Friday 25 August 2023

मुलांनी व्यसनाधीनतेकडे वळू नये -प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :- किशोरवयीन मुलांनी व्यसनाधीनतेकडे वळू नये, या वयात त्यांना व्यसनाचे आकर्षण होवून व्यसन लागू शकते. त्यामुळे त्यांनी या वयात व्यसनाकडे वळू नये, असे प्रतिपादन प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागानतर्गत नशामुक्त भारत कार्यक्रम सुरू आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांच्या वतीने विभागीय स्तरावरील नशामुक्त कार्यक्रम शासकीय निवासी शाळा बदनापूर जिल्हा जालना येथे आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

 श्रीमती सोनकवडे म्हणाल्या की, स्त्रीला तुलनात्मकदृष्ट्या जास्त ताण-तणावाचा सामना करावा लागतो, तरी त्यांच्यामध्ये व्यसनाचे प्रमाण नगण्य आहे. तसेच सकारात्मक विचारसरणी ठेऊन प्रत्येकाने आपल्या अभ्यासाकडे लक्ष देत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

समाज कल्याण विभाग औरंगाबाद मार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला आविष्कार, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच यावर्षी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी रूपरेषा आखून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

             यावेळी शासकीय निवासी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. जयश्री सोनकवडे यांचे हस्ते निवासी शाळेतील मुलांनी सुरू केलेल्या बँकेचे उद्घाटन करण्यात आले आणि  वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप गिरी यांनी केले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले, आणि बी.एस.सय्यद यांनी मुलांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जयश्री सोनकवडे यांनी मुलांचे शासकीय वसतिगृह बदनापूर येथे भेट दिली. असे सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment