Wednesday 8 March 2023

जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी घेतली बालविवाह निर्मुलनाची शपथ


           जालना, दि. 8 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण अधिक आहे. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरुन विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, शासकीय व निमशासकीय आस्थापना-कार्यालयांमध्ये उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालका, नागरिकांसह इतर सर्वांनी बालविवाह निर्मुलनाची शपथ  देण्यात आली. महिला दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बालविवाह निर्मुलनाची शपथ अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी  उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैये, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार छाया पवार, महिला व बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

           जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलेल्या आवाहनाला जालना जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन सर्व शासकिय /अशासकिय आस्थापना, अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आदी  ठिकाणी अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी बाल विवाह निर्मुलनाची शपथ घेण्याकरिता उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या उपक्रमात दुपारी 4 वाजेपर्यंत मिळालेल्या माहिती नुसार एकुण 2 हजार 100 पेक्षा अधिक आस्थापनांनी सहभाग नोंदविला असुन एकुण 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक लोकांनी बाल विवाह निर्मुलनाची  शपथ घेतली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*- 

     


No comments:

Post a Comment