Friday 18 August 2023

जालना जिल्ह्यात शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करणार - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 




       जालना, दि.18 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज  आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, संपादक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत.  या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतील. जालना जिल्हा रेशीम शेतीमध्ये प्रगती करीत आहे. आपला जिल्हा रेशीम शेतीत राज्यात पहिल्या क्रमाकांवर आणण्याचा मानस आहे. रेशीम हातमाग, रो मटेरियल निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील मुख्य शेती उत्पादन असणारे मोसंबी, द्राक्षे व मिरची यांचे प्रक्रिया उद्योग स्थापित करता येतील का, याचीही चाचणी केली जाईल. 

जालना शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, मोकळ्या जागा, अतिक्रमण, भटके जनावरे,  रस्ते अपघाताबाबत उपाययोजना याबाबत ठोस कार्यवाही केली जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शहरातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतील.  शहरातील सीसीटिव्हीचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल.   पाणीपुरवठा योजनेसाठी शासनस्तरावर प्रलंबित प्रस्तावाची माहिती घेवून सुधारीत प्रस्ताव दाखल करण्यात येतील. जाळीचा देव तिर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न केला जाईल. मत्स्योदरी देवी मंदिराचा विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात येईल.  तसेच  श्रीक्षेत्र  राजुरेश्वर संस्थानची कामे प्रगतीपथावर नेवून मंदिराच्या परिसरात विकासात्मक कामांचे नियोजन केले जाईल. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावे टँकरमुक्त केली जातील. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पातंर्गत विविध कामे झाली आहेत.  या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना समृध्द केले जाईल.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment