Thursday 23 March 2023

शेतीचा 'आत्मा 'अर्थात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ...

 


 सन 1998 ते 2005 या कालावधित जागतिक बँकेच्या निधीच्या सहाय्याने देशातील 7 राज्यातील 28 जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रकल्पाअंर्तगत तंत्रज्ञान विस्तारामध्ये नाविण्यपुर्णता या सदराखाली विस्तार विषयक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. ही योजना अतिशय यशस्वी ठरली व राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरिता सहाय्य ही योजना अस्तित्वात आली. ही योजना सुरुवातीस 252 जिल्हयामध्ये विस्तारीत करण्यात आली. सन 2007 साली राष्ट्रीय कृषी विकास परीषदेमध्ये कृषी विस्तारामधील क्रांतिकारक बदलाची गरज प्रामुख्याने समोर आली. राष्ट्रीय शेतकरी आयोगाने कृषी विस्तार यंत्रणेत अमुलाग्र बदल सुचविला आहे. सन 2005 ते 2009 या दरम्यान कृषी विस्तार कार्यक्रम सुधारणा अंर्तगत मिळालेल्या अनुभवातुन व राज्य सरकारशी सल्लामसलत करुन केंद्र शासनाने सध्याची राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य ही योजना काही वैशिष्ट्यपूर्ण बदलासह प्रस्तावित केली.

 

आत्मा योजनेचा प्रमुख उद्देश :-

राज्यस्तर जिल्हास्तर व तालुकास्तरावर पुर्नजिवीत नव्याने स्वायत्त संस्था स्थापन करणे,  अनेक बहुउद्देशिय संस्थांना कृषि विस्तारासाठी चालना देणे व पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत विस्तारसेवा पुरवठादारांचा समावेश करणे, शेती पध्दतीनुसार दृष्टीकोण, एकात्मिक व सर्वसमावेशक कृषी,  विस्तार कार्यक्रम राबविणे, विस्तार कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण करीत असतांना संलग्नविभागातील इतर कार्यक्रमासोबत सांगड घालणे, शेतकर्याच्यागरजा व मागण्या विचारात घेऊन त्यानुसार शेतकरीसमुह / शेतकरी गट तयार करणे. उपरोक्त उद्देश साध्य करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था व त्यासाठी आवश्यक सर्मपित मनुष्यबळ यासाठी लागणारी आवश्यक तरतूद व निधीबाबत केंद्र शासनाने व राज्यशासनाने यशार्थदर्शी नियोजन केले आहे.

 

जिल्हास्तरीय नियोजन व अंमलबजावणी :-

आत्मा ही एक स्वायत संस्था आहे. आत्मा नियामक मंडळ सर्वसमावेशक दिशादर्शक धोरण ठरवेल नियामक मंडळ, प्रकल्प संचालक आत्मा, प्रकल्प उपसंचालक, आत्मा व सहाय्यक कर्मचारी यांचे सहकार्याने कामकाज करतील. आत्मा व्यवस्थापन समिती ही योजना अंमलबजावणीसाठी कार्यकारी शाखा असेल. जिल्हास्तरावरील जिल्हा शेतकरी सल्ला समिती ही जिल्हा कृषी विस्तार नियोजन व अंमलबजावणीत मदत करेल ययार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा तयार करण्याबरोबरच जिल्हयातील संपुर्ण कृषि विस्तार व्यवस्थापन व नियोजन समर्पित कर्मचाऱ्यांच्या मदतीने आत्मा संस्था करत असते.

 

तालुकास्तरीय नियोजन व अंमलबजावणी :-

तालुकास्तरावर तालुका, गट तंत्रज्ञान चमू ज्यामध्ये कृषी व कृषी संलग्न विभागातील गट, तालुका स्तरावरील अधिकारी असतील गट शेतकरी सल्ला समिती ज्यामध्ये प्रगतशील व अनुकरणीय शेतकरी असतील, त्यांचे तालुका पातळीवरील कृषी विस्तार नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असेल. गट शेतकरी सल्ला समितीत निवडलेले शेतकरी हे प्रामुख्याने शेतकरी, कृषि विज्ञान मंडळ, शेतकरी समुह यांचेतुन चक्राकार पध्दतीने निवडण्यात यावेत जे तालुका तंत्रज्ञान चमुस वेळोवेळी मार्गदर्शन करतील, तालुका आत्मा कक्षामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व विषय विशेषज्ञ हे बीआयटी व बीएफएसीच्या मदतीने तालुका कृती आराखडा तयार करणे व अंमलबजावणी संदर्भात जबाबदारी पार पाडत असतात.

 

गावस्तरीय नियोजन व अंमलबजावणी :-

शेतकरी मित्र हा कृषि विस्तार यंत्रणा व शेतकरी यांचेतील महत्वाचा दुवा असेल. प्रत्येकी दोन गावांसाठी एक शेतकरी मित्र निवडला जाईल. शेतकऱ्याला कृषि व कृषि संलग्न विभागाबाबत मार्गदर्शन करणेसाठी शेतकरी मित्र उपलब्ध असेल. शेतकरी, शेतकरी सेवा केंद्र इत्यादी विस्तार कार्यक्रमाबाबत माहितीची देवाण-घेवाण करणे संदर्भात शेतकरी मित्राची मदत होईल. ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे कृषी व्यावसायिकांना तांत्रिक सहाय्य देवुन कृषी विस्तारामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.  तालुक्यात कृषी व कृषी संलग्न विषयाच्या शेतीशाळा घेण्यात येत असतात.

 

आत्मा व्यवस्थापन समितीची मुख्य कार्य :-

            जिल्ह्यातंर्गत विविध सामाजिक आर्थिक समुह आणि शेतकरी यांना समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी विशिष्ट कालावधीने. जिल्ह्याचे एकात्मिक यथार्थदर्शी संशोधन कृषि विस्तार नियोजन करणे, ज्यामध्ये लघू आणि मध्यम स्वरुपाचे संशोधन तथा तंत्रज्ञान वैधता प्रथम प्राधान्याने करता येईल. जिल्हा शेतकरी सल्ला समितीच्या मदतीने वार्षिक कृषी कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देणेसाठी आवश्यक बदल करण्यासाठी तथा मंजूरीसाठी ठेवला जाईल. लेखा परीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन करणे, सहभागी कृषी संलग्न विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र बिगर सरकारी संघटना, खाजगी संस्था यांच्यात समन्वय ठेवून वार्षिक कृती आराखडा राबविणे.  तालुका व गावपातळीवर शेतकरी माहिती व सल्ला केंद्र स्थापन करणे व त्याद्वारे एकात्मिक कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम राबविणे. नियमित कार्यवाही कार्यक्रम अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्यासह आत्मा नियामक मंडळास पाठविणे जो नंतर कृषि व सहकार मंत्रालयास पाठविला जाईल. आत्मा नियामक मंडळाने स्विकारलेली धोरणे, गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय व केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणे. आत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध गट तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक होणे आवश्यक आहे तसेच बैठकीचा अहवाल राज्य मुख्यालय कक्षास पाठविणे गरजेचे आहे. या सर्वावरुन जिल्हाअंतर्गत, राज्य व आंतरराज्याअंतर्गत अनिवासी व निवासी प्रशिक्षणे, अभ्यासदौरे आणि किसान गोष्टीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा योजना अर्थात शेतीचा आत्मा प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते. 

- जिल्हा माहिती कार्यालय, जालना

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment