Friday 4 August 2023

9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन कन्नड येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार दिन


      जालना, दि. 4 (जिमाका) :-   संयुक्त राष्टसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या  ठरावानुसार 9 ऑगस्ट  हा जागतिक आदिवासी दिन म्हणून जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

                 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद अंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश असून 9 ऑगस्ट हा दिवस  जागतिक आदिवासी दिन  हा डीडीएल लॉन्स, गौताळा रोड, कन्नड जि. औरंगाबाद या स्थळी साजरा करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी विद्यार्थी आरोग्य तपासणी कॅम्प, आधार कार्ड नोंदणी, जातीचे दाखले, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांविषयी माहिती शिबीरांचे आयोजन तथा आदिवासी उपयायोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपयायोजना क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीपर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास  औरंगाबाद, लातूर, जालना व बीड या जिल्ह्यातील सर्व आदिवासी बंधू व भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन, प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.                                                                    

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment