Thursday 31 August 2023

णेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

 

मुंबई, दि. 31 : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.  

राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

-*-*-*-*-

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


जालना, दि.31 (जिमाका) :-  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दि.8  सप्टेंबर 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शुक्रवार दि.8 सप्टेंबर 2023 रोजी औरंगाबाद येथून दुपारी 1 वाजता जालना येथे आगमन व जिल्हा भाजपा पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.45 वाजता जालना येथे पत्रकार परिषद, दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे राखीव. आणि दुपारी 4.30 वाजता मोटारीने जालनावरुन औरंगाबादकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-


सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.31 (जिमाका) :-  जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी जालना येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहात वर्ष २०२३ २०२४ साठी आजी, माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पाल्याकरीता तसेच वसतिगृहामध्ये जागा शिल्लक असल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांनाही इयत्ता आठवी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी या संधीचा जास्तीत जास्त आजी, माजी सैनिक व विधवाच्या पाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. निलेश प्रकाश पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.

  सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये जेवणाची व राहण्याची सुविधा असुन शिस्तबध्द वातावरण आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज सैनिकी मुलांचे वसतिगृह, जिल्हा क्रीडा संकुलासमोर, जालना येथील वसतीगृह अधिक्षक यांच्याकडे उपलब्ध असून दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रवेश घेण्यास प्राप्त करुन घ्यावेत. वसतिगृहात जालना शहराबाहेर वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण व इतर भागातील आजी, माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना दुरध्वनी क्रमांक 02482-225201 व वसतिगृहाचे अधिक्षक मोबाईल क्र.8999730746 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिदीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-


माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

 


 

जालना, दि.31 (जिमाका) :-  विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट  कार्य करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी अथवा पाल्यांना  10 हजार रुपयांचा आणि 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार सन २०२२-२३ देण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी अर्ज दाखल करतेवेळी वृत्तपत्राची कात्रणे, छायाचित्रे, प्रसिध्दी प्रकरणाची माहिती सोबत जोडून अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे 20 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. तरी या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 इयत्ता दहावी, बारावीमध्ये 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेतलेल्या माजी सैनिक/विधवा पत्नीचे पाल्य असावे.  राष्ट्रीय/राज्य स्तरीय प्रतियोगितेत सुवर्ण रौप्य, कास्य यापैकी पदक मिळालेले असावे. खेळामध्ये आंतराष्ट्रीय स्पर्ध्येत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र इंडियन ऑलम्पिक असोसिएशन, साई किंवा राष्ट्रीय फेडरेशन यांनी प्रमाणित केलेले असावे.  साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, व इतर कला क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी / पुरस्कार प्राप्त असला पाहिजे.  नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी या पुर, जळीत, दरोडा, अपघात नैसर्गीक आपत्ती (भुकंप/वादळ) यामध्ये बहुमोल कामगिरी केलेली असावी.  शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार. तसेच आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सुध्दा पुरस्कार देण्यात येईल.  यशस्वी उघोजकांना पुरस्कार, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे असावेत. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-


Tuesday 29 August 2023

अल्पपोहार व भोजन व्यवस्थेसाठी निविदा भरण्याचे आवाहन

 


जालना, दि. 29 (जिमाका) - शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी अल्पपोहार व भोजन व्यवस्था व इतर बाबींचा पुरवठा करण्यासाठी अनुभवी व सुयोग्य अभिकर्त्याकडून विहित नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीव्दारे मागविण्यात आलेली आहे. सदर ई- निविदा भरण्याचा कालावधी दि. 28.08.2023 ते दि. 04.09.2023 पर्यंत आहे. सदर ई-निविदा www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी ईच्छूक पुरवठादारांनी सदरची निविदा विहित कालावधीत भरण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगीता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 30 ऑगस्ट रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

 


जालना, दि. 29 (जिमाका) –केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11.15 वा. औरंगाबाद येथून जालना येथील वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट येथे आगमन, सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ- वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट, जालना, दुपारी 1.00 वा. सार्वजनिक बैठक, स्थळ- वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट, दुपारी 4. वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट येथून प्रयाण.

***  

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंचा गुणगौरव क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जातील - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 






 

जालना दि. 29 (जिमाका) :-  जिल्ह्यात खेळाकरीता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.  तर मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जालना जिल्ह्यातुन प्रतिभावान खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय  क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद व नेहरु युवा केंद्र यांच्यावतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे जालना  जिल्ह्यातील विविध खेळांचे क्रीडा संघटक, क्रीडा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडूंचा गुणगौरव सोहळा देवगिरी इंग्लीश स्कूल येथे  आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास हॉकी महाराष्ट्र संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रा. दिनकर थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, अरविंद देशमुख, गायत्री सोरटी आदीसह क्रीडा संघटक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मार्गदर्शक व खेळाडुंचा गौरव करण्यात आला.

-*-*-*-*-

 

Monday 28 August 2023

“शासन आपल्या दारी” अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालन्यात 8 सप्टेंबर रोजी नियोजित कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आढावा

 


 

 




जालना, दि. 28 (जिमाका) –  शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शहरात दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. कार्यक्रम स्थळी  उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.  सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.

       जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर  आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विभागप्रमुख उपस्थित होते.            

शासन आपल्या दारीअभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भागात   दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. पांचाळ म्हणाले की,  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  सर्व समितीप्रमुखांनी सोपवलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडवी.  कार्यक्रम स्थळी  उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्नीशामक वाहन, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. कुठल्याही प्रकारे उपस्थितांची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.  

 

-*-*-*-*-*-

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त महिलांकरिता स्व संरक्षण व सुरक्षेचे प्रशिक्षण

 


 

     जालना, दि.28 (जिमाका) :-  मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठवाडा मुक्ती संग्रामास यावर्षी 75 वर्षे पुर्ण होत असल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांचेमार्फत महिलांकरिता स्व संरक्षण व सुरक्षेचे  प्रशिक्षण शिबीर दि. 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल,जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीरास तंज्ञप्रशिक्षक वर्ग मार्गदर्शन करणार आहे. या प्रशिक्षणाकरिता सर्व शासकीय, निमशासकीय, संघटना व खाजगी आस्थापनेवरील महिला कर्मचारी तसेच शहरातील इतर सर्व क्षेत्रातील महिलांनी आणि इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी, तरूणींनी या प्रशिक्षण शिबीरात सहभागी होऊन स्व संरक्षण आणि सुरक्षेचे धडे घ्यावेत. अधिक माहितीसाठी संतोष वाबळे, क्रीडा मार्गदर्शक मो.क्र. 7588169493 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

Friday 25 August 2023

डेंग्यू आजार : सावधानता बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

 


जालना, दि.25 (जिमाका) :- सध्या जालना जिल्हयात पर्जन्यमान कमी असल्यामुळे जनतेमध्ये पाणी साठवण्याच्या प्रमाण वाढले आहे. दरम्यान, या कारणाने डेंग्यु आजाराचे एडिस डास घनता मोठ्या प्रमाणात वात आहे व त्यामुळे डेंग्यु सदृष्य रूग्णांत वाढ होताना दिसून येत आहे.

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार हा प्रत्येकाला डेंग्यू  आजारापासून दूर ठेव शकतो. किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच शासनाने डेंग्यु हा आजार नोटिफायबल घोषित केल्यानुसार जिल्हयातील सर्व खाजगी रूग्णालयाने कार्यवाही करावी व अशा रूग्णाबाबत तात्काळ शासकीय यंत्रणेस कालमर्यादेत कळवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.डी.गावंडे यानी केले आहे.

सद्यस्थितीत जालना जिल्हयात शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये जानेवारी ते 21 ऑगस्ट पर्यत एकुन 143 संशयीत रूग्णांचे रक्तजल नमुने शासकीय वैद्याकिय महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले असता त्यात  24 डेंग्यु लागण झालेले 24 व खाजगी रूग्णालयत 22 असे एकुन 46 रूग्ण आढळुन आले आहेत. तर  दोन संशयीत डेंग्यूची लागण झालेल्या. रुग्णांचा मृत्यु झाला आहेत.

 " डेंग्यू "  हा अतिशय गंभीर आजार आहे.  यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जनतेमध्ये डेंग्यू आजार बद्दल माहिती व जनजागरण होणे अत्यंत आवश्यक आहे.  डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा " एडिस इजिप्टाय " नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

             नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्या अनुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते.

डेंग्यू आजाराची कारणे -

डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.

डेंग्यू आजाराची लक्षणे -

"एडीस एजिप्टाय" डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी , अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे,  चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या होतात. डेंगी ताप आजारात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाय :-

ताप असेपर्यंत आराम करा. ताप कमी होण्यासाठी ‘पॅरासिटेमोल’ डॉक्टर च्या सल्याने  गोळ्या घ्या. ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत.निर्जलिकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी)  रक्तस्त्राव किंवा इतर लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत  मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा.साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत तसेच खाली न करता येणार्‍या पाणी साठ्यात, उदा. टाकी हौद यामध्ये गप्पी मासे सोडावेत.आपल्या घरी डेंग्यू ताप सर्वेक्षणसाठी येणार्‍या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करा व आपण  अथवा इतर कोणीही आजारी असल्यास त्वरित  जवळच्या प्राथमिक आरोग्य केद्रात संपर्क साधावा.डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी-- आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा  रिकामे करावीत व कोरडा दिवस पाळावा. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.किंवा बाहेर डासांची पैदास होऊ देऊ नका.घरामध्ये घाण पाणी साचू देऊ नका. भांड्यात पाणी किंवा छतावर इतर कोणतीही वस्तू असल्यास लगेच फेकून द्या.

• या गोष्टी लक्षात ठेवा -

   डेंग्यूचा डास हा सामान्य डासांपेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो.   घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका.   उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच घरांमध्ये कुलरचा वापर केला जातो.   कुलरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत कूलर वापरल्यानंतर लगेचच त्यातील पाणी रिकामे करा. पावसाळ्यात कुंड्या, बाटल्या किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका. असे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वैध मापन शास्त्र यंत्रणा करणार वजने मापे उपयोगकर्ता आस्थापनांचे सर्वेक्षण

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त वैध मापन शास्त्र यंत्रणेने त्यांचे परवानाधारक दुरुस्तकांच्या सहकार्याने वजने मापे उपयोगकर्ता व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील कार्यरत सर्व परवानाधारक दुरुस्तकांना वजने व मापे व तोलन उपकरणे यांचा वापर करणा-या आस्थापनांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

जिल्हयातील संबंधित दूरुस्ती परवाना धारकास वजने मापे व तालेन उपकरणे उपयोगकर्ता आस्थापनाचे सर्वेक्षणासाठी उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, जालना जिल्हा या कार्यालयाने प्राधिकार पत्र दिले आहे. त्यामुळे वजनमापे उपयोगकर्ता आस्थापनेमधील व्यापा-यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या दुरुस्ती परवानाधारकास सहकार्य करावे, असे आवाहन उपनियंत्रक रमेश दराडे यांनी केले आहे. काही शंका असल्यास व्यापा-यांनी ०२४८२-२२०७४३ या कार्यालयीन दुरध्वनीक्रमांकावर संपर्क साधावा. असे उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

अनधिकृत चायनीज (चिनी बनावटीच्या) वजन काटे यांच्या विक्री व वापरावर बंदी

 


जालना, दि.25 (जिमाका) :-वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व तोलन उपकरणे यांच्या अचुकतेबाबतची पडताळणी केलेली वजने व मापे व तोलन उपकरणे उपयोगकर्त्यानी वापरणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. तसेच वजने व मापे यांचा वैध विक्री परवाना असलेल्या परवानाधारकाने वजने, मापे व तोलन उपकरणे यांची विक्री करणे आवश्यक आहे. असे असताना देखील काही व्यापारी विविध देशातुन आयात केलेले (चिनी व बनावटीचे) किंवा इतर राज्यातुन आणलेले इलेक्ट्रॉनिक्स काटे अनधिकृत व्यक्ती त्याचे स्टिकर वजन काटयांना लावून अनधिकृतपणे विक्री करत आहेत.

सदरचे इलेक्ट्रॉनिक्स काटे अप्रमाणित असल्यामुळे त्यांची विक्री अथवा उपयोगकर्त्याने वापर करणे बेकायदेशीर आहे. अप्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स काटयाची विक्री अथवा वापर केल्याचे आढळून आल्यास वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गतच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे अप्रमाणित वजन काटयाची विक्री अथवा व्यवहारामध्ये उपयोग करु नये,  असे आवाहन उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र आर.डी. दराडे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जनआक्रोश आंदोलनामुळे 29 ऑगस्ट रोजी वाहतुक मार्गात बदल

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील रा. अंकुशनगर महाकाळा ता. अंबड जि. जालना व इतर दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी पैठण फाटा, शहागड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार असून हे आंदोलन हे शहागड ते पैठण रोडवर पैठण फाटा येथे आहे. या आंदोलनास मोठ्या प्रमाणात आंदोलकाची गर्दी होणार असून वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचे आदेश अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी जारी केले आहे.

     महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 च्या अधिकारान्वये जालना शहागड- पैठण रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 29 ऑगस्ट 2023 रोजीच्या सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत अथवा आंदोलन संपेपर्यंत खालील सर्व प्रकारच्या वाहतुकीस नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेशात नमुद केले आहे.

जालना –अंबड-वडीगोद्री शहागड मार्गे बीडकडे जाणारी वाहणे  ही पर्यायी मार्ग अंबड घनसावंगी – आष्टी – माजलगाव मार्गे बीडकडे जाईल.  शहागड मार्गे साष्ट पिंपळगाव – पैठणकडे जाणारी वाहणे ही  पर्यायी मार्ग शहागड-महाकाळा- साष्ट पिंपळगांव मार्गे पैठणकडे जाईल. पैठणकडून शहागडकडे येणारी वाहणे ही पर्यायी मार्ग साष्ट पिंपळगाव – महाकाळा –शहागडकडे जातील.

वरील मार्गाची सर्व प्रकारची ‍ वाहतुक मार्गात  दि. 29 ऑगस्ट 2023 रोजीच्या सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत अथवा आंदोलन संपेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी असे  आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :- ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचणार नाही तो पर्यंत तेथील युवक-युवतीमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होवून खऱ्या अर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती साध्या होणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवस 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा येणार असून क्रीडा सप्ताहाचे आयोजन दि.21 ते 29 ऑगस्ट 2023 या कालावधीत  करण्यात आले आहे. क्रीडा प्रकारात धावणे, चालणे, योगा, फुटबॉल, खो-खो, बँडमिंटन, फेन्टबॉल आदिचे आयोजन करण्यात आले असून खेळात सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे महमंद शेख (8788360313), संतोष वाबळे (7588169493), रेखा परदेशी (9022951924) आणि शेख चाँद (9822456366) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट़ रोजी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू, क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व एकविध क्रीडा संघटना जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद ( हॉकीचे खेळाडू ) यांचा जन्म दिवस दि. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता देवगिरी इंग्लिश स्कुल, अंबड चौफुली, जालना येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये सन 2019-20 पासून राष्ट्रीय शालेय तसेच संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेत प्राविण्य तथा सहभागी  खेळाडूंचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर खेळाडू घडविणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचा ही सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या क्रीडा व  खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो. जोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविले जाणार नाही. तेथील युवक युवतीमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही. तो पर्यंत खऱ्या अर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती साध्य करणे शक्य होणारा नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने सन 1991-92 या वर्षीपासून  दि.12 ते 18 डिसेंबर याकालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सन 2019-20 पासून क्रीडा क्षेत्रात खालीलप्रमाणे कार्य करत असल्याची माहिती दि. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथील संतोष वाबळे, 7588169493 यांच्याकडे सादर करावी.

अ.क्र.

 खेळाडूंची माहिती

क्रीडा मार्गदर्शक माहिती

1

सन 2019-20 व नंतरच्या राष्ट्रीय शालेय तसेच संघटनेमार्फत आयोजित क्रीडा स्पर्धेत प्राविण्य तथा सहभागाचे प्रमाणपत्र झेरॉक्स, ट्रॅकसुट साईज, मोबाईल क्रमांक सादर करावा.

सन 2019-20 व नंतरच्या राष्ट्रीय शालेय तसेच संघटनेमार्फत आयोजित क्रीडा स्पर्धेत आपल्या प्रशिक्षण केंद्रातील खेळलेल्या खेळाडूच्या सहमतीसह प्रमाणपत्र व प्रशिक्षण केंद्राचे ठिकाण, छायाचित्र, ट्रॅकसुट साईज व मोबाईल क्रमांक सादर करावा.

वर्ष 2019-20 व नंतरच्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी विहीत वेळेत माहिती सादर करावी, असेही  प्रसिदीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*- 

मुलांनी व्यसनाधीनतेकडे वळू नये -प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :- किशोरवयीन मुलांनी व्यसनाधीनतेकडे वळू नये, या वयात त्यांना व्यसनाचे आकर्षण होवून व्यसन लागू शकते. त्यामुळे त्यांनी या वयात व्यसनाकडे वळू नये, असे प्रतिपादन प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागानतर्गत नशामुक्त भारत कार्यक्रम सुरू आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांच्या वतीने विभागीय स्तरावरील नशामुक्त कार्यक्रम शासकीय निवासी शाळा बदनापूर जिल्हा जालना येथे आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

 श्रीमती सोनकवडे म्हणाल्या की, स्त्रीला तुलनात्मकदृष्ट्या जास्त ताण-तणावाचा सामना करावा लागतो, तरी त्यांच्यामध्ये व्यसनाचे प्रमाण नगण्य आहे. तसेच सकारात्मक विचारसरणी ठेऊन प्रत्येकाने आपल्या अभ्यासाकडे लक्ष देत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

समाज कल्याण विभाग औरंगाबाद मार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला आविष्कार, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच यावर्षी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी रूपरेषा आखून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

             यावेळी शासकीय निवासी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. जयश्री सोनकवडे यांचे हस्ते निवासी शाळेतील मुलांनी सुरू केलेल्या बँकेचे उद्घाटन करण्यात आले आणि  वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप गिरी यांनी केले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले, आणि बी.एस.सय्यद यांनी मुलांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जयश्री सोनकवडे यांनी मुलांचे शासकीय वसतिगृह बदनापूर येथे भेट दिली. असे सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday 23 August 2023

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

 







जालना, दि. 23 (जिमाका) - विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

***

 

मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


जालना, दि. 23 (जिमाका) :-  राज्यात मध उद्योग हा केवळ शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके व फळबागायतींच्या ठिकाणी व तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाद्वारे पर-परागीभवन होऊन पिकाच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 5 ते 45 टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक आहे. त्यादृष्टीने मधमाशा पालन उद्योग हा सदर उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणुन चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व जिल्ह्यात मधकेंद्र योजना (मधमाशा पालन) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना महाराष्ट् राज्य खादी  व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर जि. सातारा येथे मध संचालनालय कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

अ)   योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता  --1.वैयक्तिक मधपाळ – पात्रता अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त. 2.केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ – व्यक्ती   वैयक्तीक केंद्रचालक (प्रगतीशील मधपाळ) पात्रता – किमान 10 वी पास, वय वर्षे  21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन,प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.  3. केंद्रचालक संस्था :- पात्रता – संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्त्वावर घेतलेली किमान 1 एकर शेतजमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान  1 हजार चौ.फु. सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशपालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले संस्था असावेत. ब) योजनेची वैशिष्टे -मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध  खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणांची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती. क)   अटी व शर्ती  - लाभार्थी निवड प्रक्रीये नंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरु करणे संबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य.           ड) अधिक माहितीसाठी संपर्क :-  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय,   एम.आय.डी. सी. एरिया, प्लॉट नं-7 जालना

फोन नं. 0242-220628 संतोष बगाटे मो.क्र. 982252534,                    Email.Id – dviojalna@rediffmail.com    2. संचालक, मध संचालनालय,  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5      महाबळेश्वर, जिल्हा सातारा पिन – 412806 (दुरध्वनी – 02168-260264), असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Tuesday 22 August 2023

एक दिवसीय युनिसेफ प्रोग्रॅम ऑफिसरची कार्यशाळा संपन्न


 

जालना, दि.22 (जिमाका) :- शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे बुधवार दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी एक दिवसीय युनिसेफ प्रोग्रॅम ऑफिसरची जालना जिल्ह्यातील एकूण 18 संस्थांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम तंत्रनिकेतनचे प्र. प्राचार्य डॉ . निनाद  जावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी जेईएस फार्मसी कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र राठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

 एक दिवसीय प्रशिक्षणाकरिता युनिसेफ-ACWADAM चे मधुकर लेंगरे यांनी युनिसेफ ग्रीन क्लब निर्माण करण्याकरिता आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच यावेळी संस्थेतील प्रा. जयंत पोहनेरकर व प्रा. राजरत्न खिराडे यांनी देखील वेगवेगळ्या सेशन्समध्ये मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाकरिता आर.डी.भक्त पॉलीटेकनिक कॉलेजचे प्रा.राहुल तायडे, सि.पी.कॉलेज ऑफ फार्मसी जालनाचे प्रा. शुभम खैरे, एमएसएस पॉलिटेक्निकचे प्रा. अविनाश दवणे, फार्मसी कॉलेज प्रा. सुनिल जायभाये, व्यवस्थापन कॉलेजच्या प्रा.डॉ.सोनाली राठोड, फार्मसी कॉलेज बदनापूरचे प्रा. परमेश्वर मतलबे, डिजेपी पॉलिटेक्निक कॉलेजचे सय्यद समीर, इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ.एम.एम.जाधव यांची उपस्थिती होती. सादर योजनेत वृक्षारोपण, पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच सदर विषयांशी संबंधित प्रयोग, प्रकल्प सेमिनार, कार्यशाळा यांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सदर UNICEF- YOUTH ENGAGEMENT AND WATER STEWARDSHIP (YEWS ) कार्यक्रम हा राज्यस्तरीय नोडल ऑफिसर डॉ . विठ्ठल बादल यांचे मार्गदर्शनानुसार घेण्यात येत आहे. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

Monday 21 August 2023

क्रीडा स्पर्धा : क्रीडा शिक्षकांची 23 ऑगस्टला बैठक

 

जालना, दि.21 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांच्या विद्यमानाने सन 2023-24 वर्षातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासंदर्भात बुधवार दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता  जिल्हा क्रिडा अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका क्रिडा अधिकारी, तालुका क्रीडा संयोजकांच्या उपस्थितीत जालना तालुक्यातील सर्व शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, सर्व माध्यमांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक असलेल्या शाळा मधील क्रीडा शिक्षकांची, तसेच क्रीडा प्रेमी शिक्षकांची बैठक जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जालना, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                 

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन

 


 

जालना दि.21 (जिमाका) :-  घनसावंगी पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण रुग्णालयाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीच्या गेटजवळील नाल्यात लिंबाच्या झाडाखाली एका अनोळखी अंदाजे 40 ते 45 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास पोलिस ठाणे, घनसावंगी यांना माहिती द्यावी, असे आवाहन घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे यांनी केले आहे.

घनसावंगी पोलिस ठाणे यांनी मरणोत्तर पंचनामा करुन या पुरुषाच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात दि.10 ऑगस्ट 2023 रोजी पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणी दि.10 ऑगस्ट रोजी बुऱ्हाणखाँ उमरखाँ पठाण वय 44 वर्ष यांनी  दिलेल्या खबरीवरुन आमॉ34/2023 कलम 174 सीआरपीसीप्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुरुषाचा मृतदेह अंदाजे उंची 165 सेमी असून पांढऱ्या रंगाचा शर्ट ज्यावर निळ्या रेषा व  निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास किंवा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार असल्यास किंवा गुन्हा दाखल असल्यास पोलिस ठाणे घनसावंगी यांना माहिती द्यावी. माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक पी. डब्ल्यू. त्रिभूवन (मो.9823067443), पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे (मो.8605103703), हेड काँस्टेबल आर.वाय. वैराळ (मो.8668703254) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस उपनिरीक्षक, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-