Wednesday 8 March 2023

अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेत

 


जालना, दि. 8 (जिमाका) :-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचे वाटप महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील पात्र इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी जालना समाज कल्याण कार्यालयात दि.17 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना समाज कल्याणचे  सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचत गट असावा, बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. नोंदणीकृत बचत गटामध्ये किमान 10 सदस्य असावेत त्यापैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातीलच असावेत. बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांचे असणे आवश्यक आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडणे व सदरचे बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिवांच्या  आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बचत गटाने व गटातील सदस्यांनी या पुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या 10 टक्के (रु 35000/- डिमांड ड्राफ्ट) स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल 3 लाख 15 हजार रूपये ) शासकिय अनुदान अनुज्ञेय राहील. अर्जाची संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त आलेली असल्यास पात्र अर्जदाराची निवड ड्रॉ (लॉटरी) पध्दतीने करण्यात येईल. बचत गटातील किमान एका सदस्याकडे सदरचे वाहन चालविण्याचा सक्षम अधिकाऱ्याचा परवाना असावा अथवा प्रशिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र असावे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेत अनुज्ञेय असलेल्या 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदान (3 लाख 15 हजार रुपये) पेक्षा जादाची रक्कम संबंधित बचत गटाने स्वतः खर्च करावी लागेल. प्रस्ताव परिपुर्ण सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी बचत गटांचे अध्यक्ष व सचिवांची राहिल.  रुपये 35000/- चा डिमांड ड्राफ्ट (राष्ट्रीयकृत बँकेचा) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना या नावाने काढावा. वरिल अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच यापुर्वी अर्ज सादर केले आहेत परंतू लाभ न मिळालेल्या बचत गटांना नव्याने अर्ज सादर करावे लागतील. अशा अटी व शर्ती आहेत. अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जालना या कार्यालयामधुन विनामुल्यउपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अर्ज बचत गटाच्या नावे देण्यात येईल. व एका बचत गटास एकच अर्ज मिळेल, त्यासंबंधी बचत गटाने कागदपत्रे सोबत आणावेत. परिपुर्ण भरलेले आवश्यक असलेले कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह अर्ज दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेतच सादर करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment