Thursday 3 August 2023

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत “शासन आपल्या दारी” अंतर्गत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जबाबदारी व समन्वयाने कामे करावीत - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


17 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमासाठी विविध समित्या गठीत

 

जालना, दि. 3 (जिमाका) :-  शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शहरात गुरुवार, दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी  नियोजित कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने व समन्वयाने सोपविलेली कामे पार पाडावीत. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर, लाभार्थी व नागरिक यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.

जालना शहरातील नवीन मोंढा रोड परिसरात  दि. 17 ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारीउपक्रमातंर्गत प्रशासनाच्यावतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  जिल्हा प्रशासनाने  विविध समित्यांची स्थापना केली आहे.  या समित्यांकडे सोपविलेल्या कामांबाबत सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. बैठकीस  प्रभारी अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे विभागीय जनसंपर्क अधिकारी दादासाहेब थेटे  आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विस्तार अधिकारी, कृषी, महसूल व इतर सर्व विभागांचे अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते.            

जालना शहरातील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासनाने मुख्य संनियंत्रण समिती, पत्रिका वाटप करणे समिती, कंट्रोल रुम, लाभार्थी नियोजन समिती, कार्यक्रमस्थळी मंडप व्यवस्था, देखभाल व तयारी समिती, स्टॉल व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅड व्यवस्थापन, स्वागत समिती, बैठक व्यवस्था, व्यासपीठ व्यवस्थापन, बॅनर/फ्लेक्स व्यवस्थापन, भोजन, पाणी व्यवस्थापन, अग्निशमन, स्वच्छता व्यवस्थापन, प्रचार-प्रसिध्दी, आरोग्य व्यवस्था, वीज व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदी समितीची स्थापन करण्यात आली असून या समिती अंतर्गत विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी  शासन आपल्या दारीहे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या अनुषंगाने जालना शहरात दि. 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कामनिहाय स्थापन करण्यात आलेल्या समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  समन्वयाने कामे करावीत. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कुठलीही उणीव भासू देऊ नये. कार्यक्रम उत्कृष्ट पध्दतीने पार पडेल, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमास उपस्थित राहणारे मान्यवर, लाभार्थी, नागरिक यांची बैठक व्यवस्था तसेच वाहनांचे पार्किंग, स्टॉल व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य व्यवस्था, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन, स्वच्छता आदी बाबी कार्यक्रम स्थळी व्यवस्थित असतील, याची संबंधित समिती प्रमुख व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. यासाठी सर्वांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून सुक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.  यावेळी श्री. थेटे यांनीही मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment