Tuesday 21 March 2023

शाश्वत शेती, प्रगतीशील शेतकरी…! जालना जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम - 23 मार्चपासून जालन्यात कृषी महोत्सवाला प्रारंभ - नवीन मोंढा रोडवरील गोरक्षण मैदानावर महोत्सव - दुपारी 12.30 उदघाटन कार्यक्रम - 27 मार्चपर्यंत सुरु राहणार कृषी महोत्सव - कृषी तंत्रज्ञान व सिंचन, कृषी निविष्ठा,धान्य महोत्सव,शासकीय विभागांच्या स्टॉल्सचा समावेश - कृषी तंत्रज्ञान विभाग,कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी महामंडळे यांचा सक्रिय सहभाग - कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यानाचे आयोजन - खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग - जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)-- कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील भोकरदन नाका ते मोंढा रोड येथील  पांजरपोळ संस्थानच्या गोरक्षण मैदानावर  जालना जिल्हा कृषी महोत्सव दि.23 मार्च 2023 ते 27 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. कृषी महोत्सवात जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जालना डॉ विजय राठोड यांनी केले आहे.

कृषी महोत्सावाचे उदघाटन गुरुवार, दि. 23 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे हा या कृषी महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा भाग असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहिल. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेण्यात येईल.

जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचित सन्मान करुन स्मृतीचिन्ह वितरण करण्यात येतील. जिल्हा कृषी महोत्सवाअंतर्गत कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात शासकीय दालनामध्ये 40 स्टॉल्स, कृषी निविष्ठा 30, कृषी तंत्रज्ञान व सिंचन 30, गृहोपयोगी वस्तू 40, धान्य महोत्सव 20, खाद्यपदार्थ 20 अशा एकूण अंदाजे 200 पेक्षा जास्त स्टॉलचा समोवश असेल. शासकीय दालनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व उपक्रम यांचे स्टॅाल्स असतील.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment