवाच्या  मिरवणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे. याबाबतचे  आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जारी केले आहेत.

आदेशानूसार गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी श्री राम नवमी उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने वाहतुक नियमन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.  1) मोतीबाग कडुन शनिमंदीर गांधीचमन मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मोतीबाग, सिटीझन टी पॉईन्ट, भोकरदन नाका, बसस्थानक या मार्गे जाईल व येईल. 2) अंबड चौफुली नुतन वसाहत कडुन शनिमंदीर गांधीचमन मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मोतीबाग , सिटीझन टी पॉईन्ट , भोकरदन नाका , बसस्थानक या मार्गे जाईल व. 3) रेल्वे स्टेशन , नगर परीषद , गांधीचमन मार्गे मंमादेवी व नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही रेल्वे स्टेशन, नुतन वसाहत, अंबड चौफुली, मंठा चौफुली , नाव्हा चौफुली , जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. 4) माळीपुरा, दिपक हॉस्पीटल , टाऊन हॉल परीसरातील गांधी चमन मार्गे मंमादेवी , नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही दिपक हॉस्पीटल जवळुन जामा मस्जीद चौक , कैकाडी मोहल्ला , राजाबाग सवार दर्गा , रामतीर्थ मार्गे किंवा जामा मस्जीद चौक , विठ्ठल मंदीर , पेशवे चौक , लक्कड कोट मार्गे जाईल व येईल. 5) रेल्वे स्टेशन , निरामय हॉस्पीटल, मंमादेवी मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही निरामय हॉस्पीटल जवळुन सुभद्रा नगर, ग्लोबल गुरुकुल , मंठा चौफुली, नाव्हा चौफुली , जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. 6) बसस्थानकावरुन , फुलंब्रीकर नाट्यगृह आणि, ट्राफीक ऑफीस रोडकडुन येणारी व सुभाष चौक मार्गे मंमादेवी, जुना जालना मध्ये जाणारी वाहतुक ही बसस्थानकवरुन, लक्कडकोट, पेशवे चौक, विठ्ठल मंदीर, जामा मस्जीद चौक, दहपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ , राजाबाग सवार दर्गा, कैकाडी मोहल्ला, जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल. 7) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुर्तीवेस , सराफा बाजार , काद्राबाद , पाणीवेस , सुभाषचौक मार्गे मंमादेवी, जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही गुरु गोविंदसींग नगर, रामनगर, गांधी नगर, बायपास रोड अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल किंवा मंगळ बाजार , चमडा बाजार , राजमहेल टाँकीज जवळील पुलावरुन, ग्लोबल गुरुकुल, अंबड चौफुली , नुतन वसाहत मार्गे जाईल. किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन सुभद्रा नगर , सोनल नगर , निरामय हॉस्पीटल मार्गे जाईल व येईल. 8) सदर बाजार, सिंधी बाजार, रहेमान गंजकडुन येणारी व मामा चौक मार्गे, सुभाष चौक, मंमादेवी जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही जुना मोंढा, दिपक वाईन शॉप , बसस्थानक , लक्कडकोट, पेशवे चौक , विठ्ठल मंदीर , जामा मस्जीद चौक , दिपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ , राजाबाग सवार दर्गा , कैकाडी मोहल्ला , जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल. 9) मंठा चौफुली , गुरुबचन चौक कडुन येणारी व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे बडीसडक, सदर बाजार बसस्टँण्डकडे जाणारी वाहतुक ही गुरुबचन चौक, जिजामाता प्रवेशद्वार, झाशीची राणी पुतळा मार्गे जाईल व येईल. 10) रामनगर , गांधी नगर येथुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे बडी सडक, सदर बाजार, जवाहरबाग चौकीकडे जाणारी वाहतुक ही रामनगर, आझाद मैदान, गुरुबचन चौक, जिजामाता प्रवेशद्वार, झाशीची राणी पुतळा, जेईएस कॉलेज, बाबुराव काळे चौक मार्गे जाईल व येईल. गुरुवार दि.30 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजेपासून श्रीराम नवमी उत्सव मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात  निर्गमित करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात 3 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


 

        जालना दि. 29 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याचे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे निर्देश दिलेले आहेत. तरी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवार दि. 3 एप्रिल  2023 रोजी सकाळी ठिक 10 ते 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  अशी माहिती  उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यांतील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व सदर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यत दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन सुचीत केलेले आहे. कोणत्याही  स्तरावर लोकशाही दिनात  न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.   तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोचपावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागद पत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्यात अर्ज  https:jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Tuesday 28 March 2023

कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान वालसा डावरगावचे शेतकरी बनले लखपती

 





जालना, दि. 28  (जिमाका) – कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी  वरदान ठरत आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील अनेक शेतकरी रेशीम शेती करुन भरघोस उत्पन्न कमवत आहेत.  रेशीम शेतीमुळे येथील शेतकरी लखपती बनले आहेत.

वालसा डावरगाव  हे भोकरदन शहरापासून 15 कि.मी. अंतरावर आहे. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायावर लोकांचा भर आहे. बदलत्या हवामानामुळे भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना शेतीतून जेमतेम उत्पन्न प्राप्त होते.  या परिस्थितीवर मात करण्यासाठी  येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निश्चिय केला. रेशीम विकास कार्यालयाला भेट देऊन त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. योगायोगाने महाराष्ट्रातील पहिली रेशीम कोष बाजारपेठ  जालना येथे असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

रेशीम उद्योगातील तुती झाडे एकदा लावली कि, ती 15 वर्षांपर्यंत टिकतात.  कमी पाण्यात अगदी दुष्काळातही जगतात. यावर कोणतीही किड-रोग मोठ्या प्रमाणात नुकसान करत नाही, कोणत्याही किटक नाशकची फवारणी करण्याची आवश्यकता नाही. रेशीम किटकांचे संगोपन किटक संगोपन गृहात होत असल्यामुळे वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम होत नाही.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत रेशीम विकास योजनेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत वर्गवारीनुसार व अल्पभूधारक शेतकऱ्यास तुती लागवड, किटक संगोपन गृह उभारणी व संगोपन कामकाजाकरीता तीन वर्षांत रू.3,39,500/- इतके कुशल व अकुशल अनुदान देण्यात येते.  यामुळे शेतकऱ्यांना आपल्याच शेतामध्ये आपले उत्पादन वाढविण्याकरीता केलेले तुती लागवड व किटक संगोपनाचे कामाचे अनुदान प्राप्त होते. म्हणजे शेतकऱ्याने रूपये एक लक्षचे रेशीम कोष उत्पादन केल्यावर त्याकरीता अंडीपुंज खरेदी, चॉकी खर्च, मजुरी व इतर खर्च मनरेगाच्या मस्टरमधून मिळतो. त्यामुळे रेशीम पीक काढण्यास शेतकऱ्याने केलेला खर्च त्यास प्राप्त होतो. शेतकऱ्यांना तुती लागवड व किटक  संगोपन गृह अशा मुलभूत सुविधा तयार होतात.

वालसा डावरगाव येथील बबन माधवराव साबळे यांच्याकडे 3.50 एकर शेती आहे. पारंपारिक पिकातून त्यांना फारसे उत्पादन मिळत नव्हते. कुटुंबात पाच सदस्य. रेशीम विभागाकडून त्यांनी तुती लागवड व रेशीम उद्योगाची माहिती मिळवली. तुती लागवडीतून रेशीम कोषाचे पिक हे साधारणत: तीन-साडेतीन महिन्यात निघत असून त्याला बाजारभावही चांगला मिळत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी रेशीम शेती करण्याचे ठरविले.

साबळे यांनी सांगितले की, प्रारंभी आम्ही सहा शेतकऱ्यांनी मिळून एक गट तयार केला आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. रेशीम कार्यालयाकडून सखोल माहिती घेतली. आम्हाला एकरी रु. 1 लाख 84 हजार 370 अकुशलसाठी व रु. 1 लाख 10 हजार 780 कुशलसाठी असे एकूण रु. 2 लाख 95 हजार 150 /- इतके अनुदान एकरी तीन वर्षासाठी मंजूर केले. पहिल्या वर्षी केवळ दोन वेळा कोष उत्पादन घेण्यात आले. पहिल्या वेळी 35 किलो तर दुसऱ्या वेळी 100 किलो असे एकूण 135 किलो कोष उत्पादन घेण्यात आले. त्यातून रु. 65 हजार उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी 450 किलो कोष उत्पादनातून रु. 2 लाख 25 हजार तर तिसऱ्या वर्षी 800 किलो कोषातून 5 लाख 60 हजार इतके उत्पन्न मिळाले. प्रत्येक वेळी कोष उत्पादन घेण्यासाठी साधारणत: 7 ते 10 हजार इतका खर्च येतो.

याच गावातील सोमीनाथ तेजराव जाधव यांच्याकडे जेमतेम दोन एकर शेती आहे. पारंपारिक पिकांबरोबर दुग्ध व्यवसाय करीत असत. मात्र, त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी रेशीम शेती करण्याचे ठरविले. त्यांनी रेशीम अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जोमाने रेशीम शेती करण्याचे ठरविले. आज घडीला शेतामध्ये मोठया प्रमाणात तुती लागवड त्यांनी केली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. आज घडीला वालसा डावरगाव येथील सुमारे 32 शेतकरी रेशीमची शेती करीत आहेत.  रेशीम शेतीतून  या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात तर वाढ झालीच शिवाय गाव समृध्दीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

वालसा डावरगाव सारखे इतर गावातील शेतकरऱ्यांनी पुढाकार घेऊन गटाने रेशीम शेती करावी व आर्थिक स्थैर्य प्राप्त करून घ्यावे. अधिक माहिती करीता जिल्हा रेशीम कार्यालय, नवीन मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती,जालना येथे संपर्क करावा.

-*-*-*-*-*-

क्रीडा गुण वाढीसाठी जिल्ह्यातील खेळाच्या संघटनांना आवाहन

 


 

जालना, दि. 28 (जिमाका) :-   शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार इयत्ता दहावी व बारावीमध्ये  शिकत असलेल्या जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन प्राविण्य मिळविलेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडागुणांची सवलत देण्याची सुधारीत कार्यपध्दती निश्चित असुन त्यानुसार सन 2018-19 या शालेय वर्षापासून सुधारीत नियमावलीनुसारच क्रीडागुण सवलत देण्यात येणार आहे. अशी माहिती क्रीडा विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सुधारीत शासन निर्णयामधील परिशिष्ठानुसार एकविध खेळांच्या संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावयाच्या स्पर्धा विषयक कागदपत्रांची यादी नमुद केलेली आहे. सदर कागदपत्रांच्या आधारे एकविध खेळांच्या संघटनांची अधिकृतता ठरविण्यात येणार आहे. यापुर्वी जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांना दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याविषयी सुचित करण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे पुनश्च उपरोक्त शासन निर्णयातील परिशिष्ठ 5 मधील नमुद कागदपत्रांची यादी कार्यालयात दि. 5 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावी. सदर कागदपत्रांच्या आधारे सन 2022-23 मधील क्रीडागुण सवलतीकरीता पात्र एकविध खेळांच्या संघटना निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रामुळे क्रीडागुण सवलतीपासुन आपल्या एकविध खेळ संघटनाद्वारा आयोजित स्पर्धामधील सहभागी खेळाडु वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी कळविले आहे. एकविध खेळ संघटनेने सादर करावयाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजनाबाबतचे परिपत्रक, ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांची भाग्यपत्रीका, ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धात सहभागी झालेल्या खेळाडुंच्या नावांच्या विहित नमुन्यात (परिशिष्ठ 10) दोन प्रतीतील याद्या (प्रावीण्यासह) त्यावर राज्य संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची शाईची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक आहे एकविध खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या शाईच्या नमुना स्वाक्षरीचे पत्र आवश्यक राहील.  असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

जिल्हा कृषी महोत्सवात 29 मार्च रोजी विविध विषयावरील चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 


 

   जालना, दि. 28 (जिमाका) - जालना जिल्हा कृषि विभाग,कृषि तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा(आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ जालना यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सव दिनांक 30 मार्च 2023 पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.सदरील कृषि महोत्सवाच्या निमित्ताने बांबू लागवड तंत्रज्ञान,नैसर्गिक शेती,मोसंबी पिकावरील कीड व रोग नियंत्रण व फळगळ नियंत्रण,पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व व लागवड तंत्रज्ञान,पौष्टिक तृणधान्य अन्न प्रक्रिया,शेतकरी उत्पादक कंपनी,तुती रोपांची नर्सरी करणे,फळ व भाजीपाला प्रक्रियेमधील संधी व  आव्हाने,PMFME योजनेबाबत मार्गदर्शन,सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन या विषयावरील विविध तज्ञ मार्गदर्शकाची चर्चासत्रे पार पडलेली आहेत.

     तर दि. २९ मार्च २०२३ रोजी डॉ. संजय पाटील (प्रमुख  शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी मोसंबी संशोधन केंद्र,बदनापूर) यांचे   मोसंबी लागवड तंत्रज्ञान, डी.एस.कांबळे सर(जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जालना) यांचे जनावरातील लम्पी रोगाचे नियंत्रण आणि दिलीप हाके  (सेवानिवृत्त उपसंचालक रेशीम) यांचे महाराष्ट्रातील रेशीम उद्योगातील संधी या विषयावरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत. तसेच दिनांक 29 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता  स्वरसंध्या ऑर्केस्ट्राचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी दि. 29 मार्च 2023 रोजी आयोजित विविध चर्चासत्रे व स्वरसंध्या ऑर्केस्ट्रा या सांस्कृतिक कार्यक्रम याचा याचे लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व महिला आर्थिक विकास महामंडळ जालना यांचे वतीने करण्यात येत आहे.

 

-*-*-*-*-*-

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

 


       जालना, दि. 28 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा   असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. 31 मार्च 2023 पर्यंत अशी ठेवण्यात आली आहे. खेळाडूंनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा करीता प्रस्ताव व विहित  नमुन्यातील अर्ज (खेळाडू) दि. 31 मार्च 2023 पर्यंत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.

        क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडुंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  शासन निर्णयानुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्या कारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019- 20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करु शकले नाहीत.यास्तव त्यांचे नुकसान होऊ नये व सदर खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये. याकरीता अशा  दि. 14 डिसेंबर 2022 च्या शसन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू (ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/ प्राविण्य प्राप्त खेळाडू फक्त) यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात आले आहे. अर्जाचा विहीत नमुना https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताजया बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या खेळाडू, यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत. असे  क्रीडा विभागामार्फत प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

Monday 27 March 2023

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाकडून एक दिवसीय प्रशिक्षण व रंगीत तालीम संपन्न

 







 

जालना, दि. 27 (जिमाका) :-  आपत्तीच्या काळात जिल्ह्यात बचाव होण्यासाठी एन.डी.आर.एफ पुणे यांच्यामार्फत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज दि.27 मार्च 2023 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण व रंगीत तालीम आयोजित करण्‍यात आले होते. या प्रशिक्षणाअंतर्गत सकाळी   11 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना येथे Flood Water Rescue या विषयावर Table Top Exercise घेण्‍यात आली. यावेळी  अपर जिल्‍हाधिकारी अंकुश पिनाटे, , निवासी उपजिल्‍हाधिकारी केशव नेटके,  तहसिलदार डॉ. प्रशांत पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षणात जिल्‍ह्यातील पोलीस विभाग, सामान्‍य रुग्‍णालय, आरोग्‍य विभाग (जि.प), विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, होमगार्ड, अग्‍नीशमन विभाग, बी.एस.एन.एल. , म.रा.वि.वि.कंपनी, शिक्षण विभाग व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एन.डी.आर.एफ पुणे यांचे टिममधील अधिकारी निरीक्षक महिंद्र पुनिया व निरीक्षक अजयकुमार यादव यांनी Flood Water Rescue या विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन केले.  तदनंतर दुपारी 12.30 वाजता एन.डी.आर.एफ, पुणे यांचे टिममधील अधिकारी व सहकारी कर्मचारी यांच्यामार्फत मोती तलाव, जालना येथे प्रत्‍यक्ष Mock Exercise घेण्‍यात आली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी शोध व बचाव अंतर्गत Flood Water Rescue या आपत्‍तीमध्‍ये विविध साहित्‍याचा उपयोग करुन शोध व बचावाबाबत प्रत्‍यक्ष प्रात्‍याक्षिक (रंगीत तालीम) करुन दाखविले. तसेच आग लागण्‍याची घटनेसंदर्भातही अग्‍नीशमन विभागाच्या सहाय्याने प्रात्‍याक्षिक करण्‍यात आले. या Mock Exercise च्‍यावेळी पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग, होमगार्ड, अग्‍नीशमन विभाग व महसुल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्‍यक्ष सहभाग नोंदविला.  यावेळी जिल्‍ह्यातील पोलीस विभाग, सामान्‍य रुग्‍णालय, आरोग्‍य विभाग (जि.प), विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, होमगार्ड, अग्‍नीशमन विभाग, बी.एस.एन.एल., म.रा.वि.वि.कंपनी, शिक्षण विभाग व महसूल विभागातील अधिकारी /कर्मचारी असे एकुण १२५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीबाबत आवाहन

 


जालना, दि. 27 (जिमाका) :-  शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसुचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणीसाठी सुरु आहे. तरी जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करण्यासाठी समान संधी केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या समन्वयक यांची मदत घेऊन अर्ज नोंदणी वाढविण्याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही  अर्ज नोंदणी केलेली नाही अशांना शुक्रवार दि.31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयांचे तालुकानिहाय महाविद्यालयांचे कॅम्प घेण्यात आले असून प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ अर्ज नोंदणी व अर्ज मंजुर करणे, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसुल न करणे, महाविद्यालयांत समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत सहायक आयुक्त अमित घवले यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सुचना दिल्या आहेत.  परंतु  दि. 27 मार्च 2023 पर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे फक्त 9 हजार 98 अर्ज नोंदणी झालेले असून मागील वर्षात जालना जिल्ह्यात नोंदणी झालेल्या 1 हजार 66 पेक्षा 1 हजार 538 अर्ज अद्यापही नोंदणी झालेली नसल्याने जालना जिल्ह्याची एकुण 85 टक्के अर्ज नोंदणी झालेली आहे. तर अद्यापही 15 टक्के अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती करीता अर्ज सादर केलेले नाहीत. अर्ज नोंदणीकरीता शासन स्तरावरुन मुदत वाढविली नसल्यास अर्ज सादर करता येणार नाही त्यास सर्वस्वी विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार राहतील. तसेच महाविद्यालीनस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जावर संबंधित महाविद्यालयांनी दि. 31 मार्च 2023 पुर्वीच अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज मंजुर  करावेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Sunday 26 March 2023

जालना जिल्हा कृषी महोत्सवाचे थाटात उदघाटन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शेतीला व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती करावी - पालकमंत्री अतुल सावे

 








जालना, दि. 26 (जिमाका) :- शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची तसेच नवनवीन अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तज्ञांचे मार्गदर्शन लाभावे आणि विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद घडवा यासाठी आपल्या जिल्हयात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी केले. तर राज्यशासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून  शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेकविध योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती  करावी, असे आवाहन  सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जालना येथील पांजरपोळ संस्थानच्या गौरक्षण मैदानावर जालना जिल्हा कृषी महोत्सव-2023 चे उदघाटन आज थाटात पार पडले. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे  व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उदघाटन झाले. कार्यक्रमास  आमदार कैलास गोरटंयाल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे,  आत्माच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, शेतीच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये माहितीची देवाण-घेवाण व्हावी हा  सुध्दा कृषी महोत्सवाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन होते याचा अभ्यास करुन केंद्र शासनाने त्या पिकाच्या वाढीसाठी आणि त्यावर प्रक्रीया करुन अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरीता जिल्हानिहाय पिकांची निवड केली आहे. आपल्या जालना जिल्हयात मोसंबीचे जास्त उत्पादन होते. मोसंबीवर आधारीत प्रक्रिया उद्योग करण्यासाठी सबसिडीही उलपब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ शेती करुन फायदा होणार नाही तर शेतीसोबतच अन्न प्रक्रिया उद्योग उभारुन शेतकरी सधन होण्यास मदत मिळणार आहे. पोकरा योजनेत जालना जिल्ह्याने कौतूकास्पद काम केले आहे.  शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शास्त्रोक्त पध्दतीने शेती करण्यावर शेतकऱ्यांचा भर असायला हवा. शेतकऱ्यांनी प्राधान्याने माती परिक्षण करुन घ्यावे व कृषी तज्ज्ञांनी ठरवलेल्या मात्राप्रमाणेच खताची मात्रा पिकांना द्यावी. कृषी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे सांगून जिल्हा कृषी महोत्सवात कृषीतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 पालकमंत्री  अतुल सावे म्हणाले की,   महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटावर मात करता यावी आणि कर्जबाजारीपणातून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करता यावे याकरीता 6 हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती करावी. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाने सातत्याने अभ्यास दौरे आयोजित करावे. राज्य शासन यासाठी निश्चितपणे आवश्यक निधीची तरतूद करेल.

 कृषी प्रदर्शनात महिला बचत गटाच्या सदस्यांनी  अत्यंत चांगली उत्पादने तयार करुन विक्रीसाठी ठेवली आहेत, असे कौतुक करुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी बांधव हा आमचा प्राण आहे त्यामुळे त्यांना कसे आर्थिक सक्षम करता येईल यावर शासन भर देत आहे. शेतकऱ्यांच्या अनुषंगाने महत्वाचे विविध निर्णय अधिवेशनात जाहीर केल्या गेले आहेत. शेतकऱ्यांनी  जिल्हा कृषी प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदवून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावेत.

आमदार कुचे म्हणाले की, शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती करावी.  यावेळी  विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव यांनीही मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी कृषी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट करत असतांना प्रदर्शनात एकुण 200 स्टॉलची उभारणी करण्यात आले असल्याचे सांगून कृषी उत्पादने, शेतीनिगडीत औजारे, शेतीसंबंधी उद्योग, मविमच्या महिला बचतगटांची उत्पादने यांच्यासह दररोज तीन चार कृषीतज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.  यावेळी विविध योजनांच्या घडीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी मानले. कृषी महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी आपल्या सेवा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व ते नियत वयोमानानूसार 31 मार्च 2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व मान्यवरांनी  कृषी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सना भेट दिली. यावेळी ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.  कार्यक्रमास मोठया संख्येन शेतकरी, महिला, नागरिक, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दि. 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात शासकीय दालन, विविध शेतीशी संबंधीत कंपन्यांचे स्टॉल्स, बचतगटाचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचाही सक्रिय सहभाग आहे.

-*-*-*-*-

जालना जिल्ह्यातील 3 लाख 45 हजार 662 कुटुंबांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरणास प्रारंभ अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ

 




 

जालना, दि. 26 (जिमाका) :- शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 45 हजार 662 कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून जालना येथे आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे व सहकार, इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे  यांच्या उपस्थितीत आज ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ झाला.

जालना शहरातील कन्हैय्यानगर येथील रास्त भाव दुकानाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, तहसीलदार छाया पवार, भास्कर दानवे, शहरातील रास्त भाव दुकानदार व लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.

शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरणास आज प्रारंभ झाला.

 यावेळी केंद्रीय रावसाहेब पाटील म्हणाले की, गोरगरीबांना  सणउत्सव आनंदात साजरा करता यावा, यासाठी  शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरु केला आहे. गुढी पाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत  जिल्हयातील  3 लाख 45 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. गरीबाची चिंता करणारे हे शासन असून लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की,  सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने मागील दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला. त्याच पध्दतीने गुढी पाडवा व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या जिल्हयातील  शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. याचा लाभ शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा.

कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.  शिधामध्ये रवा,साखर, चनाडाळ व खाद्यतेलाचा समावेश आहे.

जालना तालुक्यातील 68 हजार 55, बदनापूर तालुक्यातील 31 हजार 425, भोकरदन तालुक्यातील 59 हजार 604, जाफ्राबाद तालुक्यातील 34 हजार 505, परतूर तालुक्यातील 31 हजार 494, मंठा तालुक्यातील 30 हजार 844, अंबड तालुक्यातील 48 हजार 605, घनसावंगी तालुक्यातील 41 हजार 130 शिधापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधाचे वितरण होणार आहे.

 

-*-*-*-*-*-

 

 

Friday 24 March 2023

रेशीम शेतीत शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड रेशीम पीक शेतकऱ्यांसाठी संजीवणी - कृषीरत्न विजय आण्णा बोराडे तुती बाग जोपासना, रेशीम किटक संगोपन व कोष विक्री व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण संपन्न

 






जालना, दि. 24 (जिमाका) -- आत्मा अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तुती बाग जोपासना, रेशीम किटक संगोपन व कोष विक्री व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण’ या विषयीचे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी  येथे गुरुवारी घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी शेतकऱ्यांना पटकन लखपती व्हायचे असेल तर त्यांनी रेशीम उद्योग करावा असे प्रतिपादन केले. याच बरोबर त्यांनी तुतीची लागवड काडया ऐवजी तुती रोपांनी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात पहिल्याच वर्षी रू.50,000/- ची वाढ होते. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून रोखणारा रेशीम उद्योग आहे. शेतकऱ्यांना सातत्याने शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता रेशीम शेती व उद्योगामध्ये आहे. जालना येथे रेशीम अंडीपुंज निर्मिती ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रीया उद्योग कार्यान्वीत असुन जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. त्यामुळे जालना जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  रेशीम शेतीचा स्वकिार करून आपले जीवन समृध्द करावे. मी स्वत: माझ्या शेतामध्ये तुती लागवड करून रेशीम कोषांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

कार्यक्रमास 250 रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष,कृषीरत्न, विजय आण्णा बोराडे यांनी रेशीम पीक शेतकऱ्यांसाठी संजिवणी ठरत आहे, ’रेशीम उद्योगास अवकाळी पाऊस, जास्तीचा पाऊस, दुष्काळ या वातावरणातील बदलांचा विशेष विपरित परिणाम होत नाही. आहे. रेशीम उद्योगातील उत्पादन शश्वत आहे. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे महिलांना प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येते. रेशीम उद्योग यशस्वी करण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.जालना जिल्हयात रेशीम धागा तयार होत असुन आता त्यापुढे जाऊन महिलांना प्रशिक्षित करून घरोघरी हातमागावर पैठणी साडी विणकाम होणे आवश्यक आहे.

रेशीम विभागाचे सेवानिवृत उपसंचालक, दिलीप हाके यांनी रेशीम शेती ही गट शेतीप्रमाणे केल्यास अधिक फायदेशीर ठरते तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी 1.00 एकर ऐवजी 2.00 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्यास वेतनाप्रमाणे रेशीम शेतीमधुन उत्पन्न मिळते, असे सांगीतले. तसेच रेशीम शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे बाबतीत दत्तक घेउन काम केल्यास प्रत्येक शेतकरी रेशीम उद्योगामध्ये 100 टक्के यशस्वी झाल्याशिवाय रहाणार नाही, असे प्रतिपादन केले.

केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. रामप्रकाश वर्मा यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना निर्जंतुकीकरन व सुधासित तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी तुती बाग व्यवस्थापन,  किटक संगोपन तंत्रज्ञान या विषयी उपस्थीत शेतकऱ्यांना सादरीकरनव्दारे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील विषय विशेषज्ञ प्रा.अजय मिटकरी यांनी उझी माशीचे नियंत्रण या विषयी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.

प्रस्तावना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी चे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एस.व्हि.सोनुने यांनी केली. यादरम्यान त्यांनी, जालना जिल्हयात रेशीम उद्योग वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीचे 20 वर्षापासुन योगदान असुन यामध्ये रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी, रेशीम तंत्राज्ञान प्रशिक्षण व मार्गदर्शन ई.बाबी राबविल्या जात आहेत. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीव्दारे प्रशिक्षित अनेक युवकांनी रेशीम उदयोग सुरू करून आपले जिवनमान उंचावले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचे हस्ते नव्याने रेशीम उदयोग करून 100 अंडीपुंजास 100 किलो पेक्षा जास्तउत्पादन घेणारे मच्छींद्रनाथ चिंचोली येथील युवा शेतकरी श्री.राज मुळे यांचे तसेच नांजा ता.भोकरदन येथील रेशीम उत्पादक जोडपे शरद मोरे व पुष्पा शरद मोरे  यांचा पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच कार्याक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थीतीत व जिल्हाधिकारी यांचे हस्ते रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली  या सॉफ्टवेअर व मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले. सुत्रसंचालन, प्रा.अजय मिटकरी, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांनी केले तर आभार प्रदर्शन रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे यांनी केले.

-*-*-*-*-*-*-

नेहरू युवा केंद्र तर्फे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन

 


जालना, दि. 24 (जिमाका) :-  नेहरु युवा केंद्र जालना यांच्यातर्फे रविवार दि.26 मार्च 2023 रोजी पार्थ सैनिकी शाळा , खरपुडी रोड येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, व्हॉलीबॉल व कब्बडी या विविध खेळाचा समावेश आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेऊन येणे अनिवार्य असुन जिल्ह्यातीत इच्छुक खेळाडुंनी व संघानी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीसह कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 


जालना, दि. 24 (जिमाका) :-  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दि. २४ मार्च २०२३ रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र , जालना या कार्यालयाच्या वतीने जालना शहरात भव्य क्षयरोग जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अश्वमेध जगताप यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात करण्यात आली.

रॅलीमध्ये वसंतराव नाईक नर्सिंग स्कुल जालना , परिचर्या प्रशिक्षण केंद्र जालना , महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय जालना , मिशन हॉस्पिटल जालना या कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व एनटीईपी कर्मचारी सहभागी झाले होते. क्षयरोग जनजागरण रॅली जिल्हा क्षयरोग केंद्र जालना येथुन निघुन सतकर कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली मार्गे जिल्हा परिषद जालना येथे पोहोचुन रॅलीची सांगता करण्यात आली.

जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, जालना या ठिकाणी क्षयरोग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  क्षयरोग जीवाणु संशोधक डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ अश्वमेध जगताप, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. म्हस्के, उद्योजक रमेशभाई पटेल, उद्योजक घनशामदास गोयल,  उद्योजक दिनेश भारुका, उद्योजक डी.बी. सोनी,   व्यवस्थापक तळेकर, उद्योजक आदर्श भारुका,  डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ . रमेश काकड व डॉ . राम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

     जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, भारत सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उदिष्ट्य ठेवलेले असुन सर्व आरोग्य यंत्रणेने क्षयरुग्णांचे तात्काळ संशयीत क्षयरुग्ण शोधुन त्वरीत निदान व औषधोपचार देऊन क्षय रुग्णांना बरे करावे जेणेकरुन क्षयरोग मुक्त भारत करण्यास मदत होईल .  जालना जिल्ह्यातील स्टील असोसिएशन जालना व विक्रम टि प्रोसेसर यांनी प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियानांतर्गत उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना पाच हजार पोषण किट वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानुन यापुढे ही कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन केले.   मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी समाजामध्ये क्षयरोगाबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी जेणेकरून समाजातील सर्व नागरीकांना क्षयरोगाबाबत माहिती मिळेल असे सांगितले. डॉ . अश्वमेध जगताप जिल्हा क्षयरोग अधिकारी जालना यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.  २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थांना व राष्ट्रीय क्षयरोग दुरिकण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर आघाम यांनी केले तर विलास जवळेकर यांनी आभार मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता  जी.जी. लोखंडे,  एस . व्ही यादव,  एस . एस . खंडागळे, व्ही. जी. जवळेकर, डी. एस. जावळे, जी के वावरे, गोपाल राऊत,  अमोल निकस,  वैजनाथ मुंडे, श्री. गरगडे, श्री. कादरी,  श्री पठाण, डी. आर. रगडे, आशिष ओझा, श्री. बजगुडे , सविता वैद्य, श्री. बजगुडे, श्री सुधिर गालफाडे, वर्षा दाभाडे, श्री. बनकर, गणेश सुर्यवंशी, श्री. एंगडे, श्री. कठाळे, श्रीमती आडबोले, सरला पाटील, हंसाबाई सलामपुरे, पल्लवी अळसपुरे, श्री.बोबडे, श्री. शहाणे, श्री. राजाळे, श्री. कांबळे यांनी परिश्रम घेतले. 

-*-*-*-*-